वेडात मराठे वीर दौडले सात.. नेमकं काय?
सालाबादप्रमाणे नेसरीच्या खिंडीत धारातीर्थी पडलेल्या "त्या" सात नावांची पोस्ट अजूनही फिरते आहेच. म्हणून पुन्हा एकदा हा लहानसा शैक्षणिक धडा-
१) विसाजी बल्लाळ २) दीपोजी राउतराव ३) विठ्ठल पिलदेव अत्रे. ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्दी हिलाल ६) विठोजी शिंदे आणि ७) सरनौबत कडतोजी उर्फ प्रतापराव गुजर.
ही सात नावे, पैकी पहिली सहा नावे नेसरीच्या खिंडीत प्रतापरावांसोबत धारातीर्थी पडल्याचा कसलाही पुरावा नाही. किंबहुना यातलं एक नाव, विठोजी शिंदे हे सर्जखानाशी लढताना आधीच मारले गेले होते, ते नेसरीत असणं केवळ आणि केवळ अशक्य आहे.
मग ही सहा नावे खोटी आहेत का?
अजिबात नाही. ही नावे, या व्यक्ती खरंच प्रतापराव गुजरांसोबत सैन्यात होत्या. जयराम गंभीरराव पिंड्ये नावाच्या शिवरायांच्या समकालीन कवीने पर्णालपर्वत ग्रहणाख्यान नावाचं एक काव्य रचलं आहे ज्यात कोंडाजी-अण्णाजी दत्तोंनी पन्हाळगड जिंकून घेतला ती मुख्य हकीकत आहे. या हकीकतीनंतर, जेव्हा पन्हाळा हातचा गेला हे पाहून आदिलशहाने अब्दूलकरीम बहलोलखानास महाराजांवर पाठवलं, आणि वाटेतच उमराणीला प्रतापरावांनी बहलोलचा पराभव केला तीही हकीकत दिली आहे. वर उल्लेखलेले सहाही जण या युद्धात प्रतापराव गुजरांसोबत असल्याचा या काव्यात उल्लेख आहे. उमराणीला हाती आलेला बहलोल सोडून दिला म्हणून महाराज वैतागले, आणि नंतर नेसरीचा प्रसंग घडला आदि जयरामाने काहीही दिलेलं नाही.
पण कोणीतरी उगाच या सहा मुख्य सरदारांना नेसरीच्या प्रसंगाशी जोडून अफवा उठवली जी वाऱ्यावर वेगाने पसरते आहे. प्रतापराव गुजर सहा सैनिकांनीशी मारले गेले हे केवळ एका इंग्रजी पत्रात असून इतरत्र याला कुठेही दुजोरा नाही. त्यातही, त्या सहा जणांची नावे इतिहासाला माहीत नाहीत.
आता आणखी एक गंमत सांगतो. प्रतापराव केवळ सहा सैनिकांनीशी मारले गेले ही सत्य घटना असली तरीही अपल्याकडे भाषा किती महत्वाची असते पहा. खालच्या दोन्ही फोटोंवरून आपल्याला हे समजून येईल. पहिला फोटो आहे मूळ इंग्रजी पत्राच्या मजकुराचा. तर दुसरा आहे त्याच्या मराठी भाषांतराचा. या दोन्हीत थोडी तफावत आहे. ही जाणूनबुजून नक्कीच केली नाहीये, कारण सुदैवाने जुन्या इतिहास संशोधक-संपादक मंडळींना ना जातीयवादाचा वारा लागलेला होता ना अहंभावाचा! ना झटपट प्रसिद्धीचा ना वैचारिक गुलाम होण्याचा. त्यामुळे हे केवळ wrong choice of words इतकंच म्हणावं लागतं.
तर, पहिल्या फोटोतली ओळ अशी आहे- "Pertab Roy who fell in the encounter of Sevajees army with Bullool Ckaun in a narrow passage betwixt two hills who with six horsemen more were slaine."
याचं भाषांतर करताना पत्रसारसंग्रहाच्या संपादकांनी असं केलं आहे- "प्रतापराव बहलोलखानाशी एका खिंडीत फक्त ६ खोडेस्वारांनीशी लढताना बाकीचे सैन्याचे मदतीचे अभावी मारला गेला."
आता इथे चूक काय झाली सांगतो. संपादकांनी आपल्या मनाने (किंवा त्या ओघात) "फक्त" हा शब्द घातला अन वाक्यरचना बदलली.
वरच्या इंग्रजी मजकुराचं योग्य भाषांतर असं हवं होतं:
"एका अरुंद खिंडीत बहलोलखानाशी लढताना प्रतापराव आणि आणखी सहा सैनिक मारले गेले", किंवा, "बहलोलखानाशी एका अरुंद खिंडीत लढताना प्रतापराव सहा सैनिकांनीशी मारले गेले."
फक्त सहा घोडेस्वारांनीशी लढताना म्हटलं की असं होतं, तिथे तेवढंच सैन्य होतं त्यांच्यासोबत, जी गोष्ट मुळात दिसत नाही. प्रतापराव सेनापती होते. खुद्द जासुदांचा नाईक (या वेळेस बहिर्जी जाधव) सेनापतीच्या दिमतीला असे. त्यामुळे प्रतापराव गाफील असणं वगैरे संभवत नाही. का? सोदाहरण स्पष्ट करतो. मे १६६५ मध्ये पुरंदरला मोंगलांचा वेढा पडला असताना एके रात्री गडावरून मराठ्यांची एक तुकडी अचानक खाली आली आणि शत्रूवर तुटून पडली. शत्रू सावध होताच हे मराठे गडावर परत फिरले. यात एकंदर चार मराठे मारले गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मराठे उतरले आणि आधी पडलेल्या चार जणांची प्रेतं वर न्यायला पाहू लागले, त्यात आणखी चार मारले गेले. आता या दोन्ही वेळेस गडावरून केवळ ४-४ जण खाली लढायला उतरले असं आपण म्हणणार का? मुरारबाजी उतरले ते ७०० जण घेऊन आणि त्यात मुरारबाजींसह आणखी ४०० जण पडले. म्हणजे गडावरून तेवढेच उतरले असा अर्थ होत नाही. त्यामुळे, प्रतापराव सहा जणांनीशी पडले हे खरं असलं तरी ते केवळ तेवढेच घेऊन लढायला गेले असं नाही, आणि त्या सहा जणांची नावंही आपल्याला माहीत नाहीत.
तेव्हा, कोणी हा मेसेज पुन्हा पसरवल्यास त्याला सत्य सांगुया. पुराव्यांवर आधारित इतिहासावरच विश्वास ठेवूया.
© कौस्तुभ कस्तुरे
.png)


