बाळाजी विश्वनाथ - सबनीस ते पेशवा
पेशवा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे थोरल्या बाजीरावांचं. त्या अलीकडे पेशवापदी कोण होतं हे अनेकदा माहीत नसतं अथवा हे पद अस्तित्वात होतं का नाही याबद्दलही सहसा कल्पना नसते. खरं सांगायचं तर बाजीरावांच्या आधी या पदावर किमान सात पेशवे होऊन गेले होतेहे सांगितलं तर कोणाचाही चटकन विश्वास बसणार नाही.
पेशवा या शब्दाचा मूळ अर्थ आहे पेश करणारा अथवा अग्रणी असणारा, थोडक्यात सर्वात वरचा. सुलतानी अंमलात 'वझीर' जो असायचा तोच थोडक्यात पेशवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर कानुनजाबीता रुजू करून, विशेषतः रघुनाथ पंडित आणि धुंडिराज व्यासांकरवी राज्यव्यवहारकोश तयार करून अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना संस्कृतप्रचुर शुद्ध मराठी शब्द बहाल केले. पेशवा या शब्दाचं नवं रूप झालं 'मुख्य प्रधान'. अष्टप्रधान मंडळ हे खरंतर राजांचं प्रमुख मंत्रिमंडळ, त्या अष्टप्रधान मंडळातही मुख्य प्रधान म्हणजेच पेशवा. स्वराज्याच्या पहिल्या पेशव्यांचं नाव शामराज निळकंठ. त्यानंतर नरहरी आनंदराव, मोरोपंत पिंगळे, निळो मोरेश्वर, शंकराजी नारायण, बहिरो मोरेश्वर अशी अनेक माणसं या पदावर येऊन गेली. पण "पेशवाई" हा शब्द जेव्हा येतो तेव्हा तो श्रीवर्धनकर भट घराण्याने इ.स. १७१३ ते १८१८ अशी एकशेपाच वर्षे हे पद सांभाळलं त्यासंबंधी असतो. या पेशवाईचा मूळ पुरुष म्हणजे बाळाजी विश्वनाथ पेशवे. थोरल्या बाजीरावांचे वडील. या भट-पेशवे घराण्यातील पहिल्या पेशव्याची पार्श्वभूमी आणि त्यांचा पेशवाईपर्यंतचा प्रवास आपण या लेखात थोडक्यात पाहणार आहोत.
बाळाजी विश्वनाथांचा जन्म हा कोकणातील श्रीवर्धनचा. नेमकं जन्मसाल किमान अजूनतरी निश्चितरित्या उपलब्ध नाही पण चालत आलेल्या आख्यायिका आणि दंतकथांवरून हे साल १६६० असावं. बाळाजींचे पणजोबा, महादजी विसाजी यांच्या काळापासून, किंवा कदाचित आधीपासूनही, श्रीवर्धनची देशमुखी भट घराण्याकडे होती. यांचे पुत्र परशुरामपंत भट हे थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत चाकरीस राहिले, आणि या परशुरामपंतांच्या मुलाला, विसाजीपंतांना शिवाजी महाराजांनी दोन हजार फौजेची सरदारी सांगितल्याची नोंद या घराण्याच्या हकीकतीत आहे. हे विसाजी-विश्वनाथ म्हणजेच बाळाजींचे वडील. बाळाजी विश्वनाथ आणि त्यांचे भाऊ श्रीवर्धन आणि पंचमहाल येथील देशमुखी करत असताना सिद्दीची गैरमर्जी त्यांच्यावर झाली आणि यांच्या मर्जीतल्या संभाजीपंत मोकाशींना हिशोबाच्या कारणावरून जंजिरेकर सिद्दीने गोणत्यात घालून समुद्रात बुडवलं. सिद्दीची ही दहशत वाढत चालली तेव्हा अखेरीस बाळाजी विश्वनाथ आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह श्रीवर्धहून निघाले आणि वेळासला भानूंकडे येऊन थांबले. तिघंही भानू भावांनी बाळाजी विश्वनाथांची मदत करण्याचं ठरवलं आणि हे सारे देशावर राजाराम महाराजांच्या फौजेत सामील होण्यासाठी निघाले. तिवऱ्याच्या घाटाने वर येण्याचा बेत असतानाच सिद्दीने अचानक बाळाजीपंतांना अटक केलं, पण पंचविस दिवसांच्या कैदेनंतर भानू बंधूंनी किल्लेदाराला वश करून बाळाजींची सुटका करवून घेतली. यानंतर त्रिवर्ग भानू बंधू आणि बाळाजी विश्वनाथ हे थेट घाटावर येऊन सासवड मुक्कामी येऊन थांबले.
सासवडच्या पुरंदऱ्यांचा आणि बाळाजी विश्वनाथांचा पूर्वीपासून स्नेह असावा असं वाटतं. पुरंदऱ्यांच्या घराण्यातील त्र्यंबक भास्कर हे शिवाजी महाराजांच्या काळात सुभेदार होते. पुढे त्यांचे पुत्र तुकदेव त्र्यंबक आणि अंबाजी त्र्यंबक हे देखील तसेच कर्तबगार निपजले. बाळाजी विश्वनाथांच्या आजोबांचा-वडिलांचा शिवाजी महाराजांच्या कारभारात प्रवेश झाला तेव्हापासून भट-पुरंदरे संबंध प्रस्थापित झाले असं दिसतं. बाळाजीपंत आणि भानू बंधूंना पुरंदऱ्यांनी आपल्या वाड्यात आश्रय दिला. भानू बंधूंची ओळख साताऱ्यात महादजीपंत जोशी सावकार यांच्याशी असल्याने त्यांच्या मध्यस्तीने आणि अंबाजीपंतांच्या ओळखीने बाळाजी विश्वनाथ सुरुवातीला भोरच्या शंकराजी नारायण पंतसचिव यांच्याकडे फडावर कारकून म्हणून राहिले. पुढे रामचंद्रपंत अमात्यांकडेही बाळाजींनी कोठी म्हणजे धान्यगाराच्या हिशोबासंबंधी नोकरी केली. या सगळ्यात धनाजी जाधवरावांनी बाळाजी विश्वनाथांची हुशारी पाहून आपल्या फौजेच्या सबनिशीवर त्यांना नेमलं. अर्थात ही सबनिशी देखील काही काळच असावी असं दिसतं, कारण बाळाजींच्या काम करण्याच्या पद्धतीने आणि हुशारीनमुळे ते साऱ्यांच्या नजरेत भरले आणि त्यांच्या कारकिर्दीची कमान चढतच राहिली.
इ.स. १६९९ ते १७०३ या काळात बाळाजी पुणे सुभ्याचे सरसुभेदार होते. इ.स. १७०२ साली औरंगजेबाचा वेढा सिंहगडाला पडला आणि धनाजी जाधवरावांनी हा वेढा मोडून काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा धनाजी जाधवरावांच्या दिमतीला बाळाजी विश्वनाथ असल्याचा उल्लेख सापडतो. यापुढची चार वर्ष, इ.स. १७०३ ते १७०७ या काळात बाळाजी सुभे दौलताबादचे सरसुभेदार होते. या सुभेदारीनंतर बाळाजी बहुदा पुन्हा धनाजी जाधवरावांच्या सेवेत जमाबंदीच्या कामावर दाखल झाले.
इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी भांडणं सुरु झाली तेव्हा उत्तरेत जाताना माळव्यात दोराहा येथे शाहजादा आझमने शंभूपुत्र शाहू महाराजांची सुटका केली. शाहू महाराज सुटून आल्यावर त्यांना लांबकानीच्या मुक्कामी जाऊन मिळणारा सगळ्यात पहिला सरदार होता मल्हार तुकदेव पुरंदरे, अंबाजीपंत पुरंदऱ्यांचा सख्खा पुतण्या. पुढे नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर वगैरे अनेक सरदार जमा झाले. बाळाजी विश्वनाथ पुणे आणि दौलताबादचे सरसुभेदार असल्यापासून महाराष्ट्रात असलेल्या औरंगजेबाच्या छावणीतील शाहूराजांशी त्यांचा संबंध आला असण्याची दाट शक्यता आहे. औरंगजेबाच्या पुढच्या बादशहांनी स्वराज्याच्या सनदा देण्यापूर्वी आधी उत्तराधिकारी कोण हे ठरवा असं म्हटल्याने राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई आणि शाहूराजे यांच्यात कलह निर्माण झाला. ताराबाईंनी आपल्या पुत्राच्या नावे, शिवाजी महाराजांच्या नावे सनदांची मागणी केली आणि महाराष्ट्रात आलेले शाहू महाराज खरे नसून तोतया आहेत असं म्हटलं. शाहू महाराज स्वराज्यात येत आहेत हे पाहून ताराबाईंनी धनाजी जाधवराव, प्रतिनिधी वगैरे लोकांना त्यांच्यावर रवाना केलं खरं, पण खेड मंचरच्या या लढाईत धनाजी जाधवराव सेनापती ऐनवेळेस शाहू महाराजांच्या पक्षास मिळाले आणि प्रतिनिधी पळून गेले. पुढे शाहू महाराजांनी साताऱ्यास आपली राजधानी केली तर ताराबाईंनी पन्हाळा आपल्या राज्याची नवी राजधानी केली.
इ.स. १७१० मध्ये धनाजी जाधवराव मृत्यू पावल्यावर त्यांच्या पुत्राला, चंद्रसेन जाधवांना सेनापतिपद मिळालं, आणि शाहू महाराजांनी "सेनाकर्ते" हे पद बाळाजी विश्वनाथांना दिलं. सेनाकर्ता म्हणजे सैन्य ज्याच्या लगामी आहे अशी व्यक्ती, राजांनी नेमलेला खास माणूस अशा अर्थाने. राज्यव्यवहारकोशात "हुकूमत' म्हणजे "सेनाकर्ता" असं म्हटलं आहे. पूर्वी हुकुमतपनाह हे पद राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत अमात्य यांना दिलं होतं, आणि आता अमात्य ताराबाईंच्या पक्षात असल्याने आपल्याकडचं हे पद शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना दिलं, आणि यासोबतच पंचवीस लक्षांचा सरंजाम दिला.
इ.स. १७१३ मध्ये कान्होजी आंग्र्यांनी कोकणातील किल्ले घेतानाच कल्याण भिवंडी प्रांतही आपल्या ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांच्या काळापासून कल्याण भिवंडी वगैरे सारा प्रांत पेशव्यांकडे असल्याने शाहू महाराजांचे तत्कालीन पेशवे बहिरोपंत आंग्ऱ्यांवर स्वारी करून निघाले. पण वाटेत लोहगडाच्या आसपास कान्होजींनी अचानक छापा घालून बहिरोपंतांनाच कैद केलं. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना आंग्ऱ्यांवर स्वारी करायला सांगितली. बाळाजींनी लढण्यापेक्षा कान्होजींसारखा जबरदस्त योद्धा शाहू महाराजांच्या पक्षात असल्यास उत्तम हा विचार करून आंग्ऱ्यांशी बोनी सुरु केली, आणि अखेरीस तह करून सलोखा निर्माण केला. कान्होजी आंग्रे ताराबाईंचा पक्ष सोडून शाहू महाराजांचे 'सरखेल' झाले. बहिरोपंत महाराजांच्या मनातून उतरले आणि सुरुवातीपासूनचा असलेला विश्वास अधिक वाढल्याबद्दल शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना दि. १७ नोव्हेंबर १७१३ रोजी आपले पेशवेपद बहाल केले. परशुरामपंत प्रतिनिधी, अंबाजीपंत पुरंदरे आदी साऱ्यांनीच बाळाजी विश्वनाथच पेशवेपदासाठी योग्य आहेत असा निर्वाळा दिला असल्याने महाराजांच्या मनात काही शंका नव्हती. बाळाजींनी आधीचे उपकार लक्षात ठेऊन अंबाजीपंत पुरंदऱ्यांना महाराजांकडून आपली मुतालकी आणि तर भानूंना लोहगड-नाणे मावळचे सबनिशी आणि मुजुमदारी देवविली.
इ.स. १७१६ मध्ये रामचंद्रपंत अमात्यांच्या पदरच्या दामाजी थोरातांनी शाहू महाराजांविरुद्ध आघाडी उघडली तेव्हा त्यांना समजवायला गेलेल्या बाळाजी विश्वनाथांना कबिल्यासह थोरातांनी हिंगणगावच्या गढीत कैद केलं, आणि पैशासाठी साऱ्या कुटुंबाचे हाल केले. अंबाजीपंत आणि पिलाजी जाधवरावांनाही यावेळेस थोरातांनी अडवून धरलं तेव्हा हे दोघे पैशाची व्यवस्था करतो म्हणणं बाहेर पडले. शाहू महाराजांच्या आज्ञेनुसार खंडणी भरून आधी त्यांनी बाळाजी विश्वनाथ आणि कबिल्याची सुटका केली, नेमकं हे होतानाच भोरचे नारो शंकर सचिव बाळाजींना सोडवायला गेले असता थोरातांनी त्यांनाही कैद केलं. अखेरीस बाळाजींनी फौजेसह हल्ला करून थोरातांचा पराभव केला, आणि सय्यद बंधूंच्या फौजेच्या मदतीने हिंगणगावची गढी पाडून टाकून थोरातांना कैद केलं. या वेळेस पुरंदर किल्ला बाळाजींनी आपल्याकडे मागून घेतला. कृष्णराव खटावकरांचं बंड देखील बाळाजी विश्वनाथांनी मोडलं.
इ.स १७१६ मध्ये फर्रुखसियर बादशाह सय्यद बंधूंच्या मदतीने गादीवर आला खरा, पण हे सय्यद बंधू आपल्याला गादीवर बसवू शकतात तसे आपल्याला काढून दुसऱ्या एखाद्यालाही ते गादी देऊ शकतात असं म्हणून फर्रुखसियरने सय्यद हुसेनअलीला दक्षिणेत पाठवलं, आणि दुसरीकडे दक्षिणेचा सुभेदार दाऊदखान याला अंतस्थ कळवलं की हुसेनअलीला कारभार सुपूर्द करू नकोस. यात दाऊदखान आणि हुसेनअली यांच्यात युद्ध होऊन दाऊदखान मारला गेला. सय्यद बंधूंना बादशहाचा हा कावा समजून त्यांनी काशीत असलेल्या शंकराजी मल्हारकरवी शाहू महाराजांशी थेट बोलणी सुरु केली. महाराजांनी चौथाई, सरदेशमुखी आणि स्वराज्याच्या सनदा मागितल्या. सय्यद बंधूंनी आपल्याला मदत करण्याच्या मोबदल्यात बादशहाकडून या सनदा मिळवून देण्याचं कबूल केलं. शाहू महाराजांनी इ.स. १७१८ मध्ये बाळाजी विश्वनाथ यांना फौजेसह दिल्लीत जाऊन आपली राजकारणं तडीस न्यायला सांगितलं. सोबत खंडेराव दाभाडे सेनापती, उदाजी पवार, संताजी आणि राणोजी भोसले वगैरे खाशी खाशी मंडळी दिली. ही सारी फौज दिल्लीत गेल्यावर फर्रुखसियरने मराठ्यांना सनदा देण्यास नकार दिला तेव्हा सय्यदांनी बादशहाला पदच्युत करून, रफीउद्दरजत नावाचा नवा बादशाह बसवून त्याकरवी या सनदा बाळाजी विश्वनाथांना सुपूर्द केल्या. दि. ३ आणि १५ मार्च रोजी अनुक्रमे चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा बाळाजींनी दिल्ली दरबारात घेतल्या. या वेळेस प्रतिपक्षाकडून बाळाजींचा दिल्लीत घातपाताने खून करण्याचा कट रचला गेला होता, पण नेमकं बाळाजींच्या पालखीत बसलेले बाळाजी महादेव भानू (नाना फडणीसांचे आजोबा) हे या कटात मारले गेले. संताजी भोसलेही मारले गेले. या साऱ्या प्रकरणात एकोणीस वर्षांचे बाजीराव देखील बाळाजी विश्वनाथांसोबत दिल्लीत गेले होते. पुढे बाजीरावांनी थेट दिल्लीवर हल्ला चढवण्यामागचं हे देखील एक कारण आहे. इथपासूनच दिल्ली नेमकी काय आहे हे बाजीरावांनी पुरते ओळखले होते. दि. २२ मार्च १७१९ला दिल्ली सोडून पुढे काशीयात्रा करून जुलै महिन्यात बाळाजी पुन्हा महाराष्ट्रात आले. त्यांच्या या मोठ्या मोहिमेबद्दल आणि भरीव कामगिरीबद्दल शाहू महाराजांनी दि. ४ जुलै रोजी दरबारात आपल्या या पेशव्याचा मोठा सत्कार केला.
इ.स. १७१९च्या पावसाळ्यानंतर बाळाजींनी पुन्हा महाराष्ट्रात शाहू महाराजांचा जम बसवायला आणि बंडखोरांचा बंदोबस्त करायला सुरुवात केली. बेळगाव, डिग्रज ते सांगली-कोल्हापूर वगैरे भागातील बंडखोरांचा बंदोबस्त करण्यात आला. १७२०च्या मार्च महिन्यात इस्लामपूरजवळ कोल्हापूरकर संभाजीराजांशी बाळाजी विश्वनाथांची लढाई झाली, ज्यात बाळाजींचा जय झाला. तिथून पुढे ते साताऱ्याला महाराजांचं दर्शन घेऊन सासवडला येतात न येतातब तोच आठवड्याच्या आत, दि. २ एप्रिल १७२० रोजी सासवड मुक्कामी त्यांचा मृत्यू झाला. बाळाजी विश्वनाथ सगळ्यात आधी काही काळ सासवडला पुरंदऱ्यांच्या कोटात राहत होते, तिथून पुढे त्यांनी एक-दोन वर्षे सुप्याला कोट बांधून वास्तव्य केलं आणि पुन्हा सासवडला नवा वाडा बांधला अशा काही नोंदी सापडतात. सासवड आणि सुपे ही दोन्ही गावे शाहू महाराजांनी बाळाजींना इनाम दिली होती. शिवाय कार्यात सासवडचे देशकुलकर्ण्य आणि कसबे सासवडचे कुलकर्ण्य हे पुरंदऱ्यांकडे होते.
बाळाजी विश्वनाथांची दोन लग्नं झाली असावीत असा तर्क राजवाड्यांनी दिला आहे, पण त्याला ऐतिहासिक आधार काही नाही. त्यांच्या पत्नीचे नाव राधाबाई, विश्वास उर्फ बाजीराव सर्वात थोरला मुलगा, त्यानंतर अंताजी उर्फ चिमणाजी (चिमाजीअप्पा), भिऊबाई आणि अनुबाई अशी चार अपत्य बाळाजींना होती. त्यांनी अगदी शिवाजी महाराजांची अखेरची कारकीर्द आणि संभाजी महाराजांची कारकीर्द किमान ऐकली असं म्हणता येऊ शकतं. पुढे राजाराम महाराजांच्या काळात ते घाटावर येऊन स्वराज्याच्या सेवेत आल्यानंतर मोंगलांची कारभाराची पद्धत, रामचंद्रपंत अमात्य आणि धनाजी जाधवरावांसारख्या मुत्सद्दी लोकांची कारभाराची पद्धत आदी सगळं जवळून पाहिलं. याचाच उपयोग त्यांना पुढे शाहू महाराजांचं आसन बळकट करण्यात झाला. खुद्द शाहू महाराजांनी बाळाजींचा उल्लेख एका पत्रात "अतुल पराक्रमी सेवक" असा केला आहे. एकंदरीतच, भट-पेशवे घराण्याच्या या प्रथम पेशव्याने केवळ सात वर्षेच ती काय पेशवाई अनुभवली, पण या सात वर्षात पुढे उभ्या राहिलेल्या वटवृक्षाची पाळेमुळे कणखर केली.
- कौस्तुभ कस्तुरे
(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या जानेवारी २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)