मोहिनी
मोहिनी म्हणजे एखाद्याला संमोहित करणारी, मोहात पाडणारी. हे खरंतर विष्णूचं स्त्रीरूप आहे. महाभारत आणि इतर पुराणांत मोहिनीच्या अनेक कथा आहेत.
आदिपर्वात समुद्रमंथन प्रसंगात आलेल्या वर्णनाचा सारांश असा: जेव्हा अमृतासाठी देव-दानवात वाद पेटला, अन दानवांनी अमृतकुंभ पळवला तेव्हा देवांनी भगवान विष्णूंची आराधना केली. भगवान विष्णू एका अत्यंत मोहक, सुंदर अशा 'मोहिनी'रुपात अवतरले, अन दानवांकडे गेले. मोहिनीच्या अदांनी घायाळ झालेल्या दानवांनी बेसावधपणे अमृतकुंभ मोहिनीकडे सुपूर्द केला, अन पुढे देवांनी मोहिनी अर्थात विष्णुकडून हे अमृत घेऊन प्राशन केलं. हीच कथा काहीशा फरकाने, विस्तृत प्रमाणात रामायणाच्या बालकांड, विष्णू पुराण, पद्म पुराण आणि भागवत पुराणातही येते.
विष्णू पुराणात मोहिनीच्या आणखी काही 'माया' दर्शवल्या आहेत. उदाहरणार्थ भस्मासुर नावाचा राक्षस शिवशंकराकडून वरदान घेतो की तो ज्याच्या मस्तकी हात ठेवेल त्याचं भस्म होईल. भस्मासुर अहंकारात इतका आंधळा होतो की ज्या शिवाने हे वरदान दिलं त्यांनाच भस्म करायला जाऊ पाहतो. शिवशंकर विष्णूची मदत मागतात, अन विष्णू मोहिनीरुपात भस्मासुरासमोर जातात. भस्मासुर मोहिनीच्या अत्यंत मोहक रुपाला भुलतो, अन तिच्याशी विवाहाची इच्छा धरतो. या साऱ्यात, मोहिनी नृत्याच्या नादात स्वतःच्या मस्तकावर हात ठेवते. तिच्या तालावर नाचणारा भस्मासुरही स्वतःच्या मस्तकी हात ठेवतो आणि स्वतःच भस्म होऊन जातो.
गणेश पुराणात विरोचनवधाच्या प्रसंगात, सूर्याकडून शक्तिशाली मुकुट मिळालेल्या विरोचन असुराला विष्णू मोहिनीरूपात येऊन भुलवतात आणि त्याचा पराभव करतात.
ब्रह्मांड पुराणात शिव-पार्वती विष्णूच्या भेटीला गेले असताना, पूर्वी कधी नारदमुनींच्या सांगण्यावरून शिवाने जे काही मोहिनीबद्दल ऐकलेलं असतं ते प्रत्यक्षात पाहण्याची त्यांना उत्कंठा लागते. शंकर विष्णूंना मोहिनी अवतार धारण करण्याबद्दल विनावतात. विष्णू जेव्हा हा अवतार धारण करतात तेव्हा साक्षात शिव सुद्धा तिच्यावर भाळतात, तिला मिठीत घेतात असा प्रसंग दर्शवला आहे. असाच प्रसंग अग्नी पुराणात अन शिव पुराणातही आहे. शिवशंकराच्या वीर्यस्खलनाने 'स्कंद' आणि 'हनुमान' जन्माला आले असं ब्रह्मांडपुराण, तर अग्नी आणि शिवपुराण 'लिंग' आणि 'हनुमान' जन्माला आले असं सांगतात.
स्कंद पुराणात मोहिनी रूपातील विष्णू हे काही प्रमाणात आपलं कर्तव्य विसरलेल्या, आणि स्वतःला देव समजू लागलेल्या ऋषींना धडा शिकवण्यासाठी शिवाच्या सहाय्याला आले असं दर्शवलं आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात मात्र मोहिनी हे विष्णूचं रूप न मानता शंकराने निर्माण केलेली, ब्रह्माला भुलवण्यासाठी ही एक अप्सरा असल्याचं दर्शवलं आहे.
एकंदरीत, मोहिनी ही भगवान महाविष्णूची माया. जिच्या अप्रतिम सौंदर्याला केवळ दानवच नाही, तर देवही भुलले. अशी ही मोहिनी- दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयातली.
- कौस्तुभ कस्तुरे
.png)

