विश्वासराव बल्लाळ


पूर्वी नातवाच्या जन्माआधी आजोबा मृत्यू पावले असल्यास नातवाला आजोबांचं नाव देण्याचा प्रघात होता. बाळाजी विश्वनाथ भटांच्या घराण्यातही ही परंपरा आढळते. विश्वास उर्फ विश्वनाथपंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्राने, बाळाजींनी आपल्या थोरल्या मुलाचं नाव आपल्या वडिलांच्या आठवणीत विश्वास असं ठेवलं. हे विश्वासराव म्हणजे पुढे प्रसिद्धीस पावलेले थोरले बाजीराव पेशवे. गंमत वाटली ना? आता उलगडा झाला का, की पुढे बाजीरावांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी जन्माला आलेल्या आपल्या थोरल्या पुत्राचं नाव नानासाहेब पेशव्यांनी विश्वास का ठेवलं? हे धाकटे विश्वासराव पुढे पानिपतात मृत्यू पावले. म्हणजेच, पानिपतावर मृत्यू झालेल्या या विश्वासरावांचं नाव त्यांच्या आजोबांच्या, म्हणजेच थोरल्या बाजीरावांच्या मूळ नावावरून- विश्वास या नावावरून ठेवण्यात आलं होतं. शाहू महाराजांच्या आणि बाळाजी विश्वनाथांच्या रोजकीर्दीतही १७२०च्या पूर्वी अनेक ठिकाणी बाजीरावांचं नाव विश्वासराव बल्लाळ असंच आढळतं. 



वर दिलेलं पत्रं हे पुरंदरे दप्तरातलं अश्विन वद्य दशमी राज्याभिषेक शके ४५ म्हणजेच ८ ऑक्टोबर १७१८चं छत्रपती शाहू महाराजांचं एक पत्र आहे, ज्यात जुन्नर प्रांतातल्या पिंपळनेर गावची मोकासदारी विश्वासराव बल्लाळ (म्हणजेच बाजीराव) यांना देण्यात येत असल्याचं त्या गावच्या पाटलाला कळवण्यात आलं आहे. या पत्रावर खाली डावीकडे बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचा शिक्का असून त्याच्या बाजूला उजवीकडे श्रीपतराव प्रतिनिधी यांचा शिक्का आहे.    

- कौस्तुभ कस्तुरे