गारदी आणि पेशव्यांवरील खुनी हल्ले


गारदी हे प्रकरण म्हणजे आजच्या पाळलेल्या गुंडांसारखं होतं. राजकारणात असे कणखर गुंड प्रत्येक राजकारण्यांकडे असतातच हे आपण सारेच जाणतो, विशेषतः जेव्हा शत्रू अशा गोहस्तींचा अवलंब करतो तेव्हा तुमच्याकडेही अशी माणसं मनाविरुद्ध का होईना पण ठेवणं अपरिहार्य असतं. गारदी पण असेच, पैसे फेकले की वाटेल ती कामं करणारे. गारदी हा मूळ बहुदा 'गार्ड' या शब्दाचा अपभ्रंश असावा. उत्तरेत जसे पेंढारी असत तसेच दक्षिणेकडे गारदी होते. कर्नाटक ही त्यांची मुख्य भूमी. हैदर आणि निजामाच्या राज्यात यांची पैदास जास्त होती. पहाडी आणि जीवानिशी काम करणारे म्हणून शनिवारवाड्याभवतली नानासाहेबांनी, आणि नंतर माधवरावांनी गारद्यांचा पहारा लावण्याचं जे ठरवलं ते याकरताच. म्हणजे जीव देतील पण सुरक्षा वाऱ्यावर सोडणार नाहीत. पण या गारद्यांची वाईट बाजू म्हणजे आपल्यापेक्षा समोरच्याने जास्त पैसे दिला तर हे इमान विकायलाही कमी करत नसत. दुर्दैवाने पेशव्यांच्या बाबतीत त्यांच्याच घराण्यात अशी उदाहरणं घडली आहेत, आणि तरीही पेशवे विस्तवाशी खेळत राहिले ही सगळ्यात मोठी चूक ठरली. 

पेशवे घराण्यांपैकी तीन खाशा माणसांवर गारद्यांनी हल्ले केले आहेत, आणि तिसऱ्या हल्ल्यात खुद्द एका पेशव्याला जीव गमवावा लागला आहे. 

पहिली घटना म्हणजे सदाशिवरावभाऊंवर मुझफ्फरखान गारद्याने करवलेला हल्ला. दि. २९ ऑक्टोबर १७५९ रोजी पुण्यात गारपिरवर (म्हणजे सध्याचं ससून हॉस्पिटल) भाऊसाहेबांचा डेरा पडला असता त्यांच्यावर खुनी हल्ला झाला. भाऊसाहेब बेसावध होते. मागून वार पडत असतानाच भाऊसाहेब शाई घेण्यासाठी वाकले आणि वारकऱ्याचा वार चुकला. भाऊसाहेबांच्या जवळच उभ्या असलेल्या नागोजी गुजराचे लक्ष होतेच. त्याने पुन्हा वार होण्यापूर्वीच त्या माणसाचा हात गच्च पकडला. परंतु हत्याराचा निसटता वार भाऊसाहेबांच्या पाठीवर झालाच. हा हल्ला करणारा माणूस हैदरखान म्हणजेच मुझफ्फरचा जावई होता. हैद्राबादचा निजामअल्ली आणि मुझफ्फरखानाला भाऊंचा अडसर असल्याने त्यांनाच मारून बाजूला करावे असा हा कट होता जो उधळला गेला. दुसऱ्या दिवशी या सासरा-जावयाची डोकी मारण्यात आली. 

दुसरी घटना यानंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे दि. ७ सप्टेंबर १७६९ रोजी माधवराव पेशव्यांसोबत घडली. माधवराव पर्वतीवरून शनिवारवाड्यात येत असताना गारद्याने वार केला. माधवराव हुशार असल्याने त्यांनी तो वार सफाईदारपणे चुकवला. बुधवारी साधारण तिसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारची जेवणं झाल्यानंतर माधवराव पर्वतीवर दर्शनाला गेले होते. तिथून येताना सोबतच्याच एका गारद्याने अचानक तलवार उपसून माधवरावांवर चालवला. माधवराव घोड्यावर बसले होते. त्यांचं पटकन लक्ष गेलं आणि त्यांनी घोडा एका बाजूला झुकवला त्यामुळे ते वाचले. एवढ्यात आजूबाजूच्या पंधरा-वीस जणांनी त्या गारद्याला जमिनीवर लोळवून पकडून ठेवलं. मोरोबादादा तेवढ्यात तिथे आले आणि गारद्याला मारू न देता त्यांनी त्याला अंधारकोठीत घालायला सांगितलं. चौकशी सुरु होती, पण पुढे त्याचं काय झालं ते समजत नाही. हा हल्ला कोणी करवला याचं ठोस कारण कुठेही सापडलं नसलं तरी हे काम रघुनाथरावांनी अथवा सखारामबापूंनी केलं नसेल असं सांगता येत नाही. कारण माधवरावांवर सखारामबापू राघोबासाठी खुनी हल्लाही करू शकतो असं काही वर्षांपूर्वी गोपाळराव पटवर्धनांनी गोपिकाबाईंना सांगितलं होतं.

तिसरा हल्ला म्हणजे खुद्द नारायणराव पेशव्यांचा दि. ३० ऑगस्ट १७७३ रोजी शनिवारवाड्यात झालेला खून आणि उठलेला प्रचंड प्रलय. या वेळेस राघोबा थेट पाठीशी असल्याने गारद्यांनी शनिवारवाड्यात हैदोस घातला, रक्ताचे पाट वाहिले आणि उजळ माथ्याने गारद्यांनी आपण केलेल्या कृत्याचं समर्थन चालवलं. यात गारद्यांच्या पाठी कोण होतं आणि खून कोणी करवला हे उघड होतं. पुढे महम्मद इसाफ हा दोन वर्षांनी पकडला गेला आणि सुमेरसिंग पकडला जाण्याआधीच मृत्यू पावला. रघुनाथरावांच्या खास हुजऱ्या तुळाजी पवारने हे काम अंगावर घेतलं होतं. या वेळेस सुद्धा रघुजी आंग्रे यांनी नारायणरावांनी सावध करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला पण नारायणरावांच्या या गोष्टीला फारसं मनावर न घेण्याच्या निर्णयाने त्यांचा घात झाला.  

एकूणच, गारद्यांना त्यांच्या शूरत्वाकरिता आणि पथ्थरदिलीकरिता जवळ ठेवणं हे जितकं गरजेचं होतं तितकंच घातकही सिद्ध झालं. याकरिता सुदैवाने पेशव्यांच्या घरातील दोन कर्तबगार पुरुष जीवानिशी वाचले,पण तिसऱ्याला मात्र दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला. 

© कौस्तुभ कस्तुरे