महाराजांच्या काळातील पत्रव्यवहाराची प्रक्रिया!



शिवछत्रपतींच्या काळात स्वराज्याचे चिटणीस बाळाजी आवजीं चित्रे यांना काय काय कामे करावी लागत याबाबत पुढील माहिती. 

शिवाजी महाराजांच्या काळात एखादे गाव ईनाम दिल्यानंतर त्या ईनामपत्राच्या अनेक नकला तयार करण्यात येत असत. यात १ मुख्य ईनामपत्राचा कागद आणि त्याच्या ४ नकला असत. त्या अशा-
२ फडनिशी कागदज्यात 
  • १ खुद्द ज्याला ईनाम द्यायचे त्याला द्यावयाचा
  • १ कागद त्या गावाच्या मोकदम म्हणजेच पाटलाला द्यावयाचा. 
3 चिटनिशी कागद, ज्यात 
  • १ कागद तेथील महालदार अथवा तालुका प्रमुख 
  • १ कागद सुभेदार/मामलेदार अथवा जिल्हाप्रमुख (वर्तमान आणि भावी)
  • १ कागद देशमुख-देशपांडे इत्यादींना लिहीलेला असायचा.

एखाद्या व्यक्तिला गाव मोकासा दिला किंवा तैनातीस जमिन दिली असता त्याचे एकूण ४ कागद बनवले जायचे. ते असे-
१ फडनिशी कागद सदर गावच्या मोकदम म्हणजेच पाटलाला द्यावयाचा.
3 चिटनिशी कागद, ज्यात 
  • १ कागद तालुकादार अथवा महालदार 
  • १ कागद कमाविसदार अथवा तेथील ईनामदार 
  • १ कागद जमिनदार म्हणजे जमीन ज्याच्या मालकीची आहे त्याला.

चिटणीसांना एकूण ५ शिक्के-रोखे उमटवण्याचा अधिकार होता-
  • १ सरंजामाचा शिक्का
  • २ शेत सनदेचा शिक्का
  • ३ वृत्तीचा शिक्का (वृत्तीपत्र म्हणजे एखादे काम नेमून दिल्याचे पत्र)
  • ४ ईनामपत्र (महाराजांनी ईनामदारी बंद केली, पण राजीखुशीने ईनामे देणे बंद केले नाही)
  • ५ वरातापत्र (म्हणजे जकातमाफिचे पत्र)

नवा सरकारी अंमलदार नेमला असता त्याकरता २ सनदांचे कागद बनवले जायचे-
  • १ फडनिशी कागद खुद्द त्या अंमलदाराच्या नावचा
  • १ कागद त्या प्रांतातील जमीनदार आदी व्यक्तिंसाठी

याशिवाय सरकारी संग्रहासाठी कोणाला इनाम-वतन-वर्षासन दिले त्याची करारपत्रे, पुरातन वतनाचा इंसाफ अथवा न्यायदान होईल त्याची पत्रे, न्यायदानातील हरकी-शेरणी इत्यादींची पत्रे, बंदरे, किल्ले, बारा महाल व अठरा कारखाने यांच्या संबंधीची पत्रे कोणास कैद करणे-सोडणे इत्यादी राजाज्ञेची पत्रे चिटणीसच करत असत. कानुनजाबता मध्येच मोडणारा चिटणीसी जाबता याबबत अत्यंत सुस्पष्ट माहिती पुरवतो. चिटनिसांनी कोणकोणती कामे करावीत याबाबत चिटणीसी जाबित्यात एकूण ३२ कलमे आहेत. याशिवाय सबनिशी आणि कारखानिशी जाबित्यामध्येही अनेक महत्त्वाच्या कागदांवर शेवटी चिटणीसांची मोर्तब असावी असे लिहीले आहे.

संदर्भ – कानुनजाबिता (शिवचरित्रप्रदिप व सनदापत्रांतील माहिती)

- कौस्तुभ कस्तुरे