महाराष्ट्राचे इतिहासाचार्य: विश्वनाथ काशिनाथ राजवाडे
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (१२ जुलै १८६३ - ३१ डिसेंबर १९२६)
दि. ७ जुलै १९१० या दिवशी सरदार मेहेंदळे, गंगाधरराव मुजुमदार आदी
सहकार्यांच्या साथीने पुण्याच्या सदाशिव पेठेत "भारत इतिहास संशोधक
मंडळाची" स्थापना करून राजवाड्यांनी इतिहास
संशोधन परंपरेची एक शिस्तबद्ध संग्रह करून आखिवरेखिव सुरुवात केली.
अठराव्या वर्षी मॅट्रीक, चोवीसाव्या वर्षी बी.ए. झालेल्या राजवाड्यांनी
आपल्या केवळ ६३ वर्षांच्या आयुष्यात असंख्य ग्रंथसंग्रह आणि शोधानिबंध
लिहून इतिहास संशोधनाच्या परंपरेचा कळस गाठला.
राजवाड्यांचा स्वलिखित ग्रंथविस्तार पाहता त्यांच्या प्रचंड ज्ञानाची आपल्याला कल्पना येते-
* मराठ्यांच्या इतिहासाची साधने, एकूण खंड २२- त्यातील विभाग-
खंड १ - पानिपत प्रकरणाचे कागद
खंड २ - पेशवाई शकावली
खंड ३ - ब्रह्मेंद्रस्वामींची पत्रे इत्यादी
खंड ४ - निरनिराळ्या शकावल्या
खंड ५ - पेशवेकालिन पत्रे
खंड ६ - नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीतील पत्रव्यवहार
खंड ७ - काळे दफ्तर
खंड ८ - बावडेकर दफ्तर
खंड ९ - प्रभात मासिकातील लेख
खंड १० - सवाई माधवरावकालीन पत्रव्यवहार
खंड ११ - चासकर दफ्तर
खंड १२ - रायरीकर दफ्तर
खंड १३ आणि १४ - रायरीकर आणि खासगीवाले दफ्तरातील निवडक कागद
खंड १५ - शिवकालीन जेधे इत्यादी घराणी
खंड १६ ते १९ - शिवकालिन घराणी (इतिहाससंग्रह)
खंड २० - शिवकालीन घराणी (भा.इ.सं.मं)
खंड २१ आणि २२ - शिवकालीन घराणी (इतिहास व ऐतिहासिक)
* संकीर्ण लेखसंग्रह (भा.इ.सं.मं ग्रंथमाला)
* संस्कृत भाषेचा उलगडा (सत्कार्योत्तेजक सभा, धुळे)
* महिकावतीची (उर्फ माहिमची) बखर :संपादन
* जयराम पिंड्येकृत राधामाधवविलास चम्पू : संपादन
* ज्ञानेश्वरी (सत्कार्योत्तेजक सभा, धुळे)
* ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण (सत्कार्योत्तेजक सभा, धुळे)
* सुबंतविचार (भा.इ.सं.मं)
* मराठी छंद (व्याकरणाशी संबंधीत)
* दासोपंतांची पदे
* मराठी धातुकोश
* भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
* महाराष्ट्राचा वसाहतकाल (लेखमाला)
* श्री समर्थ रामदास स्वामी
या ग्रंथसंपदेव्यतिरिक्त इतिहासाचार्यांचे अनेक लेख आणि शोधनिबंध
ग्रंथमाला, विश्ववृत्त, लोकशिक्षण, राष्टोदय, इतिहास आणि ऐतिहासिक, रामदास
आणि रामदासी, विद्यासेवक या मासिकांमधून तसेच केसरी, ज्ञानप्रकाश आणि समर्थ
या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले आहेत. 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने'
च्या अमौलिक आणि विवेचक दीर्घ प्रस्तावनांचा मिळून एक स्वतंत्र खंड निर्माण
होईल.
राजवाड्यांचा अभ्यास तर कल्पनातीत होता. नुसतं मराठ्यांचा
इतिहास नाही तर अगदी प्राचिन वेदकाळापासून ते अर्वाचिन इतिहासापर्यंत
त्यांचे संशोधन होते. राधामाधवविलास चम्पू ची केवळ प्रस्तावना वाचली
म्हणजे राजवाड्यांचा त्यामागचा प्रचंड अभ्यास समजून येतो. 'भारतीय
विवाहसंस्थेचा इतिहास' हा तत्कालीन सनातनी वृत्तींत खळबळ माजवून देणारा
ग्रंथ म्हणजे प्राचिन इतिहासाची पाने आणि विवाहसंस्था तसेच हिंदू समाजातील
स्त्री-पुरुष परस्परसंबंधातील कालानुरुप पडत गेलेला फरक समजवणारा ग्रंथ
आहे. पुराणातील अनेक कोड्यांचा आणि वंशावळींचा उलगडा राजवाड्यांनी अतिशय
सोपा करून मांडला आहे. याशिवाय राजवाड्यांनी सुरतेची राष्ट्रीय सभा
(National Congress), गोखल्यांची इंग्लंडमधील कामगिरी, स्वदेशी, वेदोक्त,
बडोदे राज्यातील सुधारणा, महाराष्ट्रातील गेल्या पाऊणशे वर्षातील कर्त्या
पुरुषांची मोजदाद, शिवकालीन समाजरचना इत्यादी राजकीय आणि सामाजिक लेख
लिहीले.
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार म्हणतात- "राजवाड्यांचे
पूर्वी किर्तने, साने, रानडे, गुप्ते प्रभुती विद्वानांनी इतिहास संशोधनास
प्रारंभ केला होता. पण या सर्व मंडळीत एक रानडे वजा घातले तर
राजवाड्यांइतका प्रतिभाशाली गृहस्थच कोणी पडला नाही यात शंका नाही. शिवाजी
महाराजांनी देशासाठी फकीरी घेतली आणि राजवाडे यांनी राष्ट्रीय
स्मृतीसंचलनासाठी तशीच फकीरी घेतली. श्री समर्थांच्या चरित्राच्या
उपेक्षितांगाचे रहस्य यथार्थ जाणून आचरणांत आणणारा त्यांच्यासारखा दुसरा
पुरुष शोधून काढून दाखविणे कठिण आहे". द. वा. पोतदारांना लिहीलेल्या पत्रात
'इंग्रजीत आपण लिहीत बोलत नाही' असं राजवाडे मराठीच्या अभिमानाने सांगतात.
© कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com