पानिपतचा प्रतिशोध.. दिल्लीवर भगवा!



दि. १० फेब्रुवारी १७७१ रोजी मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला. तो जरी शाहआलम बादशहासाठी जिंकून घेतला असला तरीही पानिपतच्या नंतर अवघ्या दहा वर्षातच मराठे पुन्हा तितक्याच ताकदीने उसळून वर आले आणि बादशाहीच्या संरक्षणासाठी केवळ आपणच आहोत हे दाखवून दिलं, त्याने साऱ्या उत्तर हिंदुस्थानी सत्ता हादरल्या. मराठ्यांच्या या विजयाची कहाणी थोडक्या शब्दात अशी-


 
थोरल्या मोहिमेची गरज

पानिपतच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मराठ्यांचा तरुण पण दुर्दैवाने मृत्युपंथाला लागलेला पेशवा तळमळत होता. पेशवा माधवराव! गादीवर आल्यानंतरच्या पेशवाईच्या गोंधळात आणि प्रत्यक्ष सख्ख्या काकाचा विरोध मोडून काढत दक्षिणेकडील मराठा सत्ता स्थिरस्थावर करण्यात माधवरावांचा बव्हंशी वेळ गेला. तोपर्यंत इकडे उत्तरेतही अनेक राजकारणं बदलली. होळकरांची सरदारी आता पराक्रमी तुकोजी सांभाळत होते. माधवरावांनी शिंद्यांची सरदारी राणोजी शिंद्यांचे पुत्र, महापराक्रमी जयाप्पा आणि दत्ताजींचे बंधू महादजींना दिली. पानिपतच्या प्रचंड प्रसंगात आधीचे काही तह आणि करारमदार प्रत्यक्षात उतरले नव्हते त्याची पूर्तता करण्यासाठी आणि पुन्हा मराठ्यांचा भगवा जरीपटका उत्तरेत डौलात फडकवण्याचा माधवरावांनी आपल्या चार शूर सरदारांना इ.स. १७६९च्या अखेरीस उत्तरेत पाठवण्याचा निर्णय घेतला. हे चार सरदार म्हणजे रामचंद्र गणेश कानडे, विसाजी कृष्ण बिनीवाले, महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर. मराठ्यांच्या या नव्या मोहिमेचे तीन उद्देश होते-

१) नानासाहेबांच्या काळात १७५४ मध्ये यमुनेच्या आसपास असलेल्या जाटांशी झालेले तह पुन्हा सुरळीत करावेत
२) अहमदिया करारानुसार आणि नंतरही बादशाहीच्या रक्षणासाठी अंतर्वेदीत मिळालेला इटावा, फफूंद, फर्रुखाबाद इत्यादी मुलुख मराठ्यांना निर्धोकपणे मिळावा.
३) रोहिल्यांचं वर्चस्व मोडून दिल्लीच्या पातशाहीला पुन्हा मराठ्यांच्या छत्राखाली (थोडक्यात उपकारात) आणावं.

नवलसिंह आणि रणजितसिंह या दोघा भावांनी, विशेषतः मोठ्या भावाच्या अंतर्गत विरोधामुळे धाकट्या रणजितसिंहाने सुरुवातीला मराठ्यांची मदत मागितली खरी, पण मराठा सरदार चंबळेवर एकत्र होऊन त्यांनी तीस पस्तीस हजारांच्या संख्येने एकदम जाटांच्या मुलुखात प्रवेश केला तेव्हा मात्र रणजितसिंह घाबरला. कुंभेरीच्या प्रचंड किल्ल्याबाहेर तितकीच प्रचंड मराठी सेना पाहून रणजितसिंहाने मदतीची आश्वासने बासनात गुंडाळून ठेवायला सुरुवात केली. हा सारा प्रकार पाहून मराठा धुरिणांनी दिग आणि भरतपूरचा आसमंत जाळून टाकला. इकडे तुकोजी होळकरांनी नजीबखानाशी असलेलं सख्यत्व उपयोगास आणून अंतर्वेदीतील जाटांचा मुलुख घ्यायला फासे फेकले तेव्हा दिगमधून नवलसिंह बाहेर पडला. दि. ६ एप्रिल १७७० रोजी अरिंगच्या लढाईत नवलसिंह जाटाचा दारुण पराभव झाला. सुमारे दोन हजार घोडी आणि तेरा हत्ती मराठ्यांनी काबीज केले.

अंतर्वेदीत मराठे येतात..

२५ एप्रिल १७७० रोजी तुकोजी होळकर प्रथम यमुनापार करून अंतर्वेदीत उतरले. पाठोपाठ इतरही फौज यमुना उतरली. या वेळेस नजीब मराठ्यांच्या मदतीला आला होता. इतक्यात गाझीउद्दीन इमादुल्मुल्क हा पूर्वीचा वजीर अचानक आग्र्यात येऊन मराठ्यांना भेटला. दुसऱ्या आलमगीराचा शत्रू असलेल्या गाझीउद्दीनला मराठे पुन्हा जवळ करतात हे पाहून नजीब आणि बादशहाच्या जवळच्या शुजा वगैरे साऱ्यांनाच भीती वाटू लागली. अर्थात हा केवळ एक गैरसमज असल्याने त्याचा दूरगामी परिणाम झाला नाही हेही खरं. परिणामी जाटांशी चाललेली तहाची बोलणी मात्र फिस्कटली.

मे १७७० अखेरीस गोविंदपंत बुंदेल्यांच्या दोन्ही पुत्रांनी, बाळाजी आणि गंगाधर यांनी अहमदखान बंगषाकडून फर्रुखाबाद जिंकून घेतली. नेमकं याच वेळेस नजिबाचं एक कारस्थान उघडं पडलं. मराठी हेरांनी त्याच्याकडून हाफिज रहमत वगैरे इतर रोहिल्यांना जाणारे खलिते पकडले. यात मराठ्यांना भूलथापा देऊन झुलवत ठेऊन जाट-मराठे यांना एकमेकांत झुंजवून आपण ताकद वाढवायची असा होरा होता. हे जेव्हा समजलं तेव्हा रामचंद्र गणेशांचे डोळे खाडकन उघडले. त्यांनी नवलसिंगाशी ६५ लाखांचा तह करण्यास तात्काळ मान्यता दिली, आणि तीन वर्षात रक्कम फेडण्याच्या आणि पुढे सालिना अकरा लाखाच्या मुचलक्यावर जाटांना तोशीस द्यायचं थांबलं. हे स्थिरस्थावर झाल्यावर मराठ्यांनी अंतर्वेदीतील रोहिल्यांनी आणि पठाणांनी बळकावलेल्या मुलुखाची मागणी केली तेव्हा त्यांनी सरळ नकार दिला. मराठ्यांच्या छावणीत असलेल्या नजीबखानाचा ऑक्टोबर अखेरीस एकाएकी मृत्यू झाला. नजिबाच्या मृत्यूनंतर मात्र रोहिल्यांची बाजू लंगडी झाली आणि मराठ्यांच्या पराक्रमाला नवी गवसणी मिळाली. १५ डिसेंबर रोजी इटाव्याच्या किल्ल्यावर भगवा जरीपटका फडफडू लागला.

मराठमंडळातील धुसफूस आणि मोहिमेला नवी ऊर्जा

इथे मराठा सैन्यातील एकजूट हळूहळू फुटू पाहत होती. रामचंद्र गणेश कानडे हे अगदी नानासाहेबांपासूनचे कर्तबगार सरदार असल्याने माधवरावांनी त्यांना मोहिमेचं मुख्य नेमून त्यांचे दिवाण म्हणून विसाजी कृष्ण बिनीवाले यांना नेमलं. महादजी आणि तुकोजी या दोघांनाही सेनापतित्व दिलं. वास्तवात शिंदे होळकर हे उत्तरेतील कसलेले सेनापती तर कानडे बिनीवाले हे दक्षिणेकडील माहितगार सेनापती. अशात धुसफूस वाढू लागली. कानडे शिंदे यांचं पटत नव्हतं तितकंच शिंदे होळकरांचं पटत नव्हतं. तुकोजी होळकर हे आधी नजीब आणि नंतर त्याचा पुत्र झाबेताखान यांना गोंजारून घेत असल्याने महादजींना याचं वैषम्य वाटत होतं. साहजिकच, विसाजी आणि महादजी हे एकमेकांच्या बाजूचे झाले तर कानडे आणि होळकर हे एकमेकांना दुजोरा देऊ लागले. सुरुवातीच्याच काळात, म्हणजे अरिंगच्या लढाईच्या पूर्वीच काळात कानडे-होळकरांच्या धोरणाला कंटाळून महादजी शिंदे वैतागून मारवाडात निघून गेले. त्यांना कानड्यांनी पुन्हा आणलं खरं पण पुढे नजिबाच्या साहाय्याने मोहीम चालवायला महादजी तयार नव्हते. कितीही झालं तरीही याच नजिबाच्या चिथावणीने पानिपत घडलं होतं. अंताजी माणकेश्वरांसारखा सरदार ओरडून सांगत होता 'नजीब आणि अब्दाली दोन नाहीत' तरीही पुन्हा त्याच नजिबाचं साहाय्य घ्यायचं हे मात्र महादजींनी पटत नव्हतं. त्यांचं म्हणणं पडलं की नवलसिंह आणि रणजितसिंह या दोघांशी शत्रुत्व न पत्करता मराठ्यांनी नजीबखानासारखे रोहिले आणि अहमदखान बंगशसारख्या पठाणांना अंतर्वेदीतून काढून टाकावं आणि या कमी जाटांचं साहाय्य घ्यावं. पुढे महादजींचं म्हणणं शब्दशः खरं ठरलं आणि बंगश, हाफिज रेहमत, नजिबादी साऱ्यांनी मराठ्यांना दिलेली वचनं बासनात गुंडाळून ठेवली. नजिबाच्या मृत्यूनंतर झाबेताखानावरुन पुन्हा शिंदे होळकर वैमनस्य उत्पन्न झालं. अखेरीस माधवरावांनी या साऱ्यात स्वतः लक्ष घालून इ.स. १७७१च्या सुरुवातीला अथवा मध्यावर रामचंद्र गणेश कानड्यांना परत बोलावलं, आणि विसाजी कृष्ण बिनीवाल्यांना मोहिमेचं नेतृत्व करायला सांगून शिंदे-होळकरांना उत्तरेतच एकदिलाने मोहीम सुरु ठेवण्यास आज्ञा दिली. तुकोजींचे पाठीराखे कानडे दक्षिणेत गेल्याने आता विसाजी-महादजींना साहाय्य करण्याशिवाय तुकोजींना पर्याय नव्हता.

थोरल्या माधवरावांची सूक्ष्म नजर आणि राजकारणं

दरम्यानच्या काळात माधवरावांची अनेक पत्रं चारही सरदारांना, विशेषतः रामचंद्र गणेश आणि विसाजी कृष्णांना जात होती की एकदिलाने कामं करा, आपापसात भांडणाचा हा समय नाही. ऐतिहासिक संकीर्ण साहित्याच्या ७व्या खंडात माधवरावांचं एक भलं मोठं पत्रं "माधवरावांचे परराष्ट्रीय धोरण" या नावाने प्रसिद्ध झालं आहे. दि. २१ डिसेंबर १७७०चं हे संबंध पत्रं वाचनीय आहे. सुरुवातीलाच साऱ्यांना करड्या स्वरात पेशवे विचारतात, "हिंदुस्थानात तीर्थरूप राजश्री भाऊसाहेब गेले त्या तागाइत सरकारची फौज गेली नाही. तमाम अमीर, राजेरजवाडे, जाट यांनी मुलुख आटोपून अति उन्नत झाले. त्यांस शिक्षा करून पैसा मातबर घ्यावा, सरकारचा मुलुख दाबीला असेल तो सोडवून साबिक दस्तूर सरकारचा अंमल करावा, नक्ष लोकोत्तर करावा व दक्षिणी कायम सारगरम आहेत ऐशी आवई अब्दाली व शीख वगैरे मुफसदावर गालब करावी यास्तव तुम्हांस रवाना केले, व तुमची उमेद नवी नवाजी केल्यास करून दाखवाल, पैसा मबलग मिळविण्यात येईल व मुलुख सोडवाल. तैसेच (आधीचे) शिंदे व होळकर कृतकर्मे पराक्रमी होते, जे कर्म धन्यानी करावे ते उभयतांनी करावे, करीत आले. आपले स्वहित न पाहता सरकार उपयोगी कर्मे बहुत केली तेव्हाच या दौलतीचे बाजू म्हणवून घेतले होते. ते तर (आधीचे शिंदे होळकर) आपले एकनिष्ठेत गेले. त्यामागे त्यांचे वंशज होळकर शिंदे आहेत. किंबहुना पाहिल्यापेक्षाही अधिक करून दाखवतील हा फार फार भरवसा होता. तुम्हांस (आणि) त्यांस हिंदुस्थानास जाऊन वीस एकवीस महिने झाले. कीर्तिस्पद व धनी उपयोगी किती कर्मे संपादिलीत? त्याचे मनन करावे. शिंदे उदेपुरास गेले. त्यांचे मते आपणच कृतकार्य व्हावे. यश आपण संपादावें. होळकराचे मते शिंदे फजित पाडावे. वरकडचेही चित्ती खपीप व्हावे. या भावे मसलतीस गुडघे बसोन मामला खराब, शिंदे खराब, राज्यसंस्थान खराब ! सरकारात रुपये दृष्टीस न पडे". याच पत्रात माधवरावांनी नानासाहेबांचा काशी-प्रयाग स्वराज्यात आणण्याचा मतलब पुन्हा उधृत केला आहे.  नजिबाच्या बद्दल रागारागाने माधवराव लिहितात, "नजीबखान मृत्यू पावला. मोठा हरामजदा. फंदफितीने फसाद हरामखोर होता. लौकरच वारला. मोठी व्याधी गेली. राजकारणी होता. तो जिवंत असता तर तुमचे राजकारण सिद्धीस जाऊ देता हे होणेच नव्हते. नजीबखानाच्या मरणामुळे दिल्लीचा बंदोबस्त तुटला असेल, यास्तव तुम्ही रोहिल्यांची मामलत, पैक्यावर करावी. पेस्टार साली मुलुख सोपवून देतो ऐसे लिहून घेऊन मामला चुकवावी. दिल्लीचा बंदोबस्त झाबेतखानाने केला नाही, तो तुम्ही दिल्लीस जावे, दिल्ली हस्तगत करावी, आपला बंदोबस्त करावा. यंदाचं रोहिल्यापासून मुलुख सोडवावयाची अड न धारावी, दिल्ली काबिजात जाल्यास वजारताची आरजू सुज्याउद्दौल्यास आहे व पातशाह तख्तावर बसावे हे जरूर, तेव्हा ते तुमचे मुद्दे मान्य करतील, पैका देतील व मुलुख देतील. तुम्ही चार कलमे अधिक लिहून दिली तरी करीतील". 

हे सगळं पत्रं खूप विस्तृत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर माझ्याकडे असलेल्या या पत्राच्या एका नकलेची लांबी नऊ फुटांची असून त्या पत्राच्या दोन्ही बाजूला मजकूर आहे. पूर्ण पत्रं इथे देत गेलो तर वेळ फार जाईल, पण पत्राचा शेवट मोठा वाचनीय आहे. माधवराव लिहितात, "तुम्हांस (कानडे आणि बिनीवाल्यांना) सर्व खोलून लिहिले आहे. याउपरी न कराल तर ठीक नाही. खुलासा, सर्वांनी एकएकाचे न्यून पाहून पाहून घाण केली तैसे न करणे. मातबर सरदारांनी सरकारचे लक्ष सोडून धणियाचे कामाची पायमल्ली केली, आपले वडिलांची रीत सोडून अमर्यादेस गोष्ट नेली यात कल्याण नाही. अशा गोष्टी सहसा नच कराव्या. धण्याचे लक्ष, धण्याचे हित तेच त्यांनी करावे, करून दाखवावे यात उत्तम नाक्ष लौकिक होईल. धणी कृपाच करतील. असो, तुम्ही सर्व लिहिल्याअन्वये समजोन करणे. जाणिजे". पुढच्या इमेजमध्ये या (पत्राची सुरुवात आणि शेवट) मूळ पत्राचा फोटो दिला आहे.

दिल्ली वर भगवा!

२० डिसेंबर १७७० रोजी अलाहाबादेहून शाहआलम बादशहाचा वकील सैफुद्दीन मुहम्मद विसाजीपंतांना येऊन भेटला. झाबेताखान अजूनही होळकरांच्याच सैन्यात असून मराठ्यांना मदत करण्याचं नाटक करत होता. तुकोजींना त्याच्या या राजकारणाचा सुगावा लागला नाही. झाबेताखानाने दिल्लीच्या संरक्षणासाठी आपले तीन हजार सुसज्ज सैन्य ठेवलं होतं. बादशहाला पुन्हा तख्तावर बसवण्याच्या उद्देशाने मराठा फौजा मणिपुरी, शुकोहाबाद वगैरे करत पटपरगंजकडे आल्या. दि. ७ फेब्रुवारी १७७१ रोजी सैफुद्दीन महम्मद हा बादशहाचा प्रतिनिधी म्हणून लाल किल्ल्याच्या बाहेर आला आणि त्याने आपल्याला किल्ल्यात घेण्याची विनंती केली. सैफुद्दिनानें समस्त दिल्लीकरांना आश्वस्त केलं की मराठ्यांपासून दिल्लीला काहीही धोका उत्पन्न होणार नाही. यावेळी दिल्ली शहराचा ताबा हा झाबेताखानाचा सरदार मुसावीखान याच्याकडे होता. त्याने सैफुद्दिनच्या सांगण्यानुसार बादशहाची आणि मराठ्यांच्या नावाची द्वाही शहरात फिरवली. पण दिल्लीचा किल्लेदार कासीमअली याने मात्र किल्ल्याचा ताबा द्यायचं नाकारलं. झालं. दिल्लीच्या वेशी मुसवीखानाने मराठ्यांसाठी आधीच उघडल्या असल्याने मराठ्यांच्या तोखान्याच्या माऱ्यात थेट लाल किल्ला आला. मराठ्यांचा तोफखाना दि. ७ फेब्रुवारीपासून दिल्लीच्या तटावर आग ओकू लागला. दोनच दिवसात असद बुरुजाला खिंडार पडलं आणि दि. ९ फेब्रुवारी रोजी कासिमने तहाच्या वाटाघाटी सुरु केल्या. किल्लेदाराने संपूर्ण शरणागती पत्करली. दि. १० फेब्रुवारी १७७१ रोजी भल्या सकाळी मराठा सरदार बाळाराव गोविंद (गोविंदपंत बुंदेल्यांचा मुलगा) लाल किल्ल्यात प्रवेशता झाला. मुघलांची राजधानी पुढच्याच एका मुघल बादशहासाठी मराठ्यांनी 'जिंकून' घेतली होती.

मिरजेच्या पटवर्धनांच्या दफ्तरात या संबंधी एका पत्रात उल्लेख आहे की, "पत्रात हिंदुस्थानचे मात्र वर्तमान लिहिले आहे जे, इटाव्याचा किल्ला राजश्री रामचंद्र गणेश यांनी घेऊन दिल्लीस आले. सरकारचे झेंडे दिल्लीस उभे केले. पातशाह बसविणार. पन्नास लक्ष रुपये नजर बोलतात, हे पावणा करोड रुपये घेऊ म्हणतात. पावणा करोडीवर ठराव होईल तेव्हांच बसवीतील. सारांश, तिकडे फौजेचा नक्षा मोठा झाला म्हणून लिहिले आहे". ही दोन वाक्य जरी असली तरी यामागचा इतिहास प्रचंड आहे. सरकारचे झेंडे म्हणजे प्रत्यक्ष मराठ्यांचा भगवा जरीपटका दिल्लीच्या किल्यावर उभा केला. त्यातही, शाहआलम बादशहाला गादीवर बसवण्याकरता बादशहाकडून जी नजर मिळायची ती पन्नास लक्ष रुपये ते देणार होते, पण मराठी धुरीण मात्र पाऊण कोटी रुपयांवर असून बसले. साहजिक आहे, मोंगलांनी इतके वर्ष पिळलं होतं, आता त्यांना सहजासहजी सुख लाभणं शक्य नव्हतं. पाऊण करोड दिले नाहीत तर बादशाह बसवणार नाही असं रामचंद्रपंतांनी सांगितलं. मुघल बादशाह शाहआलम यावेळी अलाहाबादेस होता. दोन दिवसांतच बादशहाकडे मराठ्यांची मागणी पोहोचली. मराठे दिल्ली घेऊ शकतात आणि झाबेतखानाला हरवू शकतात त्यावरून त्यांच्याशिवाय कोणीही आपल्याला इतर शत्रूंपासून वाचवू शकत नाही, अथवा इतर कोणीही मराठ्यांच्या तावडीतून वाचवू शकत नाही हे बादशहाला समजलं. त्याने अखेरीस करारावर स्वाक्षऱ्या केल्या ज्यात अशी कलमे होती-

१) लाल किल्ला बादशहाच्या हाती सोपवल्यानंतर आठ दिवसात दहा लाख रुपये मराठ्यांना देणे. 
२) खुद्द बादशाह दिल्लीत आल्यानंतर पंधरा लाख रुपये मराठ्यांना द्यायचे, आणि ते द्यायला असमर्थता दिसली तर मराठे ते आसपासच्या मुलुखातून 'वसूल' करू शकतात. 
३) पूर्वीच्या मोंगल-मराठा तहान्वये जे प्रदेश मराठ्यांकडे होते ते पूर्ववत चालवावेत. 
४) केवळ वजीर सोडल्यास मोंगल दरबारातील इतर नेमणूक करण्याचा हक्क मराठ्यांना मिळेल.

दि. १७ मार्च १७७१ रोजी रामशास्त्री प्रभुणे यांनी एका पत्रात म्हटलंय, "सांप्रतचे वर्तमान राजश्री विसाजीपंत दादा व महादजीबाबा शिंदे वगैरे सरदारांनी सनदा करून दिल्ली घेऊन बंदोबस्त केला. हे यश मोठे आले. श्रीमंतांचेही मानस ऐसेच होते म्हणून वारंवार पत्री आज्ञा जात होती, असे असता राजश्री रामचंद्रपंत तात्यास अनुकूल पडले. दादाच या यशाचे विभागी होते. मुख्य साहेबाकमावर निष्ठा तेथे सुदृढ यश". 

एकूण काय, तर प्रत्यक्ष बादशाह मराठ्यांचा पुन्हा अंकित झाल्यागत होता. हा विजय खूप मोठा होता. मराठे दिल्लीवर पुन्हा कब्जा मिळवतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. दिल्लीचा बादशाह इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता, तो सुद्धा मराठ्यांची धास्ती पडून पुन्हा माघारी आला. इंग्रज किमान या वेळेस तरी केवळ चरफडण्यापलीकडे काही करू शकले नाहीत. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सैफुद्दीन महंमदाने बाद्शाहातर्फे किल्ला घेईपर्यंत- १२ ऑगस्टपर्यंत म्हणजे सहा महिन्यांपर्यंत भगवा जरीपटका डौलाने फडकत होता. हा मराठ्यांनी घेतलेला पानिपतचा प्रतिशोध होता. या संपूर्ण मोहिमेत जरी चार मुख्य सरदार असले तरी पुढे हुजुरातीचे सेनापती विसाजीपंत बिनीवाले आणि यानंतर उदय पावलेले पराक्रमी सेनापती महादजीबाबा शिंदे यांनी या मोहिमेवर वैभवाचा कळस चढवला. 

ही आहे एका प्रचंड विजयाची कहाणी..

© कौस्तुभ कस्तुरे

स्रोत:

१. ऐतिहासिक लेखसंग्रह लेखांक १११० : वा. वा. खरे
२. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ७, लेखांक ९ : मा. वि. गुजर
३. मराठी रियासत खंड ५, पृ. १५४ : गो. स. सरदेसाई
४. पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद खंड २९, लेखांक २६५ : गो. स. सरदेसाई

*************

पानिपतानंतरच्या या माधवरावांच्या 'उत्तरहिंद'च्या महत्वाकांक्षेवर आधारित मी लिहिलेली, कॉन्टिनेन्टल प्रकाशन प्रकाशित ऐतिहासिक कादंबरी "प्रतिशोध पानिपतचा" ऑनलाईन-ऑफलाईन सर्वत्र उपलब्ध आहे.