अंताजी माणकेश्वर गंधे



इतिहासात अनेक वीरांचा उल्लेख केवळ काही प्रसंगांपुरताच केलेला आढळतो, आणि ही यादी काही थोडीथोडकी निश्चितच नाही. विशेषतः मराठ्यांच्या इतिहासाबद्दल बोलायचं झाल्यास इतक्या शूरांनी रणमंडळ गाजवलं आहे की प्रत्येकाचा पुसटता परिचय देणे सुद्धा थोडक्यात आवडणारे नाही. अनेक घराणी, त्या घराण्यांमधील अनेक वीर हे कधी धारातीर्थी पडले, कधी आपल्या बुद्धीची चमक दाखवत, स्वराज्याची सेवा करत काळाला सामोरे गेले. अशीच तलवार गाजवणारी आणि शब्दांच्या खेळातही तितकीच कर्तबगार व्यक्ती इतिहासाच्या पानांत हरवलेली आहे.. अंताजी माणकेश्वर गंधे!

आपण कधीतरी ऐकलं असतं की पानिपतच्या युद्धादरम्यान अंताजी माणकेश्वर हे भाऊसाहेबांच्या हुजुरातीत यशवंतराव पवार आणि समशेरबहाद्दर यांच्यासोबत होते. पण मुळात हे अंताजी कोण, त्यांचा उदय केव्हा झाला अथवा त्यांची पानिपतपूर्वीची नेमकी कामगिरी तरी काय असा प्रश्न उपस्थित झाल्यास "मराठी रियासती"सारखं साधन सोडून सहसा वाचायला मिळत नाही. म्हणूनच अंताजींबद्दल हा लेखनप्रपंच.

अंताजींच्या जन्मसालाबद्दल निश्चित अशी माहिती आज उपलब्ध होत नाही. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या एका त्रैमासिकात ज्येष्ठ इतिहास संशोधक कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांनी "शके १६२०च्या सुमारास चांबळी वगैरे गावांची जोस-कुलकर्णीची वहिवाट अंताजी माणकेश्वर व त्यांचे वडील बंधू हरी माणकेश्वर करू लागले" असं म्हटलं आहे. यावरून या वेळेस म्हणजे इ.स. १६९८ मध्ये अंताजींचे वय किमान अठरा-वीस वर्षांचे असावे असं गृहीत धरलं तरी त्यांचा जन्म इ.स. १६८०च्या सुमारास येतो. पण अंताजी हे पुढे १७६१ मध्ये पानिपतच्या मोहिमेत खाशा हुजुरातीत लढत आहेत, तेव्हा त्यांचे वय ऐंशीच्या घरात नक्कीच नसणार हे उघड आहे. यावरून शकाचा आकडा देताना कृ. वां. ची काही गल्लत झाली असावी असं वाटतं. गंधे घराण्यात परंपरेनुसार अंताजींचे जन्मवर्ष हे इ.स. १७९५ मानले जाते, हे बऱ्याच अंशी संभव दिसते. चांबळीकर अत्रे हे अंताजींचे मावसबंधू असल्याने, आणि अत्रे घराणे पूर्वापार स्वराज्यात महत्वाच्या हुद्द्यांवर असल्याने अंताजींचेही लक्ष कऱ्हेपठार आणि एकंदरीतच स्वराज्याच्या कामकाजात गेले नसते तरच नवल.

अंताजी माणकेश्वरांचा लढाईतील अधिकृत असा प्रथम उल्लेख थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या इ.स. १७२९ मधील बुंदेलखंड स्वारीत येतो. बाजीरावांनी जैतपूरला महम्मदखान बंगशला कोंडलं असताना त्याचा मुलगा कायूमखान हा वडिलांच्या मदतीसाठी चालून येत होता. अशा वेळेस बंगेशला मिळणारी मदत वाटेतच रोखण्यासाठी बाजीरावांनी आपल्या ज्या काही प्रमुख सरदारांना पाठवलं त्यात पिलाजी जाधवराव वगैरे प्रभुतींसोबत अंताजी माणकेश्वरांचाही उल्लेख आहे. अंताजींची ही पहिलीच मोहीम का? याबद्दलही इतिहास स्पष्ट काही सांगत नाही. बहुदा या मोहिमेनंतर बाजीरावांनी अंताजींना माळव्यातच जाऊन-येऊन राहायला सांगितलं असावं असं दिसतं. अंताजींचे बंधू जगन्नाथ माणकेश्वर हे देखील यावेळेस अंताजींसोबत लढाया मारत होते. महंमदखान बंगशचा बाजीरावांनी बुंदेलखंडात प्रचंड पराभव केला. हे सगळं झाल्यानंतर बंगश मात्र चरफडत बादशहाकडे गेला तेव्हा बादशहाकडून त्याची नियुक्ती माळव्याच्या सुभेदारीवर झाली. बाजीरावाची काही कमी नव्हते. चिमाजीअप्पांनी आधीच माळव्यातील प्रमुख ठाण्यांवर आधीच छापे घातले होतेच पण आता संबंध माळवा आपल्याकडे यावा म्हणून बाजीरावांनी मल्हारराव होळकर आणि अंताजी माणकेश्वर या दोघांना इ.स. १७३२च्या सुमारास माळव्यात पुन्हा पाठवलं. या दोघांनीही बंगशच्या सैन्यावर हल्ले करून त्याच्या मुलुखात धुमाकूळ मांडला. अशा पद्धतीने या दोन-तीन वर्षांच्या काळात अंताजींचा वावर साधारणतः या काळापासूनच उत्तरेत सुरु झालेला दिसून येतो. मध्यंतरी इ.स. १७३९ मध्ये काही काळ अंताजी हे आवजी कवड्यांसोबत वऱ्हाडात मुलूखगिरीवर होते, पण पुन्हा ते बाजीरावांच्या हुजुरातीत येऊन दाखल झाले. इ.स. १७३९च्या सुमारासच त्यांना बाजीरावांकडून ग्वाल्हेरची सुभेदारी मिळाली.

नानासाहेबांच्या काळात सुरुवातीला अंताजींनी अनेक महत्वाच्या लढाया जिंकल्या. अंत्री, गढाकोटा, नरवर वगैरे अनेक युद्धप्रसंग झाले. पण अंताजींच्या आयुष्यातील महत्वाचा प्रसंग ठरला तो म्हणजे दि. २३ एप्रिल १७५२ रोजी कनौज येथे मराठे आणि मोंगल यांच्यात झालेला प्रसिद्ध 'अहमदिया करार'. या करारान्वये दिल्लीच्या बादशाहीच्या संरक्षणासाठी एक मराठा सरदार कायमचा उत्तरेत ठेवणे अनिवार्य झालं होतं. सुरुवातीला अंताजी हे आपली निवडक फौज घेऊन तिथे होतेच, पण. शिंदे-होळकरांच्या इतर प्रांतातील स्वाऱ्यांमुळे अखेरीस इ.स. १७५४ मध्ये अंताजींची नेमणूक कायमस्वरूपी दिल्लीच्या सरदारावर करण्यात आली. नानासाहेबांनी पाच हजार फौज अंताजींना दिली होतीच, शिवाय बादशाहाकडूनही सप्तहजारी मनसब मिळाल्याने अंताजींचं एकूण सैन्य आता बारा हजार झालं. या साऱ्या प्रकरणात आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे नागोरात जयाप्पा शिंद्यांचा दग्यानें झालेला खून. दत्ताजी आणि जनकोजी मारवाडात अडकले असता त्यांनी कळकळीने अंताजींना मदतीसाठी बोलावलं आणि अंताजींनी मारवाडात जाऊन माधोसिंगाचा सेनापती अनिरुद्धसिंग याचा पराभव केला. यानंतर सगळं स्थिरस्थावर होतं न होतं तोच अब्दालीची चौथी धाड आली, आणि ती सर्वप्रथम अंगावर झेलली ती अंताजींनी. यमुनेच्या वाळवंटात तीन लढाया झाल्या. अब्दाली पुढे गेला असला तरीही अब्दालीचा एक पुत्र आणि त्याचा वजीर या दोघांशी अंताजींच्या तीन लढाया झाल्या. यातल्या दोन लढायांमध्ये अंताजींना हार पत्करावी लागली पण एका लढाईत मात्र अंताजींनी अब्दालीला चांगलाच हिसका दाखवला. वास्तविक अंताजींची फौज ही अब्दालीच्या एक दशांशच्या आसपास असूनही अंताजींनी हे धाडस केलं हे काही पठाणांना रुचेना. खुद्द अब्दाली म्हणाला, "मी अटक उतरल्यापासून कोणीच माझ्या मार्गात आडवं आलं नाही, आणि इथे येऊन राजा अंताजी हे का करत आहे?" यावर नजीबखानाने अब्दालीला म्हटलं, "हा बाळाजीरायाचा (नानासाहेबांचा) मातबर सरदार आहे". एकूणच, अब्दाली आणि नजीब या दोघांनाही अंताजींनी पुरेपूर जोखलं होतं. उत्तरेच्या राजकारणात नजीबखान हा एकमेव माणूस बाजूला केल्यास आपल्याला कसलाही अडथळा येणार नाही हे सर्वप्रथम समजून घेणारे आणि पुण्याला नानासाहेबांना लिहून कळवणारे अंताजी हे पहिले सरदार होत.

दरम्यान उत्तरेतल्या सरदारांचे आपापसातील हेवेदावे आणि इतर गोष्टींवरून सदाशिवरावभाऊंनी सगळ्यांचीच चौकशी सुरु केली. हिंगणे, नारो शंकर, विंचूरकर, बुंदेले इत्यादींसह अंताजी माणकेश्वरांचीही चौकशी करण्यात आली. या साऱ्या सरदारांमध्ये उत्तरेतील जहागिऱ्यांमध्ये वाद असून शिंदे आणि होळकर या दोन सरदारांच्या मुख्य गटांमध्ये हे लहानसहान सरदार विभागले गेले होते. अंताजी माणकेश्वर हे आधीपासूनच सफदरजंग, आणि बादशहाच्या मर्जीत आल्याने इतर सरदारांचा काहीसा जळफळाट होणं स्वाभाविक होतं. पण अर्थात, त्यांच्याविरुद्ध तक्रारी आल्यानंतर पेशव्यांना त्यांना वेगळी वागणूक देणं शक्य नव्हतं. नानासाहेबांची खासियत अशी, की चांगलं काम करणाऱ्याला ते डोक्यावर घेत, पण एखाद्याविरुद्ध कागाळ्या आल्या तर चौकशी करून त्याला शिक्षा केल्याशिवाय ते शांत बसत नसत. याही वेळेस अंताजींविरुद्ध तक्रारी आल्यानंतर त्यांना दक्षिणेत बोलावण्यात आलं. या सगळ्या चौकशीला वेळ लागत असल्याने, त्यातही प्रथमदर्शनिकाही पुरावे नसल्याने अंताजी सदाशिवरावभाऊंसोबत दक्षिणेतील उदगीरच्या महत्वाच्या मोहिमेत सहभागी झाले. अंताजींच्या चौकशीबद्दल कागदोपत्री फारशी काही माहिती मिळत नाही, पण ज्या अर्थी भाऊंनी त्यांना समशेरबहाद्दर आणि यशवंतराव पवार यांच्यासोबत खुद्द आपल्या हुजुरातीत घेतलं त्यावरुहन अंताजी हे शेवटी निरोध निर्दोष सिद्ध झाले असंच म्हणावं लागतं.

पानिपतचा प्रचंड संग्राम सर्वांनाच माहीत आहे. या संग्रामाच्या अखेरीस विश्वासराव मारले गेल्यानंतर आणि भाऊसाहेबही नाहीसे झाल्यावर जी काही पळापळ झाली त्यात सगळी फौज उधळली गेली. अंताजीही दक्षिणेच्या रोखाने निघाले. पण मध्ये दिल्लीच्या पश्चिमेला असलेल्या फर्रुखनगर येथे जाटांशी झालेल्या झटापटीत अंताजी मारले गेले. बहुदा ते पानिपतच्या रात्री अथवा दुसऱ्या दिवशी मारले गेले असण्याचा संभव जास्त आहे. एकूणच, दिल्लीच्या राजकारणात मुरलेला हा मुत्सद्दी लढवय्या अखेर दिल्लीच्या आसमंतातच शांत झाला.


- कौस्तुभ कस्तुरे

(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या नोव्हेंबर २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)