शहामतपनाह थोरले बाजीराव



मराठ्यांच्या इतिहासात 'बाजीराव पेशवा' हे नाव सर्वश्रुत आहे. हल्ली आलेल्या सिनेमामुळे, इनामदारांच्या राऊ कादंबरीमुळे, दूरदर्शन वाहिन्यांवरील निरनिराळ्या मालिकांमुळे बाजीरावांचं नाव केवळ महाराष्ट्र नाही तर भारतभर घरातघरात  पोहोचलं आहे. अर्थात, वरील सर्व ललित साहित्य हे प्रमाण मानता येत नाही. त्यात अनेकदा इतिहासाशी छेडछाड करून प्रसंग मांडलेले असल्यामुळे जे दाखल जातं तोच मूळ इतिहास असं काहीसं चित्रं लोकांच्या नजरेसमोर उभं होतं. बाजीरावही याला अपवाद नाहीत. पण तरीही, या साऱ्याच्या पलीकडे असलेली अस्सल कागदपत्रे, समकालीन आणि उत्तरकालीन बखरी, हकीकती वगैरे पाहू गेल्यास बाजीरावांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचा, त्यांनी लढलेल्या लढायांचा उलगडा होतो. बाजीरावांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मोहिमा केल्या. स्वतः तलवार घेऊन युद्धात उतरले आहेत असे २३ प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्या बंधूंनी, चिमाजीअप्पांनी आणि सरदारांनी अनेक लढाया जिंकलेल्या आहेत. एकंदरच, ऐतिहासिक कागदपत्रांतून बाजीरावांचं व्यक्तिमत्व समजून घेण्यास खूप मदत होते. असेच काही गमतीशीर, काही महत्वाचे प्रसंग या लेखात पाहू.      

मागच्या अंकाच्या लेखात आपण बाळाजी विश्वनाथ पेशव्यांबद्दल माहिती घेतली. त्यांच्या मृत्यूनंतर पेशवाई कोणाला द्यावी हा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा अनेकांना हायसं वाटलं. आता पुन्हा आपल्या 'मर्जीतला' पेशवा गादीवर बसवण्यास काळ अनुकूल आहे अशी ती सुप्त इच्छा होती. पण शाहू महाराजांनी आपल्या जुन्या जाणत्या काही मुत्सद्द्यांच्या सल्ल्याने बाजीरावांनाच पेशवाईवर नेमलं आणि पुढे वीस वर्षांपर्यंत, बाजीरावांच्या मृत्यूपर्यंत ही पेशवाई काढून घेण्याचा प्रसंग शाहू महाराजांवर कधीही आला नाही हे सांगायलाच नको. पहिल्या तीन वर्षातच बाजीरावांनी नर्मदा पार करून माळवा वगैरे प्रदेशात मुसंडी मारली. पण निजामासारख्या शत्रूलादेखील या पेशव्याची 'शहामतपनाह' अशी तारीफ करावी लागली ती १७२४ साली. 

झालं असं, की निजामाने दक्षिणेत स्वतंत्र बस्तान मांडायला सुरुवात केली हे पाहून बादशहाने मुबारीजखान नावाच्या सरदाराला निजामाविरुद्ध पाठवलं. या सरदारांशी दोन हात करण्यासाठी निजामाकडे अर्थातच ऐनवेळेस पुरेशी फौज नव्हती. त्याने शाहू महाराजांकडे मदत मागितली. यात दुसरा हेतू हाही होता की दिल्लीविरुद्ध मराठे आपल्याला मदत करतात का आपल्या विरोधात जातात हे पाहून घ्यायलाही निजामाने हे फासे फेकले. महाराजांनी बाजीरावांना आणि चिमाजीअप्पांना, त्यांच्यासोबत सुल्तानजी निंबाळकर, पिलाजी जाधवराव वगैरे सरदारांना निजामाच्या मदतीसाठी पाठवून दिलं. साखरखेडले इथे बादशाही सरदार आणि निजामाची लढाई झाली. निजामाचा जय झाला, पण या विजयासोबतच निजामाला एक नवीनच चिंता उत्पन्न झाली. भविष्यात आपल्याला दिल्लीकडून नाही तर मराठ्यांच्या या पेशव्याकडून जास्त धोका आहे याची जाणीव त्याला झाली. निजामाने लिहिलेल्या पत्रात बाजीरावांचा उल्लेख मात्रं "शहामतपनाह" अर्थात शौर्य ज्याच्या अंगी पुरेपूर वसलं आहे असा होतो. पेशव्यांच्या बखरकाराने या प्रसंगाच्या नंतर घडलेल्या दोन गमतीशीर गोष्टी दिल्या आहेत. 

बाजीरावांचा साखरखेडल्याच्या संग्रामातला हा सारा प्रौढप्रताप पाहून केवळ निजामच नाही, पण त्याच्या साऱ्या छावणीत, अगदी त्याच्या जनानखान्यातही बाजीरावांची कीर्ती पसरली. निजामाचा जनानखाना बराच मोठा असणार हे उघड आहे. या साऱ्या बायकांनी निजामाकडे हट्ट धरला की "बाजीराव मोठा देखणा, सुरतपाक आहे असं आम्ही ऐकलं आहे. आम्हाला बाजीरावाला पाहायचं आहे". आता झाली पंचाईत. निजामाला काही बायकांचा हा हट्ट मोडता आला नाही आणि त्याने अखेरीस बाजीरावांना आपल्या छावणीत भेटायला बोलावलं. निजामाने आपल्या एका वकिलाकरवी बाजीरावांना म्हटलं, "तुम्हास जाफत करायची आहे, यासाठी तुम्ही आमच्या इथे यावं". जाफत म्हणजे मेजवानी. बाजीरावांना पेशवाई मिळून अर्थातच चार वर्ष झाली होती. शिवाय अंबाजीपंत पुरंदऱ्यांसारखे मुत्सद्दीही सोबत होतेच. बाजीरावांनी थेट निजामाच्या गोटात जाण्याऐवजी ही भेट बाहेर कुठेतरी घडावी असं म्हणून निजामाला म्हटलं, "आम्ही शहरात येणार नाही. बाहेर कोठे बसवायची जागा केल्यास तेथे येऊ. तिथेच तुमची आणि आमची मुलाखत होईल". निजामाला काहीच म्हणता येईना, आपल्या मनात जे काही असेल ते लपवून वरकरणी निजाम म्हणाला, "बरं, आम्ही शहराबाहेर साताऱ्यानजीक मेजवानीची जागा करतो, तिथे तुम्ही यावं". औरंगाबाद शहराच्या काहीसं दक्षिणेला 'सातारा' या नावाचं एक गाव पूर्वीही होतं, आजही आहे. निजामाने साताऱ्यात मेजवानीचे मोठी जागा केली, आलिशान डेरेदांडे उभे केले. आत बिछायत केली आणि सभोवती चिकाची बाडं उभारली. या बाडांपलीकडे निजामाचा सारा जनानखाना येऊन बसणार होता. ही सारी तयारी झाल्यावर निजामाने बाजीरावांकडे निरोप पाठवला, "आता तशीही लढाई वगैरे संपलेली आहे, ही केवळ खुशीची भेट आहे. आपण केवळ पाच खिजमतगार घेऊन यावं". निजामाने आपली काही माणसं बाजीरावांना आणण्यासाठी रवाना केली. निजामाचा जनानखाना पडद्यांआड येऊन बाजीरावांना पाहण्यासाठी उतावीळ होऊन बसला होताच. इकडे बाजीराव सारी तयारी करून घोड्यावर बसून निघाले. सोबत पाच खिजमतगार किंवा नोकरपेशा होता. बाजीराव आले हे पाहून निजाम डेऱ्याबाहेर गेला आणि पेशव्यांच्या हाताला धरून त्यांना डेऱ्यात घेऊन आला. बाजीराव आत येत असतानाच निजामाच्या बायका त्यांना पाहत होत्या. गौरवर्ण, भक्कम शरीरयष्टी, रुबाबदार चाल, एक वेगळंच तेज पाहून नियाज्मच्या बेगमा हरखून गेल्या. क्षण दोन क्षण जातात तोच एकदम चिकाचे पडदे बाजूला झाले आणि निजामाच्या बेगमांनी बाजीरावांवर दोन पायली मोती अक्षरशः उधळले ! निजामाच्या देखत ही सारी घटना घडत होती. काय वाटलं बरं असेल त्याला? पण निजाम चरफडण्यापलीकडे काही करू शकला नाही. 

केवळ मनातून चरफडण्याचा हा प्रसंग संपतो न संपतो तोच आणखी एक प्रसंग निजामाने स्वतः ओढवून घेतला. बेगमच्या या गुस्ताखीने भडकलेला निजाम बाजीरावांना बसायची खूण करून आपल्या आसनावर बसत म्हणाला, "आता कसं? आता तुम्ही आमच्या हाती सापडलात ! तुमचे ते शिंदे-होळकर कुठे आहेत? तुम्हाला आम्ही आता इथे दगा केला तर कसं होईल?" बाजीराव किंचितसे हसले, म्हणाले, "मी जिथे आहे तिथेच सारे आहेत". निजाम छद्मीपणाने हसला, "कुठे आहेत? मला तर इथे खिजमतगारांच्या पलीकडे कोणीही दिसत नाही". आता जोरात हसण्याची पाळी बाजीरावांची होती. निजामाला काहीच समजेना. अखेरीस बाजीरावांनी ओळख करून दिली. जे पाच खिजमतगार आले होते त्यांच्यात बाजीरावांचे दोन जबरदस्त सरदार, राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर हेही होते. ते वेष बदलून आले होते. निजामाच्या डेऱ्यात आता बाजीराव आणि त्यांच्या सरदारांच्या तावडीत एकदाचा निजाम आणि त्याचे खिजमतगार अडकले होते. निजाम वेळ टाळून नेण्यासाठी उसनवारी हसत म्हणाला, "आम्ही तुम्हाला या वेळेस दगा करणार नाही, कारण या समयी आंम्हाला तुमची गरज आहे. याउपर आमच्या विश्वासावर आमच्या भेटीस येऊ नये, आम्ही दगा करायला चुकणार नाही". बाजीरावांच्या या शौर्याची पुन्हा एकदा तारीफ करत निजाम म्हणाला, "एक बाजी, बाकी सब पाजी". पाजी म्हणजे मूर्ख. बाजीरावांनीही झाली तेवढी थट्टा खूप झाली असं म्हणून निजामाच्या या कोटीला प्रतीकोटी करून उत्तर दिलं, "एक निजाम, सब हजाम". अशी परस्परे बोलणी होऊन निजामाकडून वस्त्रालंकार मिळून बाजीराव अखेरीस आपल्या डेऱ्यात आले. 

साखरखेडल्यापासून पुढे निजामाला बाजीरावांच्या पराक्रमाचा अंदाज दरवेळेस येत गेला. पण पहिला आणि सगळ्यात मोठा तडाखा खुद्द निजामाला बसला तो म्हणजे पालखेडला. बाजीरावांनी कर्नाटकात दोन मोहीम काढल्यावर शाहू महाराजांचा पेशवा आता हिंदुस्थान आणि कर्नाटक, दोन्हीकडे नजर फेकू लागला आहे हे पाहून निजामाने स्वराज्यावर आक्रमण करण्याचा घाट घातला. १७२७च्या मध्यापासूनच निजामाने अगदी पुण्यापर्यंत येऊन मुलुख जाळला, अनेक सरदारांना फोडून तिथे आपला अंमल बसवला. बाजीरावांनी यावेळेस एक वेगळीच खेळी आरंभली. पालखेडच्या युद्धप्रसंगाचा हा एक उत्तम नमुना युद्धशास्त्रात         महत्वाचा आहे. निजाम पुण्यावर येतो आहे हे पाहून बाजीराव दसऱ्याच्या आसपास पुण्यातून निघाले ते संगमनेरजवळ, पुणतांब्याला गोदावरी ओलांडून निजामाच्या मुलुखात शिरले. जातानाच पालखेडवरून औरंगाबादच्या उत्तरेने वऱ्हाडात माहूर वगैरे भागात त्यांनी धामधूम केली. तिथून बर्हाणपूरचा रोख धरून, ऐनवेळेस बऱ्हाणपूर बाजूला ठेऊन ते पश्चिमेकडे वळले आणि नर्मदेच्या किनाऱ्याने गुजरातेत आले. गुजरातेत सरबुलंदखान नावाचा एक सरदार होता. या खानाचा आणि निजामाचा छत्तीसचा आकडा होता. बाजीरावांनी याचाच फायदा घेऊन, "निजामानेच मला तुझ्यावर पाठवलं आहे" अशी बतावणी करून गुजरातेत दंगा मांडला. खान हुशार होतो आहे असं पाहून बाजीराव छोटा उदेपूर आणि तिथून धुळ्याजवळ बेटावदला येऊन थांबले. आता बाजीराव निजामाच्या हालचालीकडे लक्ष ठेऊन होते. आपण पुण्यात असताना पेशव्याने आपल्या जहागिरीत हा सारा उपद्व्याप केला हे पाहून निजाम चवताळला. बाजीरावांना अडवण्यासाठी त्याला आता वेगाने जाण्याची निकड भासू लागली. त्याने आपला तोफखाना मागे ठेऊन घोडदळानिशी तो पुढे आला. निजामाने पुणतांब्याला गोदावरी ओलांडली. बाजीरावांचा डोळा होताच. आपल्या सगळ्या घोडदौडीत बाजीरावांनी प्रत्येक युद्धक्षेत्र आपल्या नजरेखालून घातलं होतं. पालखेडची जागा ही निजामाला कोंडीत पकडायला योग्य आहे हे पाहून बाजीराव विद्युतवेगाने येऊन निजामावर कोसळले. त्यातही, जवळपास तीन दिवस लहानमोठ्या चकमकी सुरु होत्या. वैजापूर ते पालखेड या भागात बाजीरावांनी फिरता गोल वेढा घालून निजामाला जेरीस आणलं. त्याची रसद बंद झाली. औरंगाबाद जवळच असल्याने तिथून निजामाला कुमक येऊ शकते हे पाहून बाजीरावांनी निजामाचा वेढा आवळला आणि निजाम शरण येण्याच्या बेतात असताना त्याला मुद्दाम पैठणच्या रोखाने नेलं. दि. २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडचं हे युद्ध झालं आणि पुढच्या दहा दिवसात बाजीरावांनी निजामाकडून सतरा कलमी तह मंजूर करून घेतला. खुद्द औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेल्या गाझीउद्दीनचा मुलगा, कसलेला मुत्सद्दी आणि योद्धा असलेला चीनकिलीजखान मराठ्यांच्या एका तरुण पेशव्यांकडून इतक्या दारुण पद्धतीने पराभव पावतो हि गोष्ट उभ्या हिंदुस्थानाला अनाकलनीय होती. बाजीरावांच्या यशाची कमान इथून पुढे चढती वाढतीच राहिली. पुढे बुंदेलखंड, कोकण, राजपुताना, अटेर-दिल्ली, भोपाळ अशा अनेक स्वाऱ्यांमध्ये अपयश म्हणजे काय हे बाजीरावांना माहित असण्याची गरजच उरली नव्हती. 

बाजीरावांच्या आयुष्यातील एकूण एक प्रसंग हा विस्तृत ऐकण्यातच मजा आहे. पण अर्थातच, शब्दमर्यादेमुळे इथे सारं काही देणं शक्य होत नाहीये. दिल्लीस्वारीतील एक दोन गमतीशीर प्रसंग देऊन हा लेखनप्रपंच या भागापुरता थांबवतो. बाजीरावांनी अटेरवर मोहीम काढली तेव्हा मल्हारराव होळकर आणि विठोजी बुळे हे बाजीरावांचे दोन सरदार अंतर्वेदीत उतरले. अंतर्वेद म्हणजे गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या मधला प्रदेश. बादशहाचा सादतखान नावाचा एक पठाण सरदार हुशार होताच. तो एकदम होळकर-बुळ्यांवर चालून आला. बाजीरावांच्या या तुकड्यांचा पराभव झाला, आणि त्यांना माघार घ्यावी लागली. मराठे पुन्हा यमुनेअलीकडे आले. सादतखानाने या लहानशा विजयावरून बादशहाला लहून पाठवलं की, "मी बाजीरावाच्या फौजेचा प्रचंड पराभव केला आहे. आता तो नर्मदा उतरून माघारी जातो आहे. पुन्हा कधी उत्तरेत येईल अशी आशाच नाही". बिचाऱ्या महम्मदशाह बादशहाने देखील सादतखानाच्या या शब्दांवर विश्वास ठेऊन त्याला मानाची वस्त्रं, हत्ती घोडे वगैरे बहाल केले. हे ऐकून बाजीराव वैतागले. एका लहानशा तुकडीचा पराभव केल्यावर हा सादतखान एवढं बढाई मारतो? ठीके, मग आता गंमतच करू ! बाजीरावांनी आपला मनोदय चिमाजीअप्पांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केला आहे, त्यात ते काहीसं असं म्हणतात - "सादतखानाने काहीही बढाई मारली तरी मराठे आहेत हे बादशहास दाखवावे यासाठी दिल्लीवर जातो". सादतखान विजयाच्या धुंदीत होता. बाजीराव इकडे यमुनेच्या दक्षिण तीराने, जाटांच्या मुलुखातून येऊन एकदम कालकादेवीच्या जत्रेत आलेल्या माणसांना दमदाटी करून  उभे ठाकले. या लोकांना "झांबडाझांबड केले" असं म्हटलं आहे, म्हणजे उगाच भीती घातली, लुटलं. या लोकांनी घाबरेपणाने दिल्लीत जाऊन आणखी मोठं दृश्य उभं केलं, "बाजीराव आला, बाजीराव आला ! शत्रू दाराशी आला !". बादशहाची भीतीने गाळण उडाली. बाजीराव? तो तर दक्षिणेत गेलेला ना मार खाऊन? आता? तरीही बादशहाने मीरहसनखान कोका, अमीरखान वगैरे लोकांना बाजीरावांवर पाठवलं. या लोकांना हुलकावण्या देत बाजीरावांनी दिल्लीपासून थोडं लांब नेऊन लांडगेतोड केली. झालं, हे सारे लंगडत शहरात आले. पण एवढ्यात कमरुद्दीनखान वजीर खासा चालून येतो आहे हे पाहून बाजीरावांनी आपला मुक्काम दिल्लीहून हलवला, आणि ते राजपुतान्याच्या रोखाने निघाले. मालच्याच्या मुक्कामी मराठी फौज असताना बादशहाने आपला एक माणूस पाठवून शत्रू कसा आहे हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. तो बादशहाचा माणूस एका फकिराच्या वेष करून आला होता. दुसऱ्या दिवशी त्याने एक पोतडी बादशहाच्या समोर उपडी केली, ज्यात अर्धवट जळलेल्या भाकरीचे काही तुकडे, हरभरे आणि वाटलेल्या मिरच्या होत्या. बाजीरावांच्या फौजेचा हे खाणं होतं. बादशहाला मराठ्यांच्या तलवारी तिखट जाणवल्या होत्याच, पण त्याहूनही तिखट जाळ असं हे खाणं पाहून बादशहाची काय अवस्था झाली असेल तोच जाणे. बहुदा याच प्रसांगात बादशहाने आपला एक चितारी बाजीरावांच्या फौजेत त्यांचं गुपचूप चित्र काढून आणण्यासाठी पाठवला होता. त्याने काढलेलं चित्रं काहीसं असं होतं- बाजीराव घोड्यावरून चालले आहेत, पाठीवर भाला आहे, कमरेला तलवार आहे, आणि जाता जाता शेतातील कणसे हातावर मळून त्यांचे दाणे ते खात आहेत. हे चित्र पाहून बादशहाच्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडले, "ये तो शैतान है.. शैतान है !".            


- कौस्तुभ कस्तुरे 

(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या फेब्रुवारी २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)