मिरजकर गोपाळराव पटवर्धन

पटवर्धन सरदारांची पेशवाईतली एक प्रमुख सरदार म्हणून कारकीर्द ही इ.स. १७३५ नंतर सुरु झालेली पाहायला मिळते, त्यातही इ.स. १७६०च्या देवगिरीच्या वेढ्यापासून पटवर्धन सरदार, विशेषतः गोपाळराव हे प्रामुख्याने पुढे आले. तत्पूर्वी, वसईच्या वेढ्यात रामचंद्र हरी पटवर्धन वगैरे लढत होतेच, हे घराणे म्हणून प्रामुख्याने उदयाला आले ते रामचंद्र हरीच्या मोठ्या भावाच्या वंशापासून, गोविंदरावांच्या वंशापासून. इ.स. १७५७च्या सिंदखेडच्या संग्रामात गोविंद हरी आणि त्यांचे पुत्र गोपाळराव हे दोघेही नानासाहेब पेशव्यांना आपल्या फौजेसह येऊन सामील झाले होते. सिंदखेडच्या या युद्धात निजामअलीला अडवण्याची जबाबदारी नानासाहेब पेशव्यांनी गोपाळराव पटवर्धनांवरही दिली होती. पण त्यांना निजामाला अडवता आलं नाही आणि निजाम सिंदखेडवर येऊन दाखल झालाच.

या सिंदखेडच्या मोहिमेपूर्वी गोपाळराव पटवर्धनांनी नानासाहेबांसोबत कर्नाटकच्या स्वाऱ्यांमध्येही आपली चमक दाखवली होती. इ.स. १७५५ मध्ये कर्नाटकच्या दुसऱ्या मोहिमेवरून परत येताना नानासाहेब पेशव्यांनी विसाजी कृष्ण बिनीवाले, बळवंतराव मेहेंदळे यांच्यासोबत गोपाळराव पटवर्धनांना म्हैसूरच्या बाजूला मुलूखगिरीसाठी ठेवले होते. पुढे नानासाहेब स्वतः दक्षिणेत गेले आणि सावनूरला वेढा घालून कोट पाडून टाकला. सावनूरकर नवाब शरण आला. इथवर गोपाळराव स्वतः नानासाहेबांसोबत असून यानंतर पेशव्यांनी त्यांना सोंधे संस्थानावर रवाना केलं. गोपाळरावांनी सोंध्यातून आठ लक्ष रुपये खंडणी, त्यातले अडीच लक्ष रुपये रोख, आणि उरलेल्या साडेपाच लक्षांच्या भरपाईसाठी मदनगड किल्ला ओलीस म्हणून ठेऊन घेतला. राजकारण म्हणून गोपाळरावांनी किल्लाही हाती येईपर्यंत सोंदेकरांचा मेहुणाच ओलीस ठेऊन घेतला आणि पुढे त्याला सोडून दिलं. पण या मोहिमेत गोपाळरावांच्या फौजेचे पावसामुळे फार हाल झाले. अंदाजे वीस-पंचवीस माणसं अशीच मृत्यू पावली, बाकीचे अनेक जखमी वगैरे झाले.

सिंदखेडच्या मोहिमेनंतर गोपाळराव पटवर्धन आणि मल्हारराव रास्ते या आपल्या दोन्ही सरदारांना पेशव्यांनी पुन्हा कलबुर्ग्याकडे रवाना केलं. या दोघांनी श्रीरंगपट्टणम आणि बंगलोर काबीज करून ते म्हैसूरच्या राज्यावर चौथाई बसवण्याच्या खटपटेला लागले. या दरम्यान हैदरअली आणि गोपाळरावांची बंगलोर आणि श्रीरंगपट्टण यांच्या दरम्यान दोन चार महिने निकराची हातघाई झाली. यात चौदा महालांवरचा हक्क गोपाळरावांना सोडून द्यावा लागला. यात आपलं नुकसान झालं असं म्हणून नानासाहेबांनी गोपाळरावांना "हैदरखानाने तुमचे स्वरूप नेले" असे खडे बोल सुनावले.

इ.स. १७६०च्या उदगीरच्या मोहिमेनंतर सदाशिवरावभाऊंनी निजामाकडून असीरगड-बऱ्हाणपूर, देवगिरी आणि विजापूर ही तीन प्रमुख स्थळं कागदोपत्री लिहून घेतली. यापैकी असीरगड हा उत्तरेत जाताना स्वतः भाऊ कब्जात घेणार होते. विजापूरवर विसाजीपंत बिनीवाले आणि नंतर रघुनाथरावांना पाठवण्यात आलं, आणि देवगिरी जिंकण्यासाठी नानासाहेबांनी गोपाळराव पटवर्धन यांना नियुक्त केलं. देवगिरीच्या किल्ल्यावर निजामातर्फे दर्गाह कुलीखान नावाचा एक कडवा सरदार किल्लेदार म्हणून नियुक्त केलेला होता. गोपाळराव पटवर्धन हे मुळात तडफदार म्हणून नावाजले गेल्याने नानासाहेबांनी त्यांची नियुक्ती केली खरी, पण गोपाळराव किल्ल्याच्या खाली आल्यावर किल्लेदाराने किल्ला थेट पटवर्धनांच्या हाती देण्यास नकार दिला. किल्लेदार म्हणू लागला, "विजापूर आणि असीरगड तुमच्या हाती आल्याशिवाय मी देवगिरी देऊ शकत नाही. तुमच्याकडे निजामाचा कागद असला तरीही मला थेट निजामाकडून काही निरोप आलेला नसल्याने माझ्याही हाती काही नाही". गोपाळरावांनी हे ऐकून किल्ल्याला वेढा घातला, आणि किल्लेदाराशी नरमाईची भाषेत बोलणी आरंभली. वास्तविक किल्लेदाराला निजामाची आतून फूस होती, आणि तू किल्ला पेशव्याला अजिबात देऊ नकोस असा निरोप मिळाला होता. इकडे गोपाळरावांनी दिवसेंदिवस खालीच थांबून, किल्लेदाराला जहागीर देण्याचं अमिश दाखवून किल्ला घेण्यास दिरंगाई लावली आहे हे पाहून नानासाहेब वैतागले. त्यांनी गोपाळरावांना स्पष्ट सांगितलं, "कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता किल्ल्याची रसद बंद करून टाका. वेढा आवळून धरा जेणेकरून किल्ला शरण येईल".

नानासाहेबांची या पात्रातील वाक्य मोठी अपूर्व आहेत. ते गोपाळरावांना लिहितात, "वारंवार लिहिता की ही स्थळे दुर्घट आहेत, शहास गुंतता येत नाही. हे बहुत अपूर्व वाटते. विचार दुरानडेंशी तुम्हांसच कळते हे पूर्ण प्रत्ययास येऊन गेले. लाखो असाध्य कामे श्रीकृपातेजप्रतापपुढे तृणप्राय आहेत, परंतु करणारासारखे फळ होते. तुम्ही सख्त, जलद शिपाई म्हणून मी तुम्हांस पाठवले होते. तुम्हीच आम्हांस विचार लिहिणार, इतके कळले असते तर लहानसान पथके पाठवले असते. गोपाळरावजी, हे दौलताबाद तुम्हांस दुर्घट वाटत्ये, परंतु दो महिन्यात सख्तीने वेढा घालून एक रुपया न देता घेऊ. राजभरून लिहिले म्हणून आता तुम्हांस राग  येईल. याउपर या पत्रावरून जितका राग येईल तितका त्याजवर काढणे." दि. १ एप्रिल १७६० रोजी नानासाहेबांचं हे पत्रं आलं आणि गोपाळराव अत्यंत संतापले. पेशव्यांवर नाही, स्वतःवरच! नानासाहेबांची मात्र लागू पडली आणि पुढच्या सातच दिवसात गोपाळराव पटवर्धनांनी देवगिरीवर हल्ला चढवून दि. ८ एप्रिल रोजी किल्ला जिंकून घेतला. नानासाहेब टोक्याला मुक्कामाला होते ते तिथून थेट देवगिरी पाहायला गेले आणि त्यांनी गोपाळरावांनी मोठी तारीफ केली. यानंतर पानिपतच्या युद्धाची बातमी आली आणि नानासाहेब स्वतः उत्तरेकडे चालून निघाले तेव्हा गोपाळराव आपल्या फौजेसह पेशव्यांना येऊन सामील झाले. वास्तविक पेशव्यांची आज्ञा ही रघुनाथरावांना साहाय्य करण्याची होती. पण पटवर्धनांचं आणि रःघुनाथरावांचं वाकडं आल्याने ते रुजू होण्यास टाळाटाळ करू लागले असं पाहताच नानासाहेबांनी त्यांना आपल्या सोबत नेलं.

नानासाहेबांच्या मृत्यूनंतर माधवराव गादीवर आले, पण लगेच त्यांना आपल्या चुलत्याच्या, रघुनाथरावांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. इ.स. १७६२ मध्ये काका-पुतण्याच्या या वादात गोविंद हरी आणि गोपाळराव गोविंद या पितापुत्रांनी माधवरावांची साथ दिल्याने माधवरावांनी मिरजेचं ठाणं गोविंद हरी पटवर्धन, पर्यायाने गोपाळरावांकडे दिलं. घोडनदीवरील मालेगावच्या युद्धात आणि तहात गोपाळरावांनी आपल्या फौजेसह पेशव्यांची पाठराखण केली होती. मालेगावच्या तहात माधवराव काळवेळ पाहून शरण गेले तरी गोविंद हरी आणि गोपाळराव मात्र बंड करून रघुनाथरावांना विरोध करत लढण्याच्या उद्देशाने उभेच राहिले. रघुनाथरावांनी मिरजेच्या कोटला मोर्चे लावले आणि अखेरीस महिन्याभराने पटवर्धनांनी मिरज हवाली केली. पुढे आबा पुरंदऱ्यांनी गोपाळरावांचा जमखिंडीजवळ पराभव केला. गोपाळराव पळून निजामाच्या आश्रयाला गेले. चुलत्या पुतण्याच्या वादात पटवर्धनांनी मात्र वाताहात झाली. पण पटवर्धनांनी काही केल्या निजामाला जाऊन मिळणं पेशव्यांना आवडलं नाही. ते एका पत्रात लिहितात, "गोपाळरावांनी न करावयाची गोष्ट करून मोंगल आम्हांवर घेऊन येतात."  भागानगरवर चालून गेले तेव्हा मात्र त्यांनी गोपाळरावांचं मन वळवून पुन्हा आपल्याकडे आणलं.

यानंतर माधवरावांचा गोपाळराव पटवर्धनांवर विश्वास बसला आणि पेशव्यांनी पुढे कायमच त्यांना नावारूपाला आणलं. इ.स. १७६४ मध्ये गोपाळरावांना लगेच हैदरअलीवर रवाना करण्यात आलं. सावनूरच्या वेढ्यात गोपाळरावांनी स्वतः हाती सूत्र घेऊन हिमतीने चाल करून हैदरअलीला आपली ताकद दाखवली. खुद्द हैदर यावेळेस रट्टेहळ्ळी गावाच्या जवळ होता. गोपाळराव पटवर्धन आणि विठ्ठल शिवदेव विंचूरकर तिथे गेल्यावर हैदरने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. गोपालरांनी गनिमी काव्याने हैदरला लांब नेट माधवरावांच्या मोठ्या फौजेजवळ आणलं आणि अखेरीस हैदराचा पराभव झाला. पण याचा वचपा काढायचं हैदराने ठरवलं. सावनूरात असलेल्या गोपाळरावांवर दग्यानें हल्ला करायचा हैदरचा बेत होता. पण गोपाळरावही सावध होते. त्यांना हा बेत समजला आणि हैदरची फजिती झाली.

वरच्या कर्नाटक मोहिमेप्रमाणेच इ.स. १७७० मध्येही कोलार प्रांतातील अनेक ठाणी गोपाळरावांनी काबीज केली होती. नेमकं या वेळेस हैदर पुन्हा गोपाळरावांवर चालून आला तेव्हा मात्र गोपाळरावांनी परिस्थिती नाजूक झाली होती. त्र्यंबकराव मामा पेठ्यांनी पटवर्धनांना रायदुर्गाला जायला सांगितलं पण गोपाळराव गेले नाहीत. या साऱ्या दगदगीत आणि मानसिक ताणात गोपाळरावांनी प्रकृती फारच बिघडली. त्यांनी वामनराव या आपल्या भावाला दक्षिणेत बोलावलं आणि आपण स्वतः मिरजेला यायला निघाले. मिरजेत पोहोचताच तिसऱ्या दिवशी, दि. ११ जानेवारी १७७१ रोजी गोपाळराव पन्नाशीच्या वयात मृत्यू पावले. पटवर्धन घराण्यातला हा मोठा करता पुरुष गेल्याने पेशव्यांसकट सारेच कष्टी झाले. गोपाळरावांच्या मृत्यूची बातमी समजताच माधवरावांनी चार दिवस चौघडा बंद केला आणि दरबार मना केला.

 

- कौस्तुभ कस्तुरे

(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या डिसेंबर २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)