सासवडचे सरदार पुरंदरे
सासवडच्या आसमंतातील अनेक घराणी ही अगदी शहाजीराजांच्या-शिवाजी महाराजांच्या काळापासून रणांगण आणि मुत्सद्देगिरी गाजवत आहेत. अत्रे, बोकील, सरनाईक, जगताप, आणि अनेक. अशातलंच एक तालेवार घराणं म्हणजे सरदार पुरंदऱ्यांचं. या घराण्यातील काही वंशजांकडून असं समजण्यात आलं की हे घराणं मूळचं कर्नाटकातील. मूळ आडनाव लोकरस. ते महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाल्यावर आधी झाले 'वाघ', आणि पुढे पुरंदर किल्ल्याच्या परिसरात राहायला आल्यावर या घराण्याने 'पुरंदरे' हे आडनाव स्वीकारलं.
या घराण्याच्या अनेक शाखा-उपशाखा आहेत, पण इतिहासात जी शाखा गाजली ती म्हणजे त्र्यंबक भास्कर पुरंदरे यांची. आपल्याला हे माहित असेलच की बाळाजी विश्वनाथ सुरुवातीच्या काळात कोकणातून घाटावर आल्यावर त्यांना पहिला आसरा मिळाला ते म्हणजे सासवडच्या पुरंदऱ्यांकडे. पण या दोन घराण्यांची ओळख ही याही आधीची होती असं म्हणायला नक्कीच वाव आहे. असं एकदम का कोणी कोणाला आपल्याकडे राहायला देईल? मग ही ओळख कधीची असेल?
बाळाजी विश्वनाथांचे आजोबा परशुरामपंत आणि वडील विश्वासराव हे शिवाजी महाराजांना जाऊन भेटल्याचा उल्लेख आपल्याकडे आहे. एवढंच नव्हे, तर विश्वासरावांनी म्हणजेच विश्वनाथपंतांना महाराजांनी दोन हजार फौजेची सरदारी सांगितली. हा काळ नक्की कोणता ते सांगता येत नसलं तरीही विश्वनाथपंत अर्थात बाळाजी विश्वनाथाच्या वडिलांचा प्रवेश हा इ.स. १६७०च्या सुमारास झाला असला पाहिजे. याच सुमारास महाराजांनी पुरंदर किल्ल्यावर आणि आसपासच्या भागावर देखरेख करण्याकरीता एक जबरदस्त,मोठ्या हुद्द्यावरचा माणूस सुभेदार म्हणून नेमला होता. तेच वर उल्लेख केलेले त्र्यंबक भास्कर पुरंदरे. त्र्यंबक भास्कर हे अगदी शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळापासून सोबत असलेले दिसतात. महाराज पन्हाळ्यावर अडकले असताना पन्हाळ्याची जबाबदारी ही त्र्यंबकपंतांवर सोपवलेली होती. पुढे या त्र्यंबकपंतांचं वय झाल्यानंतर यांचे दोन पुत्र- अंबाजी त्र्यंबक आणि तुकदेव त्र्यंबक हेही राजकारण आणि युद्धनीतीत पुढे येऊ आले. यात अंबाजीपंतांचं नाव विश्वेषत्वाने घ्यावं लागतं. तुकदेव त्र्यंबक त्या मानाने बहुदा लवकर निवर्तले असावे त्यामुळे पुढे त्यांचा पुत्र मल्हार तुकदेव हा आपल्या काकांच्या सोबत सारी कामं चोख पार पाडून लागला.
बाळाजी विश्वनाथ घाटावर आले तेव्हा अंबाजीपंत पुरंदरे ही एक मातबर असामी बनली होती. बाळाजी विश्वनाथांना त्यांनी आधी ताराबाईसाहेबांकडे नेऊन, तिथून रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव,आणि त्यानंतर धनाजी जाधवरावांकडे नोकरी करण्यास लावून दिलं. बाळाजी विश्वनाथ सासवडला आल्यानंतर त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, राहायला घर नव्हतं, त्यामुळे हे सगळं बिऱ्हाड काही वर्षे पुरंदर्यांच्याच वाड्यात राहत होतं. याच उपकरणांना स्मरून, पुढे बाळाजी विश्वनाथाच्या नातवाने, थोरल्या नानासाहेब पेशव्यांनी जेव्हा शनिवारवाड्याच्या विस्तार केला तेव्हा अगदी आपल्या आप्तस्वकीयांनाही वाड्याच्या कोटात आपले स्वतंत्र वाडे उभारायला परवानगी दिली नाही. ती परवानगी केवळ आणि केवळ पुरंदरे घराण्याला मिळाली.
बाळाजी विश्वनाथ आणि अंबाजीपंत यांचा घरोबा दिवसेंदिवस वाढतच गेला. अंबाजीपंतांना घरात तात्या म्हणत असत. औरंगजेबाने राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर इ.स. १७०२ मध्ये जेव्हा सिंहगडाला वेढा घातला तेव्हा गडावर बाळाजी विश्वनाथ सेनापती धनाजी जाधवरावांच्या तर्फेने कामकाज पाहत असून त्यांनी या वेढ्यातून सासवडला पत्रं लिहून 'कृष्णमृत्तिका' म्हणजे तोफा-बंदुकांच्या दारूची मागणी केली आहे. या वेळेस गडावर अंबाजीपंतांच्या चुलत भाऊबंदांपैकी गोमाजी विश्वनाथ नावाचा एक माणूसही उपस्थित होता.
इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याच्या पुत्रांमध्ये दिल्लीच्या सिंहासनाची चढाओढ लागली तेव्हा राजपुत्र आझमने माळव्यात आपल्या कैदेत असलेल्या शाहू महाराजांची सुटका केली. यामागची अटकळ अशी की शाहू महाराजांनी महाराष्ट्रात येऊन आपला हक्क सांगावा आणि मराठ्यांमध्ये दुहीची बीजे पेरली जावीत. शाहू महाराज जेव्हा मजला मारून खान्देशात आले तेव्हा लांबकानीच्या मुक्कामी त्यांना आपल्या फौजेसह जाऊन मिळणार पहिला सरदार हा पुरंदरे होता- अंबाजीपंतांचा पुतण्या, मल्हार तुकदेव पुरंदरे. यासाठी महाराजांनी कौतुकाने पुरंदऱ्यांना परगणे सुपे आणि कसबे सासवडची सरदेशमुखी लिहून दिली. यापूर्वीच राजाराम महाराजांनी इ.स. १७९३ मध्ये कसबे सासवडचं कुलकर्ण्य आणि कार्यात सासवडचं देशकुलकर्ण्य पुरंदऱ्यांना बहाल केलं होतं. एकंदरीतच, सासवडच्या प्रदेशात पुरंदरे आता प्रचंड तालेवार सरदार म्हणून नावारूपाला आले. राजाराम महाराजांनी दिलेल्या या वृत्तीवर अत्रे घराण्याने आपला दावा सांगितला, पण पुढे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या वादाचा निकाल पुरंदऱ्यांच्या बाजूला लागला आणि अत्रे खोटे पडले.
बाळाजी विश्वनाथ हे चढत्या वाढत्या पदव्या पावत हळूहळू सेनाकर्ते झाले, आणि इ.स. १७१३ मध्ये बहिरोपंत पेशव्यांच्याच अटकेचा प्रसंग उद्भवल्याने शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना पेशवाई दिली. या वेळेस पेशव्यांनी आपल्यावरचे उपकार स्मरून अंबाजीपंत पुरंदऱ्यांना आपला खाजगी दिवाण आणि त्यांच्या सातारा दरबारातील मुतालिक अशी पदं महाराजांकडून मिळवून दिली. अंबाजीपंतांना यावेळेस जातीस चाळीस हजार रुपयांचा सरंजाम आणि पंचवीस हजार रुपयांच्या इतर तैनातीही लावून देण्यात आल्या. स्वतः अंबाजीपंत हे पेशव्यांची दिवाणी करत आणि त्यांचा पुतण्या मल्हार तुकदेव हा सातारा दरबारात राहून पेशव्यांची मुतालकी करत असे.
पुरंदऱ्यांचे आपल्यावर उपकार आहेत असं पेशव्यांना वाटण्याचं आणखी एक कारण झालं ते म्हणजे दमाजी थोरात हिंगणगावकर यांचं प्रकरण. हिंगणगावकर थोरात हे शाहू महाराजांच्या विरोधात बंड करून उठले असताना त्यांनी एके दिवशी बाळाजी विश्वनाथ,त्यांचा कुटुंबकबिला आणि अंबाजीपंत पुरंदऱ्यांना दग्यानें कैद केलं. अंबाजीपंतांनी या प्रकरणात पेशव्यांच्या कुटुंबाला अजिबात इजा होऊ दिली नाही. थोराताने अगदी लोखंडाची सांडस तापवून अंबाजीपंतांच्या अंगाचं मास तोडलं तरीही त्यांनी हा त्रास सहन केला. या दरम्यान बाळाजी विश्वनाथांनी जामिनासाठी आपली सुटका करून पैशाची व्यवस्था करण्यात ते बाहेर गुंतले होते. अखेरीस पन्नास हजार रुपयांच्या मोबदल्यात या साऱ्यांची सुटका करण्यात आली. या दरम्यानच पेशव्यांनी फौज जमवून, थोरातांवर हल्ला करून हिंगणगावची गढी जमीनदोस्त केली, आणि तिच्यावर गाढवाचा नांगर फिरवला.
इ.स. १७१९मध्ये बाळाजी विश्वनाथ आपल्या पन्नास हजार फौजांसह दिल्लीत सय्यद बंधूंच्या मदतीसाठी गेले तेव्हा त्यांच्या सोबत अंबाजीपंत पुरंदरेही होते. या मोहिमेत चौथाई-स्वराज्य आणि सरदेशमुखीच्या सनदा घेऊन मराठा फौजा माघारी फिरल्या. पण फौजा दिल्लीतून बाहेर पडताच बाळाजीपंत पुढे आलेले दिसतात तर अंबाजीपंत हे बहुदा काशीयात्रा करूनच परतले असावेत.
बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर सातारा दरबारात जेव्हा 'पेशवाई कोणाला द्यावी' हा प्रश्न पुन्हा उद्भवला तेव्हा अंबाजीपंतांनी मोठ्या हिकमतीने बाजीरावांची बाजू मांडली. पिलाजी जाधवराव, नाथजी धुमाळ असे जुनेजाणते सरदारही बाजीरावांच्या पाठीशी उभे राहिल्याने महाराजांनी अखेरीस बैरावांनाच पेशवाई दिली. बाजीराव पेशवाईवर आल्यानंतरही बराच काळ त्यांना अंबाजीपंतांच्या आधाराशिवाय कामं करणं शक्य होत नसावं असं वाटण्याजोगा एक पुरावा आज आपल्याकडे उपलब्ध आहे, हे म्हणजे खुद्द बाजीरावांचं एक पत्रं. इ.स. १७२६च्या सुमारास अंबाजीपंत हे पेशव्यांची काही फौज घेऊन माळव्यात उतरले होते. यावेळेस पेशवे स्वतः कर्नाटकात स्वारीवर गेले होते. इकडे निजामाने एक बातमी वाऱ्यावर पसरवून दिली की पेशवा बाजीराव आणि खंडेराव दाभाडे सेनापती हे दोघे बंड करून महाराजांना पायउतार करतील. महाराजांनी काहीसा गैरमेळ होऊन बाजीरावांना 'निजामाला पायबंद घालण्याबद्दल' पत्रं लिहिलं. हे पत्रं मिळताच बाजीरावांनी तातडीने अंबाजीपंतांना पत्रं पाठवून शक्य तितक्या लवकर आपल्या मदतीसाठी यावं असं कळवलं आहे. बाजीराव लिहितात, "आता उशीर करू नका, लवकरात लवकर या. तुम्ही इथे आल्यावर तुमच्या हाती बंदोबस्त देऊन मला राजदर्शनासाठी साताऱ्यात जावं लागेल. इथे जे लोक ठेवायचे ते तुमच्या विचारानेच ठेवावे लागतील. इथली सारी कामं तुम्ही नसल्यामुळे खोळंबली आहेत, तुम्ही आल्याशिवाय काही होत नाही. कोणत्याही प्रकारे माझा घात करू नका". अंबाजीपंत वेळेवर आले आणि बाजीरावांना हायसं वाटलं.
इ.स. १७३५ मध्ये अंबाजीपंत पुरंदऱ्यांचा वार्धक्याने मृत्यू झाला. या वेळेस पुरंदरे घराण्यातील पुढची पिढी कामकाजात आधीच तरबेज झाली होती. मल्हार तुकदेव हे आधीपासूनच साताऱ्यातील मुतालकी सांभाळत होते. आता अंबाजीपंतांचा मुलगा महादजी उर्फ महादोबाही या कामी निपुण होऊ लागला. अंबाजीपंतांचा दुसरा मुलगा सदाशिव हाही लवकर निवर्तला असावा असं दिसतं. याच सुमारास बाजीरावांनी आपला ज्येष्ठ पुत्र बाळाजी उर्फ नाना यालाही सातारा दरबारात शिक्षणासाठी ठेऊन दिलं. महादोबा पुरंदऱ्यांसोबत नानासाहेबांचं शिक्षण सुरु झालं. याच कारणाने, नानासाहेब पेशवे शेवटपर्यंत महादोबांना आपला राजकारणातील गुरु समजत असत. महादोबा हे चिमाजीअप्पांसोबत वसईच्या मोहिमेत सामील झाले होते.
महादोबा पुरंदऱ्यांनी नानासाहेबांची अगदी सख्ख्या भावासारखी साथ दिली. इतकी, की इ.स. १७४२च्या सुमारास, बाबूजी नाईक बारामतीकरांनी कर्जासाठी पेशव्यांकडे तगादा लावला, आणि आपला एक ब्राह्मण शनिवारवाड्यासमोर उपोषणाला बसवला तेव्हा महादोबा पुरंदऱ्यांनी आपल्या घरातील चांदीची भांडी वगैरे विकून पेशव्यांसाठी पैसे उभे केले. महादोबांना घरात बाबा म्हणत असत. नानासाहेबांचा महादोबांवर प्रचंड विश्वास. सदाशिवरावभाऊंची पहिली मोहीम इ.स १७४६ साली झाली. कर्नाटकातील या मोहिमेत भाऊंचं सारं लष्करी शिक्षण हे महादोबा पुरंदऱ्यांच्या हाताखाली झालं होतं. महादोबांचा पुतण्या त्र्यंबक सदाशिव उर्फ नाना हाही आता कामकाजात तरबेज होऊ लागला होता.
महादोबा पुरंदरे कोणत्याही प्रसंगी सातारा दरबारात नानासाहेबांची बाजू उचलून धरत असत. एकदा महाराजांनी विचारलं, "पेशवे काहीच करत नाहीयेत का?" यावर महादोबा म्हणाले, "महाराज, इतरांचा दंडक असा की लहानशी गोष्ट केली तरी ती चढवून वाढवून सांगावी, आणि आमच्या खावंदांचा म्हणजे पेशव्यांचा दंडक असा की आभाळाएवढी गोष्ट जरी केली तरी ती तिळाएवढी दाखवावी". आणखी अशाच एका प्रसंगात महाराजांनी बाजीरावांच्या माणसांवर कामचोरीचा आरोप केला, तेव्हा पुरंदरे म्हणाले, "ही गोष्ट कधीच होणार नाही महाराज. पेशव्यांना अशा गोष्टी अजिबात चालत नाहीत. तिथे इतर कोणी जाऊदेत, खुद्द पुरंदरे असले आणि अन्यायाने वागले तरी पेशवे गर्दनच मारतील इतके ते सरळ आहेत". नानासाहेब पेशव्यांची पेशवाई महाराजांनी काढून घेतली तेव्हा सातारा दरबारातील साऱ्या प्रकरणावर महादोबाची बारीक नजर होती. किंबहुना, त्यांच्याच चौकस बुद्धीमुळे साताऱ्यातील राजकारण राखण्यास नानासाहेबांना मदत झाली असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
या वेळेस कधी शक्यता नव्हती ती घटना पुरंदरे-पेशवे या घराण्यांमध्ये घडली. प्रत्येक घरात रुसवेफुगवे होतातच. शाहू महाराजांच्या मृत्यूच्या सुमारास महादोबा आणि नानासाहेब पेशवे यांच्यात काही कारणावरून वितुष्ट आलं. हे वितुष्ट बहुतांशी कामकाजाच्या पद्धतीवरून होतं. सदाशिवर्वभौ हे रामचंद्रबाबा शेणवी या मुत्सद्द्याच्या हाताखाली तयार झालेले. त्यांना शांततेच्या राजकारणापेक्षा आक्रमक शैली जास्त पसंत होती. भाऊंनी हळूहळू कारभार आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली आणि कारभाराची शैली बदलली. नानासाहेबांनी सदाशिवरावभाऊंना आपला कारभारी नेमलं हे पाहून, विशेषतः सातारा दरबारात आक्रमकतेने भलतंच काही होऊन बसेल या काळजीमुळे नानासाहेब आणि महादोबा यांच्यात शब्दाला शब्द वाढत गेला आणि महादोबा रुसून, सगळं सोडून सासवडला जाऊन बसले. अर्थात, कितीही झालं तरी जिव्हाळा काही तुटत नाही. नानासाहेबांनी यथावकाश महादोबाचं रुसवा दूर केला, भाऊसाहेबांना कोल्हापूरची पेशवाई मिळाली आणि सांगोल्याच्या करारानंतर काळजी करण्याचं काही कारण नाही असं पाहून महादोबाही सगळं विसरून पुन्हा पेशव्यांशी पुन्हा पूर्वीच्याच जिव्हाळ्याने एकरूप झाले.
महादोबा पुरंदरे पानिपतच्या काही काळ आधीच निवर्तले, त्यामुळे भाऊसाहेबांसोबत नानासाहेबांनी पानिपतावर नाना पुरंदऱ्यांना पाठवलं. नाना पुरंदरे हे नानासाहेब पेशव्यांना मानलेल्या मुलासारखे होते. स्वतः नानासाहेबांसोबत महादोबांचा मुलगा निळकंठराव उर्फ आबा होता. नानासाहेबांनी पानिपत मोहिमेच्या आधी आपलं दुसरं लग्न केलं त्याच वेळेस निळकंठरावआबांचं देखील लग्न लावून दिलं इतका हा जिव्हाळा.
पुढच्या काळात त्र्यंबक सदाशिव उर्फ नाना पुरंदरे, निळकंठ महादेव उर्फ बाबा पुरंदरे, धोंडदेव मल्हार उर्फ धोंडोबाअप्पा आणि महीपत त्र्यंबक उर्फ बजाबा पुरंदरे या चौकडीने गाजवला. या साऱ्या पुरंदरे मंडळींनी कायमच पेशव्यांच्या प्रति आपली निष्ठा कायम ठेवली, आणि हरप्रकारे पेशव्यांचं काम, शब्द खाली पडू दिला नाही. इतकं, की दुसरे बाजीराव धूळकोटबारीला जेव्हा माल्कमला शरण आले तेव्हा इतर सारे सरदार बाजीरावांना सोडून गेले होते, पण शेवटपर्यंत साथ देणाऱ्यात केवळ दोनच सरदार होते, एक म्हणजे विंचूरकर आणि दुसरे म्हणजे निळकंठराव आबा (द्वितीय) पुरंदरे. आपल्या जिवाभावाच्या लोकांना शंभर-दीडशे वर्षे आणि पिढयान्पिढ्या साथ देणारी अशी घराणी अत्यंत विरळ असतात हेच खरं.
- कौस्तुभ कस्तुरे
(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या ऑक्टोबर २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)