रणधुरंधर सरदार शिंदे भाग २ - दत्ताजी, जनकोजी व महादजी



मागच्या भागात आपण राणोजी शिंदे आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयाजी उर्फ जयाप्पा यांच्या कार्यकाळाबद्दल आणि पराक्रमाबद्दल पाहिलं. या दुसऱ्या भागात राणोजींचे दोन पुत्र, दत्ताजी-महादजी आणि जयाप्पांचे पुत्र जनकोजी यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती पाहणार आहोत.

दिल्लीचा वजीर आणि अयोध्येचा नवाब सफदरजंग याचं आणि अहमदखान पठाणाचं वैर इ.स. १७५१ मध्ये गाजत होतं. अहमदखान वास्तविक बादशहाचा मित्र असला तरीही आपल्याला डोईजड होईल म्हणून बादशाह आतून पठाणांची मदत करत होता. अखेरीस या सगळ्यावर दाब राहावा म्हणून सफदरजंगाने मराठ्यांची मदत मागितली. शिंदे-होळकर या पेशव्यांच्या दोन सरदारांशी त्याने दररोज पंचवीस हजार रुपये देण्याचा करार केला आणि पठाणांशी झगडा आरंभला. जयाप्पा शिंदे आणि दत्ताजी शिंदे हे दोघेही भाऊ या मोहिमेत हजर होते. अंतर्वेदीत उतरून मराठ्यांनी अहमदखान बंगशाची अक्षरशः लांडगेतोड चालवली. नानासाहेब पेशव्यांनी याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले की, "शाबास तुमच्या हिमतीची, व दिलेर रुस्तुमीची. दक्षिणच्या फौजांनी गंगायमुनापार होऊन पठाणांशी युद्ध करून फते पावावे हे कर्म सामान्य नव्हे. तुम्ही एकनिष्ठ, कृत्तकर्मे दौलतीचे स्तंभ आहा. इराण तुराण पावेतो लौकिक जाहला".

दत्ताजी शिंद्यांचा स्वभाव हा काहीसा रागीट आणि शिपाईगिरीचा होता. शांतपणे विचार करून कामगिरी करावी असा जयाप्पांसारखा त्यांचा स्वभाव नसल्याने नानासाहेब पेशव्यांनी जयाप्पा गेल्यावर सांत्वनपर पत्र लिहिताना म्हटलं, "दत्ताजी शिंदे मर्द-खबरदार आहेत. जानकोजीचे समाधान करून उपस्थित मनसुबा सिद्धीस पाववून शत्रूचे पारिपत्य, तहरह उत्तमप्रकारे होय ते करणे. दत्तबाचा स्वभाव शिपाईगिरीचा आहे, यास्तव रागे करून असमयी अस्थानी निकडीस प्रवर्ततील, त्यास गोड बोलून समजावून सांगणे". स्वतः दत्ताजींना नानासाहेब लिहितात, "तुम्ही आजपावेतो शिपाईगिरी केली. आता सरदाराची रीत धरून तजविजीनेच कामे करावी. तुमचा अभिमान ईश्वरास आहे, आणि मजवर ईश्वरी कृपा आहे तोवर साहित्याशी कधी चुकणार नाही. तीन पिढ्यांचे एकनिष्ठ सेवक, कामाचे असता तुमचा अभिमान नसावा हे या घरात कधीही घडणार नाही". जयाप्पा गेल्यावर दत्ताजी आणि जानकोजींवर प्रसंग उद्भवला म्हणून अंताजी माणकेश्वरांना पुढे पाठवून, आणि पाठोपाठ समशेरबहाद्दर, विठ्ठल शिवदेव विंचूरकर वगैरे असामींना कुमकेस देऊन मारवाडची स्वारी आखली. अंताजींनी मारवादात जाऊन अनिरुद्धसिंगचा पराभव केला आणि दत्ताजींनीही मारवाडातील राजपुतांची इतर ठाणी मारून काढली. अखेरीस साऱ्याच मराठा फौज दत्ताजींच्या मदतीस आलयावरून विजेसिंगाने दत्ताजींना अजमेर-झालोत हे दोन किल्ले आणि पन्नास लाख रुपये नख्त द्यायचं कबूल केलं. अखेरीस अहमदीयाच्या पाच वर्षानंतर शिंद्यांना अजमेर मिळालं.

मारवाडातून इ.स. १७५६ मध्ये दत्ताजी आणि जनकोजी हे काका-पुतणे दक्षिणेत नानासाहेबांच्या मदतीस येऊन दाखल झाले. शिवनेरी आणि आजूबाजूचा प्रदेश उद्धव विरेश्वर चितळ्यांनी कब्जात घेतल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी आता आपली दृष्टी अहमदनगरकडे फेकली. दत्ताजी शिंदे या स्वारीत दाखल होताच त्यांनी नानासाहेब पेशव्यांना म्हटलं, "दिवसेंदिवस मोंगल (निजाम) क्षीण होत जाईल, तसे आणखी घेतले जाईल. त्याने बळ धरिले तर आम्हीही जात आहो. स्वामींच्या आशीर्वादेकरून सर्व पादाक्रांत करू". नानासाहेबांनी सलाबतजंग निजामाकडे पंचवीस लक्ष रुपयांची मागणी केली, आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून अखेरीस निजामावर मोहीम काढण्यात आली. दि. १२ ते १७ डिसेंबर १७५७ या पाच दिवसांत वऱ्हाडात सिंदखेडच्या आसपास पेशव्यांचा फौजांचा आणि निजामाचा संग्राम झाला. या संग्रामात सेनानायक म्हणून नानासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र विश्वासराव असून त्यांच्याच वयाचे जनकोजी शिंदे सुद्धा तलवार गाजवत होते. सदाशिवरावभाऊ पैठणवर थांबून फौजेच्या मागची व्यवस्था पाहत होते. या मोहिमेत, ऑक्टोबर १७५७ मध्ये औरंगाबादवर दत्ताजी शिंद्यांनी हल्ला चढवला तेव्हा त्यांना काहीशी जखम झाली. निजामाच्या मदतीसाठी सिंदखेडहून रामचंद्र जाधव मदतीला येत असताना दत्ताजी-जनकोजी यांनी अचानक जाधवांवर हल्ला चढवला. सिंदखेड वेढलं गेलं. जाधवांच्या मदतीसाठी निजामअली निघाला असता विश्वासरावांनी त्याचा पाठलाग सुरु केला. अखेरीस वर उल्लेखलेला पाच दिवसांचा संग्राम होऊन निजामाने पेशव्यांशी तहाची बोलणी सुरु केली.

इ.स. १७५८च्या फेब्रुवारीत जनकोजी शिंदे उत्तरेत गेले आणि पाठोपाठ तीन महिन्यांनी दत्ताजींनीही उत्तरेकडे प्रयाण केलं. जनकोजी उज्जैनीहून खंडण्या वसूल करत राजपुतान्यात गेले. दरम्यानच्या काळात श्रीगोंद्याला दत्ताजींनी भागीरथीबाईंशी लग्न केलं, आणि आपल्या कुटुंबासह, शिवाय जनकोजींची पत्नी काशीबाई आणि नारोशंकर दाणींसह दत्ताजी उत्तरेत गेले. नोव्हेम्बर १७५८ मध्ये जनकोजी आणि दत्ताजी शिंदे यांची भेट रेवाडीत झाली. या वेळेस दत्ताजी-जानकोजींना नानासाहेबांनी नजिबाचं पारिपत्य करावं, लाहोरचा बंदोबस्त करावा, तीर्थक्षेत्र सोडवावी आणि पाटणा-बंगालात स्वारीं अरुण दोन करोडपर्यंत पैसा मिळवावा असं म्हटलं. या साऱ्या प्रकारात आधीच्या स्वारीत पंजाब वगैरे मुलखात शिंदे काका-पुतणे हे आपला अंमल बसवतानाच अब्दालीचा पुन्हा हल्ला झाला. डिसेंबर १७५९ मध्ये दिल्लीजवळ छावणी असतानाच नजीबखानाने आपले पूर्वीचे अपराध क्षमा करून पदरी घ्यावं असं म्हटलं आणि आपण आपल्याला शुजावर आणि बंगाल प्रांतात स्वारीसाठी मदत करू असंही वचन दिलं. शुक्रतालच्या प्रदेशात नजीब दत्ताजींना गंगेवर नावांचे पूल बांधून देणार होता. पण एवढ्यात अब्दाली आला आणि नजीबाने दत्ताजींशी दगाबाजी केली. दत्ताजींना याची कुणकुण असल्याने त्यांनीही आधीच नजिबाच्या प्रदेशात लुटालूट सुरु केलीच होती. पण नेमकं याच वेळेस लाहोरहून अब्दालीचा मार खाऊन साबाजी शिंदे दत्ताजींकडे आले आणि बंगालात जाण्याचा बेत रद्द करून दत्ताजींसमोर आता अब्दालीचा सामना करण्याचा प्रसंग उभा राहिला. अखेरीस याची परिणीती पुढे बुराडी घाटावर दि. १० जानेवारी १७६० रोजी दत्ताजींच्या मृत्यूमध्ये झाली. दत्ताजीच्या मदतीसाठी जनकोजी गेले असता तेही जखमी झाले. त्यांच्या दंडात गोळी घुसली. अखेरीस ते माघारी फिरून कोटपुतळीला आले. 

पानिपतच्या संग्रामात जनकोजी शिंदे आणि त्यांचे काका महादजी हे दोघेही भाऊसाहेबांसोबत होते. विश्वासराव आणि भाऊसाहेब मारले गेले आणि फौज उधळली. या साऱ्या अवधीत घायाळ अवस्थेत जनकोजी शिंदे बरखुर्दारखानाच्या हाती सापडले. खानाने जनकोजींवर उपचार केले, पण नजीबाने खानाची तक्रार अब्दालीकडे करताच अब्दालीकडून झडती होण्याच्या आत निकाल लावावा म्हणून खानाने जनकोजींची हत्या केली. महादजी शिंदे हे रणांगणावरून निघून जाण्यात यशस्वी ठरले, पण नेमकं एका पठाणाने त्यांना पळताना पाहिलं आणि पाठलाग सुरु केला. काही अंतरावर महादजींनी आणि पठाणाची झटपट झाली तेव्हा पठाणाच्या तलवारीचा वार महादजींच्या पायावर लागला आणि ते बेशुद्ध झाले. महादजी मृत्यू पावले असं समजून पठाण निघून गेला आणि दैव बलवत्तर म्हणून महादजी बचावले. महादजीचा पाय आयुष्यभर या कारणास्तव अधू राहिला. पुढे महादजीच्या हयातीतच जनकोजी शिंद्यांचे तोतये अचानक उद्भवले पण त्यांचा योग्य परामर्श घेण्यात आला.

पुढे महादजीचा बराच काळ पुण्यातील राजकारणामुळे आणि शिंद्यांच्या घरातील अंतर्गत भाऊबंदकीमुळे वाया गेला. इकडे माधवराव आणि रघुनाथरावांच्या चढाओढीत पेशव्यांनी महादजींनी आणि राघोबादादांनी तुकोजी शिंद्यांचा पुत्र म्हणजेच महादजींचा पुतण्या केदारजी याला सरदाराची वस्त्रं बहाल केली. पुढे या गोंधळातून मार्ग काढत धोडपच्या प्रसंगाच्या आसपास केदारजींना बाजूला करून शिंद्यांची सरदारी महादजींनी सन्मानपूर्वक बहाल केली. यापूर्वी राक्षसभुवन वगैरे प्रसंगात महादजींनी अर्थातच आपली शिपाईगिरीची शर्थ केली. सरदारी मिळाल्यानंतर महादजींनी पहिली मोठी मोहीम म्हणजे इ.स. १७६९ मध्ये उत्तरेत पुन्हा घडी बसवण्याची. रामचंद्र गणेश, विसाजी कृष्ण, तुकोजी होळकर यांच्यासोबत महादजींनी उत्तरेची मोहीम काढली. या मोहिमेत दि. १० फेब्रुवारी १७७१ रोजी महादजींनी दिल्ली जिंकून घेतली. बाळाजी गोविंद खेरांनी दिल्लीत शिरून महादजीच्या तर्फेने लाल किल्ल्यावर भगवा फडकावला. शाहआलम  बादशाह हा यावेळेस अलाहाबादेस इंग्रजांच्या छावणीत होता. या वेळी मराठ्यांच्या फौजेतच रामचंद्र गणेश-तुकोजी होळकर आणि विसाजी कृष्ण-महादजी शिंदे असे दोन गट पडले. तुकोजी होळकर हे नजीबखान आणि त्याचा पुत्र झाबेताखानाला गोंजारून घेत असल्याने महादजींची रुष्टता होती. अखेरीस रामचंद्र गणेशांना माधवरावांनी परत बोलावलं आणि विसाजी कृष्णांना मोहिमेचं मुख्य नेमलं तेव्हा महादजींनी आपल्या पराक्रमाने साऱ्या प्रांतात पराक्रम गाजवला. नजीबखान मृत्यू पावल्यावर त्याच्या पुत्राला, झाबेताखानालाही महादजींनी पाळता भुई थोडी केली. रोहिल्यांची राजधानी नाजीबाबाद उर्फ पथ्थरगड महादजींनी जिंकून घेतला आणि आपल्या घराण्याच्यातील अनेकांच्या नाशाला करणीभूत ठरलेल्या, पानिपतच्या सूत्रधाराची म्हणजेच नजीबखानाची कबर महादजींनी फोडून छिन्नविछिन्न केली. पानिपतचा सूद महादजींनी पुरेपूर उगवला. पानिपतच्या प्रसंगात कैद केलेले अनेक पुरुष आणि स्त्रिया मुक्त केल्या असं म्हटलं जातं.

माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर नारायणराव आणि रघुनाथराव हे दोघेही औटघटकेचे पेशवे ठरले. नारायणरावांच्या खुनाच्या प्रकरणाने साऱ्या मराठमंडळाचा रघुनाथरावांवर रोष झाला. बारभाईंनी एकत्र येत रघुनाथरावांना हद्दपार केलं आणि महादजी शिंद्यांसारखा पाठीराखा बारभाईंनी मिळाल्यावर त्यांना लष्करी बाबतीतही चिंता करण्याची गरज उरली नाही. या साऱ्याचा फायदा घेत इंग्रजांनी रघुनाथरावांना आश्रय दिला आणि पहिल्या इंग्रज मराठा युद्धाला तोंड फुटलं. या संबंध युद्धात महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांनी एकत्र येत लष्करी बाब सांभाळली तर बारभाईंचा एकभाई झालेल्या नाना फडणवीसांनी प्रशासकीय पकड कायम ठेवत पुणे दरबाराचं वर्चस्व कायम ठेवलं. लहानग्या पेशव्याला वास्तवात यावेळी काहीही समजत नव्हतं,त्यामुळे नाना आणि महादजी या जोडगोळीने उत्तर पेशवाईत राज्य राखण्याचं मोठं काम केलं. दि. १७ मे १७८२ रोजी महादजी शिंदे आणि इंग्रज वकील अँडरसन यांच्यात साल्बाई इथे तह झाला आणि इंग्रजांनी शरणागती पत्करली. 

महादजींच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि सन्मानाची घटना म्हणजे दि. २ ऑक्टोबर १७८८ रोजीचा रोहिल्यांच्या पराभव आणि बादशहाची पुनर्स्थापना. आधी पाहिल्याप्रमाणे झाबेताखानाचा बाजार महादजींनी उठवला. पुढे झाबेताखान हिमालयाच्या पायथ्याशी पळून गेला आणि तिथेच मृत्यू पावला. झाबेताखानाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र गुलाम कादर याने दिल्लीच्या बादशहाचा पुन्हा छळ आरंभला. बादशहा आणि त्याचा परिवार अत्यंत भयावह परिस्थितीत जगू लागले असता महादजी शिंद्यांनी ही जबाबदारी अंगावर घेऊन गुलाम कादरचा पराभव केला. गुलाम कदर अखेरीस पकडला गेला. त्याने बादशहाचे डोळे काढून कैदेत टाकलं होतं, त्यामुळे महादजींनीही त्याच पद्धतीने त्यालाही शिक्षा केली. गुलाम कादरला पकडून त्याचे डोळे काढण्यात आलं आणि त्याला मृत्युदंड देऊन त्याला एका झाडाला लावून ठेवण्यात आलं. महादजीच्या या उपकारामुळे बादशहाने त्यांना वकील-इ-मुतलक आणि बादशहाची नायबमुनायबी बहाल केली. महादजींनी हा सन्मान सवाई माधवराव पेशव्यांतर्फे स्वीकारला आणि पुढे चार वर्षांनी ते दक्षिणेत परत आले तेव्हा अत्यंत नम्रतेने त्यांनी वकील-इ-मुतलकीची वस्त्रे पेशव्यांना अर्पण केली. दक्षिणेत आल्यानंतर वयोमानापरत्वे महादजींची तब्येत हळूहळू बिघडत गेली आणि अखेरीस दि. १२ फेब्रुवारी १७९४ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.

महादजीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच इच्छेनुसार, केदारजींचे नातू असलेल्या दौलतराव शिंद्यांना शिंद्यांची सरदारी देण्यात आली. महादजींपर्यंत असलेला शिंद्यांचा आब आणि सन्मान दौलतरावांच्या काळात उरला नाही, आणि हळूहळू पेशव्यांच्या अधःपतनासोबतच शिंद्यांचीही तीच गत झाली. पण एक मात्र नक्की, जोवर अठराव्या शतकाचा विचार होईल आणि पेशव्यांच्या दोन खंद्या सरदारांपैकी शिंदे या एका सरदारांचा उल्लेख होईल तेव्हा राणोजींपासून महादजींपर्यंत तीन पिढ्यांतील या पाच पराक्रमी पुरुषांना इतिहास कधीही विसरू शकणार नाही.


- कौस्तुभ कस्तुरे

(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या ऑगस्ट २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)