रणधुरंधर सरदार होळकर - मल्हारराव आणि तुकोजी



थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात जी दोन सरदार घराणी उदयाला आली, आणि आपल्या प्रचंड पराक्रमाने ज्यांनी हिंदुस्थान गाजवला त्यातल्या एका- शिंदे घराण्याची माहिती आपण मागच्या दोन लेखांत पाहिली आहेच. यातलं दुसरं घराणं म्हणजे होळकरांचं. मल्हारराव होळकर हे या सरदार घराण्याचे मूळ पुरुष. साधारणतः इ.स. १६९३ साली मल्हाररावांचा जन्म झाला अशी इतिहासकारांच्या मतांत एकवाक्यता आहे. सासवड तालुक्यातच आधी 'वीर'चे राहणारे म्हणून वीरकर, आणि नंतर जेजुरीजवळच नीरा नदीच्या काठी 'होळ' इथे स्थायिक झाल्याने होळकर असं आडनाव या घराण्याने स्वीकारलं. मल्हारराव होळकरांनी आपली लष्करी पेशाची सुरुवात कदमबांड्यांच्या लष्करातून केली. पुढे त्यांनी बांड्यांशी काही झगडा झाला, वा इतर कारणावरून पेशव्यांचे मुतालिक अंबाजीपंत पुरंदरे यांना पत्रं लिहून 'आपण बांड्यांची चाकरी सोडून पेशव्यांच्या चाकरीत यायला तयार आहोत' असं कळवलं. मल्हाररावांसारखा शूर पुरुष आपल्याकडे येत असल्यास कोणाला नको असेल? पेशव्यांनी, बहुदा बाजीरावांनी, अर्थातच मल्हारावांना आपल्या पदरी घेतलं, आणि इथपासून पुढे मल्हारराव होळकर हे पेशव्यांचे एक पराक्रमी सारा म्हणून उदयाला आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे जेव्हा फौज घेऊन दिल्लीला गेले, आणि चौथाई-सरदेशमुखीच्या सनदा आणल्या तेव्हा मल्हारराव आपल्या तुकडीसह एक शिलेदार म्हणून पेशव्यांच्या सैन्यात हजर होते असं दिसतं.

मल्हारराव होळकरांचा आलेख हा शिंद्यांप्रमाणेच पालखेडच्या युद्धापासून चढता वाढता दिसून येतो. पालखेड नंतर मल्हारराव चिमाजीअप्पांसोबत आमझेऱ्याच्या युद्धात सहभागी झाले होते. पुढे इ.स. १७३२ मध्ये माळव्याच्या मोहिमेतही मल्हारराव पुढे जाऊन कामगिरी बजावून आले. त्याचं झालं असं, की आमझेऱ्याच्या लढाईनंतर माळवा हा बादशहाच्या हातून गेला असं पाहताच महम्मदखान बंगश हा माळव्यावर चालून आला. तिथे असलेल्या मल्हारराव आणि अंताजी माणकेश्वरांना बंगशच्या फौजांना समोरासमोर तोंड देता आलं नाही म्हणून हे दोघेही आपापल्या फौज घेऊन राजपुतान्यात शिरले. पुढे चिमाजीअप्पा मोठ्या फौजेसह होळकर-गंध्याच्या मदतीसाठी आले आणि बंगशची पाळता पुरेवाट झाली. या मोहिमेनंतर चिमाजीअप्पांनी बाजीरावांच्या सहमतीने माळव्याची वाटणी पेशव्यांचे दोन सरदार शिंदे आणि होळकरांमध्ये निम्मी निम्मी करून दिली. यात होळकरांच्या वाट्याला तीस टक्के माळवा आला. इथपासूनच पुढे मल्हारराव आणि इतरही वंशजांना 'सुभेदार' ही पदवी लावली गेली असं दिसून येतं. इंदूरच्या नंदलाल मंडलोईची मदत मल्हाररावांनी आधीपासूनच घेतल्याने माळवा जिंकण्यासाठी या जमीनदारांचा उपयोग पेशव्यांनी या मोठ्या प्रमाणात करून घेतला. या नंतरच्या दोनेक वर्षात राणोजी आणि मल्हारराव यांनी आपल्या हाती आलेल्या माळव्यात बस्तान बसवण्यासाठी लहानमोठ्या मोहिमा सुरूच ठेवल्या.

बाजीरावांनी पुढच्या काळात केलेल्या राजपुताना, दिल्ली, आदी मोठ्या मोहिमांमध्ये मल्हारराव होळकरांनी सहभाग घेतला. भोपाळच्या स्वारीत बाजीराव असताना इकडे चिमाजीअप्पांनी वसईची भली थोरली मोहीम हाती घेतली होती. बाजीरावांनी राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांना अप्पांच्या दिमतीला दिलं. वसई विजयात मल्हाररावांचा मोठा वाटा आहे. बाजीरावांच्या काळातली एक गोष्ट मोठी मजेशीर आहे, पेशव्यांच्या बखरकाराने ती नमूद करून ठेवली आहे. निजामाने बाजीरावांना कपटाने भेटायला बोलावलं तेव्हा त्याने आपली माणसं बाजीरावांना घ्यायला पाठवली. बाजीराव काही वेळाने निजामी माणसांसह निजामाच्या डेऱ्यात येऊन दाखल झाले. निजामाने बाजीरावांना विचारलं, "आता कडे फसलात? आता मी तुम्हाला कैद करणार आहे, कुठे आहेत तुमचे ते पराक्रमी शिंदे-होळकर?". निजामाने एकदम बाजीरावांच्या पाठी उभ्या असलेल्या आपल्या लोकांना म्हटलं, "पेशव्यांना कैद करा." पेशव्यांच्या मागची दोन माणसं जागेवरून तसूभरही हलली नाहीत. बाजीराव केवळ हसले. अखेरीस निजाम चरफडतो आहे हे पाहून बाजीराव म्हणाले, "तुला आमचे शिंदे-होळकर पाहायचे आहेत ना? हे पहा, हे दोघे आहेत शिंदे-होळकर". थोडक्यात, बाजीरावांनी निजामाकडून आलेल्या माणसांच्या मुसक्या आवळून आपल्या तंबूत टाकलं होतं आणि निजामाच्या माणसांचा वेष करून राणोजी आणि मल्हारराव हे स्वतः बाजीरावांचं कडं होऊन आले होते.

बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवाईवर आले. नानासाहेबांनी आपल्या वडिलांप्रमाणेच शिंदे-होळकरांचा सरदाराचा बहुमान पुढेही तसाच सुरु ठेवला. नानासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात, बाजीराव गेले हे पाहून इतर बंडखोरांनी उचल खाल्ली तेव्हा मल्हारराव होळकरांनी माळव्यात जातीने पाय रोवून बुंदेलखंड-गढा वगैरे सगळ्या भागावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. या दरम्यान पेशव्यांची वाढती ताकद पाहून दिल्लीच्या बादशहाने अधिकृतरीत्या माळव्याचा सुभा सनदशीर मार्गाने पेशव्यांना देऊ केला. या बदल्यात पेशवे दिल्लीची मदत करतील अशी जामीनकी बादशहाने लिहून मागितली तेव्हा पेशव्यांच्या सरदारांनी, शिंदे-होळकर आणि पवारांनी ही जामीनकी लिहून दिली, की पेशव्यांनी हा करार पल्ला नाही तर आम्ही त्यांची नोकरी सोडून देऊ. अर्थात, हे सगळं संगनमताने होत असून बादशाही चाकरी ही केवळ देखाव्यापुरती होती.

इ.स. १७४३ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी आपल्या त्रिस्थळी यात्रेदरम्यान काशीतील ज्ञानवापीजवळची मशीद पाडून विश्वेश्वराचं मंदिर पुन्हा उभारण्यासाठी मल्हाररावांना सांगितलं होतं असं दिसतं. पण काशीतील ब्राह्मणांनी नारायण दीक्षित पाटणकरांच्या करावी पेशव्यांच्या पायाशी गळ घातली की मशीद पाडली तर अयोध्येचा नवाब मन्सूरअलीखान हा आम्हाला जगू देणार नाही आणि हिंदूंचा नायनाट करेल. यावरून अखेरीस पेशव्यांना आणि मल्हाररावांना हा बेत रद्द करावा लागला. पुढे अर्थातच, ही मशीद पडता अली नाही तरीही मल्हाररावांच्या सुनबाई अहिल्यादेवी होळकर यांनी या ज्ञानवापीशेजारीच विश्वेश्वराचं एक नवीन मोठं शिवालय उभं केलं, जे आजही आहे.

इ.स. १७४५ च्या सुमारास जयपूरच्या गादीसंबंधाने पेशव्यांच्या सरदारांमध्ये वितुष्ट आलं. जयसिंह मृत्यू पावल्यानंतर ज्येष्ठ पुत्र ईश्वरीसिंहाचा पक्ष जयाप्पा शिंद्यांनी घेतला, तर धाकट्या माधोसिंहाचा पक्ष मल्हाररावांनी घेतला. शिंदे-होळकरांचं जुग इथून फुटलं ते पुढे कायमचंच. नानासाहेबांनी मध्यस्थी करून ही भांडणं मिटवली, तरीही राजपुतान्यातला मराठ्यांचा वावर आता राजपुतांच्या डोळ्यात खुपत होता, आणि याचीच परिणीती पुढे माधोसिंह-बिजेसिंहाने अब्दालीला मदत करण्यात झाली. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूच्या पश्चात साताऱ्याच्या राजकारणात नानासाहेबांना मात द्यायला मल्हाररावांसारखा मुत्सद्दी सरदार पेशव्यांपासून फोडून आपल्याकडे घ्यावा अशी ताराबाईंच्या पक्षाने राजकारणं सुरु केली. मल्हारराव फुटणार अशी वदंता असतानाच नानासाहेबांनी सूत्र फिरवली, आणि मल्हारराव होळकरांनी बेलभंडार उचलून आपण कायम पेशव्यांचे एकनिष्ठ सरदार आहोत, इतर कोणाचीही चाकरी पत्करणार नाही असं म्हटलं. नानासाहेबांचाही मल्हाररावांवर बाजीरावांप्रमाणेच विश्वास होता. पुढच्या दोन वर्षात मल्हारराव आणि जयाप्पा शिंद्यांनी अंतर्वेदीत उतरून अहमदखान बंगश आणि इतर पठाणांची पराभव केल्यावर नानासाहेबांना प्रचंड आनंद झाला. "शाबास तुमची सरदारांची! आमच्या दक्षिणच्या फौजांनी गंगाधर होऊन, रोहिले पठाणांसी युद्ध करून आपण फते पावावे हे कर्म सामान्य नव्हे. तुम्ही एकनिष्ठ, कृतकर्मे सेवक, या दौलतीचे स्तंभ आहा" असं आनंदाने नानासाहेब उद्गारले. याच सुमारास साधारणतः तुकोजी होळकर यांनाही मल्हाररावांच्या दिमतीला देऊन त्यांचीही नेमणूक नानासाहेबांनी केली.

इ.स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या वेढ्याच्या प्रसंगी मल्हाररावांचा पुत्र खंडेराव हा अचानक तोफेचा गोळा लागून मृत्यू पावला. खंडेरावांच्या इतर बायका सती गेल्या पण मल्हाररावांनी मोठ्या कष्टाने अहिल्याबाईंना सती जाण्यापासून रोखलं. मधल्या काळात उत्तरेतील जम बसवण्यात माळरावांचा काळ गेला, आणि पानिपतच्या युद्धात अखेरीस अर्धवट युद्धातून निघून आल्यामुळे नानासाहेबांची त्यांच्यावर इतराजी झाली. मल्हाररावांनी भलीमोठी थैली पाठवून आपल्या सगळ्या कृत्यांचा हिशोब दिला, आणि अखेरीस इतर सरदारांच्या मध्यस्थीने नानासाहेबांनी होळकरांची जप्त केलेली जहागीर त्यांना परत केली. पानिपतच्या प्रसांगानंतर पुढच्या पाचेक वर्षात पुन्हा उत्तरेतली घडी सावरण्याचा मल्हाररावांचा वेळ गेला. अखेरीस इ.स. १७६६ साली निधनापूर्वी त्यांनी मागची व्यवस्था लावून, प्रशासकीय कामकाज अहिल्याबाईंच्या हाती तर लष्करी कामकाज दत्तकपुत्र तुकोजी होळकरांच्या हाती सोपवला. मल्हाररावांचा पुत्र खंडेराव हा आधीच मृत्यू पावला असल्याने नातू मालरावांच्या नावाने पेशव्यांनी वस्त्रे बहाल केली.

तुकोजी होळकरांनी अहिल्याबाईंच्या जोडीने लष्करी बाबतीत मल्हाररावांचीच कामाची पद्धत पुढे सुरु ठेवली. अधिकृतरीत्या मालराव हे सरदारावर असले तरी त्यांचाही वर्षभरातच मृत्यू झाल्याने होळकरांची 'सुभेदारी' आता इ.स. १७६७ मध्ये तुकोजी होळकरांकडे आली. थोरल्या माधवराव पेशव्यांनी रघुनाथरावांच्या बंदोबस्त केल्यानंतर पानिपतच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्तरहिंदची थोरली मोहीम उघडली. रामचंद्र गणेश कानडे, विसाजी कृष्ण बिनीवाले, महादजी शिंदे आणि यांच्यासोबत तुकोजी होळकर असे चार पराक्रमी सरदार उत्तरेकडे निघाले. इ.स. १७७१च्या फेब्रुवारीत या सरदारांनी दिल्ली जिंकून घेतली आणि दिल्लीवर पुन्हा भगवा झेंडा फडकू लागला. जाट, पठाण, रोहिले आदींवर स्वाऱ्या होऊन मध्येच माधवराव पेशव्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने मोहीम तहकूब होऊन तुकोजी होळकर १७७३ मध्ये इंदूरला परत आले. नारायणरावांच्या खुनानंतर बारभाई कारस्थानाने जोर धरला आणि रघुनाथरावांच्या माळव्यातील हालचाली तसेच इंग्रजांचा मराठेशाहीतील होऊ पाहणारा प्रवेश यावर लक्ष ठेवण्यासाठी तुकोजी होळकरांनी नर्मदेच्या प्रदेशात आपली गस्त वाढवली. इ.स. १७७९ मध्ये पहिल्या इंग्रज मराठा युद्धाच्या दरम्यान तुकोजी होळकरांना पुण्याला यावं लागलं आणि महादजी शिंद्यांच्या साथीने त्यांनी इंग्रजांचा धुव्वा उडवला. बोरघाटाच्या लढाईत कप्तान हार्डले आणि गॉडार्ड या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना मराठी फौजांनी सळो की पळो करून सोडलं. नाना फडणवीसांनी पुण्यात मोठा दरबार भरवून तुकोजी होळकर आणि बापू होळकर या दोघांचाही सत्कार केला.

इ.स. १७८६च्या आसपास नाना फडणीसांनी टिपू सुलतानवर मोहीम उघडली तेव्हा कित्तूरच्या युद्धात आणि सावनूर-बंकापूर प्रसंगी तुकोजी होळकरांना पुन्हा दक्षिणेकडे पाचारण करण्यात आलं. याच्या डिड वर्षानंतर तुकोजी हे वाफगावहून उत्तरेत शिंद्यांच्या मदतीसाठी जायला निघाले. गुलाम कादरच्या साऱ्या प्रकरणात शिंदे-होळकरांच्या फौज एकत्र होऊन लढत होत्या. इकडे दक्षिणेत निजामाने पुन्हा डोकं बावर काढल्याने नाना फडणवीसांनी निजामावर पुन्हा मोहीम आखली. इ.स. १७८५ च्या मार्चमध्ये खर्ड्याच्या आसमंतात ही प्रचंड लढाई होऊन निजामाचा मोड झाला. तुकोजी होळकर आणि परशुरामभाऊ पटवर्धन आदी सरदारांनी पूर्ण ताकदीनिशी निजामाची अक्षरशः पळता भुई थोडी केली, आणि पेशव्यांचा जय झाला. दुर्दैवाने या लढाईनंतर काही अवधीतच महेश्वरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मृत्यू झाला आणि याच सुमारास तुकोजी होळकर हे अर्धांगवायूने अंथरुणाला खिळले. पुढे दोनेक वर्षात, तुकोजीरावांचाही काळ झाला.

बाजीरावांच्या काळात पुढे आलेल्या होळकरांच्या घराण्यात मल्हारराव आणि तुकोजी या दोन पराक्रमी सरदारांनी होळकरांच्या जहागिरीची ही चंद्रकळा चढतीवाढतीच ठेवली, आणि उत्तर-हिंदुस्थानात शिंद्यांप्रमाणेच आपला दबदबा कायम ठेवला.

 

- कौस्तुभ कस्तुरे

(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या सप्टेंबर २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)