पानिपतवीर सदाशिवरावभाऊ



पानिपत म्हटलं की मराठा माणसाच्या मनात सर्वप्रथम येतं ते म्हणजे पानिपतचं तिसरं युद्ध. अफगाण बादशाह अहमदशाह अब्दाली आणि मराठा पेशव्याचा चुलतभाऊ यांच्या नेतृत्वाखाली अफगाण आणि मराठे ही दोन्ही प्रचंड सैन्यदळे दि. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या मैदानात एकमेकांना भिडली. स्वतःच्या जीवाची बाजी लावूनही युद्ध हरल्याने पुढे कायमच नाकर्तेपणाचा शिक्का बसलेला मराठ्यांचा सेनापती मात्र कायमच टीकेचा धनी झाला. हा सेनापती म्हणजे सदाशिवरावभाऊ उर्फ भाऊसाहेब! बाळाजी बाजीराव उर्फ थोरल्या नानासाहेब पेशव्यांचा धाकटा चुलतभाऊ, चिमाजीअप्पांचा मुलगा अन पराक्रमी थोरल्या बाजीरावांचा पुतण्या! 

सदाशिवरावभाऊंचं नाव ऐकल्यावर इतर भाषिक सोडाच, पण मराठी माणसाच्या मनात पहिलं चित्र कोणतं उभं राहत असेल तर ते 'पानिपत हरण्यास कारणीभूत असणारा, नानासाहेब पेशव्याचा एक नाकर्ता भाऊ’ एवढंच असतं. मग काय, केवळ पानिपतचा नाही तर पेशवाईत घडलेल्या कोणत्याही, अन आपल्याला व्यक्तिगतरीत्या न आवडणाऱ्या गोष्टींचा संदर्भ सरळ नानासाहेब आणि त्यांच्या या नाकर्त्या भावाशी लावला जातो. पण खरंच सदाशिवरावभाऊ असा नाकर्ता होता? आत्ताच्या काळात सोशल मीडिया असेल व इतर व्यासपीठांवरून भाऊसाहेबांच्या या कर्तृत्वाची लक्तरं फाडली जातात, आणि आपल्यालाही भाऊसाहेब म्हणजे नेमकी काय चीज आहे हे माहित नसल्याने त्यावर कोणीच बोलत नाही हे दुर्दैव आहे. भाऊसाहेबांच्या एकंदरच जीवनावर आपली नजर फिरते तेव्हा एका स्थितप्रज्ञ सेवकासारखी, सेनापतीसारखी नजर असलेला आणि तशीच कामगिरी बजावलेला हा एक पराक्रमी पुरुष आपल्या नजरेस पडतो. 

बाजीराव पेशव्यांचे रणधुरंधर बंधू चिमाजीअप्पा आणि रखमाबाई यांच्या या पुत्राचा जन्म दि. ४ ऑगस्ट १७३० रोजी झाला. बाराव्या दिवशी बाळाचं बारसं झालं. बाजीराव आणि अप्पा हे दोघेही सांब सदाशिवाचे मोठे भक्त असल्याने अप्पांच्या पुत्राचं नाव ठेवण्यात आलं 'सदाशिव'. बाजीरावांना यावेळेस बल्लाळ उर्फ नाना या नावाचा एक पुत्र असल्याने साहजिकच त्यांच्या या धाकट्या चुलत भावाला 'भाऊ' म्हटलं जाऊ लागलं. रूढार्थाने तेच नाव सर्वतोमुखी झालं. 

भाऊसाहेबांच्या वयाच्या केवळ सत्ताविसाव्या दिवशी रखमाबाईंचा मृत्यू झाला. लहानग्या बाळाच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं, अशातच वडील कायम मुलूखगिरीवर असल्याने आजी राधाबाई आणि काकू काशीबाई या दोघींनी लहानग्या सदाशिवाचा सांभाळ केला. पुढे नानासाहेबांच्या लग्नानंतर गोपिकाबाई जेव्हा शनिवारवाड्यात आल्या तेव्हा त्यांनीही भाऊसाहेबांवर पुत्रवत माया केली. तरीही, केवळ लहानग्या भाऊला मातृछत्र असावं म्हणून चिमाजीअप्पांचं दुसरं लग्न भिकाजी मोरेश्वर थत्त्यांच्या मुलीशी, अन्नपूर्णेशी झालं. 

लहानपणापासून भाऊसाहेबांना आजीकडून आणि काका-वडिलांपासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकारणाचे धडे मिळत असल्याने ते अत्यंत कमी वेळात तरबेज झाले. इतके, की वयाच्या नवव्या आणि बाराव्या वर्षी त्यांनी ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांना ज्या करारी स्वभावाने आणि राजकारणी भाषेत उत्तरं दिली आहेत ती पाहता प्रथमदर्शनी ही पत्रे कोण्या मोठ्या व्यक्तीने लिहिली आहेत असाच भास व्हावा. त्याच झालं असं, की चिमाजीअप्पांनी वसई जिंकल्यानंतर तिथल्या आणि कल्याण-भिरवंडीच्या आसपासच्या मुलुखातून काही मिळकत भिक्षा म्हणून परशुरामाच्या देवस्थानासाठी मिळावी अशी मागणी पेशव्यांकडे केली. वास्तवात, यावेळी खुद्द बाजीराव पेशवे हे निजामाचा बंदोबस्त करून नादीरशहाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी बऱ्हाणपूरला जाऊन थांबले होते. चिमाजीअप्पा वसई जिंकल्यानंतर तिथेच प्रांताची व्यवस्था लावत होते. शिवाय इंग्रज वकील इंचबर्ड हा साष्टीत अप्पांशी वाटाघाटी करत होता तेही एक नवं राजकारण त्यांच्या मस्तकी होतं. या सगळ्यात अप्पांकडून पत्राला उत्तर यायला उशीर होऊ लागल्याने ब्रह्मेंद्रस्वामींकडून वरचेवर पत्रं येऊ लागली. अखेरीस अप्पांच्या या लहानग्या नऊ वर्षांच्या पुत्राने दि. १२ सप्टेंबर १७३९ रोजी धावडशीकरांना पत्रं लिहून कळवलं, "स्वामी ईश्वरस्वरूप आहेत. त्यांची अवहेलना करण्यासारखं आम्ही काय वागलो आहोत? संपूर्ण प्रजा स्वामींची आहे, आणि त्यातही कोकणातल्या प्रजेविषयी स्वामींना जास्त जवळची आहे (कारण ब्रह्मेंद्रस्वामी आधी कोकणात वास्तव्यास होते). कोकणातली प्रजा आनंदाने स्वामींना देईल आणि तेही घेतील, यात अवज्ञा कसली आलीय? पण कोकणातल्या प्रजेची उपजीविका हणजे सगळी मेहनत करून भाजावे, कष्ट करावे, तेव्हा कुठे फळ मिळतं. यंदा पाऊस चैत्रापासूनच पडू लागला आहे. यामुळे जे काही करायचं तेवढं प्रजेने केलं, पण पुढे पाऊसच पडत नाहीये. याप्रकारे रयतेची अवस्था आहे. आपण सर्वज्ञ आहात". 

अशाच आणखी एका पत्रात, वसईतील जिंकलेल्या चंदनी पेट्यांची आणि दोन मोठ्या घंटांची मागणी स्वामींनी केली, आणि काही कारणास्तव अप्पांना ती पुरवता आली नव्हती. पुढे अप्पा गेल्यानंतर स्वामींनी आपली मागणी तशीच लावून धरली. ते इतके अधीर झाले की शाप वगैरे देण्याची भाषा बोलू लागले. शंकराजी केशवांनी वसईहूनच पाठवलं नसल्याने भाऊंनाही ते पुढे धावडशीला पाठवता आलं नाही. यावेळीही ३० मार्च आणि १२ एप्रिल १७४२ रोजी भाऊंनी ब्रह्मेंद्रस्वामींना सविस्तर पत्रं लिहून आपली बाजू मांडली आहे. ही पत्रे द. ब. पारसनीसांनी स्वामींच्या चरित्रात प्रकाशित केली आहेत ती संपूर्ण वाचनीय आहेत.

दरम्यानच्या काळात, बाजीरावांच्या पाठोपाठ आठ महिन्यातच चिमाजीअप्पांचा मृत्यू झाल्याने भाऊसाहेबांच्या डोक्यावरील पितृछत्रही हरपलं. सावत्र आई अन्नपूर्णाबाई या सती गेल्या. तरीही केवळ कर्तव्य म्हणून आणि जशी आपल्या वडिलांनी आपल्या काकांची कायम साथ दिली तशी आपणही नानासाहेबांना साथ द्यावी या उदात्त हेतूने अप्पांचा हा पुत्र सारी दुःख गिळून कर्तव्यपूर्तीला उभा राहिला.

भाऊसाहेबांचा शिक्का बहुदा वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी बनवण्यात आला असावा. शिक्क्यात अक्षरे होती - "श्रीराजा शाहू चरणी तत्पर । सदाशिव चिमणाजी निरंतर ।". १७४४ महाराजांची आज्ञा घेऊन बाबूजी नाईक बारामतीकर आणि नागपूरकर रघुजी भोसले हे कर्नाटकात गेले. वास्तवात कर्नाटकातील संस्थानिकांवर दाब बसवून मराठ्यांचे पाय तिथे घट्ट रोवावेत ही अपेक्षा असताना बाबूजी नाईकांकडून हवं तासन काम होत नव्हतं, आणि महाराजांनाही याचीच काळजी वाटत झोटीहोती. दोन वर्षांच्या या मोहिमेचं विशेष फलित काही नाही हे पाहून नानासाहेबांनी शाहू महाराजांकडून परवानगी घेऊन सदाशिवरावभाऊंची नेमणूक कर्नाटकच्या या मोहिमेवर केली. वयाची पंधरा वर्षे पूर्ण होऊन सोळावं सुरु असता भाऊसाहेबांची ही पहिलीच मोहीम कर्नाटकात झाली. मोहिमेची मुखत्यारी नानासाहेबांनी आपले खास महादोबा पुरंदरे यांना दिली होती. महादोबांच्या हाताखाली भाऊंना लढाईचा पहिला अनुभव मिळाला. रतनगड, अडर आजरे, बहादूरबिंडा आदी जिंकून ११ मे १७४७ रोजी भाऊसाहेब महाराष्ट्रात परत आले. या संबंध मोहिमेत भाऊंनी पाच्छापूर, कित्तूर, गोकाक, यादवाड हरिहर, बसवपटणम वगैरे ३६ परगणे काबीज केले. 

इथपासून पुढे भाऊसाहेबांनी पंधरा वर्षे कर्नाटकात अनेक मोहिमा करून पेशव्यांच्या हुजुरातीची बिनी सांभाळली. नानासाहेबांनी या त्यांच्या पहिल्या मोहिमेनंतर लगेचच, महादोबांशी काही मतभेद झाल्यामुळे पुरंदऱ्यांकडची दिवाणी काढून भाऊसाहेबांना बहाल केली. सदाशिवरावभाऊ आता नानासाहेब पेशव्यांचे कारभारी झाले. सातारा दरबारातील मुतालकी पुरंदरे मंडळीच सांभाळत होती. 

शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर साताऱ्यात माजलेल्या यादवीमुळे राज्याचा आटोप करणं गरजेचं होतं. ताराऊसाहेबांनी उभ्या केलेल्या राजकारणांना तोंड देता देता नाना-भाऊ या दोघांनाही अंतर्गत हितशत्रूंनाही तोंड द्यायचं होतं. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार नानासाहेबांनी ताराऊसाहेबांचे नातू 'रामराजे' यांना सिंहासनाधिष्ठित केलं आणि मराठ्यांचे नवे छत्रपती म्हणून घोषणा करण्यात आली. छत्रपती वयाने लहान असल्याने, आणि शाहू महाराजांनीही मृत्यूसमयी नानासाहेबांना ज्या तीन याद्या दिल्या त्यात राज्यकारभार एकहाती पेशव्यांनी सांभाळावा हे सांगितल्याने नाना-भाऊ या दोघांनीही आपलं कर्तव्य म्हणून राज्यातील अंतर्गत बंडखोरांचा नायनाट करण्यास सुरुवात केली. यात महत्वाची आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे आधीचे नानासाहेबांचे कट्टर विरोधक असलेले नागपूरकर रघुजी भोसले हे पेशव्यांना पाठिंबा देऊ लागले, शिवाय इतरही लहानमोठ्या सरदारांनी नानासाहेबांची बाजू घेतली. प्रतिनिधी वगैरे पेशव्यांच्या आधीपासूनच्या शत्रूंनी वैर पत्करलं तेव्हा कारभारी या नात्याने भाऊसाहेबांनी प्रतिनिधींवर हल्ल्याची योजना केली आणि ऑगस्ट १७५० मध्ये सांगोल्यावर स्वारी करून हे प्रतिनिधींचं बंड मोडण्यात आलं. सांगोल्याच्या या स्वारीतच अखेरीस, खुद्द रामराजे छत्रपतींच्या उपस्थितीत भाऊसाहेबांनी राज्याची विस्कळीत झालेली घडी नीट बसवून दिली. इतिहासप्रसिद्ध असलेल्या सांगोला कराराची कलमे पेशव्यांच्या शकवलीत वाचायला मिळतात. अभ्यासूंनी राजवाडे खंड २ मधील ही शकावली अवश्य वाचावी, विस्तारभयास्तव ती सारी कलमे इथे देत नाही.  

नानासाहेबांकारवी भाऊसाहेबांना दिवाणगिरी मिळावी ही कल्पना शिंद्यांचे पूर्वाश्रमीचे कारभारी रामचंद्रबाबा शेणवी यांची होती. भाऊसाहेब रामचंद्राबाबांना आपला गुरु मानत असत. नानासाहेब स्वतः महादोबांना आपला राजकारणातील गुरु मानत. महादोबाची कार्यपद्धती आणि भाऊंची कार्यपद्धती ही काहीशी वेगळी असल्याने नानासाहेबांना या साऱ्याचा फायदाच झाला. सांगोल्याच्या स्वारीनंतर भाऊसाहेब तुंगभद्रा-कोरेगाव इत्यादी लढायांमध्ये हजार होते. पुढे १७५४ साली नानासाहेब पेशव्यांसोबत कर्नाटकात मोहीम करून परत येताना नानासाहेबांनी कोल्हापूरकर छत्रपतींची आणि भाऊसाहेबांची भेट घडवून आणली. याच भेटीत कोल्हापूरकर छत्रपती महाराजांनी आपल्या राज्याची पेशवाई भाऊसाहेबांना बहाल केली आणि खासगत खर्चासाठी पारगड, कलानिधीगड आदी पाच किल्ले तैनातीस लावून दिले. नानासाहेबांच्या जवळपास सगळ्यात दक्षिणेकडील स्वाऱ्यांमध्ये भाऊसाहेब जातीने हजर होते. इ.स. १७५७ पासून निजामावर पुन्हा चाल करण्यात आली तेव्हा नानासाहेबांची तब्येत काहीशी बिघडत चालली होती. यावेळेस भाऊंनी पेशव्यांच्या खाशा फौजेची पिछाडी सांभाळली होती.

एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे हैद्राबादच्या मुझफ्फरखान गारदी याच्या धरसोड वृत्तीमुळे, आणि महादोबांनी त्याच्यावर अति विश्वास दाखवल्याने भाऊसाहेबांनी कडक पावले उचलल्याने मुझफ्फरखान गारद्याने आपल्या जावयाकरवी गारपिरावर डेरा असताना भाऊसाहेबांच्या खुनाचा प्रयत्न केला. भाऊसाहेब डेऱ्यात बसले असताना बोलण्याचं निमित्त करून डेऱ्यात शिरून हत्यार चालवले. भाऊसाहेब बेसावध होते. मागून वार पडत असतानाच भाऊसाहेब शाई घेण्यासाठी वाकले आणि वारकऱ्याचा वार चुकला. भाऊसाहेबांच्या जवळच उभ्या असलेल्या नागोजी गुजराचे लक्ष होतेच. त्याने पुन्हा वार होण्यापूर्वीच त्या माणसाचा हात गच्च पकडला. परंतु हत्याराचा निसटता वार भाऊसाहेबांच्या पाठीवर झालाच. भाऊसाहेबांवर खुनी हल्ला झाला होता आणि पकडल्या गेलेल्या माणसाचे नाव होते हैदरखान. हा मुझफ्फरखानाचा जावई असून त्याने पकडला गेल्यावर सरळ सरळ आपल्या सासऱ्याचे नाव घेतले. तो म्हणाला, "हे सगळं कारस्थान नबाब निजामअली याचे असून त्याचे आणि मुझफ्फरखानाचा खूप दिवसांपासून हा कट शिजत होता. भाऊसाहेब हे मातबर कारभारी असल्याने निजामाचे काही चालत नव्हते आणि म्हणून त्याने मुझफ्फरखानाला एक लक्ष रुपये जहागिरीच्या बदल्यात भाऊसाहेबांना मारायची कामगिरी सोपवली आली मुझफ्फरखानाने मला सांगितले. त्यांनी मला त्याची लेक सुद्धा देऊ केली". हे ऐकल्यावर मुझफ्फरखानालाही लगेच मुसक्या आवळून कैदेत टाकण्यात आले. भाऊसाहेबांवर खुनाचा प्रयत्न झाला हे ऐकून गोपिकाबाईंसह सगळे जण त्यांना भेटायला आले. दुसऱ्या दिवशी, ३० ऑक्टोबर १७५९ रोजी मुझफ्फरखान आणि हैदरखान या दोघांचीही डोकी मारण्याचा हुकूम भाऊसाहेबांनी दिला.

भाऊसाहेबांच्या आयुष्यातील उदगीर आणि पानिपत या दोन प्रचंड मोठ्या आणि लागोपाठ झालेल्या मोहिमा आहेत. उदगीरला भाऊसाहेबांनी प्रचंड फौजेसह निजामाला धूळ चारली. अहमदनगर, परांडा आदी किल्ले भाऊसाहेबांनी जिंकल्यामुळे निजामाला लढाईशिवाय काहीच गत्यंतर नव्हतं. साठ लाखांचा मुलुख शिवाय अशेरी-बऱ्हाणपूर, दौलताबाद, मुल्हेर, विजापूर आदी निजामाची महत्वाची स्थळं भाऊसाहेबांनी करारात लिहून घेतली. निजामाने हा करार पाळला नाही तरी काही काळातच लढून ही स्थळे मराठ्यांकडे आली. दि. ७ मार्च १७६१ रोजी नानासाहेब आणि भाऊसाहेबांच्या परतुडला वाटाघाटी झाल्या आणि लगेच भाऊसाहेब एका आठवड्याने उत्तरेत पानिपतच्या मोहिमेला निघाले. पानिपतच्या मोहिमेचा पत्रसंभार प्रचंड उपलब्ध आहे. यावर आजवर विपुल लिखाणही झालेलं आहे. भाऊसाहेबांकडून यात काही चुका झाल्या परंतु एकंदरच युद्धाच्या दिवशीपर्यंत मराठ्यांचं पारडं जड असल्याचं आणि अब्दाली पळून जायचीही तयारीत असल्याचं दिसून येतं. विश्वासराव मारले गेले आणि अखेरीस आता नानासाहेबांना काय तोंड दाखवावं म्हणून खजील होऊन भाऊसाहेबांनी युद्धात भान विसरून उडी घेतली.

भाऊसाहेब पानिपतच्या युद्धात मारले गेले का? असा प्रश्न कित्येक वेळा पडतो. भाऊसाहेब वाचले, ते हरियाणात गेले अशाही अफवा उठल्या होत्या. पण भाऊसाहेब मारले गेले ही गोष्ट खरी आहे. खुद्द काशीराजाने या साऱ्याची हकीकत दिली आहे. भाऊंना मारणाऱ्या लोकांनी 'आपण कसं त्यांना मारलं' याची इत्यंभूत हकिकताच कथन केली होती. शिवाय भाऊसाहेबांचं शरीर सापडलं त्याखाली सात मोती सापडले. त्यांच्या उजव्या पायावर केस नव्हते आणि कमरेला कट्यारची खूण होती. पुण्यात पूर्वी खुनी हल्ला झाला त्याची ती खूण होती. याही पलीकडे जाऊन गणेश वेदांती, अनुपगीर गोसावी, बापूजी महादेव हिंगणे वगैरे खाशा भाऊंना ओळखणाऱ्या लोकांनी हा मुर्दा भौंचाच आहे हे स्पष्ट ओळखलं होतं. काशीराज आणि अनुपगीर गोसाव्याने अब्दालीला विनंती करून भाऊसाहेब आणि विश्वासरावांची पार्थिवं आपल्याकडे आणली आणि चंदनादी उपचार करून त्यांचे अंत्यविधी केले. 

भाऊसाहेबांची दोन लग्नं झाली होती. पहिली पत्नी उमाबाई या २० मार्च १७५० रोजी मृत्यू पावल्यानंतर महिनाभराने भाऊसाहेबांचा दुसरा विवाह पार्वतीबाईंशी झाला. पानिपतातून पार्वतीबाई वाचून महाराष्ट्रात आल्यानंतर पुढे बावीस वर्षे जिवंत होत्या.

वयाच्या केवळ एकतिसाव्या वर्षी नानासाहेब पेशव्यांचा हा चुलतभाऊ पानिपतच्या या प्रचंड महासंग्रामात दि. १४ जानेवारी १७६१ रोजी मारला गेला. नानासाहेबांनी भाऊंच्या मदतीसाठी आधीच उत्तरेकडे कूच केलं होतं, पण भेलशाच्या नजीक असताना त्यांना सावकारी डाकेतून भाऊसाहेबांच्या मृत्यूचं वर्तमान मिळालं. खुद्द अब्दालीने गुलराज नावाच्या वकिलाकरवी पेशव्यांना सांत्वनपर पत्रं लिहून "माझी लढायची इच्छा नव्हती, आपल्या भावाच्या हट्टामुळे लढावं लागलं. आता तो गेला तेव्हा वैर विसरून त्याने पूर्वी केलेली व्यवस्था मी जशीच्या तशी कायम करून जात आहे, दिल्ली आपणच सांभाळी, तुमच्याइतकं शूर इथे कोणी नाही" असं म्हटलं. नानासाहेबांना हे वाचताना काय वाटलं असेल? युद्ध हरुनही जिंकलं होतं. अखेरीस भाऊसाहेबांच्या या मृत्यूच्या धक्क्याने आधीच खालावलेली नानासाहेबांची तब्येत आणखी खालावली आणि "भाऊ, भाऊ" करत नानासाहेबांनी अवघ्या साडेपाच महिन्यात प्राण सोडला. इतिहासात राम-लक्ष्मण, बाजीराव-चिमाजीअप्पांप्रमाणेच नाना-भाऊ या भावांची जोडीही अशीच अमर झाली. 


- कौस्तुभ कस्तुरे

(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या मे २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)