राज्यधुरंधर पेशवा नानासाहेब
भारतीय इतिहास पाहिला असता अगदी मोजक्या राजसत्ता या 'महासत्ता' म्हणून गणल्या गेल्या आहेत. अंदाजे महाभारताच्या काळापासून अनेक वेळेला एखादे साम्राज्य हे निम्म्या भारतावर आपली सत्ता गाजवत असल्याचं दिसून येतं. सोळाव्या शतकानंतर विचार करायचा झाल्यास पानिपतच्या दुसऱ्या लढाईपासून मुघल साम्राज्य अत्यंत वेगाने फोफावलं आणि पुढच्या जवळपास दीडशे वर्षात तीन चतुर्थांशाहून अधिक भारतावर त्यांचा झेंडा फडकत होता. पण औरंगजेबाच्या अति महत्त्वाकांक्षेने ज्या काळात हे साम्राज्य कळसाला पोहोचलं त्याच काळात या साम्राज्याची अधोगती सुरु झाली. अत्यंत जुलूम करून आणि परधर्मीयांवर अत्याचार करणाऱ्या या मुघल शासकाला महाराष्ट्र पूर्ण जिंकता आला नाहीच, पण मराठ्यांनी त्याची कबर इथे महाराष्ट्रातच खोदली. औरंगजेबाच्या मृत्यूच्याही आधीच मराठ्यांनी नर्मदा पार केली होती, आणि त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या तेरा वर्षात मराठ्यांनी सनदशीररित्या गेलेल्या स्वराज्याचे हक्क, शिवाय मोंगली प्रदेशात चौथाई-सरदेशमुखीच्या हक्क मिळवले. एवढ्यावरच मराठे थांबले नाहीत, तर पुढच्या पंधरा-सोळा वर्षाच्या काळात मराठ्यांच्या शहामतपनाह पेशव्याने थेट दिल्लीवर जाऊन धडक दिली. बादशाह लाल किल्ल्याचे दरवाजे लावून भेकडासारखा लपून बसला. बादशाही फौजांचा त्याचाच राजधानीत या पेशव्याने पराभव केला. या साऱ्या घडामोडी घडताना, विशेषतः या दिल्लीस्वारीच्या वेळेस तत्कालीन पेशव्यांचा पुत्र माळव्याच्या प्रदेशात आपली एक स्वतंत्र नवी, पहिली मोहीम आखात होता, पूर्णत्वास नेत होता. पुढच्या घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींमध्ये या पुत्राचा वाटा मोलाचा ठरणार भोटा. हे पितापुत्र म्हणजे पेशवे थोरले बाजीराव आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र नानासाहेब!
नानासाहेबांचा जन्म मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीसह चतुर्दशी म्हणजेच दि. ६ डिसेंबर १७२१ या दिवशी नाणेमावळातील वडगावजवळ साते या गावी झाला. वास्तविक यावेळेस खुद्द पेशवे कुटुंबाचा पुण्याशी काही संबंध नव्हता. पेशव्यांचा वाडा यावेळेस सुप्याला असून बहुदा काशीबाईच्या माहेराशी, चासकर जोशी यांच्याकडे हे गाव असावं, किंवा त्यांचा तिथे वाडा असावा. नानासाहेबांचा जन्म झाला तेव्हा बाजीरावांची स्वतःला सिद्ध करण्याची धडपड सुरु होती. पण पुत्रजन्माच्या या वार्तेसोबतच त्यांना त्यांचं आसन स्थिरस्थावर करण्याची संधी मिळत गेली. पालखेड मोहिमेने बाजीरावांच्या कर्तबगारीवर शिक्कामोर्तब केलं आणि शाहू महाराजांना या घराण्याविषयी आत्यंतिक विश्वास निर्माण झाला. नानासाहेबांची मुंज झाल्यावर इ.स. १७३०च्या जानेवारीमध्ये स्वतः शाहू महाराजांनी नानासाहेबांचं लग्न वाईच्या भिकाजी रास्त्यांच्या मुलीशी, गोपिकेशी लावून दिलं. यानंतर पुढची दहा वर्षे नानासाहेब सातारा दरबारात महाराजांच्या अगदी जवळ बसून राज्यकारभार शिकले, ज्याचा उपयोग महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याची घडी बसवण्यात त्यांना झाला.
पेशवेपद मिळण्यापूर्वी नानासाहेबांनी माळवा आणि शाहू महाराजांच्या प्रदीर्घ अशा मिरज स्वारीत जातीने भाग घेतला होता. बाजीरावांनी वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षीच त्यांना स्वतःची अशी मुद्रा तयार करून दिली होती. माळव्याच्या मोहिमेचं नेतृत्व पिलाजी जाधवरावांनी केलं असून त्यांच्या हाताखाली ही संबंध मोहीम नानासाहेबांनी केली. जणू काही हे त्यांच्यासाठी अधिकृत शिक्षण होतं. या मोहिमेचे मुक्काम आपल्याकडे पेशव्यांच्या रोजनीशांमध्ये आणि दप्तरात आज उपलब्ध आहेत. माळव्यात जाताना पुणतांब्यावरून वैजापूर-पालखेड वगैरे भागातूनच स्वाऱ्या उत्तरेत गेल्या. यावेळी प्रत्यक्ष काय घडलं हे सांगणं अवघड आहे, पण नानासाहेबांना आपल्या वडिलांनी निजामाला पराभूत केल्याच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील का? प्रत्यक्ष पालखेडच्या युद्धभूमीवर जाऊन कशा प्रकारे व्यहरचना केली त्याचा अंदाज घेता आला असेल का? पुराव्यांच्या आधारे हे प्रश्न अनुत्तरित राहतात, पण थोडं Between the Lines वाचलं तर हे घडलं असण्याची शक्यता जास्त वाटते.
बाजीरावांच्या मृत्यूनंतर सातारा दरबारात पुन्हा पेशवेपद कोणाला द्यायचं हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा पूर्वीप्रमाणेच, "पद देऊन पाहू, अगदीच नाही जमलं तर त्यांच्याकडून दुसऱ्याला ते पद देता येईल" असं म्हणत शाहू महाराजांनी बाजीरावांच्या पुत्रालाच हे पद देऊ केलं. पुढच्या सात वर्षात ही वेळ अली नाही, पण मध्यंतरी १७४७ मध्ये विरोधकांनी पुन्हा उचल खाल्ली आणि नानासाहेबांविषयी महाराजांना अत्यंत वाईट गोष्टी सांगितल्या. महाराजांनी केवळ न्याय करण्यासाठी नानासाहेबांची पेशवाई काढून घेतली आणि काय खरं काय खोटं हे समजून घेण्यासाठी शेट्याबा दाजी संकपाळ नावाच्या माणसाला नानासाहेबांची खबर काढण्यासाठी पाठवलं.
शेट्याबाने महाराजांना म्हटलं, "पेशवे सुखरूप आहेत. काम कारभार पूर्ववतप्रमाणेच होत आहे. आपल्या बंदोबस्ताने आहेत. ब्राह्मणांचे हात तोडले, कलावंतिणी राखिल्या, दारू पितात, धुंद जाहले, म्हणून महाराजांनी ऐकले होते, परंतु (मी) सर्व शोध बारकाईने घेतला व दिसूनही सर्व आला. अगदी बाष्कळ! नाना बहुत खबरदार आहेत".
हे ऐकल्यावर महाराजांनी विचारलं, "लवंडीचे लोक भलतेच सांगतात. सर्व लटके. नाना खुशाल आहे की?" शेट्याबा म्हणाला, "खुशाल आहेत".
महाराज यावर काय म्हणाले ते अतिशय महत्वाचं आहे- "इतकेच असले म्हणजे जाहले. नाना जिवाने खुशाल असला म्हणजे सर्व बरे आहे. लोकांचे आम्ही मजकूर कोठे मानतो? तू सांगतोस हे खरे. बारांना वाईट नाना. माझा तेवढा चाकर माझे पदरी मातबर आहे. सुखरूप असला म्हणजे जाहले".
बखरकारांनी हा सारा प्रसंग अतिशय खुलवून लिहिला आहे. थोडक्यात, महाराजांनी नानासाहेबांची परीक्षा घेतली आणि बाहेरूनही बातमी काढली, पण विरोधकांच्या बोलण्यात काहीही तथ्य आढळलं नाही. त्याहूनही महत्वाचं म्हणजे, नानासाहेबांचं पेशवेपद काढून दुसऱ्याला देऊ म्हटलं तर ते स्वीकारायलाही कोणी पुढे येईनात, तेव्हा महाराजांचा नानासाहेबांवरचा विश्वास इतका दृढ झाला की मृत्यूसमयी स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांनी नानासाहेबांना दोन याद्या करून दिल्या ज्यात पेशवाई वंशपरंपरागत असून सातारा छत्रपतींचे पेशवे या नात्याने राज्यकारभार पुढे कायम पेशव्यांनी करावा आणि इतर सरदारांनी त्यांच्या आज्ञेत राहून साथ द्यावी असं या याद्यांचं स्वरूप आहे. आणखी एक तिसरी यादी खुद्द महाराज आणि नानासाहेब यांच्यातल्या एका कराराची आहे.
आपल्या वीस वर्षांच्या पेशवाईच्या कारकिर्दीत नानासाहेबांनी दहा मोठ्या मोहीम केल्या. या मोहिमांमध्ये राजपुतान्यापासून बंगालमधील बरद्वानपर्यंत आणि उत्तरेत दिल्लीपासून ते अगदी श्रीरंगपट्टण पर्यंत या पेशव्याने सारा प्रदेश आपल्या घोड्यांच्या टापांखाली पिंजून काढला. बाजीरावांच्या काळात भिस्त होती, पण त्यांच्या पुत्राने चतुरंग सेना घेऊन हिंदुस्थानात संचार केला. एका वेळेस पंच्याहत्तर-ऐंशी हजारांची मराठ्यांची फौज येऊन लागली तर कोणाचे डोळे पांढरे नाही होणार? पानिपतच्या प्रसंगातही मराठयांची एक तृतीयांश फौज गारद झाली, एक तृतीयांश दख्खनेत बंदोबस्तासाठी होती, आणि उरलेली एक तृतीयांश फौज घेऊन नानासाहेब अब्दालीचा सामना करण्यासाठी उत्तरेत गेले. ही एक तृतीयांश फौज म्हणजे जवळपास चाळीस-पंचेचाळीस हजारांची होती. आधीच भारी पडलेल्या मराठ्यांची एक फौज बुडवतो न बुडवतो तोच खासा पेशवा आपल्या अंगावर नव्या दमाची फौज घेऊन येतो आहे हे पाहून अब्दालीच्या तोंडचं पाणी पळालं. त्याने गुलराज नावाच्या एका वकिलाला नानासाहेबांकडे पाठवून "तुम्ही पूर्वी लावलेली सारी व्यवस्था मी कायम ठेवतो आहे, मला लढायचं नव्हतचं अहो, पण तुमच्या भावाच्या हट्टापुढे माझं काही चाललं नाही" अशी बतावणी केली. पूर्वी भाऊसाहेबांनी लावलेली सारी व्यवस्था जशीच्या तशी ठेऊन अब्दाली मायदेशी परत निघून गेला.
नानासाहेबांची सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांची शिकवण. त्र्यंबक सदाशिव उर्फ नाना पुरंदरे म्हणजे नानासाहेब पेशव्यांना मानलेल्या मुलासारखे. नाना पुरंदऱ्यांनी पुढे माधवराव पेशवाईवर आल्यावर "तुमचे वडील कशा पद्धतीने कामं करत होते तशीच तुम्ही करा" अशा आशयाची एक यादी लिहून दिली आहे. यात नानासाहेबांचा थेट उल्लेख नसला तरी पेशवेपदाची जाणीव करून देताना पुरंदऱ्यांसमोर नानासाहेबांचं उदाहरण होतं हे वेगळं सांगायची गरज नाही. यात नानासाहेबांनी मोडली बाजी कशी सावरली, दौलतीचा बंदोबस्त कसा केला इत्यादी गोष्टी सांगताना नाना पुरंदरे विशेषकरून नानासाहेबांच्या माणसं जोडण्याच्या कलेबद्दल लिहतात, "खावंदांचे घरी सर्व लहान, मोठे आहेत. बरेवाईट आहेत. परंतु आपपरत्वे जातीचा अभिमान कांहींयेक नसावा. सर्वही खावंदांची लेकरे व सेवक. जो दौलतीचा खैरखवाई तो आपला उपयोगी ऐसे ध्यानात आणून सर्वांवर कृपा योग्यायोग्य असावी. अशा रीतीस जो आणिक तऱ्हेने वर्तेल व दाखवील त्याचे पारिपत्य असावे. तरीच बखेडे व बंड तुटतील". पुढे पुरंदरे माधवरावांना म्हणतात, "आम्ही शेवक हे जाणतो की देशस्थ, कोकणस्थ, कराडे, परभू, शेणवी, मराठे हे सर्व स्वामींचे. स्वामी इतक्यांचे मायबाप. चाकरी मात्र सर्वांनी दौलतीची करावी, हे जातीभेद अभिमान नसावेत". यात नाना पुरंदरे जरी "आम्ही सेवक" म्हणून स्वतःबद्दल म्हणत असले तरी हे नानासाहेबांकडून ते शिकले असल्याचा प्रत्यंतर पुरावा आपल्याकडे आहे.
मृत्यूसमयी नानासाहेबांनी रघुनाथरावांना जवळ घेऊन म्हटलं, "दादा, मराठे, मोंगल, पठाण, रजपुत रांगडे, ब्राह्मण, प्रभु, शेणवी, जे जे सरदार दौलतीस लागु आहेत आणि आमचे संगे जाती जमातीनेसी खपले आहेत त्या त्या सगळ्यांचं आम्ही वंशपरंपरागत चालवत आलो. आता यापुढे तुम्हीही तसंच चालवा. कोणाबद्दलही मनात द्वेष ठेऊ नका, दौलत सर्वांच्या कष्टामुळे आहे. सगळ्यांचं मन राखून घ्या. मनुष्य राजी राखिल्याने दौलतीस काहीही अपाय नाही असं अप्पा म्हणायचे, तुम्हीही तसंच वागा. ज्याची त्याची कामं ज्याला त्याला नीट करू द्या. न्याय अन्याय पाहून एखाद्याला शिक्षा करत जा, उगाच कोणावरही अन्याय करू नका. धर्मनिती सोडू नका. गोब्राह्मण आणि द्विज, प्रजा संरक्षण यथान्यायें करा. कोणी आपापल्या रीतिने वर्तल्यास त्यांचा, अथवा कोणत्याही जातीचा द्वेष करू नका. ज्याचा जो धर्म, ज्याचे जे दैवत त्याजविषई द्वेश मणी न आणता सगळं सांभाळा". नानासाहेब गेल्यावरही कित्येक वर्षे प्रजा आणि सरदार त्यांची आठवण का काढत असत याचं उत्तर नानासाहेबांच्या या मनोवृत्तीत आहे.
एखाद्याचं कौतुक करायचं असेल तर त्याला पुन्हा लढण्यासाठी उमेद यायला शब्दही तसेच हवेत. दमाजी गायकवाडांचा नाना पुरंदऱ्यांनी पराभव केल्यानंतर नानासाहेबांनी त्यांना म्हटलं, "शाबास तुम्हा लोकांची! मोडली बाजी तुम्ही सावरली. जी गोष्ट तुमचे वडिलांचे वडिलांस योग्य ते तुम्ही केले. याउपर बहुत सावधतेने जरब देणे, मळमळीत न करणे, आम्ही येऊन पोहोचतो". नानासाहेब शब्दप्रभू होते, त्यामुळेच टोमणे मारण्यातही ते काही कमी नव्हते. बापूजी भीमराव नावाच्या सरदाराने निजाम आणि राघो गोविंदाचा कजिया झाल्याबद्दल दोन-चार बंद भरतील एवढं मोठं पत्रं लिहून पाठवलं, पण त्यात भांडणाचं नेमकं कारण काय ते मात्र कळवलंच नाही. त्यावरून नानासाहेबांनी त्यांना चिमटा काढताना म्हटलं, "भांडण झाल्याचा मजकूर तुम्ही दोन चार बंद भरतील एवढ्या विस्ताराने लिहिलात खरा, पण भांडण व्हायला नेमकं कारण काय झालं ते मात्र लिहिलंच नाहीत. यावरून तुमच्या लिहिण्याची तारीफ काय ल्याहावीं?"
आपल्या एकंदरीतच व्यवस्थापनकौशल्याने या पेशव्याने दोन तृतीयांश हिंदुस्थानावर मराठ्यांचा भगवा जरीपटका फडकावला. पूर्वी थोरल्या शिवछत्रपती महाराजांना आणि शहाजीराजांना ज्या पातशाह्यांविरुद्ध झगडावं लागलं त्या पातशाह्यांची मुख्य मुख्य ठिकाणं नानासाहेबांनी स्वराज्यात दाखल केली. खुद्द शिवप्रभूंचं जन्मस्थान किल्ले शिवनेरी, बर्हाणपूरजवळचा मोंगली मुख्य किल्ला अशीरगड, पूर्वीच्या निजामशाहीची राजधानी असलेला अहमदनगरचा किल्ला, आदिलशहाची राजधानी असलेला विजापूरचा किल्ला हे सारं पुन्हा स्वराज्यात दाखल झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, या स्वराज्याच्या आधीचं शेवटचं स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले देवगिरी उर्फ दौलताबाद देखील नानासाहेबांनी स्वराज्यात दाखल केला. किती महत्वाचं अन मोठं काम हे !
शेवटचं एकच उदाहरण देऊन ही शब्दगंगा या लेखापुरती इथेच थांबवतो. पिलाजी जाधव हे पेशव्यांतर्फे कायम निजामाशी बोलणी करायला जात असत. सलाबतजंगाने त्रिंबक किल्ला देण्यावरून गुर्मी दाखवायला सुरुवात केली. नानासाहेबांचं स्पष्ट म्हणणं होतं, निजामाने तहात मान्य केलेला पैसा मुकाट्याने द्यावा, आम्ही त्रिंबकचा ताबा देतो, पण निजामाने ऐकलं नाही. तेव्हा नानासाहेब निजामाला म्हणतात, "जे जे अर्ज आम्ही मध्यस्थांबरोबर सांगून पाठवले आहेत ते ऐकून, सर्वप्रकारे आपले नानोकुरान (नानरोटीची शपथ) करून देतील, तेव्हा आम्हीही किल्ल्याविसी इमान देणे ते देऊ. नाहीतर जे त्यास बरे दिसेल ते ते करतील". नानासाहेबांचं यापुढील वाक्य अतिशय महत्वाचं आहे- "आम्ही गनीम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो!"
- कौस्तुभ कस्तुरे
(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या मार्च २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)