चिमणाजी पंडित उर्फ चिमाजीअप्पा



'पेशवा बाजीराव बल्लाळ' हे नाव सिनेमामुळे, कादंबऱ्यांमुळे आणि मालिकांमुळे सध्याच्या पिढीतील अनेकांच्या ओठी कायम आहे. पण 'चिमणाजी बल्लाळ' म्हटलं की हे नेमके कोण? असा प्रश्न येणं साहजिक आहे. सत्ययुगात राम-लक्ष्मण आणि द्वापारात कृष्ण-बलरामाची, भीम-अर्जुन अशा बंधूंची नावे इतिहासाच्या पानांवर कोरली गेली. तद्वतच, कलियुगाच्या या मध्यान्हात बाजीरावांसोबत त्यांच्या धाकट्या बंधूंचं नाव जोडलं गेलं आहे. हेच चिमणाजी बल्लाळ उर्फ चिमाजीअप्पा ! मध्यंतरीच्या 'सिनेमॅटिक लिबर्टी'मुळे चिमाजीअप्पा हे बाजीरावांच्या आयुष्यातील किंवा तत्कालीन जणू एक खलनायक आहेत असं काहीसं रंगवलं गेलं असलं तरी वास्तवात बाजीरावांचा हा भाऊ त्यांच्याइतकाच शूर, त्यांच्याइतकाच परखड, आणि मुख्य म्हणजे काही अंशी अधिक व्यवहारी होता. 

चिमाजीअप्पांचा जन्म नेमका केव्हा झाला हे आज तरी किमान उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे काही सांगता येत नाही. पण बाजीरावांपेक्षा किमान चार-पाच वर्षांनी ते लहान असावेत असं वाटतं. बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाईंना एकूण चार अपत्ये झाली. बाजीराव सर्वात थोर, नंतर चिमाजीअप्पा, भिऊबाई आणि सगळ्यात धाकट्या अनुबाई. बाळाजी विश्वनाथांची इ.स. १८१९ मध्ये दिल्लीवर जी थोरली स्वारी झाली त्यात बाजीराव सुद्धा सामील झाले होते. पेशव्यांचे सातारा दरबारातील मुतालिक म्हणून आत्तापर्यंत कामकाज पाहत होते, पण बाजीरावांना शाहू महाराजांनी स्वतंत्र सरदारी दिल्यानंतर बाजीरावांकडची ही मुतालकी चिमाजीअप्पांनी देण्यात आली. अप्पांच्या जोडीला पुरंदरे मंडळी होतीच. या वेळेस चिमाजीअप्पांचं वय जेमतेम पंधरा-सोळा वर्षांचं होतं. 

दि. २ एप्रिल रोजी बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला आणि लगेच १५ दिवसांनी, दि. १७ एप्रिल १७२० रोजी बाजीरावांना पेशवाईची वस्त्रे महाराजांकडून बहाल करण्यात आली. चिमाजीअप्पा आधीपासूनच पेशव्यांचे मुतालिक होते त्याप्रमाणे कामकाज करत होते. ते पेशव्यांचे दिवाण म्हणजे खासगी कारभारी या नात्यानेही वावरत होते. मुतालकी सांभाळायला अंबाजीपंत पुरंदरे आणि त्यांचा पुतण्या मल्हार तुकदेव हे साताऱ्यात असत. याच वर्षी, म्हणजेच वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी चिमाजीअप्पांनी लढाईचा पहिला अनुभव घेतला असं दिसतं. शाहू महाराजांनी सय्यद बंधू आणि निजामाच्या झगड्यात बाजीरावांना सय्यदबंधूंची कुमक करायला सांगितलं. यावेळेस बाजीराव आणि चिमाजीअप्पा हे दोघेही बंधू सय्यद बंधूंचा सुभेदार आलमअलीच्या मदतीसाठी वऱ्हाडात गेले. या लढाईत आलमअली मारला गेला, पण बाजीरावांनी आणि अप्पांनी मात्र निजामाशी सूत जुळवलं. पुढच्याच वर्षी लगेच बाजीरावांनी आणि अप्पांनी नव्या मोहीम काढून स्वराज्यातील अंतर्गत बंडाळी शमवण्याचा प्रयत्न केला. जुन्नरच्या करीमबेगाशी एक युद्ध झालं ज्यात लढताना शत्रूकडून चिमाजीअप्पांची दोन घोडी मारली गेली. 

मध्यंतरीच्या काळात अप्पांचे त्रोटक उल्लेख सापडतात. अगदी बाजीरावांच्या सुप्रसिद्ध अशा पालखेडच्या मोहिमेत त्यांनी चिमाजीअप्पांना शाहू महाराजांच्या संरक्षणासाठी पुरंदर किल्ल्यावर ठेवलं होतं. नाशिकपासून साताऱ्यापर्यंतची जबाबदारी अप्पांवर होती. पेशव्यांनी स्वतःचे खासे तीन सरदार अप्पांच्या हाताखाली दिले आणि आपण स्वतः सेनापतींची फौज घेऊन धूम करू लागले. इकडे पुरंदरगडावर राहून अप्पा मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि तुकोजी पवारांच्या मार्फत हालचाली करत होते. बाजीरावांची घोडदौड सुरु असली तरी इथून चिमाजीअप्पा आपल्या जासूदांकरवी बित्तंबातमी बाजीरावांकडे पोहोचवत होते. बाजीराव तरी दूर होते, पण इथे निजाम खासा पुण्यात असताना त्याच्या तोंडावर थांबून अप्पा आपल्या सरदारांकरवी निजामाच्या एकंदरीत प्रसंगाला तोंड देत होते.

आपल्या सरदारांचे कौतुक अप्पांकडून कायम होत असे. उदाहरणादाखल सांगतो, पालखेडच्या विजयानंतर लगेच येशजी बलकवडे नावाच्या एका सरदाराने मनमाडजवळचा कावनईचा डोंगरी किल्ला जिंकून घेतला. या सरदाराचं कौतुक करताना अप्पा म्हणतात, "किल्ला आटोपशीर, कडे थोर, पाणी पुष्कळ, शंभर माणसांनी राखण्यासारखा म्हणून मला कळलं. येशजीने छातीचा कोट करून बहादुरी बरीशी केली. हुशारीने किल्ला फत्ते केला. एरवी विनाराजकारण डोंगरी किल्ले जिंकता येणं किती कठीण आहे हे माहीतच आहे". यात बरीशी हा शब्द पाहून अनेकांच्या भुवया उंचावत, पण हीच तत्कालीन शब्दांची खासियत आहे. 'बरी' म्हणजे अतिशय उत्तम !

पालखेडच्या युद्धानंतर बाजीरावांनी नर्मदेच्या पलीकडे जोरदार मुसंडी मारून माळवा आणि बुंदेलखंड आपल्या अधिपत्याखाली आणण्यास सुरुवात केली. छत्रसाल बुंदेल्यांनी महम्मदखान बंगशच्या विरुद्ध मदतीसाठी घातलेली साद ऐकून बाजीराव स्वतः जैतपूरला गेले तर याच वेळेस चिमाजीअप्पांनी माळव्यात प्रस्थान ठेवलं. तत्कालीन राजकारणातील दोन जबरदस्त बादशाही, त्यातही राजपूत योद्धे, ज्यांचा पराभव करणं जवळपास अशक्य आहे अशी वदंता असताना चिमाजीअप्पांनी खास राजकारण करून या दोघांना सपशेल बुडवलं. बुडवलं म्हणजे यमसदनीच धाडलं. माळव्याचा सुभेदार दयाबहाद्दर आणि गिरीधरबहाद्दर हे बंधू आपल्या सुभ्यात शिरू पाहणाऱ्या मराठ्यांना अडवण्यासाठी माळव्याच्या पठाराच्या कडेच्या आमझेरा गावानजीक घाटवाटा रोखून बसले होते. मांडूच्या किल्ल्याकडून येणार रास्ता तितकासा चांगला नाही म्हणून मराठे इथूनच येतील अशी त्यांची अटकळ होती. चिमाजीअप्पांनी अचानक आपला बेत बदलून मांडूच्या वाटेने मागून येऊन दयाबहाद्दर आणि गिरीधारबहाद्दरचा फन्ना उडवला. दि. २६ नोव्हेम्बर १७२८ रोजी धुमश्चक्री उडाली आणि हे दोघेही बंधू मारले गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या जेमतेम तेविस-चोविसाव्या वर्षी दोन बलाढ्य बादशाही सरदारांवर चाल करून जाताना अप्पांसोबत त्यांच्या दोनेक वर्षं लहान असलेली त्यांची पत्नी, रखमाबाई याही होत्या. युद्ध जिंकल्यावर अप्पांनी उज्जैनच्या प्रचंड किल्ल्याला मोर्चे लावले. किल्लेदार लढण्यासाठी बाहेर आला आणि पराभव पावून पुन्हा आत गेला. किल्ला जिंकण्यासाठी गुंतून न पडता अप्पांनी जहाजपूर वगैरे प्रदेशातून खंडण्या घेऊन ते परतीच्या मार्गाला लागले. या दरम्यान रखमाबाईंनी उज्जैनला क्षिप्रा नदीच्या काठावर दानधर्म केल्याचे उल्लेख सापडतात. बाजीरावांना आपला भावाच्या महापराक्रमाची ही बातमी समजली तेव्हा ते कौतुकाने अप्पांना म्हणाले, "अप्पा, तुमची आमझेऱ्याच्या मुक्कामाची पत्रं प्रविष्ट झाली. गिरिधरबहाद्दर आकसाने युद्धास आला, तेव्हा तुमचं आणि त्याचं युद्ध झालं. परिणामी, त्याच्या फौजेसह त्याला बुडवून तुम्ही यश घेतलंत. शत्रू उगाच अभिमान धरून युद्धासाठी आला, त्याचा वडिलांच्या आणि आपल्या धन्यांच्या, म्हणजेच छत्रपती महाराजांच्या पुण्यप्रतापाने तुम्ही पराभव केलात आणि यश पदरी पाडलंत. मला खूप आनंद झाला आहे अप्पा, श्री तुम्हाला कायम अशाच प्रकारे यशस्वी करो". लक्ष्मणाने पराक्रम केल्यावर रामाला कौतुक न वाटलं तरच नवल, नाही का?          

माळव्याच्या प्रचंड मोहिमेनंतर चिमाजीअप्पांनी लगेच गुजरातचा रस्ता धरला. सरबुलंदखानाचा अंतर्गत सरदारांशी असलेला झगडा पाहता अप्पांना त्याच्याकडून इथे फारसा काही विरोध झाला नाही. खुद्द सरबुलंदखानाने फारसं न ताणता सुरत अठ्ठावीसही सोडून इतर प्रदेशाची चौथाई आणि सरदेशमुखी द्यायचं मान्य केलं. अप्पा पुण्याला आल्यावर काही काळातच बुंदेलखंडात बाजीरावांकडून मार खाललेल्या महंमदखान बंगेशला बादशहाने माळवा सुभा बहाल केला. बंगशने बाजीरावांचे माळव्यातले दोन सरदार मल्हारराव होळकर आणि अंताजी माणकेश्वर यांच्यावर अचानक चढाई केली तेव्हा या दोघांनाही माळवा सोडावा लागला. याच निमित्ताने बंगशला पुन्हा हरवण्यासाठी अप्पा मोठ्या फौजेसह माळव्यात आले. मल्हारराव आणि अंताजीही आपापल्या फौजेनिशी येऊन सामील झाले. जवळपास एक लाख मराठ्यांची फौज पाहून बंगशला पुन्हा तारे दिसू लागले. त्याने शेवटी नाईलाजास्तव अप्पांशी तह केला आणि स्वतःची सुटका करून घेतली. याच वर्ष अप्पांनी माळव्याच्या पेशव्यांच्या सुभ्याची वाटणी शिंदे-होळकर-पवार या तीन पराक्रमी सरदारांमध्ये करून दिली. 

१७३३ च्या वर्षात बाजीरावांनी जवळपास सहा महिने जंजिऱ्याला मोर्चे लावून शक्य तितकं काम करून घेतलं, पण बाजीराव परत फिरल्यावर जंजिरेकर सिद्दीने पुन्हा दोनेक वर्ष डोकं वर काढलं तेव्हा पुन्हा पेशव्यांच्या घरातील खाशा माणसाने गेल्याशिवाय निभाव लागणार नाही म्हणून शाहू महाराजांनी चिमाजीअप्पांनी जावं असा हट्ट धरला. अप्पांनी कोकणात उतरून अतिशय ताकदीनिशी सिद्दीचे एकेक किल्ले पुन्हा जिंकून घ्यायला सुरुवात केली. याने चिडून जाऊन अप्पांच्या आणि मानाजी आंग्र्यांच्या फौजेवर हल्ला करून कोण्या खाशालाच मारावं अशा हेतूने रेवसच्या किनाऱ्यावर सिद्दी सात उतरला असता १९ एप्रिल १७३६ रोजी जंजिऱ्याचा मुख्य खासा सिद्दी सातच मारला गेला. सिद्दी सातला चिमाजीअप्पांनी मारलं हे ऐकून शाहू महाराजांचा आनंद गगनात मावेना. महाराज म्हणाले, "तुम्ही बरी सिकास्त करून हबशी बुडविला. सामान्य गोष्ट जाली नाही". महाराजांनी अत्यानंदाने साखर वाटण्याचा आणि तोफांची सरबत्ती करण्याचा हुकूम सोडला. इ.स. १७३८ मध्ये बाजीरावांनी भोपाळला निजामाला गरडलं तेव्हा निजामाच्या पुत्राने, नासिरजंगने दक्षिणेकडून रसद पुरवू नये म्हणून चिमाजीअप्पा आपली फौज घेऊन तापी नदीच्या किनारी वरणगाव वगैरे मुलुखात येऊन थांबले होते. अर्थात त्यांचा थेट सामना निजामाच्या फौजेशी होऊ शकला नाही.

अप्पांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मोहीम म्हणजे वसईची मोहीम. इ.स. १७३७ ते १७३९ अशी जवळपास तीन वर्षे ही मोहीम चालली, यात मधलं एक वर्ष भोपाळच्या युद्धाकरता अप्पांना खानदेशात जावं लागलं तरी सुरुवात आणि शेवट अशी एकेक वर्षे खासे अप्पा या मोहिमेत होते. वसई म्हणजे उत्तर फिरंगाण. पोर्तुगीजांच्या अत्याचाराचे तत्कालीन प्रसंग नुसते वाचले तरी अंगावर काटा येतो. भिवंडीच्या जवळच असलेल्या अणजूर गावचे वतनदार नाईक अणजूरकर यांच्या घराण्याला पोर्तुगीजांच्या अत्याचाराची भयंकर झळ बसली. अत्याचार म्हणजे काय? धर्म बदला, नाहीतर आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. काय करणार? तर हात बांधून, त्यावरून अंगात तेलात भिजवले डगले (जॅकेट्स) घालून जिवंत जाळणार. इन्क्विझिशनचे हे राक्षसांनाही लाजवतील असे प्रकार पाहून उत्तर कोकणातील जनता ट्रस्ट झाली होती. पोर्तुगिजांचा नायनाट करण्यासाठी तेवढा वेळ हवा होता. वास्तविक गंगाजी नाईक अणजूरकर वगैरे मंडळी १७२५ सालानंतर लगेच पेशव्यांच्या मागे लागले होते की आमची मुक्तता करा. पण पालखेडपासून सुरु झालेल्या उत्तरहिंदच्या राजकारणात राऊ आणि अप्पा हे दोघेही व्यस्त असल्याने प्रत्यक्ष मोहीम सुरु व्हायला एक तप जावं लागलं. ठाणे (साष्टी), घोडबंदर, तांदुळवाडी, टकमक, तारापूर, शिरगाव इत्यादी सारी ठिकाणे चिमाजीअप्पांनी जिंकून घेतली. अप्पांच्या फौज उत्तरेकडे डहाणू-घोलवड पासून दक्षिणेकडे वेसावे, अंधेरीपर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. अंधेरी-मरोळच्या खाडीपलीकडील भाग हा इंग्रजांचा असल्याने इंग्रजांनाही धास्ती पडली. वसईचा किल्ला मात्र दाद देत नव्हता. अनेक प्रयत्न करून, सुरुंग लावूनही किल्ला हाती येत नाही हे पाहून अखेरीस अप्पा भडकले, म्हणाले, "किमान आता माझं मस्तक तोफेच्या तोंडाला बांधून तोफ  चालवा,जेणेकरून मेल्यानंतर माझं मस्तक किल्ल्यात जाऊन पडेल आणि मला तेवढं तरी समाधान लाभेल". झालं फौज एकदम खवळली. नेट लावून दि. १२ मे १७२९ रोजी वसईचा किल्ला चिमाजीअप्पांच्या फौजेने जिंकून घेतला. पोर्तुगीजांनी बारा कलमी तह केला आणि वसई प्रांतातून आपलं बस्तान कायमच हलवलं. उत्तर कोकण चिमाजीअप्पांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केलं. 

वसईची मोहीम होते न होते तोच निजामपुत्र नासिरजंगाशी युद्धाचा प्रसंग उद्भवला. बाजीराव आणि चिमाजीअप्पा, दोघं भावांनी एकत्र जाऊन गोदावरीच्या खोऱ्यात नासिरजंगाचा मार्च १४४०च्या पूर्वार्धात जबरदस्त पराभव केला. चिमाजीअप्पा नासिरजंगासोबत औरंगाबादला तह करण्यासाठी गेले. बाजीराव इथून जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यास गेले असता नर्मदाकाठी अचानक मृत्यू पावले. अप्पा आणि नानासाहेब नेमके या वेळेस मानाजी आंग्र्यांच्या मदतीसाठी कोकणात उतरले होते. याच काळात बाजीराव आणि अप्पांमध्ये मस्तानीवरून वाद उत्पन्न झाले. मस्तानीमुळे राजकारणं बुडतात असा नानासाहेबांचाही एक शेरा आहे. पण म्हणून या दोघांची एकमेकांप्रती असलेली काळजी कधीही नष्ट होणार नव्हती. भावाभावांचं प्रेम हे एकमेकांशी थेट बोलत नसताना मातोश्रींच्या आडून "अप्पाला काळजी घ्यायला सांगा, तो स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही", अथवा "राऊ तब्येतीची अशी का हेळसांड करतायत, त्यांनी आम्हाला हवी ती शिक्षा करावी पण स्वतःला जपावं" अशी दोघांचीही पत्रं राधाबाईंना येत होती. बाजीराव गेल्यानंतर मात्र चिमाजीअप्पा खचले. वसईच्या मोहिमेपासूनच त्यांची तब्येत ढासळू लागली होती.  

बाजीराव गेल्यानंतर अप्पांनी सावरून, शाहू महाराजांकरवी नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे देवविली, आणि आपली सारी ताकद आपल्या पुतण्याच्या मागे उभी केली. १७४०च्या दसऱ्यानंतर लगेच नानासाहेबांची पहिली उत्तरेची स्वारी निघताना चिमाजीअप्पाही त्यांच्यासोबत निघाले, पण मध्येच प्रकृती अतिशय ढासळल्याने नानासाहेबांनी त्यांना पुण्याला परत पाठवलं. महिना जातो न जातो तोच बातमी येऊन कोसळली. दि. १७ डिसेंबर १७४० रोजी चिमाजीअप्पांचा पुण्यात मृत्यू झाला. अतिशय धोरणी, मनमिळावू, करारी पण तितकाच प्रेमळ असलेला बाजीरावांचा हा धाकटा भाऊ अखेर आपल्या भावाच्या मृत्यूनंतर सहा महिन्यातच गेला. राम आधीच गेला होता, पाठोपाठ लक्ष्मणही गेला. इतिहासात ज्या ज्या वेळेस बाजीरावांच्या प्रचंड पराक्रमाची चर्चा झाली, त्या त्या वेळेस चिमाजीअप्पांचा उल्लेख केल्याशिवाय इतिहासाची ती पानं अपूर्ण होती; पुढेही अपूर्णच असतील.


- कौस्तुभ कस्तुरे

(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या एप्रिल २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)