रणधुरंधर सरदार शिंदे भाग १ - राणोजी, जयाप्पा
बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाने अठराव्या शतकाचा पूर्वार्ध, जवळपास वीस वर्षे हिंदुस्थानभर मराठ्यांचा डंका दुमदुमत होता. बाजीरावांच्या या पराक्रमाचे हिस्सेदार म्हणजे त्यांचे जणू डावे-उजवे हात होते. एकाचं नाव होतं मल्हारराव होळकर आणि दुसऱ्याचं नाव होतं राणोजी शिंदे. होळकरांविषयी आपण पुढच्या लेखात पाहणार आहोतच, पण येत्या दोन लेखात आपण महापराक्रमी शिंदे घराण्यातील वीर पुरुषांची कामगिरी संक्षिप्त रूपात पाहणार आहोत.
बाळाजी विश्वनाथ हे सातारा गादीच्या पेशवाईवर येण्यापूर्वी 'सेनाकर्ते' होते, पुढे त्यांना इ.स. १७१३ मध्ये पेशवाई प्राप्त झाली. याच सुमारास कधीतरी, किंवा पेशवाई प्राप्त झाल्यानंतर राणोजी शिंद्यांनी बाळाजी विश्वनाथांच्या पदरी बारगिरी पत्करली असावी असं म्हणावं लागतं. याचा स्पष्ट उल्लेख सापडत नसला तरीही नानासाहेब पेशव्यांच्या एका पत्रात आणि खुद्द महादजी शिंद्यांच्या एका पत्रात आढळते. महादजी म्हणतात, "आमची बिशात काय होती? प्रथम राणोजीबावांस खिजमतगारी सांगितली, नंतर कृपा करून पागा दिली. तेथून या पदवीस आणिले की आम्ही बादशहाची स्थापना केली. श्रीमंतांचे सेवक होऊन बादशहा स्थापिले". नानासाहेब पेशवे पुढे राणोजींचे पुत्र जयाप्पा शिंद्यांना लिहितात, "तुमचा अभिमान ईश्वरास आहे,आणि मजवर ईश्वरी कृपा आहे तोवर साहित्याशी कधी चुकणार नाही. तीन पिढ्यांचे एकनिष्ठ सेवक कामाचे असता तुमचा अभिमान नसावा, हे कधीही या घरात घडणार नाही".
महादजी शिंदे म्हणतात त्याप्रमाणे राणोजी शिंद्यांनी बाळाजी विश्वनाथांकडे आधी बारगिरी आणि नंतर खिजमतगारी पत्करली. यासोबतच हुजुरपागेचे म्हणजेच पेशव्यांच्या खाशा पागेच्या बंदोबस्ताचे काम राणोजी शिंद्यांकडे आले. हे पागेचे काम अत्यंत कसोशीने करता करता बाळाजी विश्वनाथांची मर्जी राणोजींवर बसली. असं म्हणायला थेट पुरावा नसला तरीही वाव आहे की बाळाजी विश्वनाथांच्या दिल्ली स्वारीत बाजीराव-मल्हारराव होळकरांसोबत राणोजी शिंदेही गेले असावेत. पुढे बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला आणि बाजीराव पेशवेपदी आल्यावर राणोजींनी माळवा-बुंदेलखंडाच्या दक्षिण भागात १७२३-२४ मध्ये पेशव्यांसोबत स्वाऱ्या केल्या. एका फारसी बखरीतल्या मजकुरानुसार या मोहिमेत बुंदेलखंडातील एक किल्ला सहजासहजी जिंकणे शक्य नसताना बाजीरावांनी ही कामगिरी राणोजींना सांगितली. राणोजींनी आपल्या दिमतीला रामचंद्रबाबा सुखटणकर या मुत्सद्द्याला मागून घेतलं आणि केवळ चार दिवसात राजकारण करून तो किल्ला जिंकून घेतला. बाजीरावांची मर्जी या गोष्टीमुळे राणोजींवर बसली आणि पुढे महाराष्ट्रात येताना, खान्देशात त्यांनी राणोजींचं दुसरं लग्न लावून दिलं. पुढे गोंडांचा मुलुख जिंकल्यावर तिथली पंधरा गावांची नेमणूक राणोजींना लावून दिली.
इ.स. १७२४च्या या मोहिमेनंतर राणोजी शिंद्यांचा उत्कर्ष होत गेला आणि बाजीरावांनी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मोकासे आणि पालखीचा मान बहाल केला. याच सुमारास, बहुदा साखरखेडल्याच्या लढाईनंतर राणोजींना पेशव्यांनी आपली सरदारी बहाल केली. इथपासून पुढे राणोजी शिंद्यांची कमान बाजीरावांच्या कारकिर्दीत, आणि पुढेही मृत्यूपर्यंत चढती वाढतीच राहिली. राणोजी शिंद्यांचं पालखेडच्या प्रसंगीचं एक पत्रं उपलब्ध आहे. बाजीरावांनी राणोजींना म्हटलं होतं, "मोंगल म्हणजेच निजाम दगेखोर आहे, तुम्ही उत्तम प्रकारे खबरदार घेऊन जे काही करायचं ते करा". राणोजी पत्रात बाजीरावांना लिहितात, "सेवक राणोजी शिंदे कृतानेक विज्ञापना. आपण पूर्वीही आज्ञा केली त्यानुसार आणि अंबाजीपंतांनी सांगितल्यानुसार मी तसंच वागतो आहे. मी मल्हारराव होळकरांना पत्रं पाठवून आधीच बोलावून घेतलं आहे. तुकोजी पवारांनाही बोलावणं धाडलं आहे. कदम वगैरेही येतीलच. आम्ही सारे एकत्र होऊन थांबलो आहोत. आपण पुढे जाण्याची आज्ञा ज्या प्रकारे केली आणि ज्या मार्गाने जायला सांगितलं त्या मार्गावरून जायला आम्ही कसलंही अंतर करणार नाही. अगदी प्रसंग आलाच तर स्वामींचं म्हणजे पेशव्यांचं पुण्य समर्थ आहे. जे काही व्हायचं ते स्वामींच्या पुण्याप्रमाणे निश्चितच घडून येईल. जोवर पेशव्यांची कृपादृष्टी आमच्यावर आहे तोपर्यंत ईश्वर आमचा सांभाळ करतच आहे. बाकी काय लिहावं? आज्ञापत्र लिहून आमचा सांभाळ करत असलं पाहिजे". राणोजींची स्वामीसेवेची ही भाषा आणि त्यांचा आत्मविश्वास हा या पत्रातून उठून दिसतो. यावेळेस राणोजी शिंदे हे पाटसच्या ठाण्याचं रक्षण करत होते.
चिमाजीअप्पांच्या इ.स. १७३२च्या स्वारीत माळव्यावर पेशव्यांचा अंमल पक्का झाला तेव्हा पेशव्यांनी शिंदे आणि होळकर या आपल्या दोन सरदारांमध्ये माळव्याची वाटणी करून दिली. या वेळेस पवारांनाही थोडा हिस्सा मिळाला. माळव्याच्या सुभ्याच्या एकूण ३०% उत्पन्नाचा हिस्सा राणोजी शिंद्यांना मिळाला. या वेळेपासूनच शिंदे आणि होळकरांना 'सुभेदार' ही पदवी लावलेली आढळते. यानंतर लगेच, दि. २२ एप्रिल १७३४ रोजी मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांनी बुंदीच्या संस्थानावर हल्ला चढवून ते स्थळ काबीज केलं. शिंदे-होळकर पुढे दि. ६ जुलै १७३५ रोजी माळव्यात आले तेव्हा स्वतः बाजीराव त्यांना घोरपडीपर्यंत यानंतर पेशव्यांनी आपल्या या दोन सरदारांना साताऱ्यात नेऊन त्यांची आणि शाहू महाराजांची भेट करवली. याच वर्षी बाजीरावांनी जेव्हा राजपुतान्यावर चाल कारुंजायचा विचार केला तेव्हा सवाई जयसिंह वगैरेंनी राणोजी शिंदे आणि त्यांचे कारभारी रामचंद्रबाबांच्या मध्यस्तीने बाजीरावांची मनधरणी करणं सुरु केलं. बाजीरावांनी राजपुतान्यात जाऊन समस्त राजपुतांची मोट बांधली आणि दक्षिणेत येताना राणोजी-मल्हाररावांना त्यांनी माळव्यातच छावणीस ठेवलं. बादशहाने दिलेली वचनं पूर्ण होत नाहीत म्हणून बाजीरावांनी लगेच पुढच्या वर्षी दिल्लीवर चढाई करण्याचं धोरण दाखल तेव्हा राणोजी शिंद्यांचं आनंदाने उद्गरलेलं एक वाक्य महत्वाचं आहे, "प्रधानपंत स्वामींचे आगमन सेनेसहवर्तमान होऊन सेवकास दर्शन लाभ झाला".
खुद्द दिल्लीत जेव्हा पेशवे फौजेसह शिरले तेव्हा बादशाही फौज मुकाबल्यासाठी बाहेर आली होती. पण या फौजेचा राणोजी-मल्हारराव-तुकोजी या तिघांनीही जाऊन पराभव केला. मीरहसनखान कोका या युद्धात जखमी झाला. राणोजींच्या पथकातल्या इंद्रोजी कदम नावाच्या सरदाराला गोळी लागून त्याची दोन बोटे तुटली. भोपाळच्या युद्धातही राणोजी शिंद्यांनी निजामाच्या फौजेवर हल्ले चढवून त्याची पुरती नाकाबंदी केल्याची पत्रं उपलब्ध आहेत. भोपाळच्या युद्धप्रसंगानंतर वसईची अर्धवट राहिलेली मोहीम पूर्ण करण्यासाठी फौज पुन्हा चिमाजीअप्पांच्या कुमकेसाठी आल्या. राणोजीही पुन्हा वसईच्या मोहिमेत आले. तारापूर वगैरे पट्ट्यातील किल्ले जिंकून घेण्यासोबतच राणोजींची काही पथके ही अगदी डहाणूच्या आसपास जाऊन धुमाकूळ घालू लागली होती. खुद्द वसईच्या किल्ल्याला राणोजी शिंद्यांनी पाच सुरुंग लावले होते अशी नोंद खासा चिमाजीअप्पांच्या पत्रात सापडते. दि. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीरावांचा रावेरखेडीला मृत्यू झाला. बाजीरावांची नर्मदाकिनारी छत्री बांधण्याचं काम बाजीरावपुत्र नानासाहेबांनी राणोजी शिंद्यांवर सोपवलं.
नानासाहेब पेशवे झाल्यावर दुसरी प्रदीर्घ मोहीम झाली ती बुंदेलखंड आणि बंगालवर. बुंदेलखंडात मराठ्यांचा अंमल बसवताना ओर्च्छा घेणं गरजेचं होतं. हे ठिकाण घेण्यासाठी नानासाहेबांनी राणोजींचा पुत्र ज्योतिबा आणि कारभारी मल्हार कृष्ण क्षीरसागर या दोघांना पाठवलं होतं, पण रात्री ओर्च्छेकरांनी दग्याने या दोघांची डोकी कापून खून केला. याशिवाय पाच-दहा आणखी ब्राह्मण, मल्हारपंतांचा पुत्र आणि जावई वगैरे धरून शंभर एक लोक मारले गेले. राणोजींवर दुःखाचा डोंगर कोसळला. या गोष्टीचा बदल म्हणून नानासाहेबांनी नारो शंकर दाणी यांना फौजेसह पाठवून ओर्च्छा जिंकून घेतलं आणि त्याचे तट पाडून त्यावर गाढवाचा नांगर फिरवला.
राणोजींच्या मृत्यूची नेमकी तारीख उपलब्ध नाही, पण जुलै १७४५च्या पहिल्या आठवड्याच्या सुमारास मिरझापूर प्रांतात त्यांचा मृत्यू झाला. पुत्र जयाप्पा शिंद्यांनी राणोजींची छत्री उभारून त्यांची रक्षा उज्जैनीस तीर्थाच्या ठिकाणी आणली. राणोजी गेल्यावर अर्थातच सरदाराची वस्त्रे कोणास द्यावी हा नानासाहेबांसमोर प्रश्न नव्हताच. राणोजींचा कर्तबगार ज्येष्ठ पुत्र जयाजी उर्फ जयाप्पा हा यावेळी तितकाच पराक्रम गाजवत होता.
राणोजी शिंद्यांच्या दोन वर्षे आधी जयपूरचा सवाई जयसिंह मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन पुत्रांमध्ये गादीसाठी भाऊबंदकी निर्माण झाली. थोरल्या ईश्वरीसिंहाचा पक्ष आधी पेशव्यांनी घेतल्यामुळे मल्हाररावांसोबत राणोजी, आणि पुढे जयाप्पा शिंद्यांनाही ईश्वरीसिंहाची बाजू घ्यावी लागली. इ.स. १७४५ मध्ये ईश्वरीसिंहाने माधोसिंह आणि त्याचा मामा जगतसिंह यांचा पराभव केल्यानंतर उदेपूरच्या जगतसिंहाने मल्हारराव होळकरांना आपल्या पक्षात ओढून घेतलं. यामुळे जयाप्पा आणि मल्हारराव यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. नानासाहेबांच्या पुढे हा मोठा पेच निर्माण झाला. दोन्ही भावांमध्ये समखोटा घडवून आपल्याही दोन सरदारांमध्ये फूट पडायला नको अशी नानासाहेबांची इच्छा होती. होळकर आता माधोसिंहाचा पक्ष सोडायला तयार नव्हते. शिंदे आणि रामचंद्रबाबा शेणवी हे ईश्वरीसिंहाचा पक्ष सोडायला तयार नव्हते. या सगळ्यामुळे अखेरीस इ.स. १७४७ मध्ये नानासाहेबांना उत्तरेत जाणं भाग पडलं.
इ.स. १७४९ मध्ये ईश्वरीसिंहाने आपल्याकडून राज्य आटोपत नाही म्हणून मल्हारराव होळकरांना गळ घातली, पण त्याआधीच त्याने केशवदास प्रधानाचा खून केला असल्याने मल्हारराव आपल्याला सोडणार नाहीत असं समजून ईश्वरीसिंहाने आत्महत्या केली. मल्हाररावांनी शहराची नाकेबंदी करून पाठोपाठ जयाप्पा शिंदेही आले. आता गादीवर माधोसिंहाचा हक्क होता. माधोसिंहाची जमल्यावर त्याने अचानक आपल्याला मदत करणाऱ्या जयाप्पा आणि मल्हारराव होळकरांच्या खुनाचा कट रचला. जेवणातून विष देण्याचा कट जयाप्पाच्या हुशारीमुळे टळला. पण पुढे जयाप्पा पाच हजार फौजेसह जयपूरच्या कोटात गेले तेव्हा माधोसिंहाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. जयाप्पांची जवळजवळ तीन हजार माणसे मारली गेली. बरंच नुकसान झालं. अखेरीस हिंगण्यांच्या मार्फत आणि इतर मुत्सद्द्यांच्या मार्फत तात्पुरती शांतता प्रस्थापित करून जयाप्पा आणि मल्हारराव राजपुतान्यातून बाहेर पडले. पुढची दोन वर्षे अब्दालीची स्वारी आणि अहमदखान बंगश याच्या विरुद्ध वजिराने मदतीस बोलावल्यामुळे जयाप्पा अंतर्वेदीत, म्हणजेच गंगा आणि यमुना नद्यांच्या मधल्या भागात होते.
अब्दालीची हिंदुस्थानावर स्वारी होत आहे हे पाहून वजीर सफदरजंगाने जयाप्पा आणि मल्हाररावांना मदतीला बोलावलं. दि. २३ एप्रिल १७५२ रोजी कनोज इथे बादशाहातर्फे वजिराने आणि पेशव्यांतर्फे जयाप्पा-मल्हाररावांनी तहनाम्यावर सह्या केल्या. हाच तो प्रसिद्ध कनोजचा अहदनामा अथवा अहमदिया करार. दिल्लीची बादशाही वाचवण्याच्या बदल्यात पन्नास लक्ष रुपये बादशहाकडून मिळावे, अजमेर आणि आग्रा हे दोन सुभे मिळावेत तसेच पंजाब-सिंध वगैरे प्रांतातून चौथाई वसूल करण्याची परवानगी मिळावी वगैरे कलमे या तहात होती. या सगळ्यातुनच बादशाह आणि वजिराचं जवळपास वर्षभर युद्ध भडकलं आणि १७५४च्या सुमारास वजिराच्या मृत्यूने या सगळ्यावर पडदा पडला. पण वजीर मेल्याने संकटे काही संपली नाहीत. नजीबखान रोहील्याने हीच संधी साधून अब्दालीला हिंदुस्थानात बोलावून घेतलं.
दरम्यानच्या काळात, एप्रिल इ.स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या संग्रामात शिंदे आणि होळकरांच्यात आधीच राजपुतान्यावरून असलेला वाद पुन्हा उफाळून आला. कुंभेरीच्या वेढ्यात मल्हाररावांचा पुत्र खंडेराव मृत्यू पावल्यानंतर मल्हारराव सुडाने संतापले. या सगळ्यातून केवळ जयाप्पा शिंदेच आपल्याला वाचवू शकतात म्हणून सूरजमल जाटाने आपला पगडीभाऊ म्हणून जयाप्पांना मदतीसाठी बोलावलं. जयाप्पा शिंद्यांना त्याने म्हटलं, "आजच्या या प्रसंगात आपण वडील बंधू, मी धाकटा. होईल त्या रीतीने माझा बचाव करावा". जयाप्पांनी या गोष्टीचा स्वीकार केला. जयाप्पांची तब्येत यावेळेस बिघडली होती. दोघांनी धरून उठवल्याशिवाय त्यांना हालचाल करता येत नसे. जवळपास दोन महिन्यांनी ज्वर उतरू लागला आणि जयाप्पा पुन्हा ठणठणीत झाले. दरम्यान रघुनाथराव, सखारामबापू, खुद्द बादशाह, इमादउल्मुल्क वगैरे साऱ्यांनीच मध्यस्थ राहून जयाप्पा आणि मल्हारराव यांच्यात समेट घडवून आणला. एका ठिकाणी राहून भांडणं वाढणार, त्यापेक्षा आपण मारवाडात जावं म्हणून जयाप्पांनी आपला मोर्चा राजपुतान्याकडे वळवला.
अहमदिया करारानुसार अजमेर हे आता अधिकृतरीत्या मराठ्यांना मिळालं होतं. त्याचा ताबा घेण्यासाठी जयाप्पा शिंदे अजमेरच्या रोखाने निघाले. या आधी इ.स. १७४९ मध्ये जोधपूरच्या राजा अभयसिंग मृत्यू पावल्यावर त्याच्या पुत्राची, रामसिंगाची मदत करण्यासाठी शिंदे मारवाडात गेले होते. पण तोवर अभयसिंगाचा भाऊ बख्तसिंगाने आपला अंमल बसवला होता. इ.स. १७५२ मध्ये जयाप्पांनी मारवाडवर हल्ला करून जाळपोळ केली पण बख्तसिंगाने जयाप्पांचा पराभव केला. याचाच बदल घेण्यासाठी जयाप्पा पुन्हा, जून १७५४ मध्ये अजमेरकडे निघाले. दरम्यान बख्तसिंग मृत्यू पावून त्याचा मुलगा बिजेसिंग हा गादीवर आला होता. तो मेडत्याच्या किल्ल्यातून जयाप्पांशी लढू लागला. सप्टेंबर १७५४ मध्ये जयाप्पांनि मेडत्यावर हल्ला चढवून बिजेसिंहाचा पराभव केला. बिजेसिंह मेडते सोडून जवळच असलेल्या नागोरच्या ठाण्यात जाऊन लढू लागला. जयाप्पा इरेस पडून लढू लागले म्हणून नानासाहेबांना काळजी वाटू लागली. त्यांनी जयाप्पांना पत्रं लिहून म्हटलं, "मारवाडी राजपूत अद्याप गर्विष्ठ, त्यांसी प्रसंग एकाएकी तुम्हांवर प्राप्त झाला आहे, त्यास तजविजीने दमवून, युक्तीने समय पाहून, जरब देऊन स्वकार्यसिद्धी करावी. श्रीकृपेने सरदारी व शिपाईगिरी व दाव उपाय जाणणे सर्व गन तुम्हांत आहेत". पण जयाप्पा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
दि. २१ फेब्रुवारी १७५५ रोजी अजमेरच्या किल्ला फत्ते झाला. शिंद्यांची फौज किल्ल्यावर चढली. जयाप्पांनी हाच दबाव बिजेसिंगापुढे नेऊन तहासाठी भाग पडलं. बिजेसिंगानेही तोंडदेखला तहाच्या वाटाघाटी सुरु केल्या. बिजेसिंगचा विजयभारती गोसावी नावाचा वकील जयाप्पा शिंद्यांशी बोलणी करण्याच्या नावाखाली त्यांना झुलवत ठेऊ लागला. यातच संपूर्ण जून महिना उजाडला आणि संपलाही होता, जुलैही संपत आला होता. दि. २५ जुलै १७५५ या दिवशी विजयभारती जयाप्पांच्या भेटीस छावणीत आला. त्यासोबत राजसिंग चौहान आणि आणखीही दोन माणसं होती. बोलाचालीत शब्दाला शब्द वाढून अचानक गोसावी आणि चौहान यांनी एकदम जयाप्पांवर सपासप वार केले. शिंद्यांच्या लोकांनी या साऱ्या मारेकऱ्यांना जागच्या जागी ठार केलं. सगळ्या छावणीत जितके कोणी राजपूत होते त्या सगळ्यांना ठार करण्यात आलं. गोविंद बल्लाळ खेरांनी ही बातमी रामजी अनंत दाभोलकरांना लिहिताना म्हटलं आहे, "राजेश्री आबासाहेब स्नानास चौकीवर उघड्यावर बसले त्यासमयी राजपूत दगेयासी आला. सुरी घेऊन, अस्तनीत लपवून,त्याने पोटात दोन सुरी चालविली. याप्रकारे दगा जाहला. आपासाहेब लाखांचे पालनवाले गेले".
जयाप्पा शिंद्यांच्या मृत्यूने नानासाहेबांना जबर धक्का बसला. मल्हारराव हे सरदार असले तरी वयाने ज्येष्ठ होते. उलट जयाप्पा हे समवयस्क असल्याने नानासाहेबांचा ओढा त्यांच्याकडे असे. अप्पांच्या मृत्यूबद्दल नानासाहेब लिहितात, "जयाजी सिंदे यांस दगा होऊन निधन पावल्याचा मजकूर लिहिला, तो कळोन बहुत श्रम झाले. ईश्वर मोठी अनुचित गोष्ट केली. उपाय नाही. जयाप्पासारिखा उमदा सरदार दग्यानें मृत्यू पवव ऐसे नव्हते". जयाप्पा मृत्यू पावले, पण त्यांच्या पाठी शिंद्यांकडे तितकेच शूर वीर लढण्यासाठी सज्ज होते. त्यांच्याबद्दल पाहूया पुढच्या भागात.
- कौस्तुभ कस्तुरे