माधवराव बल्लाळ पंतप्रधान
दि. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतचा प्रचंड संग्राम झाला, जणू काही अठराव्या शतकातील हे एक महायुद्धच होतं. अनेक मराठा वीर, सेनापती आणि खुद्द उद्याचा पेशवा या युद्धात मारला गेला. नानासाहेब पेशवे पानिपतच्या युद्धाच्याच वेळेस उत्तरेत गेले, आणि त्यांच्या भीतीने अब्दाली पुन्हा मायदेशी चालता झाला खरा, पण आधीच खंगलेली तब्येत घेऊन महाराष्ट्रात येताच नानासाहेबांचा मृत्यू झाला. पानिपतची भळभळणारी जखम भरून काढण्याचं सामर्थ्य, लोकांना दिलासा देऊ शकेल असा एक सर्वगुणसंपन्न, भल्या थोरल्या आधारवडासारखा हा पेशवा अचानक हे जग सोडून गेला. कोणालाही कल्पना नव्हती की असं काही अचानक होईल.
मागच्या लेखात आपण हे पाहिलंच आहे की नानासाहेबांनी मृत्यूपूर्वी पर्वतीवर माधवरावांचा हात रघुनाथरावांच्या हाती देत म्हटलं, "दादा, आता माझ्या मागे तुलाच सावरायचं आहे. माधवाला आणि साऱ्यांना सांभाळ". नानासाहेब गेले, आणि काही दिवसांतच रघुनाथराव दिलेलं वचन विसरले. सुभेदार थोरले मल्हारराव होळकर वयोवृद्ध झाले होते, त्यातच अंतर्गत कुरबुरींमुळे होळकरांचे पेशव्यांतर्फेने असणारे दिवाण गंगोबातात्या चंद्रचूड हे बऱ्याच वेळेस पुण्यातच मुक्कामी असत. याशिवाय सखारामबापू बोकील हे पूर्वाश्रमीचे नाना पुरंदऱ्यांचे कारभारी, पुरंदरे घराण्यात फूट पडल्यानंतर स्वतः सरदारी करू लागले होते. बापू आणि तात्या या दोघांनी हीच संधी योग्य आहे हे पाहून रघुनाथरावांशी हळूहळू संधान बांधणं सुरु केलं. "नानासाहेब गेले, आता श्रीमंतांशिवाय (रघुनाथरावांशिवाय) दुसरं कोण आहे गादी सांभाळायला" अशी कुजबुज मुद्दाम सुरु झाली. सुरुवातीला दादासाहेबांनी याकडे कानाडोळा केला खरा, पण ईर्ष्या माणसाला एकीकडे हतबल बनवते आणि दुसरीकडे स्वार्थी. माधवराव लहान आहेत, तेव्हा आपणच सारं काही सांभाळायला हवं असा विचार आता रघुनाथरावांच्या मनात फेर धरू लागला होता. पुढे हळूहळू या साऱ्याची परिणीती गादीसाठी आपल्याच पुतण्याशी लढण्यात झाली आणि सात वर्षांनी पुतन्याकडूनच कैद होण्याचा प्रसंग रघुनाथरावांवर ओढवला.
दि. २० जुलै १७६१ रोजी माधवरावांना पेशवाईची वस्त्रं मिळाली. सोबतच आबा पुरंदऱ्यांना मुतालकी आणि सखारामबापूंना पेशव्यांच्या दिवाणीची वस्त्रे मिळाली. पुढचीही दोनेक वर्ष अंतर्गत कुरबुरींना तोंड देता देताच अचानक राक्षसभुवनच प्रसंग ओढवला. दि. १० ऑगस्ट १७६३ रोजी पेशव्यांनी निजामाचा राक्षसभुवनला प्रचंड पराभव केला. निजामाचा वजीर विठ्ठल सुंदर परशुरामी हा मारला गेला. निजामाने आधीच्या उदगीरच्या तहातील ६० लाख आणि नव्याने २२ असा एकूण ८२ लाख उत्पन्नाचा मुलुख पेशव्यांना तहाद्वारे कबूल केला. एवढंच नाही, तर या युद्धाची दहशत एवढी बसली की पुढची जवळपास ३२ वर्ष निजामाने पेशव्यांशी कधी शत्रुत्व करण्याचा विचारही केला नाही. नंतरच्या काळात माधवरावांनी कर्नाटकात एकंदर पाच स्वाऱ्या केल्या आणि नानासाहेबांच्या काळात राहिलेला मुलुख शक्य तितका मराठा साम्राज्याला जोडण्याचा प्रयत्न केला. यात महत्वाची गोष्ट म्हणजे हैदरअळीसारख्या क्रूरकर्म्याचा पराभव ही होय.
मराठेशाहीत पुढे हिंदुस्थानभर ज्या दोन माणसांचा डंका दुमदुमत होता त्या महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या दोन नररत्नांना माधवराव पेशव्यांनी पुढे आणलं. वास्तविक पानिपतावर महादजी जखमी होऊन पायाने अधू झाले होते. शिवाय जयाप्पा आणि दत्ताजींच्या बरोबरच महादजी सुद्धा नानासाहेब आणि पर्यायाने गादीवरील पेशव्यास इमान राखणारे असल्याने रघुनाथरावाने केदारजी शिंद्यांना सरदारी दिली होती, पण माधवरावांनी महादजींनाही यात सामावून घेतले आणि पुढे तर शिंद्यांची मुखत्यारीच दिली. सखुबाई वगैरे प्रकरणात आणि उत्तरेतली मोडलेली स्वतःच्याच जहागिरीतली व्यवस्था नीट लावण्यास महादजींची पानिपतनंतर सुरुवातीची जवळपास सहा-सात वर्ष फुकट गेली. पण १७६८ पासून माधवरावांनी त्यांना पुन्हा मुखत्यारी दिल्यानंतर महादजी हळूहळू पुढे येऊ लागले. इकडे पुण्याला सखारामबापू वगैरे ज्येष्ठ लोकं असतानाही अंगचे गुण पाहून माधवरावांनी बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीसांवर विश्वास ठेवला आणि नानांनी तो विश्वास सार्थ करून दाखवला. माधवरावांच्या नंतरही नाना आणि महादजी या दोन पुरुषांनी मराठी राज्याची व्यवस्था चोख ठेवलेली दिसते. नानांवर माधवरावांचा विश्वास किती होता पहा-
वास्तविक पाहता भानू-भटांचे संबंध प्रत्यक्ष आते-मामे भावंडं हे चार पिढ्यांच्या पूर्वीचे. माधवराव-नानांच्या काळात हे संबंध पेशवा-फडणवीस एवढेच उरले होते. पण तरीही घरोबा मात्र संपला नव्हता. पेशवे दफ्तराच्या ३९व्या खंडात माधवरावांच्या राज्यकारभाराविषयी काही पत्र आहेत. त्यात त्रिंबकरावमामा पेठे यांनी स्वतः नाना फडणवीसांना लिहिलेलं पत्रं आहे. ज्यात ते म्हणतात, "आपण येणार म्हणून श्रीमंतांनी मला चौकीपहाऱ्यावर नजर ठेवायला सांगितलं, तेव्हा मी म्हणालो की नानांचा बंदोबस्त उत्तम आहे, अनोळखी माणूस शहरात यायलाही घाबरतं. यावर श्रीमंत एकदम प्रसन्न होऊन म्हणाले की चांगलं आहे, असं असलं म्हणजेच बंदोबस्त उत्तम राहतो. आपल्या मेहनतीचा बंदोबस्त ऐकून श्रीमंत फार खुश होतात".
शिवाजी महाराजांच्या हेरखात्याबद्दल आपल्याला माहिती असतेच. बहिर्जीसारखे चाणाक्ष नाईक या हेरखात्यावर होते. याप्रमाणेच माधवराव पेशव्यांचं हेरखातं सुद्धा अतिशय जबरदस्त होतं. आपल्याकडे यासंबंधी कागदपत्रांमध्ये काही नोंदी सापडतात. भोरचे पंतसचिव एकदा आपल्या पत्नीसोबत गप्पा मारत बसले असता त्यांच्या पत्नीने पंतांना म्हटलं, "रमाबाईसाहेबांकडे जसा रत्नहार आहे अगदी तस्साच तसा मला हवा". यावर पंतसचिव काही म्हणाले नाहीत, पण त्यांची पत्नी मात्र रुसून बसली. जोवर सचिव "हो" म्हणत नाहीत तोवर त्या काही पंतांशी धड बोलेनात. सचिवांनाही समजेना इकडे की काय करावं. नेमकं दुसऱ्या दिवशी सकाळी माधवरावांनी इकडे रमाबाईंना म्हटलं, "पंतसचिव आणि त्यांच्या कुटुंबाला आपल्याकडे जेवायला बोलवा". रमाबाईंनी ताबडतोब आपल्या मुदपाकातल्या लोकांना तयारी करायला सांगून खासे सेवक भोरला पाठवून दिले. कदाचित त्याच रात्री अथवा दुसऱ्या दिवशी सचिव कुटुंबासह शनिवारवाड्यात भोजनासाठी आले. जेवणं झाल्यावर स्त्रिया आतल्या बाजूस गेल्या तेव्हा माधवरावांनी विडे देताना पंतसचिवांना "त्या" रत्नहाराबद्दल सहज विचारलं. पंतसचिवांना क्षणभर समजलंच नाही पेशवे कशाबद्दल बोलतायत. काही क्षण गेले तेव्हा माधवरावांनीच विषय काढला, "तोच रत्नहार जसा पेशवीणबाईंच्या गळ्यात आहे". पंत आश्चर्यचकित झाले, "श्रीमंतांना ही गोष्ट कशी समजली?" माधवराव पुढे काहीच बोलले नाहीत. त्यानंतर बाहेर पडताना सचिवपंतांना बाहेर उभा असलेला पहारेकरी ओळखीचा वाटला. जवळ जाऊन पाहतात तो हा पहारेकरी रात्री आपल्याच वाड्यात मशालजी म्हणून काम करतोय असं पंतांना जाणवलं. अर्थात, या पहारेकऱ्याकरवी माधवरावांना ही गोष्ट समजली होती हे उघड होतं.
माधवरावांच्या हेरांचा आणखी एक अधिकृत उल्लेख म्हणजे निजामाने माधवरावांच्या सुरुवातीच्या काळात पुण्यावर हल्ला केला तेव्हा माधवरावांना याची कुणकुण आधीच लागली होती. निजामाच्या महालातील एक आचारी हा माधवरावांना आतल्या बातम्या पुरवत असे. एके दिवशी कचेरीत असताना सखारामबापू हिशोब पाहत बसले होते. एका माणसाच्या समोर उगाचच रकमा खर्ची पडलेल्या त्यांना दिसल्या. सखारामबापूंनी "या माणसाला इतकं धन देण्याचं कारण काय?" असं विचारल्यावर माधवरावांनी ती गोष्ट तेव्हा उडवून लावली, पण नंतर खाजगीत सांगितली की तो आपलाच हेर आहे. अशा पद्धतीने पूर्वी जे समर्थांनी "अखंड सावधान असावे" म्हटलं होतं त्याबरहुकूम माधवरावांची एकंदरीत वागणूक असे. या हेराने निजामाच्या लोकांना जेवण वाढत वाढता साऱ्या गोष्टी ऐकून थेट हैद्राबादच्या काळे वकीलांकरवी इकडे पुण्याला तातडीचे खलिते पाठवले होते. यामुळेच माधवराव निजामाच्या बाबतीत हुशार राहिले.
रघुनाथरावांनी सुरुवातीपासूनच माधवरावांना विरोध केला. नानासाहेब गेल्यानंतर माधवरावांची पुढची सात वर्ष आपल्या चुलत्याशी भांडण्यातच गेली. इ.स. १७६८ मध्ये धोडपच्या लढाईत माधवरावांनी आपल्या काकांचा, रघुनाथरावांच्या कायमचा बंदोबस्त केला आणि त्यांना शरण यायला भाग पाडलं. या वेळेस सखारामबापूंसारख्या शहाण्यांची माधवरावांना गरज होती, पण गंगोबातात्या चंद्रचूडांसारख्या माणसाची माधवराव गय करणार नव्हते. तात्यांना पकडून आणण्यात आलं तेव्हा माधवरावांनी झालेल्या साऱ्या नुकसानीबद्दल आणि रघुनाथरावांना बदसल्ला दिल्याबद्दल पाट्यांवर तीस लाखांचा दंड लावला. तात्यांसह, त्यांचा पुत्र, मेव्हणा वगैरे अशा चार असामींना हत्तीपायी बेड्या घालून शनिवारवाड्यात आणण्यात आलं. माधवरावांनी तात्यांना प्रश्नोत्तरे केली असता तात्यांनी वयाच्या अधिकारात उणेअधिक उत्तर दिल्यावरून माधवरावांचा पारा चढला. त्यांनी आधीच तात्या आणि साऱ्यांना छाप लावायचा हुकूम दिलेला. चाप लावणं म्हणजे कानाच्या वरच्या बाजूला चिमटे लावून ते दोरीने वरच्या बाजूने खेचणं. कानासारखा नाजूक अवयव जास्त ताणला असल्यास दुखतो आणि माणूस हे सहन करू शकत नाही. तात्या तरीही बधत नाहीत म्हटल्यावर स्वतः माधवरावांनी अंगठ्याएवढा जाड वेत हाती घेऊन गंगोबातात्या चंद्रचूडांची पाठ छड्यांखाली फोडून काढली. वीस पंचवीस छड्या माधवरावांनी अशा मारल्या की तात्यांच्या पाठीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. पुढे या साऱ्यांना अहमदनगरच्या कैदेत डांबण्यात आलं. माधवरावांच्या करड्या शिस्तीचं हे उदाहरण होतं. दिनकर महादेव जोशी नावाच्या एका सावकार-सरदाराने असंच जेवताना काही चेष्टामस्करी केल्याने माधवरावांनी भर पंगतीत त्याच्या थोबाडीत मारली होती. पेशव्यांच्या या रोगाविषयी अगदी हरिपंततात्या फडक्यांसारखा कसलेला सेनापती देखील लिहितो, "श्रीमंतांच्या प्रकृतीचा मजकूर म्हटल्यास विश्वास स्पष्ट असा कोणावरही नाही, केवळ नानांवर आहे. मनातून काय आहे ते त्यांनाच माहित, एरवी मर्जी फार कठीण. जन्मापासून यांचा कारभार केला आणि एखाद दिवस हातून काही चूक झाली तर आजपर्यंत केलेलं चांगलं काम आठवणार नाहीत. असो, श्रीमंत धनी आहेत, आम्ही सगळ्यांनी मनापासून चाकरी करावी हेच आम्हाला उत्तम, बाकी पार पडणार ईश्वर समर्थ आहे. मी श्रीमंतांना फार घाबरतो, सारा दिवस यांची मर्जी सांभाळतो, याचा जी काही परिणाम होईल तो माझ्या नशिबी असेल. श्रीमंतांची चाकरी फार कठीण, एकेक दिवस शेवटास गेला म्हणजे कृतकृत्य झाल्यासारखं होतं. देवाकडे माझी एकाच प्रार्थना असते की माझी लाज राख, बाकी काही नको". असे होते माधवराव.
इ.स. १७७१ पासूनच माधवरावांची प्रकृती बिघडू लागली होती, पण आयुष्यातील एक महत्वाची मोहीम पूर्णत्वाला गेल्याचं बघण्याशिवाय त्यांचा जीव जाणार नव्हता. ही मोहीम होती पानिपतच्या प्रतिशोधाची. काकांना जेरबंद केल्यानंतर माधवरावांनी ताबडतोब आपले चार जबरदस्त सरदार- रामचंद्र गणेश कानडे, विसाजी कृष्ण बिनीवाले, महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांना इ.स.१७६९ च्या अखेरीस उत्तरेत पाठवलं. या चारही सरदारांची आपापसात वादावादी होऊ लागली हे पाहताच माधवरावांनी पुण्यात बसून महत्वाचे निर्णय घेतले, आणि कानड्यांना परत बोलावून विसाजी कृष्णांना मुखत्यारी दिली. पुढे फेब्रुवारी १७७१ मध्ये महादजी शिंद्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा जरीपटका फडकावला. एका पत्रात उल्लेख आहे की, "राजधानीवर सरकारचे झेंडे उभे केले". जी दिल्ली पानिपतनंतर मराठ्यांच्या अधिपत्याखालून निसटली होती तिथे पुन्हा मराठ्यांचं वर्चस्व झालं. बादशाह मराठ्यांचा अंकित झाला. एवढंच नव्हे, तर महादजी शिंद्यांनी पुढे गंगेच्याही पलीकडे जाऊन ज्या नजीबखानाने पानिपतचा हा प्रचंड नरसंहार घडवून आणला त्या नजीबखानाची कबर उध्वस्त केली. या साऱ्या बातम्या ऐकल्यावर माधवरावांना काय आनंद झाला सांगू. पानिपतची जखम भरली होती आता. वीरगतीला प्राप्त झालेल्या साऱ्यांचे आत्मे शांत झाले होते. विसाजी कृष्णासारख्या महापराक्रमी सेनापतीचं स्वागत पुण्यात येताना सोन्याची फुलं उधळून करावं अशी माधवरावांनी आज्ञा केली. दुर्दैवाने ही आज्ञा पूर्ण झालेली बघण्यासाठी माधवराव हयात नव्हते. ऑगस्ट १७७२ मध्ये श्रीमंत प्रकृतीच्या कारणास्तव थेऊरच्या चिंतामणीपाशी जाऊन राहिले. पण तब्येत बिघडतच चालली होती. राजयक्ष्मा (क्षय) निदान झाला होता. अखेरीस दि. १८ नोव्हेंबर १७७२ रोजी, बुधवारी माधवरावांनी चिंतामणीच्या चरणी असतानाच हे जग सोडलं. एक धाडसी, करारी, न्यायनिष्ठुर शासक आणि उत्तम सेनापती असलेला हा पेशवा केवळ सत्ताविसाव्या वर्षी हे जग सोडून गेला.
टेलर नावाचा माधवरावांचा एक समकालीन इंग्रज म्हणतो, "माधवराव जसजसा अनुभव होऊन मोठा होत गेला तसतसे निश्चय, तडफ वगैरे त्याचे गुण व्यक्त होऊन लोकांत त्याजबद्दल आदर आणि जरब वाढत गेली. त्याचा कारभार अल्पकाळ चालला तरी तेवढ्यात बाहेरचे सत्ताधीश त्याला उत्कृष्ट आदर दाखवू लागले. आणि या बाहेरच्यांचे मनोगत माधवरावांस कळून आल्यामुळे तो जास्त काळ जगता तर पेशवाईचे सामर्थ्य देशात अबाधित केले असते याबद्दल संशय वाटत नाही. परंतु दुर्दैवाने तो अल्पायुषी झाला".
- कौस्तुभ कस्तुरे
(सदर लेख प्रसाद प्रकाशनाच्या जून २०२२च्या मासिक अंकात प्रसिद्ध झाला आहे.)
.png)
