औरंगजेब


औरंगजेब महान शासक होता ही धारणा अजूनही अनेकांची आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कोणत्याही व्यक्तीची महानता ही प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मापली जाऊ शकते हे मलाही अंशतः मान्य आहे (औरंगजेब महान आहे असलं माझ्या स्वप्नातही येणार नाही, पण हे सांगितलं नाही तर ट्रोल्स उड्या मारतील म्हणून आधीच सांगावं लागतंय). औरंगजेबाला पूज्य मानणाऱ्या गटाला तो कायम पूज्य वाटणार, औरंगजेबाच्या धार्मिक आणि सामाजिक कट्टरतेला बळी पडलेल्या समाजांना तो कायम दुष्ट वाटणार हे उघड आहे. एका कार्यक्रमाची तयारी करताना माझे मित्र रोहित पवार, रश्मीने कुलकर्णी आणि मी सहज गप्पागोष्टी करत होतो..

मुद्दा हा आहे, की औरंगजेबाची एक शासक म्हणून महानता कशी ठरवायची? औरंगजेब किती धार्मिक कट्टर होता हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, पण या धार्मिक कट्टरतेपायी, त्याही पलीकडे जाऊन केवळ अहंकार आणि हट्टापायी या माणसाने आपल्याच पूर्वजांनी (भले अत्याचाराने मिळवलेलं का असेना) पण 'साम्राज्य' धुळीस मिळवलं.

काबूल-कंदहारपासून ते पूर्वेला बंगाल प्रांत (म्हणजे आत्ताचा पूर्ण पूर्वांचल, including बांग्लादेश) हे मुघल साम्राज्य ज्याच्या हातात होतं तो शासक स्वभावाने कसा होता? बाहेरून अत्यंत साधा असल्याचं ढोंग करणारा हा बादशाह अत्यंत खुनशी, आपमतलबी, धार्मिक कट्टरतेने पछाडलेला आणि बाळबोध होता. स्वतःच्या बापाला कैदेत टाकून गादी मिळवणं आणि भावांचा खून करणं हे मुघल वंशात नवीन नव्हतं. बाबर पहिलाच असल्याने, हुमायून आणीबाणीत बादशाह झाल्याने, आणि तो लवकर गेल्यानंतर बापाविरुद्ध बंड करायला बापच जागेवर नसल्याने 'महान' म्हणून गणल्या गेलेल्या अकबराच्या नशिबी ही सत्कृत्य करण्याची वेळ आली नाही. पण पुढच्या साऱ्याच साहेबजाद्यांनी तीर्थरूप कैद व्हावेत वा लवकर गचकावेत म्हणून उद्योग आरंभले. मग तो नुरुद्दीन मुहम्मद सलीम असो, शहाबुद्दीन मुहम्मद खुर्रम असो, वा मूहिउद्दीन मुहम्मद असो. नावं ओळखीची नाहीत ना? हेच ते समस्त हिंदोस्ताचे अन डाव्यांचे प्रिय - अनुक्रमे जहाँगिर, शाहजहान आणि औरंगजेब!

बरं, ही दिव्य परंपरा पुढे चालली असती तरी हा वंश मोठा झाला असता की नाही? पण नाही. मूहिउद्दीन मुहम्मदला वयाच्या चाळिसाव्या वर्षी गादी मिळाली (म्हणजे ती त्याने बळकावली). पण चाळीस ते एकोणनव्वद या प्रचंड अशा ४९ वर्षांच्या कारकिर्दीत या बादशाहाला मृत्युसमयी पंतवंडं सुद्धा होती. औरंगजेब २० फेब्रुवारी १७०७ला भिंगारला मृत्यू पावला तेव्हा त्याचा सगळ्यात मोठा नातू मुइउद्दीन मुहम्मद हा ४६ वर्षाचा होता. औरंगजेबाची कर्ती (आणि सिंहसनाचे दावेदार असलेली) दोन मुलं अनुक्रमे ६४ आणि ५४ वयाची होती. म्हणजे बघा, वयाच्या चाळिसाव्या वर्षी औरंगजेबाने बाप-भावांना मारून राज्य घेतलं, पण त्या वयाला क्रॉस करून गेलेल्या त्याच्या नातवालाही शेवटपर्यंत ही हिम्मत झाली नाही की ताटीवर आडव्या झालेल्या म्हाताऱ्याचा गळा घोटावा, आता बाप आणि काका एवीतेवी म्हातारे झालेत तर त्यांना अलगद बाजूला करून आपणच गादी घ्यावी. औरंगजेबाची ही दहशत होती. 

त्याच्या दृष्टीने ही दहशत कौतुकास्पद होती. या म्हाताऱ्या वयातही त्याला कोणी हात लावू धजावत नव्हतं, पण दुसरीकडे, या म्हाताऱ्या वयात आपल्या पोरांची आणि नातवंडांची आयुष्य खराब (!) करण्याचं, म्हणजे त्यांना आपली खून-रक्तलांच्छनाची परंपरा पुढे चालवू न देण्याचं श्रेयही त्यालाच जातं. सत्तावीस वर्ष हा बादशाह राजधानी सोडून दख्खनेत उतरला. 'आदिल' आणि 'कुत्ब' या दोघांना औरंगजेबाने चुटकीसरशी धुळीस मिळवलं. एकेक वर्षाचा अवधी केवळ, आणि दोन्ही बहमनी शाह्या खलास! पण पुढची पंचवीस वर्ष? आदिल आणि कुत्ब हे कितीही झालं तरी बहमनी सत्ताधीश होते, तीनशे वर्षे दख्खनेत राज्य करत होते. ते क्षणार्धात गेले, पण मराठे? भिंगारला अखेरचा श्वास घेईपर्यंत औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकण्याची स्वप्नपूर्ती अनुभवता आली नाही. पंचवीस वर्षे केवळ आणि केवळ अट्टाहास आणि अहंकार या पायी आधीच्या तीन पिढ्यांनी मुघल सत्तेचं जे नाव कमावलं होतं ते याने म्हातारपणात सारं गमावलं. इतकं झालं, की नंतर नंतर खुद्द शहजादा मुअज्जम आणि आझम हे देखील बापाला आणि त्याच्या हट्टाला कंटाळून मराठ्यांना सामील झाले की काय अशा शंका येऊ लागल्या होत्या. 

औरंगजेब गेला, पण त्याने मागे सोडलेली 'विरासत' मात्र ठिगळं लावूनही जोडली जाणार नव्हती. तब्बल सत्तावीस वर्षे दिल्लीत बादशाह नाही, याचा प्रचंड परिणाम उत्तरेत झाला. मराठे इतके विलक्षण होते, की "तू इकडे आलास ना, मग आम्हीच तिथे जातो" म्हणून नर्मदा ओलांडून वर जाऊन छापे मारू लागले. म्हणजे दख्खन घेण्याच्या नादात उत्तर गमवायची पाळी आली. यात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काबूल-कंदाहारची सीमा ही नावाला होती. शाह अब्बास सानी दुसरा याच्या कारकीर्दीपासूनच औरंगजेबाची अन मुघलांची लंगडतोड सुरू झाली होती. पूर्वांचलमध्ये आसामच्या भागात लच्छित बडफुकनसारख्या आसामी शिवाजी म्हणून नावाजला गेलेल्या वीराने मुघलांना त्राही त्राही करून सोडलं होतं. मराठ्यांपासून प्रेरणा घेतलेल्या छत्रसाल बुंदेल्याने मध्य प्रांत सोडवण्यासाठी कंबर कसली होती. या साऱ्यावर कहर म्हणजे मराठे शरण येत नव्हते. एक राजा नैसर्गिक मृत्यूने गेला, एकाला आपण हाल हाल करून मारलं, एक तावडीतून निसटून जिंजीला गेला आणि महाराष्ट्रात येऊन अखेरीस तोही मृत्यू पावला, तरीही मराठ्यांचा चौथा छत्रपती गादीवर आणून हे चिवट मराठे आपल्याला अजूनही फटकावत आहेत ही सल औरंगला अखेरीस प्रचंड जाणवत असणार यात वाद नाही. 

२० फेब्रुवारी १७०७, हा माणूस वयाच्या ८९व्या वर्षी गेला. हाती काय होतं? काहीच नाही. कमावण्याचा प्रश्नच नव्हता, केवळ गमावण्याची बातमी रोज कानी येत होती. पुन्हा एकदा- ४९ वर्षांच्या या कारकीर्दीनंतर दिल्लीच्या तख्तावर आलेल्या बादशहाच्या कारकिर्दी किती होत्या?

  • आझमशाह - ३ महिने
  • शाहआलम मुअज्जम उर्फ बहादुरशहा - ५ वर्ष
  • जहाँदरशाह - १ वर्ष
  • फर्रुखसीयर - ६ वर्ष
  • रफीउद्दरजत - ३ महिने
  • रफीउद्दौला - ३ महिने 
  • मुहम्मदशाह - २९ वर्ष
  • अहमदशाह - ६ वर्ष

म्हणजे औरंगजेबाच्या कारकिर्दीएवढ्या वर्षात पुढे ८ बादशाह होऊन गेले. यातले आझम आणि मुअज्जम सोडल्यास पुढचे सगळेच बाहुले. काही बाहुले तर मराठ्यांनीच बादशाह म्हणून बसवले पुढे पुढे.

औरंगजेब गेला आणि मुघल संपले. २७ वर्ष दक्षणेत काढून हाती काही न आलेल्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बरोब्बर ३० वर्षांनी, केवळ आणि केवळ आपला इगो दुखावला गेला म्हणून एक खेळ करून दाखवावा तसा मराठ्यांचा एक पराक्रमी, झंझावाती पेशवा चाळीस हजार फौज घेऊन दिल्लीत शिरला. बादशाही फौजा लढायला आल्या, पण लंगडत परत गेल्या. बादशाह मुहम्मदशाह लाल किल्ल्याचे दरवाजे लावून लपून बसला. आला तसा हा पेशव्याचा झंझावात परत फिरला आणि मग बादशाही प्यादी 'हा सैतान काय करतो' बघायला बाहेर पडली. केवळ तीस वर्षात मुघलांची झालेली ही अधोगती ही केवळ औरंगजेबाची देणगी आहे. त्याचा अहंकार, धार्मिक कट्टरता आणि बाळबोध वागणं त्याला नडलं. हे सारं औरंगजेबाची महानता नव्हे, तर दुर्बलता दर्शवतं! शिवचरित्र महत्वाचं इथे का आहे ते औरंगजेबाची ही वागणूक पाहून लक्षात येतं. राज्यसाधनेची लगबग करताना शिवप्रभूंनी पुढच्या पिढ्यांना शिकवण दिली. १६५८ ला औरंगजेब गादीवर आला तेव्हापासूनच मुघलांना उतरती कळा लागली, अन दुसरीकडे याच वेळेस दक्षिणेत एक आचारशील-विचारशील राजा आपल्या पुढच्या पिढ्यांना एक नवी दृष्टी, नवी शिकवण देत होता!! 'शिवाजी' हा तीन अक्षरी मंत्र होता, ती एक शिकवण होती.

एका अज्ञात कवीने औरंगजेबाच्या मनस्थितीचं वर्णन अत्यंत चपखलपणे केलं होतं-

सरीत्पतेचे जल मोजवेना
माध्यान्हीचा भास्कर पाहवेना
मुठीत वैश्वानर साहवेना
तैसा नृप शिवाजी जिंकवेना!
तैसा नृप शिवाजी जिंकवेना!!

- कौस्तुभ कस्तुरे