पुरंदऱ्यांचा सरकारवाडा
'तुंबाड' पुनर्प्रदर्शित झाल्यामुळे मागच्या आठवड्यापासून त्याचीच चर्चा सुरु आहे. पण थांबा, मी सिनेमाविषयी बोलणार नाहीये, तर सिनेमातल्या वाड्याविषयी बोलणार आहे..
'तुंबाड'मधला भेसूर वाडा आठवतोय ना? त्या वाड्याने कधीकाळी मराठी राज्याचा सुवर्णकाळ पाहिलेला आहे. तो काही साधासुधा वाडा नाही. साक्षात पुण्याचे पेशवे, बाळाजी विश्वनाथ, राधाबाई, लहानगे बाजीराव आणि चिमाजीअप्पा त्या वाड्यात चार-पाच वर्ष राहिले आहेत. पुढेही इतर पेशवे वर्षातून काही वेळा सासवडच्या जातील तेव्हा इथे पाहुणचार घेत असत. कोण होतं असं इतकं तालेवार, असा कोणाचा आहे हा वाडा? हा वाडा आहे सरदार पुरंदऱ्यांचा. पेशव्यांचे सातारा दरबारातले मुतालिक. याचा इतिहास असा आहे-
बाळाजी विश्वनाथ भट आपल्या तीन आतेभावांसह- भानू बंधूंसह चिपळूणमार्गे घाटावर आले तेव्हा सर्वप्रथम जाऊन उतरले ते सासवडला पुरंदऱ्यांकडे. या प्रदेशातलं हे मोठं प्रस्थ होतं. पूर्वी १६६०च्या आसपास बाळाजी विश्वनाथांचे आजोबा परशुरामपंत भट हे थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी आले, अन त्यांच्या मुलाला, म्हणजे बाळाजी विश्वनाथांच्या वडिलांना शिवरायांनी दोन हजार फौजेची सरदारी सांगितली. याच काळात सासवडच्या पुरंदऱ्यांशी भटांचा संबंध आला असावा. या वेळी पुरंदरे घराण्याचा मूळ पुरुष शिवाजी महाराजांकडे मोठ्या हुद्द्यावर काम करत होता, पन्हाळ्यासारख्या किल्ल्याचा किल्लेदार राहिला होता. या माणसाचं नाव त्र्यंबक भास्कर. त्र्यंबकपंत पुढे पुरंदर किल्ल्याची व्यवस्था पाहू लागले, तिथले गडकरी झाले. शिवशाहीर बाबासाहेबांकडून मला मिळालेली माहिती अशी: पुरंदऱ्यांचं मूळ आडनाव होतं लोकरस, नंतर झालं वाघ, अन शेवटी पुरंदरे. या त्र्यंबकपंतांना दोन पुत्र होते. एकाचं नाव तुकदेव तर दुसऱ्याचं अंबाजी. बाळाजी विश्वनाथ घाटावर आले ते थेट सासवडला अंबाजीपंतांकडे! आधीच्या ओळखीमुळे पंतांचाच भरवसा होता. पंतांच्या ओळखीमुळे बाळाजी विश्वनाथांना रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधवराव अशा खाशा व्यक्तींकडे नोकरी लागण्यासही काही अडचण आली नाही.
पुरंदरे घराण्याची महती अशी, की थोरले शाहू महाराज माळव्यातून सुटका झाल्यावर महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांना जाऊन मिळणारा महाराष्ट्रातला पहिला सरदार होता मल्हार तुकदेव पुरंदरे, म्हणजेच अंबाजीपंतांचा पुतण्या. शाहू महाराजांचं पत्रच आहे तसं की सगळ्यात आधी तुम्ही लंबकानीच्या मुक्कामी येऊन स्वामीसेवेत रुजू झालात. शाहूराजांचे पहिले पेशवे बहिरोपंत कैद झाले तेव्हा पेशवा कोणाला करावं हा प्रश्न होता, अशात परशुरामपंत प्रतिनिधी आणि अंबाजीपंतांनी पुढाकार घेऊन बाळाजी विश्वनाथांचं नाव सुचवलं. या एकप्रकारच्या मैत्री आणि उपकारामुळे बाळाजींनीही तत्क्षणी अंबाजीपंतांना सातारा दरबारातली पेशव्यांची मुतालकी देवविली.

असो, आता पुरंदऱ्यांच्या वाड्याकडे येऊ. कसबे सासवडचं कुलकर्ण्य आणि कर्यात सासवडचं देशकुलकर्ण्य पुरंदऱ्यांचं होतं पूर्वापार, पण त्यात अत्रे-पुरंदरे वाद पेटला आणि याचा निवाडा व्हायला १७३५ साल उजाडलं. यापूर्वी सासवडमध्ये पुरंदऱ्यांचा वाडा होता, पण तो आज दिसतोय तसा भव्य नव्हता. इतर सरदारांचे वाडे असतात तसा हा पुरंदऱ्यांचा वाडा आणि त्याला कोट होता. कोटाला बुरुज अर्थातच नसावेत, कारण शाहू महाराजांनी परवानगी दिली नसावी. बाळाजी सासवडला आले आणि पुरंदऱ्यांच्या कोटात घर बांधून राहू लागले. पुढे १७१८-१९च्या सुमारास बाळाजींचा सुप्याचा वाडा पूर्ण झाल्यानंतर पेशवे घराणं सुप्याला स्थायिक झालं, अन अखेरीस १७२५ मध्ये पुण्याला आलं. पुरंदऱ्यांचे आणि पेशव्यांचे हे ऋणानुबंध अखेरपर्यंत कायम टिकले. इतके, की पेशव्यांवर कर्ज आलं तरी पुरंदरे घराणं आपल्या घरातली भांडीकुंडी विकून पैसा उभा करत असे, आणि पेशव्यांनीही शेवटपर्यंत याची जाण ठेवली होती. याच ऋणाखातर, आणि आपल्या पूर्वजांना पुरंदऱ्यांनी स्वतःच्या कोटात घर बांधून राहायला दिल्याबद्दलचे उपकार स्मरणात ठेऊन पुढे नानासाहेब पेशव्यांनी शनिवारवाड्याला कोट बांधला तेव्हा स्वतःच्या मेहुण्यांनाही परवानगी दिली नव्हती, पण कोटात घर बांधून राहायची परवानगी फक्त महादोबा पुरंदऱ्यांना दिली. कऱ्हा आणि चांबळीच्या संगमावर असलेलं संगमेश्वराचं मंदिरही भव्य रूपात पुरंदऱ्यांनी बांधलं.
वर म्हटलं तसा पुरंदऱ्यांचा मूळ वाडा हा आत्ता दिसतोय त्याहून वेगळा असणार हे नक्की. मग हा वाडा केव्हा बांधला? नक्की काही सांगता येत नाही. पुरंदऱ्यांच्या उपलब्ध कागदात तरी त्याविषयी काही माहिती सापडत नाही. पण अंदाज असा आहे की हा वाडा सुद्धा १७५०-५५च्या दरम्यान उभारला गेला असावा, ज्या वेळी शनिवारवाड्याचा विस्तार झाला आणि आजचा शनिवारवाडा उभा राहिला. पूर्वी शनिवारवाडाही असाच साधा होता. १७४८ मध्ये नानासाहेब पेशवे दिल्लीला जाऊन आले, आणि तिथल्या भव्य वास्तू पाहून आपल्याकडेही असं काही असावं, मराठ्यांचं वैभव निनादावं म्हणून असेल कदाचित, त्यांनी शनिवारवाडा भव्य बांधला. सासवडच्या वाड्याचं आणि शनिवारवाड्याचं प्रवेशद्वार पहा, खूप साम्य जाणवेल. शिवाय महादोबा स्वतः इथल्याही वाड्याच्या बाबतीत देखरेख करत होतेच. पुरंदरे पेशव्यांचे केवळ मुतालिक नव्हते, तर ते पेशव्यांचे दिवाणही होते. मुतालिक म्हणजे सातारा दरबारात पेशव्यांतर्फे कामकाज पाहणं. दिवाण म्हणजे पेशव्यांसोबत राहून त्यांचा कारभार पाहणं.
मल्हार तुकदेवांची शाखा, म्हणजे धोंडोमल्हार उर्फ धोंडोबाअप्पा आणि त्यांचा वंश पुढे मोढव्याला जाऊन स्थायिक झाला. अंबाजीपंतांची शाखा सासवडातच राहिली. अंबाजी त्रिंबक उर्फ तात्या, त्र्यंबक सदाशिव उर्फ नाना, महादोबा उर्फ बाबा, नीलकंठ महादेव उर्फ आबा, महीपत त्र्यंबक उर्फ बजाबा, महादजी नीलकंठ, निळकंठराव महादेव दुसरे उर्फ आबा अशा वंशावळीने कायम पेशव्यांची साथ दिली. दुसरे आबासाहेब पुरंदरे हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांसोबत धावणीवर असताना इकडे इंग्रजांनी सासवडच्या वाड्याला वेढा घालून तोफांचा भडीमार केला. त्या तोफगोळ्यांचा खुणा सासवडच्या वाड्याच्या तटावर आजही दिसतात.
एकेकाळी या वाड्याने काय वैभव अनुभवलं आहे हे मला दिसू शकतं. जणू काही पेशव्यांची सावली असलेले सरदार म्हणजे तिथले जणू काही सरकार होते. त्यांचा तो आब, वाड्याने पाहिलेलं वैभव, झडणाऱ्या नौबती, मान वर करून शत्रूला धडकी भरवणाऱ्या तटावरच्या तोफा, आणि शनिवारवाड्याच्या दिल्लीदरवाजाची आठवण करून देणाऱ्या त्या प्रचंड महाद्वारावरचा डौलाने फडकणारा भगवा!
सिनेमा बघताना या गोष्टी बहुतांशी कोणालाच माहीत नसतील असं गृहीत धरूनच हा लेख लिहिला आहे. पुढच्या वेळेस सिनेमा पहाल तेव्हा हे लक्षात ठेवा.
© कौस्तुभ कस्तुरे