शिवराय आणि स्त्रीदाक्षिण्य
'शि वा जी' ही तीन अक्षरं आम्ही फार स्वस्त करून ठेवली आहेत. इतकं, की या शब्दामध्ये जो मंत्र आहे त्याची किंमत आम्हाला न कळता त्याच्या बाह्यरुपावर आम्ही इतर साऱ्या गोष्टी करू पाहतो. ही पोस्ट कोणाला दूषणं देण्यास्तही नसल्याने मुद्द्यावर येतो. गेली कैक वर्ष राज्यात स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आहे. मी देशाबद्दल मुद्दाम काही म्हणत नाहीये, कारण आधी आपलं घर, मग बाहेरचं बघू. राजकारणी नवीन योजना जाहीर करतात, पुतळे बांधतात आणि पुढच्या निवडणुकीसाठी पाया भक्कम करतात. सामान्य माणूस 'आपल्या घरी जोवर होत नाही तोवर काय उगाच लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?' म्हणून आपापल्या उद्योगात रमतो. अशाच शिवजयंती किंवा जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजी महाराजांच्या आठवणीत "अशीच आमुची आई असती(?) वगैरे म्हणत महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने सोडलं, किंवा रांझ्याच्या पाटलाचा चौरंग कसा केला" वगैरे सांगून सगळे पांढरेशुभ्र बगळे इतिहासाचा सूर आळवतात. टीव्हीवर, रस्त्याने जाता-येता कानावर पडणाऱ्या या राजकीय भाषणांतून 'यातल्या एकाला तरी महाराज कळले का?' हा प्रश्न रोज आघात करतो. दोनच उदाहरणं देतो. तुमचं तुम्ही ठरवा महाराज कोणासोबत कसे वागायचे ते. हे दोन उदाहरणं वर दिलेल्या, भाषणांत येणाऱ्या दोन उदाहरणांना काउंटर करणारी वा पूरक आहेत.
पहिलं उदाहरण म्हणजे महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवलं वगैरे. यावरून महाराज शत्रूच्या स्त्रियांना कधीही कैद करत नसत वगैरे थाप बिनधास्त ठोकली जाते. महाराजांनी शत्रूच्या स्त्रियांच्या चारित्र्यावर कधीही घाला घातला नाही इतका नीतीवंत राजा होता हा हे उघड आहे. पण कैदही केलं नाही वगैरे अज्ञान आहे. आग्र्याहून सुटून आल्यावर महाराजांचं लक्ष गोव्याकडे गेलं. इथे पोर्तुगीज स्थानिक हिंदू प्रजेवर भयंकर अत्याचार करत आणि धर्मांतराची सक्ती करत. दि. १९ नोव्हेम्बर १६६७ रोजी महाराजांच्या आदेशावरून मराठ्यांनी एकदम बारदेशवर चढाई करत तिथल्या पुरुषांना, आणि त्यासोबतच स्त्रिया आणि लहान मुलांना देखील कैद करून पकडून आणलं. होय, ही गोष्ट खरी आहे. दि. ६ डिसेंबर १६६७ (ग्रेगोरियन) रोजीचा महाराज आणि विजरे यांच्यातला तहनामा प्रसिद्ध आहे, ज्यात स्पष्टपणे उल्लेख केला आह की या तहनाम्यानुसार महाराजांनी ही माणसं सोडून दिली. याबद्दल विजरेने महाराजांना विनंती केली तो मूळ उल्लेख असा- "हाली राजे अजम सीवाजीराजे याही दोस्तीचे रवेशीने त्वरेने आमच्या पादशाही मुलुकांतील बारदेशीचे रयत ळोक खेलखाना मर्द व अवरता व कचेबचे तेरिख १९ माहे नौवेंब्रु सक १६६७ ते रोजी आ राजे अजमाच्या ळोकी जे बंद धरोन नेली आहेत.." म्हणजे जशास तसं उत्तर द्यायचं तर समोर शत्रूची स्त्री, मुलं वगैरे आहेत याचा महाराजांनी विचार केला नाही. नाक दाबलं तर तोंड उघडतं ही साधी नीती महाराजांनी वापरलेली दिसते. हे सारे किमान दोन आठवडे महाराजांच्या कैदेत खितपत पडलेले. हा संपूर्ण तहनामा शिवकालीन पत्रसरसंग्रह खंड १, लेखांक ११८४ म्हणून प्रसिद्ध झाला आहे.
दुसरं उदाहरण म्हणजे, स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी. महाराजांची शिक्षा एवढी जबर आहे की पुढच्या वेळी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू धजावणार नाही. आणि हे झालं आहे. रांझ्याचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याचं उदाहरण सगळ्यांनाच माहित आहे. पण असंच एक उदाहरण पुढच्या पाचेक वर्षात पुन्हा घडलं. मोसेखोऱ्यातला सात गावचा कुलकर्णी रंगो वाकडे हा आपलं वतन खाऊन असता त्या प्रांतातल्याच 'हंसाइ' नावाच्या एका ब्राह्मण विधवा स्त्रीवर त्याने 'शिंदळकीचा अंमल' केला. शिंदळ म्हणजे वैधव्य आलेलं असणं किंवा पोरकं होणं. दुसरं म्हणजे, शिंद म्हणजे वेश्या असावी एक अर्थ होतो. आता या रंगो वाकड्याने नेमकं काय केलं, ते सहसंमतीने होतं का बळजबरी केली ते समजत नाही. पण ही गोष्ट बाहेर फुटली, आणि महाराजांच्या सदरेवर जाहीर झाली. महाराजांनी तत्क्षणी या रंगो वाकड्याला पकडून आणायला हुकूम जारी केला. हे ऐकून, आधीच त्या बाबाजी गुजर पाटलाचं महाराजांनी काय केलं हे उदाहरण डोळ्यासमोर असताना हा रंगो वाकडा आपल्या घरातून पळाला तो थेट पश्चिमेला जाऊन, घाट उतरून जावळीत मोऱ्यांच्या आश्रयाला गेला. तो तिथेच मृत्यू पावला. आता आपल्याकडे एका पत्रात ही हकीकत आली आहे ती गावच्या कुलकर्ण्यासंबंधी, जे वतन पुढे शामराजपंत रांझेकरांनी विकत घेतलं. पण या पत्रात या रंगो वाकड्याबद्दल एकच वाक्य मोठं अर्थपूर्ण आहे- "रंगोवा मजकूर आगोधरच पलाला तो जाऊन चंदररायाच्या आश्रियाने तेथे राहिला. यावर तो तेथेच देवकरणीने मयेत जाला." याबद्दल मी हे पुढे लिहितोय याला लिखित पुरावा काही नाही हे मला ठाऊक आहे. पण काही गोष्टी between the lines वाचाव्या लागतात. हे उल्लेख केलेलं पत्र ११ डिसेंबर १६५२ सालचं आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यात गुन्हेगार असलेल्याला चंद्ररावाने आश्रय का दिला? तर याच सुमारास, काही महिने आधी बिरवाडीच्या प्रकरणात महाराज आणि चंद्रराव वितुष्ट आलं होतं. बिरवाडी तप्यातील काही गावांचं पाटीलकीचं वतन हे बाजी आणि मालोजी पाटील यांचं असताना चंद्ररावाने तिथे घुसखोरी करून यांचा हक्क डावलला. हे दोघे पाटील महाराजांकडे आले, आणि त्यांनी फिर्याद दाखल केली तेव्हा महाराजांनी लक्ष घालून यांची पाटीलकी पुन्हा देवविली. याचा राग चंद्ररावाच्या मनात होताच. आधीच चंद्ररावाला महाराजांनी मदत करून गादीवर बसवलं, त्यात त्याने स्वतःहून कुरापती काढल्या. महाराजांचं लक्ष या वेळेपासूनच आता जावळीवर खिळलं होतं. ही एकेक उदाहरणं अशी घडत होती. अशात हा रंगो वाकडा चंद्ररावाच्या आश्रयाला जातो काय आणि लगेच 'देवकरणीने मयेत' काय होतो. सारंच रोमांचक आहे. काय घडलं असेल याचा तर्कच करू शकतो, मी वेगळं सांगायची गरज नाही. कदाचित महाराजांनीच मोजकी माणसं गुपचूप घुसवून रंगो वाकड्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिली असेल. हे संपूर्ण पत्र राजवाडे खंड १५, लेखांक २७० म्हणून प्रसिद्ध झालं आहे.
पण ही दोन उदाहरणं. एक बाबाजी गुजर आणि दुसरा रंगो वाकडा. यानंतर स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी कोणतीही तक्रार सध्या उपलब्ध असलेल्या एकाही विश्वसनीय कागदांत आढळत नाही. आता मुख्य मुद्द्याकडे येतो. आम्हाला, म्हणजे राजकारण्यांपासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांनाच, 'शि वा जी' या तीन अक्षरांमागचा अर्थ खरंच समजला-उमजला आहे? राजकारणी सोडून देऊ, किमान आपण तरी विचार करू..
- कौस्तुभ कस्तुरे