समर्थ रामदासस्वामी आणि गणेशोत्सव



समर्थ रामदासस्वामी हे व्यक्तिमत्व कायमच गैरसमजाच्या विळख्यात अडकलेलं आहे असं मला कायम वाटत आलं आहे. मराठेशाही, किंबहुना, अगदी स्पष्ट सांगायचं तर शिवछत्रपतींची आणि त्यानंतरच्या एखाद-दोन पिढ्या गेल्या, आणि समर्थांची ओळख महाराष्ट्रात पुन्हा बदलत गेली. त्यांचा तो जहालपणा, राष्ट्रभक्ती आणि एकंदरच लोकांना असलेली शिकवण ना नंतरच्या राज्यकर्त्यांना उमगली, ना रयतेला. रामदासस्वामी हे केवळ एक अध्यात्मिक संत म्हणू पुढच्या काळात नावाजले गेले हा समर्थ-चरित्राचा अभ्यासक म्हणून माझ्या मनातला विषाद आहे. कारण, समर्थांना नगण्य लेखणारे त्यांच्यावर शिव्यांचा भडीमार करतात, अन् समर्थांची भक्ती करणारे त्यांना देव्हाऱ्यात ठेऊन भक्तिभावाने पुजताना त्यांच्याबद्दल भलत्याच गोष्टी प्रसृत करतात. अर्थात या गोष्टी अनेक आहेत, आणि यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते. आज मात्र यातल्याच एका गोष्टीची, म्हणजे 'समर्थ आणि गणेशोत्सव' या विषयाची सत्यासत्यता पडताळण्यासाठी हा विस्तृत लेख लिहिला आहे.

समर्थांनी महाराष्ट्रातला पहिला गणेशोत्सव साजरा केला, सात कड्व्यांचि आरती रचली, महाराजांनी त्यांना १२१ खंडी धान्य दिलं वगैरे अनेक गोष्टी सांगणारा एक, किंवा एकसारखेच तीन-चार निरनिराळे लेख मागच्या वर्षांपासून सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत. हे लेख लिहिणाऱ्यांच्या उद्देश्यावर मला शंका घ्यायचं कारण नाही. त्यांनी कुठेही समर्थ, शिवराय व कोण्याही महापुरुषांची निंदा-नालस्ती केलेली नाही, कोणाचाही अपमान केलेला नाही. पण ही माहिती चुकीची आहे, आणि जाणते-अजाणतेपणी लिहिलेली ही माहिती अशीच पसरत जाऊन पुढे हाच 'इतिहास' म्हणून पुस्तकात वाचायला मिळू शकतो अशी मला भीती आहे. या गोष्टी आणि त्यांची ऐतिहासिक सत्यता पुढीलप्रमाणे आहे:

१) समर्थ रामदासस्वामींनी रचलेली गणपतीची आरती एकूण ७ कडव्यांची/चरणांची आहे, आपण त्यातली दोनच कडवी म्हणतो. 

वस्तुस्थिती: समर्थांनी ७ कडव्यांची आरती लिहिली अशी नोंदही कुठे नाही अथवा अशा आरतीचं एकही जुनं हस्तलिखित सापडलेलं माझ्या माहितीत नाही. किंबहुना, सद्यस्थितीला आणि पूर्वीपासून संप्रदायात ध्रुपदानंतर केवळ 'लंबोदर पितांबर' हे एकच कडवं घेतलं जातं, आपण म्हणतो त्यातलं पहिलं कडवंही समर्थांचं नसावं असा अंदाज आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केल्यास कोणत्याही देवतेची आरती ही केवळ एका कडव्याची असणं शक्य वाटत नाही, तेवढ्यात देवतेचं वर्णनही होत नाही. शिवाय, अठराव्या शतकातल्या आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या अनेक पोथ्यांची बाडं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ठळक उदाहरण सांगायचं तर पुण्यातल्या आनंदाश्रम संस्थेत अशी अनेक बाडं आहेत. यातील रा. चिं. ढेरे यांच्या संग्रहातील एका बाडात (mmc/८१०, बाड क्र २८) असलेल्या समर्थ रचित गणपतीच्या आरतीचं छायाचित्र पुढे जोडलं आहे. यात आपण म्हणतो तीच दोन कडवी पाहायला मिळतात. अशी अनेक बाडं आहेत ज्यात या दोन किंवा क्वचित काही बाडांत एकच कडवं पाहायला मिळतं. पण यात नव्याने उदयास आलेली सात कडवी कुठेही पाहायला मिळत नाहीत. मग ही सात कडवी आली कुठून? तर संप्रदायातीलच कोणीतरी नंतरच्या काळात केलेली ही रचना असावी, अथवा कोण्या कवीने ही कडवी रचून पुढे ती मूळ आरतीत समाविष्ट केली गेली असावीत आणि समर्थांच्या नावावर झाली असावीत. उदाहरणादाखल सांगायचं तर 'मराठा तितुका मेळवावा' या सिनेमातील 'मराठी पाऊल पडते पुढे' या गाण्यातील 'खरा स्वधर्म उभा आपुला' असो वा 'स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे' हे दोन्हीही चरण समर्थ रामदासस्वामींचे नाहीत. ते चरणही कवयित्री शांताबाई शेळके यांचे आहेत, पण ते इतके चपखल बसले की आजही अनेकांना ते समर्थांचे वाटतात. हेही तद्वतच, सात कड्व्यांचि आरती समर्थांनी रचली आहे याला कसलाही पुरावा नाही.  

२) एका लेखात 'प्रचलित गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदासस्वामींनी हा उत्सव सुरु केल्याची नोंद इतिहासात आहे' असं लिहिलेलं आढळलं. 

वस्तुस्थिती: वरील ओळीतील काही अंश सत्य आहे तर काही असत्य. सत्य असं की समर्थांनी गणेशोत्सव केला, पण तोच पहिला होता का, अथवा गणेशोत्सव त्यांनी सुरु केला का? तर नाही, असं वाटत नाही. या पलीकडे जाऊन जो चरण दिला जातो त्याची पार्श्वभूमीही चुकीची दिली गेली आहे. सदर लेखातला हा चरण म्हणजे:

समर्थे सुंदरमठी गणपती केला । दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला । सकळ प्रांतासि मोहोछाव दाविला । भाद्रपदमाघ पर्यंत ।। 

सर्वप्रथम मी हे नमूद करू इच्छितो की हा चरण खरा आहे, आणि समर्थांची जी अत्यंत विश्वसनीय चरित्र आज उपलब्ध आहेत, त्यातल्या गिरिधरस्वामीकृत 'समर्थप्रतापा'त हा चरण आहे (समर्थप्रताप, समास ८वा, चरण २रा). पहिल्यांदा या चरणाची आणि त्याबद्दल लेखात आलेल्या गोष्टींची मीमांसा करू. इथे कुठेही समर्थांनी प्रथम गणेशोत्सव केला असं दिलं नाहीये. इथे कोणालाही असा बचाव करता येईल की त्या वेळी हे सगळ्यांना माहित असल्याने गिरिधरस्वामींना वेगळं नमूद करण्याची गरज भासली नसावी. पण असंही म्हणता येत नाही. 

चिंचवडकर देव हे गाणपत्य होते. मोरेश्वर गोसावी हा यांचा मूळ पुरुष, आणि मोरया गोसावींच्या नंतर पुढच्या पुढ्यांनाही 'मोरेश्वर' ही उपाधी लावल्याचं आपल्याला दिसून येतं. याबद्दल आपल्याकडे उपलब्ध असलेली पत्रे ही राजाराम महाराजांच्या काळातील असली तरीही या घराण्यातील गणपती पूजा आणि उत्सव पूर्वीपासून असल्याचं दिसतं. दि. ५ मार्च १६९२ रोजीच्या एका पत्रात "श्री नारायण गोसावी देव वास्तव्य चिंचवड हे बहुत थोर साधू, मंगलमूर्तीचे वरदायेक, अनुष्टाननिरत सत्पुरुष, योगेश्वर, बहुत प्रसिद्ध' असा उल्लेख आला आहे. (श्री मोरया गोसावी यांची पत्रे, पत्रांक ७०). असंच दि. ३१ ऑक्टोबर १६९३च्या राजारामछत्रपतींच्या पत्रात "मौजे मोरगाव हे देवस्थान बहू जागृत स्थळ आहे तरी श्रीसी मौजे मोरगाव इनाम देविलीयाने देवाची पूजा, नैवेद्य उछाव भाद्रपद शुद्ध प्रतिपदारभ्य पंचमीपर्यंत आहे तो यैसे यथासांग चालेल" असं म्हटलं आहे. यात पुढे स्वतः राजाराम महाराज म्हणतात की, "श्री (मोरेश्वर) अष्टविनायकांमध्ये आध्यस्थळ, थोर सिध्दिस्छाने", अर्थात अष्टविनायकातला सगळ्यात जुना गणपती म्हणजे मोरेश्वरगाव अथवा मोरगावचा. मोरेश्वर हे गावाचं आणि व्यक्तीचंही नाव आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील नारायण गोसावींचे वडील म्हणजेच मोरेश्वर अथवा मोरया गोसावी. (श्री मोरया गोसावी यांची पत्रे, पत्रांक ७१). दि. ३० ऑगस्ट १७०९ रोजीचं थोरल्या शाहू महाराजांचं एक पत्रं आहे ज्यात राजाराम महाराजांच्या सनदेचा उल्लेख करून थेऊरच्या चिंतामणीचा "पूजा नैवेद्य उत्सव सांग चाले असे करून" असा उल्लेख केला आहे. (श्री मोरया गोसावी यांची पत्रे, पत्रांक ८४). शाहू महाराजांची अशी पुढच्या काळातली पत्रही मिळतात. सांगायचा मुद्दा हा, की मोरया गोसावींनी मोरगावच्या गणपतीचा उत्सव सुरु केला होता, जो भाद्रपदाच्या प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत चाले. हे मोरया गोसावी समर्थांच्या एक पिढी आधीचे असल्याने अर्थातच समर्थांनी सुरु केलेला उत्सव हा पहिला गणेशोत्सव म्हणता येत नाही.

समर्थांनी गणेशोत्सव केव्हा सुरु केला? हा वरच्या मूळ प्रश्नासंबंधाने येणारा उपप्रश्न. याचा कालनिर्णय करणं अवघड असलं तरी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तो काही अंशी तरी करता येतो. गिरीधरस्वामींनी ओवीतच समर्थे सुंदरमठी गणपती केला असं दिलं आहे. सुंदरमठ म्हणजे शिवथरच्या पर्वतराजीत असलेली एक घळ. (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक २६) शिवथरची ही घळ रायगडच्या आग्नेयेला असलेल्या वरंध घाटाच्या रांगेत कुठेतरी आहे. मी कुठेतरी अशाकरिता म्हणतो आहे, की सध्या असलेली शिवथरघळ ही मूळ शिवथरघळ असेल असं मला व्यक्तिशः वाटत नाही. थोर समर्थभक्त शंकरराव देवांनी ही घळ शोधून काढली असं म्हटलं जातं, पण या घळीचा विस्तार पाहता गिरिधरस्वामी म्हणतात तशी 'दोन पुरुष उंचीची' म्हणजे सुमारे दहा फूट उंचीची गणपतीची मूर्ती स्थापन करण्याइतकी जागा सध्याच्या शिवथरच्या घळीत नाही. शिवाय, स्वतः देवांच्या लेखनातूनही हेच प्रतीत होतं. देवांनी शिवथरची घळ ही हेळवाकच्या घळीसारखीच आहे, तितकीच लांब-रुंद आणि उंच असं म्हटलं आहे. थोडक्यात, हेळवाकची घाल केवळ पाच हात अथवा एक पुरुष उंच असल्याने शिवथरचीही तेवढीच असल्याचं देवांनी दिलं आहे. (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे, प्रस्तावना, पृष्ठ ४ आणि १८) ही उंची देखील मूळ घळीची. मातीचा थर साचून ही उंची आणखीनच कमी झाली. तेव्हा ही मूळ घळ दुसरी कुठली असावी का याचं उत्तर मिळण्यासाठी तिचं स्थलवर्णन करणारे अजून कागद सापडणं गरजेचं आहे. पण समर्थांनी शिवथरच्या घळीत गणेशोत्सव सुरु केला हे मात्र खरं. तो केव्हा? हा मूळ प्रश्न. 
  • समर्थ इ.स. १६७६ पर्यंत शिवथरच्या घळीत होते असं दिसतं, कारण दि. ८ ऑगस्ट १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी सज्जनगड आणि महिपतगडच्या किल्लेदारांना जी पत्रं पाठवली आहेत त्यात समर्थ “शिवथरी” राहतात असं म्हटलं आहे (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १५ आणि १६). 
  • शिवाजी महाराज साताऱ्याला आजारी पडले होते तेव्हा समर्थ शिवथरच्या घळीत होते असं स्पष्ट होतं, कारण कल्याण गोसाव्यांनी त्यांच्या एका पत्रात तसं स्पष्ट म्हटलं आहे (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक ५०). नोव्हेंबर १६७५ मध्ये सातारा काबीज झाल्यानंतर महाराज साताऱ्यावर गेले होते आणि तेथेच ते आजारी पडले (१६७५ ची अखेर अथवा १६७६ चा जानेवारी महिना). यावेळी समर्थ सुंदरमठी होते. 
  • याच्या थोडंसं आधीच, सप्टेंबर १६७५ मध्ये शिवाजी महाराजांनी शिवथर प्रांतात ‘रामनगर’ नावाची पेठ वसवण्याकरता अंमलदारांना पत्रं पाठवली होती. (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३). 
  • दि. ३१ मार्च १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी चाफळची पहिली (जुनी सनद, जी पुढे समर्थांनी नाकारली) सनद लिहून दिली होती त्यात महाराज म्हणतात, “आपण श्री सिवतरी असता त्यांचे भेटीस गेलो होतो” (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १७). म्हणजे ३१ मार्च १६७६ च्या आधीही समर्थ शिवथरच्या घळीत मुक्कामाला होते. 
  • महाराज दक्षिण दिग्विजयाला जात असताना बिरवाडीला मुक्काम पडला असतानाही समर्थ शिवथरच्या घळीत होते (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक २६). 
समर्थांनी पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना भेटीदरम्यान जे काही सांगितलं त्यात समर्थ म्हणतात, “नळ संवत्सरी सिवतरी (शिवाजी महाराजांनी) १८ शस्त्रे समर्पिली” (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक ४३). हा नळ संवत्सर दि. ५ मार्च १६७६ (गुढीपाडवा) ते दि. २३ मार्च १६७७ एवढा होता. या दरम्यान समर्थ शिवथरघळीत होते.
या सगळ्यावरून एक गोष्ट नक्की होते ती म्हणजे समर्थांचा मुक्काम १६७५ ते १६७७ च्या दरम्यान शिवथरघळीत होता. समर्थांनी याच काळात केव्हातरी शिवथरच्या घळीत, म्हणजे सुंदरमठी गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि गणेशोत्सव सुरु केला. यापूर्वी समर्थांचा मुक्काम शिवथरच्या घळीत होता का? नाही सांगता येत. पण १६७४ च्या आसपास, अन शिवथरला जाण्यापूर्वी आनंद संवत्सरात समर्थांचा मुक्काम हेळवाकच्या घळीत होता. (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक ५२). तेव्हा, सध्या उपलब्ध पुराव्यांवरून समर्थांनी गणेशोत्सव हा या दोन वर्षातच सुरु केला असण्याची शक्यता जास्त आहे. 

३) गणपतीच्या आरतीत 'वार्ता विघ्नाची नुरवी, प्रेम पूर्वी, कृपा जयाची' तसंच 'संकटी पावावे' वगैरे वाक्यांची पार्श्वभूमी आणि इतिहास कथन करताना उपरोक्त लेखात अफजलखान वधाची पार्श्वभूमी देण्यात आली असून ही आरती इ.स. १६५८ मध्ये रचली असं दिलं आहे.

वस्तुस्थिती: इ.स. १६५८ मध्ये शिवरायांचा आणि समर्थांचा संबंध आला नव्हता, तो १६७२च्या सुमारास, किमान १६६६ नंतर कधीतरी आला हे मी अन्यत्र सिद्ध केलं आहे. तरीही, एका मुख्य पत्राचा संदर्भ द्यायचा तर भाट्येकृत सज्जनगडमध्ये भास्कर गोसाव्यांचं दिवाकर गोसाव्यांना दिलेलं दि. १३ फेब्रुवारी १६५८चं पत्रं आहे ज्यात भास्कर गोसावी शिवाजी महाराजांनी आपल्याला समर्थांबद्दलची माहिती कशी विचारली वगैरे कथन करतात. चाफळच्या मूर्तीची स्थापना नेमकी कधीची आहे याबद्दल ठोस पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. बखरींचं मत मानलं तर इ.स. १६४९ हे साल येतं. पण यावेळेस चाफळ स्वराज्यातही नसल्याने स्थापनेवेळी शिवराय तिथे असणं शक्य नाही. बखरकारांनी आणि उत्तरकालीन चरित्रकारांनी, अगदी हनुमानस्वामींनीही चाफळच्या मूळ मूर्तीची स्थापना आणि मंदिराचा जीर्णोद्धार या दोन्हीत गल्लत केल्याने, आणि चाफळच्या नव्या, इ.स. १६७८च्या सनदेचा अर्थ नीट न लावल्याने साऱ्यांनीच १६७८ची पुनर्स्थापनेची घटना मूळ मंदिराच्या निर्माणाची घटना मानून गल्लत केली आहे. कशी? त्याविषयी माझ्या आगामी पुस्तकात मी सविस्तर चर्चा करत आहेच. विस्तारभयास्तव इथे मुख्य विषय १६५८साली शिवराय आणि समर्थांच्या संबंधाचा असल्याने तेवढीच माहिती देणं योग्य आहे. यामुळेच, समर्थांच्या नावावर खपवलेलं "विजापूरचा सरदार निघाला आहे" हे काव्यही समर्थांचं नाही हे सांगणं भाग आहे. समर्थ बाराव्या वर्षी जांबेच्या बाहेर पडले, पुढची बारा वर्ष म्हणजे १६२०-१६३२ त्यांनी नासिक-पंचवटीच्या परिसरात वास्तव्य केलं. यापुढची बारा वर्ष म्हणजे १६३२-१६४४ त्यांनी भारतभ्रमण केलं. थोडक्यात जहाँगीरची उत्तर कारकीर्द आणि शहाजहाँची मुख्य कारकीर्दभर समर्थ आसपास काय सुरु आहे हे पाहत होते. या दोन्हीही मोंगल बादशहाची क्रूरता, गोरगरीब रयतेची छळवणूक, मंदिरांचा विध्वंस आणि लुटालूट, धार्मिक अत्याचार आदी गोष्टी समर्थांना सरळ सरळ दिसत होत्या. यामुळेच आरतीतही "हा रामदास तुझी वाट पाहतो आहे, तू येऊन दर्शन दे, कोणत्याही विघ्नाची वार्ता आता येऊ देऊ नको, कायम तुझी प्रेमळ दृष्टी असू दे, कृपा असू दे" इतकं साधं मागणं आहे समर्थांचं. असंच, त्यासाठी या वाक्यांचा अफजलखानाच्या वधाशी संबंध जोडण्याचा काहीएक पुरावा नाही. गिरिधरस्वामी "समर्थे अकारनामक यवनासी मारविले" म्हणतात ते रूपक आहे इतकंच.

या वरच्या मुद्द्यासोबत मूळ लेखात समर्थ इ.स. १६५८ मध्ये शिवथरघळीबाहेर पडले त्या वेळी आनंद संवत्सर सुरु होता असं म्हटलं आहे. ही माहितीही पूर्णतः चुकीची आहे. इ.स. १६५८ मध्ये आनंद संवत्सर नव्हताच. या वर्षी, म्हणजे दि. २३ मार्च १६५८ पर्यंत हेमलंबी संवत्सर असून २४ मार्च १६५८, गुढीपाडव्याला विलंबीनाम संवत्सर लागलं. (खरे जंत्री) आनंद संवत्सर गुढीपाडवा, दि. २८ मार्च  १६७४ला सुरु झाला. यापूर्वी आनंद संवत्सर शेवटचा आलेला तो ६० वर्षांपूर्वी म्हणजे १६१४ साली. त्यामुळे मूळ लेखात त्या संवत्सरात समर्थ शिवथरच्या घळीत होते हेही चुकीचं आहे आणि संवत्सराचं नावही चुकीचं आहे.

४) इ.स. १६७५ मध्ये समर्थांनी गणेशोत्सव सुरु केला आणि महाराजांनी त्यानंतर लगेच या उत्सवासाठी समर्थांना १२१ खंडी धान्याची देणगी दिली असं मूळ लेखात म्हटलं आहे.

वस्तुस्थिती: शिवाजी महाराजांनी समर्थांना आणि पर्यायी संप्रदायाला करून दिलेली १२१ खंडी धान्याची सनद ही चाफळच्या रघुनाथाच्या देवालयाची, आणि चैत्रातल्या उत्सवासाठी आहे. त्या सनदेचा आणि गणेशोत्सवाचा काही संबंध नाही. (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १४ आणि चाफळची दुसरी मुख्य सनद). दत्ताजीपंत मंत्र्यांनी दिवाकर गोसावींना लिहिलेल्या पत्रातही चाफळच्या उत्सवासंबंधी १२१ खंडी धान्याचा स्पष्ट उल्लेख आहे. (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक २६). लेखकाचा हा घोळ बहुदा गिरिधरस्वामींच्या समर्थाप्रतापवरून झाला आहे. कारण, वर नमूद केलेल्या सुंदरमठीच्या गणपतीसंबंधीच्या चरणाच्या नंतर लगेच गिरिधरस्वामींनी तिसरा चरण देताना, "(शिवरायांनी) अकरा अकरी खंड्या कोठी पाठविली । हनुमानस्वामी मुष्टी लक्षूनिया ।।" असं म्हटलं आहे. हा चरण आधीच्या चरणाला लागून आला असल्याने हा घोळ होणं स्वाभाविक आहे. पण ही १२१ खंडी धान्याची सनद आणि गणेशोत्सव एकाच वर्षातील असल्याने गिरिधरस्वामींनी हे लागोपाठ दिलं आहे एवढंच. या चरित्रात कालदोष नसले तरी घटनांची अदलाबदल, काळरेषा हलली असल्याने हे चरित्र वाचताना असे घोळ होण्याचा संभव आहे. थोडक्यात, १२१ खंडी धान्य आणि गणेशोत्सवाचा संबंध नाही. याला जोडूनच, समर्थांच्या गणेशोत्सवाला महाराज गेले 'असतील' नक्की असं मलाही वाटतं, कारण या वेळेपर्यंत शिव-समर्थ संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे झाले होते, आणि महाराजांनी शिंगणवाडीला अनुग्रह घेऊन तीन वर्ष उलटूनही गेली होती, पण तरीही, या घटनेचा लिखित पुरावा आजपर्यंत एकही उपलब्ध झाला नसल्याने महाराज तिथेच होते असं ठामपणे म्हणता येऊ शकत नाही. 

वरच्या या मुख्य लेखासोबतच एक लहानशी गोष्ट थोडी विस्तारून सांगावी वाटते ती म्हणजे, गिरिधरस्वामींच्या लिखाणात "भाद्रपदमाघ पर्यंत" असं आलं आहे. म्हणजे भाद्रपदाच्या शुद्ध चतुर्थीला असणाऱ्या गणेशोत्सवापासून ते माघाच्या शुद्ध पंचमीपर्यंत अर्थ सर्वसाधारणपणे निघतो. यातूनच वरील लेखातही, आणि इतरत्र काही समर्थभक्तही हा पूर्ण कालावधी गणेशोत्सव चालला असं म्हणतात. सारासारविचार केल्यास ही गोष्ट अशी नसावी असं वाटतं. सण अथवा एखाद्या देवतेचे उत्सव हे आपल्याकडे इतके दीर्घ काळ केले जात नाहीत. इतका दीर्घ काळ, पाच महिने जर तो होत असेल तर तो उत्सव कसा होईल? फार तर फार पंधरवडा, महिनाभर ठीक आहे. तद्वतच, गिरिधरस्वामींच्या मूळ श्लोकात "भाद्रपदमाघ पर्यंत" ऐवजी "भाद्रपदमास पर्यंत" असं असावं, ही लेखनिकाची अथवा नकलकाराची चूक असावी. समर्थप्रतापच्या शंकरराव देवांना दोन पोथ्या मिळाल्या, आणि त्यांनी अनेक ठिकाणी पाठभेद नमूद केले आहेत. इथे त्यांनी पाठभेद दिला नसल्याने दोन्ही प्रतींत "माघ" असणार हे उघड आहे. पण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ते "माघ" नसून "मास" असावं, आणि एका नकलकारने केलेली चूक अर्थात पुढच्या नकलकाराकडे गेल्याने त्यानेही ते चुकीचं उतरवून घेतलं. धार्मिक ग्रंथांचे अभ्यासक, मित्रवर्य श्रेयस जोशी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेशपुराण-मुद्गलपुराणानुसार गणेशाचं व्रत हे एका दिवसाचं आहे, त्यामुळे पार्थिव गणपतीची स्थापना ही चतुर्थीला होऊन पंचमीला विसर्जन हे पारंपरिक आहे. गाणपत्य संप्रदायानेही हीच परंपरा पुढे चालवली. यामुळेच आपण पाहिलं असता चिंचवडकर देवांच्या अष्टविनायकांचा उत्सव हा प्रतिपदेला सुरु होऊन, चतुर्थीला स्थापना आणि पंचमीला विसर्जन होत असे. समर्थांचा संप्रदाय वेगळा असला तरी समर्थ एवढा मोठा बदल करतील हे संभवत नाही. गौरी आवाहन-विसर्जन, अनंत चतुर्दशी वगैरे धरून आधीचे पंधरा दिवस, आणि जर त्या चरणात असलेला "मास" हा शब्दशः धरला तरी भाद्रपदाच्या कृष्ण पक्षात पितरांच्या प्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेल्या पितृपंधरवड्यात हा उत्सव समर्थांनी खरंच सुरु ठेवला असेल? याचा विचार मी वाचकांवर सोडतो. 

एकंदरीतच, समर्थ आणि त्यांचं चरित्र हे या ना त्या कारणाने वेगळ्याच रूपात चर्चेत येतं. समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांमधल्या श्रेष्ठत्व-कनिष्ठत्वाच्या वादात जी हवी ती खरी माहिती मात्र पुढे येत नाही, आणि मूळ समर्थचरित्रावर अन्याय होतो. बहुत काय लिहिणे? लेखनालंकार.

© कौस्तुभ कस्तुरे

(सदर लेख आगामी पुस्तकाचा एक भाग असून लेखाचे सर्व हक्क राखीव आहेत. या लेखाचा छापील अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वापर करण्यापूर्वी, लेखात बदल करण्यापूर्वी लेखकाची संमती घेणे अनिवार्य आहे.)