रामजन्मभूमी घेण्याबद्दलचे मराठा धुरीणांचे विचार
हिंदूंची अथवा मराठ्यांची उत्तरेतली मोठी तीर्थक्षेत्र म्हणजे प्रयाग, काशी, मथुरा आणि अयोध्या. गया होतं, पण तितकंसं त्याला महत्व दिल्याचं आढळत नाही. गोकुळ-वृंदावन वगैरे प्रदेशही धार्मिकदृष्ट्या महत्वाचा होता. आता या ठिकाणी कोणाकोणाची सत्ता होती ते आधी पाहू. अयोध्या अथवा अवध हे तिथलं मोठं क्षेत्र. काशी आणि प्रयाग ही दोन्ही तिर्थस्थळे त्या काळी अयोध्येच्या सुभेदाराच्या अथवा नवाबाच्या अंतर्गत येत असत. मथुरा, वृंदावन, गोकुळ वगैरे जाटांच्या, पर्यायाने हिंदूंच्याच ताब्यात होतं, त्यामुळे त्याबद्दल तितकासा धोका नव्हता. त्यातही १७७० मध्ये मराठ्यांनी मथुरा जिंकून घेतलं.
अयोध्या, काशी आणि प्रयाग ही तीन स्थळं मराठ्यांकडे घ्यायला नानासाहेब पेशव्यांनी सुरुवातीपासून मोठे प्रयत्न केले होते. काशीत मराठ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात १७३४-३५च्या आसपास सुरू झाला. नारायण दीक्षित-पाटणकर हे काशीत स्थायिक झाले, अन तिथले जणू काही प्रमुख बनले. या सुमारास काशी थेट आपल्याकडे नसली तरी आपल्या लोकांनी काशीत मोठमोठे घाट बांधायला सुरुवात केली होती, कधीतरी काशी आपल्याकडे येईल ही अपेक्षा होतीच. काशीचा राजा बळवंतसिंग असला तरी त्याच्यावर सत्ता चालायची ती अयोध्येच्या नवाबाची.
आता अयोद्धेकडे वळू. मराठ्यांच्या कार्यकाळात सुरुवातीला अयोध्येचा नवाब होता सादतखान. हा मराठ्यांचा कट्टर शत्रू. बाजीरावांनी दिल्लीची मोहीम याचाच माज उतरवायला काढली. नादिरशहाच्या स्वारीत सादतखानाच्या मृत्यूनंतर मन्सूरअलिखान अयोध्येचा नवाब झाला. हाच तो प्रसिद्ध सफदरजंग. मन्सूर हा शाहजादा अहमदचा मित्र असल्याने त्याला १७४८मध्ये अयोध्येच्या नवाबीसोबत वजीरीही मिळाली. इथवर मन्सूर आणि मराठे यांचं काही सख्य होतं असं दिसत नाही. कशावरून?
नानासाहेब पेशव्यांनी १७४३च्या सुरुवातीला काशीत प्रवेश करण्यापूर्वी आपली चतुरंग सेना काशीच्या जवळ आणली. ऐंशी हजारांची ही भली मोठी फौज पाहून कोणाच्याही मनात धडकी भरली असती, की आता ही फौज जाईल तिथे जिंकत जाणार. नानासाहेबांचं हे शक्तिप्रदर्शन वेगळ्याच कारणासाठी होतं, तो आत्ताचा विषय नसल्याने टाळतो. पण १७४३चे किमान दोन विश्वसनीय उल्लेख आपल्याकडे आहेत की नानासाहेब-मल्हारराव होळकरांनी काशीत जाऊन ज्ञानवापी पाडावी आणि विश्वेश्वर पुन्हा उभारावा अशी इच्छा धरली, तेव्हा तिथले ब्राह्मण नारायण दीक्षितांच्या भेटीस गेले आणि पेशव्यांना परावृत्त करायला सांगितलं. का? तर मन्सूरअलीने म्हणजेच सफदरजंगाने साऱ्यांना धमकी दिलेली, "पेशवा आत्ता तात्पुरता येऊन जिंकून जाईल, पण पुन्हा आम्ही येऊ तेव्हा त्याला मदत करणाऱ्या साऱ्यांची कत्तल करू." या वेळेस काशी घेणं उघडपणे शक्य नव्हतं, अयोध्या तर सफदरजंगचा बालेकिल्ला होता, तोही घेता येत नव्हता. हा बेत तूर्तास राहिला. इथपासून पुढे नानासाहेबांनी प्रत्येक वेळेस राजकारण करून ही सारी तीर्थक्षेत्र मराठ्यांकडे घेण्याचा प्रयत्न चालवलेला आढळतो, पण दर वेळेस काही ना काही कारणाने राजकारण फसलं.
१७४८ नंतर सफदरजंग वजीर झाला आणि राजकारण बदललं. कितीही झालं तरी तो शिया होता. अहमदखान बंगशासह इतर पठाण-रोहिले हे त्याच्या विरोधात उठले. या वेळेस त्याला मराठे जवळचे वाटू लागले. नानासाहेबांनी शिंदे-होळकरांना फ्री हॅन्ड दिलेला त्यामुळे उत्तरेत दोन्ही सरदारांनी वजीराला मदत केली. कदाचित या काळात तीर्थक्षेत्र येऊ शकली असती हा विचार होता. या सोबतच दुसरं राजकारण नानासाहेबांनी चालवलं होतं ते म्हणजे निजामाचा थोरला मुलगा गाझिउद्दीन याला वजीरी देववून त्याच्याकरवी तिर्थक्षेत्रांच्या सनदा घ्यायच्या. १७५१ नंतर बादशाह आणि वजीर यांच्यात झगडा लागल्याने हे नवं राजकारण होतं. पण गाझिउद्दीनला वजीरी मिळाली नाही आणि त्याचा खून पडला, त्यामुळे हेही फसलं.
सफदरजंग १७५४ पर्यंत जिवंत होता, पण १७५३नंतर तो तसाही निष्क्रिय झाला होता. त्याच्यानंतर त्याचा मुलगा शुजा अयोध्येचा नवाब झाला. इथे गम्मत अशी, की सफदरजंग मराठ्यांना अनुकूल असला तरी बादशाह-वजीर झगड्यात मराठ्यांना बादशहाची बाजू घ्यावी लागली आणि सफदरजंग काहीसा नाराज झाला, पर्यायाने पुढे शुजाही नाराज होता.
नानासाहेबांनी शुजाकरवीही अयोध्या आणि इतर तीर्थक्षेत्र हाती घेण्याचे प्रयत्न केले होते, पण पुढच्या पाच वर्षात ते असफल झाले. सफदरजंगानंतर वजीरीवर आलेला कमरुद्दीनचा पुत्र इंतजाम उद्दौला फारसा टिकला नाही, आणि थोरल्या गाझिउद्दीनचा मुलगा धाकटा गाझिउद्दीन उर्फ इमादउलमुल्क नवीन वजीर झाला. हा इमाद आणि शुजा यांच्यात पुन्हा वाकडं असल्याने या काळात शुजाने तीर्थक्षेत्र मराठ्यांना देण्याची वेळ आली नाही. मराठ्यांना बादशाही आपल्या ताब्यात घेणं जात महत्वाचं असल्याने शुजाच्या राजकारणापेक्षा इमादला पाठिंबा देणं गरजेचं वाटलं, कारण सततची सुरू झालेली राजकारणं आणि अब्दालीच्या स्वाऱ्या. तरीही या काळात नानासाहेबांची जयाप्पा आणि पुढे दत्ताजी शिंद्यांना या तिर्थक्षेत्रांबद्दलची पत्रं आहेतच.
१७५९-६० मध्ये राजकारण पुन्हा बदललं. इमादने बादशहाचा खून केला ही गोष्ट नानासाहेबांना-भाऊंना पटली नाही. सुरजमल जाटाने इमादला पाठीशी घातलं, त्यात नजीबाने अब्दालीला पुन्हा बोलावलं. आता अखेरचा उपाय होता तो म्हणजे शुजा उद्दौल्याला बादशहाची वजीरी देणं. शुजाला वजीर करणं यात तीन हेतू होते: एक म्हणजे त्याच्याकडून अब्दालीशी लढण्यासाठी पैसा आणि मोठी फौज मिळाली असती. दुसरं म्हणजे दिल्ली दरबारात आपल्या मैत्रीतला वजीर राहिला असता, आणि तिसरं म्हणजे त्याच्याकडून तिर्थक्षेत्रांचा ताबा मिळवता आला असता. शुजाने मराठ्यांची ही मागणी मान्य केली असतीही, पण त्याला ती लिखित स्वरूपात हवी होती. नेमकं भाऊ शुजाकडे पोहोचायच्या आधीच नजीब जाऊन पोहोचला आणि त्याने याहून जास्त मागण्या मान्य केल्या. नजीब आणि शुजा मित्र कधीच नव्हते, कारण रोहिले सुन्नी होते तर शुजा शिया. पण तरीही, शाहवलीउल्ला देहलवीच्या जिहादच्या नाऱ्याने आणि सैन्याच्या दबावाने शुजाला नजीब-अब्दालीला मिळणं भाग पडलं. पुढे पानिपतात सगळंच संपल्याने, नानासाहेब-भाऊ, दत्ताजी-जनकोजी वगैरे गेल्याने हा प्रयत्न अर्धवटच राहिला.
पानिपतनंतर १७७१ मध्ये मोठ्या मोहिमेत मराठ्यांनी उत्तरेकडचा आपला जुना प्रदेश परत मिळवला खरा, पण तीर्थक्षेत्र सोडवण्याची इच्छा अपुरीच राहिली. पुढे अहिल्याबाईंनी काशीचा विश्वेश्वर मुक्त केला, म्हणजे किमान नवं मंदिर तरी उभारलं, पण तो प्रयत्न अयोध्या-प्रयागच्या बाबतीत झाला का ते समजत नाही. नाना फडणवीसांच्या आणि महादजींच्या काही पत्रात उल्लेख आढळतो, पण त्याबद्दल प्रत्यक्ष काही होऊन ही स्थळं आपल्याकडे आली असं मात्र काही दिसत नाही.
इथे एक अभ्यासक म्हणून सहज:
अयोध्या हे तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याकडे असावं असं मराठी धुरीणांना वाटत होतं. पण बाबरी मशीद हेच रामजन्मस्थान आहे किंवा तिथे रामाचं मंदिर पाडून मशीद बांधली आहे वगैरेचे उल्लेख मराठी वा फारसी कागदांत आढळत नाहीत. तसे उल्लेख कुठेही नाहीत. त्यामुळेच बहुदा, त्या काळातही बाबरी मशीद हीच रामजन्मभूमी असावी असं आपल्याकडे महाराष्ट्रात तरी जनमत नसावं.
बाबरी मशिदीत १९९२ साली सापडलेल्या विष्णू-हरी शिलालेखाबद्दल अनेक दावे-प्रतिदावे आहेत. हा शिलालेख बाराव्या शतकातला असून यात शिवापासून परशुरामापर्यंत साऱ्यांचे उल्लेख आहेत. त्यातल्या सत्तावीसाव्या श्लोकात विष्णूच्या चार अवतारांची माहिती आहे त्यात महत्कृत्य करणाऱ्या आणि दशाननाला मारणाऱ्या प्रभू श्रीरामांचाही उल्लेख आहे. त्यामुळे, मंदिर पाडून ही मशीद उभारली गेली असली तरी ते मूळ रामाचं मंदिर होतं का याबद्दल जुन्या कागदांत काही आढळत नाही. याच कारणाने, ज्याप्रमाणे आपल्याकडे ज्ञानवापी पाडण्याबद्दल आणि विश्वेश्वराची पुनर्स्थापना करण्याबद्दल उत्सुकता दिसते ती बाबरी मशीद प्रकरणात अठराव्या शतकात दिसत नाही, किमान उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तरी. कोण जाणे, नवीन पुरावा मिळाल्यास त्यावरही अधिक प्रकाश पडू शकेल भविष्यात. पण आहे हे असं आहे.
यात एका दृष्टीने महत्वाचं म्हणजे, जोसेफ टिफेंथेलर नावाच्या एका ऑस्ट्रियन ख्रिश्चन मिशनऱ्याच्या प्रवासवर्णनात मात्र पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो, "सम्राट औरंगजेबाने रामकोट नावाची ही जागा पाडून टाकली आणि तीन घुमट असलेली ही मशीद बांधली. इतरांचं म्हणणं आहे हे बाबराने बांधलं आहे. या वास्तूत, डाव्या बाजूला एक प्लॅटफॉर्म आहे, हिंदू ज्याला बेदी (वेदी) म्हणतात, कारण पूर्वी इथे एक वास्तू होती जिच्यात विष्णू आणि त्याच्या तीन भावांचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं. हिंदूंनी इथे चालवलेला पूजापाठ आणि उत्सव थांबवण्यासाठी, कोणी म्हणतं औरंगजेबाने तर कोणी म्हणतं बाबराने ही वास्तू उध्वस्त केली. पण तरीही, हिंदूंनी इथे प्रार्थना आणि उत्सव करायचं थांबवलं नाही. ते या वास्तुभवताली तीन प्रदक्षिणा घालतात आणि अखेरीस साष्टांग नमस्कार घालतात. चैत्राच्या चोविसाव्या दिवशी इथे रामजन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो." हे वर्णन पाहता मात्र अठराव्या शतकात ही जागा रामजन्मभूमी असल्याचं किमान अयोध्या आणि आजूबाजूच्या लोकांचं तरी मत असल्याचं जोसेफने नमूद केलं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. हा जोसेफ १७४३ मध्ये भारतात आला आणि १७६० मध्ये त्याने अयोध्येला भेट दिली.
श्री राम शर्मा यांच्या 'द रिलिजिअस पॉलिसी ऑफ द मुघल एम्पेरर्स' या पुस्तकात पृष्ठ २४ वर त्यांनी बाबरी मशीद ही रामाचं मंदिर पाडून बांधली असल्याचं म्हटलं आहे, आणि त्यासाठी एस के बॅनर्जींच्या 'बाबर आणि हिंदूज्' या शोधनिबंधाचा संदर्भ दिला आहे, पण मला बॅनर्जी यांचा हा निबंध सापडला नाही, त्यामुळे क्रॉसचेक करता आलं नाही.
© कौस्तुभ कस्तुरे