बखरीतील गोष्टी, भाग ७ : कवी भूषण, शिवराय आणि औरंगजेब


दिल्लीच्या पातशाहाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या पदरी चिंतामण नावाचा एक कवी आश्रयाला होता. या चिंतामणीला एक धाकटा भाऊही होता. त्याचं नाव भूषण! अर्थात, धाकटा असल्याने लाडका असणारच. भाऊ दिल्लीदरबारात मानाचं स्थान पटकावून आहे, पण धाकटा भाऊ घरीच बसून असतो असं लोक बोलू लागले तेव्हा भूषणाला हे साहवेना. हे असह्य होत गेलं, आणि अखेरीस "मला यवनांचं अन्न भक्षायचं नाही" असं म्हणून हा भूषण कुमाऊँच्या पहाडात जाऊन तिथल्या राजासमोर जाऊन उभा राहिला. भूषणाने राजाचं कौतुक केलं, त्यावर कवित्व केलं. भूषणाचं कवित्व ऐकून राजाही खुश झाला, आणि त्याने एक लक्ष रुपयांची दक्षिणा देऊन निरोप देत भूषणाचा सन्मान केला. हे करत असतानाच राजा म्हणाला, "कविराज, असा दाता पृथ्वीवर दुसरा कोणी मिळेल का?" हा एकच प्रश्न, आणि भूषणाचं पित्त खवळलं. स्वाभिमान जागा झाला. भूषणाने तत्क्षणी उत्तर केलं, "राजा, असे दाते कित्येक आहेत, पण तू असा याचक कधी पाहिला आहेस का, की लक्ष रुपये दक्षिणा मिळाली असतानाही ते तुच्छ आहेत म्हणून स्पर्श करणार नाही?" आणि झालं! भूषणाने ते कोडकवतिक नाकारलं.  

भूषण तिथून निघाला तो थेट दक्षिणेत शिवाजी महाराजांकडे आला. त्याने आधीच महाराजांची कीर्ती श्रवण केली होती. आल्या आल्याच भूषणाने महाराजांना म्हटलं, "यवनांचा शत्रू कोणी असेल तर मी केवळ त्याच्याच आश्रयाला राहणार", हे ऐकून महाराज त्याला म्हणाले, "मी यवनांचा काळ आहे!" भूषण आनंदला. अशाच राजाची त्याला ओढ होती. त्याने महाराजांपाशी राहून कवित्व केलं, ते महाराजांनाही आवडलं. महाराजांच्या प्रतापांवर त्याने 'शिव-भूषण' नावाचा एक स्वतंत्र ग्रंथच रचला. महाराज बेहद्द खुश होते. भूषण महाराजांपाशी जवळपास चार-पाच वर्ष राहिला, आणि अखेरीस महाराजांची आज्ञा घेऊन आपल्या भावाच्या घराकडे, दिल्लीला निघाला. 

शिवाजी महाराजांनी भूषणाची नावाजणी केली ही गोष्ट बादशहाला कळल्यावाचून राहिली नव्हती. एक भाऊ आपल्या पदरी आहे आणि दुसरा आपल्या शत्रूकडून नावाजला जातो ही गोष्ट तो कसा सहन करू शकेल? औरंगजेबाने चिंतामणी कवीला आज्ञा केली, "तुझ्या भावाला, भूषण कवीला भेटायला घेऊन ये." घरी आल्यावर चिंतामणीच्या आपल्या भावाला म्हटलं, "भूषणा, अरे बादशाह, माझे यजमान तुला बोलवत आहेत, चल." यावरून भूषण एकदम म्हणाला, "माझ्या यजमानांचा तो शत्रू, त्याचं दर्शन मला कशास हवंय? माझ्या मुखातून शिवरायांच्या प्रतापाशिवाय दुसरं काहीही निघायचं नाही, आणि त्यामुळे बादशाह मात्र चिडून जाईल." चिंतामणी कवींच्या पुढे प्रश्न पडला. भाऊ एक हट्टी, ऐकणारा नव्हताच; पण बादशहाची आज्ञाही मोडवत नव्हती. अखेरीस त्याने अगदी चाचरत बादशहाला म्हटलं, "भूषण आपल्या दर्शनास येईल, पण शिवाजी महाराजांचा प्रताप वर्णन करेल तरी बादशहांनी रागवू नये. आज्ञा करावी, त्यानुसार त्याला भेटीस आणतो." औरंगजेबाने आज्ञा दिली. दुसऱ्या दिवशी चिंतामणी पंडित आपल्या धाकट्या भावाला घेऊन औरंगजेबाच्या दरबारात गेले. 

औरंगजेबाने भूषणला पाहून आज्ञा केली, "काही कवित्व कर, माझं वर्णन कर". भूषण म्हणाला, "आपण आधी हात धुवून बसावं. आम्ही वीररसयुक्त वर्णन करू तेव्हा आपला हात मिशांवर जाईल." बादशाह बुचकळ्यात पडला. कवित्वाचा आणि हात धुण्याचा काय संबंध? त्याने कारण विचारताच भूषण म्हणाला, "आपल्याला शृंगार प्रिय आहे. आमचे बंधू शृंगाररस वर्णिता तेव्हा आपला हात विजारेस लागतो. म्हणूनच हात धुवून बसा." बादशाह हे ऐकून भडकला, त्याने भूषणाला म्हटलं, "तुझ्या कविता ऐकून आता माझा हात मिशांवर गेला नाही तर मी तुझा शिरच्छेद करिन. आता सुरु कर." 

भूषणाने आपलं कवित्व सुरु केला. आधी म्हटल्याप्रमाणे त्याने शिवाजी महाराजांचाच प्रताप वर्णिला. त्यावर बादशाह एकदम म्हणाला, "माझ्याविषयी कवित्व कर. मी सार्वभौम बादशाह आहे. सारे राजे कर देऊन माझे मांडलिक होतात अशी वर्णनं त्यात आली पाहिजेत." भूषण ऐकणारा थोडीच होता. त्याने त्याच्या मनाप्रमाणे कवित्व सुरु केलं. त्या कवित्वाचा अर्थ असा होता, की "साऱ्या पृथ्वीवरील इतर राजे हे जणू काही फुलांची झाडं आहेत, आणि बादशाह म्हणजे जणू काही भुंगा आहे. तो साऱ्या फुलांवर बसून त्यातला मध सेवन करतो, शोषून घेतो. पण शिवाजीराजा मात्र चम्पकवृक्ष आहे. भ्रमर तिथे मात्र जात नाही, जाऊ शकत नाही." बादशाह आता मात्र खरच रागावला. त्याने अजूनही हात मिशीवर गेला नसल्याचं दर्शवला तेव्हा भूषणाने एकापाठोपाठ एक अशी सहा कवित्वें केली, आणि खरंच बादशहाचा हात नकळत मिशीवर गेला. बादशहाने अखेरीस भूषणाचा सत्कार करून त्याला निरोप दिला. या साऱ्या घटनाही जासूदांनी महाराजांना लिहून पाठवल्या तेव्हा महाराजांनी आनंदित होऊन भूषणाला पुन्हा रायगडी येणाचं आमंत्रण दिलं. अशी एकेक नररत्न महाराजांनी गोळा केली होती. 

------------------------------------------

ऐतिहासिक तथ्य: बादशहाच्या दरबारातील संवाद हे अर्थातच खरे वाटत नाहीत, ते रूपक असावेत, पण भूषणाने औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अपमान केला ही गोष्ट खरी आहे. चिटणिसांनी वर्णन केलेला, भूषणाने बादशाहासमोर म्हटलेला श्लोक असा:

कूरम कमल कमधुज है कदंब-फूल गौर है गुलाब राना केतकी बिराज है।
पाँडरि पँवार जुही सोहत है चंदावत बकुल-बुँदेला अरु हाड़ा हंसराज है।
भूषन भनत मुचकुंद बड़गूजर है बघेले बसंत सब कुसुम-समाज है।
सबही को रस लैकै बैठि नसकत आय अलि अवरंगजेब चंपा सिवराज है ।।

अर्थातच, शिवभूषण मध्ये भूषणाचे औरंगजेब आणि त्याच्या फजितीसंबंधी अनेक श्लोक आहेत, शिवाय भूषणाने औरंगजेबासमोर एवढा पाणउतारा केल्यावर औरंगजेब त्याला सन्मानाने सोडून देईल ही शक्यता सोडाच, पण जिवंत तरी परत पाठवेल का अशी शंका साहजिक येते. पण वरचा बखरीतला प्रसंग मात्र चिटणिसांनी छान खुलवला आहे. 

माहिती स्रोत: सप्तप्रकरणात्मक चरित्र, प्रकरण चौथे

©️ कौस्तुभ कस्तुरे