जगदंबा तलवारीविषयी..


नुकतंच महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली की "इंग्लंडमध्ये असलेली शिवरायांची जगदंबा तलवार ही २०२४ पर्यंत महाराष्ट्रात परत आणली जाईल". या बातमीने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. वास्तविक, यापूर्वीही अनेक राजकारण्यांनी लंडनमधून शिवाजी महाराजांची तलवार परत आणण्याविषयी निराधार व्यक्त केला होता पण काही ना काही कारणास्तव ते जमले नाही. या वेळेस सरकारी पातळीवर पुन्हा प्रयत्न सुरु झाल्याने आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पण शिवरायांची ही जगदंबा तलवार म्हणजे नेमकी आहे तरी कोणती? शिवरायांच्या भवानी तलवारीचं नाव कायम सांगितलं जातं, मग लंडनमध्ये असलेली भवानी का जगदंबा? असे एक ना अनेक प्रश्न सध्या शिवप्रेमींच्या मनात उमटत आहेत. काय आहे या तलवारीची कहाणी, थोडक्यात समजून घेऊ. 

सर्वप्रथम, महाराजांच्या भवानी आणि जगदंबा या तलवारी वेगवेगळ्या होत्या का एकच? उत्तर आहे वेगवेगळ्या! इ.स. १६५८मध्ये महाराजांनी कोकणात स्वारी केली असता गोवलेकर सावंत महाराजांच्या भेटीसाठी आले. महाराजांना ऐकून माहीत होतं की सावंतांकडे एक नामी तलवार आहे. ही तलवार फिरंग आहे. म्हणजे, हीचं पातं हे युरोपात तयार झालेलं असून मूठ इथेच हिंदुस्थानात तयार केली गेली आहे. महाराजांनी ही तलवार पाहिली, आणि ती महाराजांच्या मनात भरली. गोवलेकर सावंतांनीही महाराजांना ही तलवार नजर केली. पण इतकी नामी तलवार अशीच घेण्याच्या ऐवजी महाराजांनी त्या बदल्यात गोवलेकर सावंतांना चारशे होन आणि मानाचा पोशाख बहाल केला. या नव्या फिरंगीचं नाव महाराजांनी ठेवलं 'भवानी'. पुढे महाराजांच्या शेवटच्या क्षणापर्यंत युद्धाच्या प्रत्येक प्रसंगी ही भवानीच महाराजांसोबत असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही भवानी सध्या नेमकी कुठे आहे याबद्दल मतमतांतरे आहेत. पण साताऱ्यात जलमंदिरात छत्रपतींच्या खाजगी देवघरात ही भवानी ठेवली आहे असा अनेक इतिहास संशोधकांचा असलेला दावा बहुतांशी खरा ठरतो. साताऱ्यात शाहू महाराजांची एक आणि खुद्द शिवाजी महाराजांची एक अशा दोन तलवारी असल्याचं; पैकी, शाहू महाराजांची तलवार दसऱ्याला शास्त्रपूजनासाठी बाहेर काढण्यात येते असं पूर्वी एका ज्येष्ठ इतिहास संशोधकांशी चर्चा करताना समजलं होतं. 

दुसऱ्या बाजूला जगदंबा ही तलवार अत्यंत मौल्यवान अशी आहे. या तलवारीची मूठ ही सोन्याने मढवलेली असून तिच्यावर १३ हिरे, १८ पाचू आणि ४६७ मानके बसवलेली आहेत. धोप जातीची ही तलवार देखील एक फिरंग आहे. म्हणजेच, भवानीप्रमाणे हिचंही पातं युरोपात टॉलेडो (स्पेन) इथे तयार झालं असून मूठ मात्र इथेच, हिंदुस्थानात बनवलेली आहे. जगदंबा तलवारीची एकूण लांबी ही १२२.५ सेंटीमीटर असून त्यापैकी पातं १०० सेंटीमीटर आणि मूठ २२.५ सेंटीमीटर इतकी आहे. मुठीच्या परजेच्या आतल्या बाजूस उच्च प्रतीच्या सुती कापडाची गादी बसवलेली आहे. ही तलवार इ.स. १८७५ मध्ये इंग्लंडचे तत्कालीन राजपुत्र, प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड सातवे हे भारतभेटीवर आले असताना कोल्हापूरच्या तत्कालीन महाराजांनी ही तलवार त्यांना भेट दिली. सध्या ही तलवार बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवलेली आहे. कोल्हापूरच्या शिलेखान्यात दि. २९ फेब्रुवारी १८७६ रोजी या तलवारीची नोंद 'तलवार सडक जगदंबा' अशी केलेली आहे. 

मग, जर भवानी आणि जगदंबा या दोन्ही तलवारी फिरंग जातीच्या आहेत तर दोन्ही एकाच असू शकत नाहीत का? असा प्रश्न साहजिकच कोणाच्याही मनात उत्पन्न होईल. कारण भवानी आणि जगदंबा ही तशी एकाच देवीची नावं असल्याने एकाच तलवारीला दोन वेगवेगळ्या नावांनी पुकारले जाऊ शकत नसेल कशावरून? पण तसं नाही. भवानी ही साधी, युद्धाची तलवार आहे. तिच्यावर रत्न जडवली असल्याची कोणतीही नोंद सापडत नाही. शिवाय युद्धाच्या तलवारी या कोणत्याही विशेष खाड्यांशिवाय, सोन्यारूप्याच्या मुठींशिवाय कणखर अशा लोखंडाच्या असत. याउलट, रत्नजडित तलवारी या विशेष दरबाराच्या प्रसंगी वा मानपानाच्या प्रसंगी बाळगावयाच्या असत. त्यामुळेच, इंग्लंडमध्ये असलेली जगदंबा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या खास शिलेखान्यातली, ठेवणीची आणि दरबारी तलवार आहे. ती युद्धाची तलवार नसून युद्धाच्या बाबतीत शिवरायांच्या ज्या तलवारीचं नाव आढळतं ती भवानी तलवार वेगळी आहे हे उघड आहे. 

एकंदरीतच, महाराजांची अशी ही खास तलवार, कोणाच्याही प्रयत्नाने आपल्याकडे पुन्हा येणार असेल तर प्रत्येक मराठी माणसासाठी त्यासारखी अभिमानाची दुसरी गोष्ट नाही. सध्या तरी या गोष्टीचं पुढे काय होतं हे पाहून एवढंच आपल्या हातात आहे. 

- कौस्तुभ कस्तुरे
दि. ११ नोव्हेंबर २०२२