पहिल्या चार पेशव्यांचे पेशवाईचे शिक्के
श्रीवर्धनकर भट पेशव्यांचे शिक्के आताशा बहुतांशी जणांना माहीत झाले असतील. मी माझ्या 'पेशवाई' मध्ये साऱ्या पेशव्यांचे शिक्के छापले आहेत. पण सुरुवातीच्या चार पेशव्यांचे शिक्के मात्र अभ्यासकांशिवाय सहसा कोणी क्वचितच पाहिले असतील. म्हणून, पुढे पहिल्या चार पेशव्यांचे शिक्के देतो आहे. यात मध्ये दोन जणांची नावं पेशवेपदी आढळतात, पण ते काळजीवाहू असल्याने त्यांच्या पेशवाईच्या मुद्रा उपलब्ध नाहीत.
यात पहिले होते शामराज निळकंठ रांझेकर अथवा रोजेकर. शिवाजी महाराज बंगळूरहून परत आले तेव्हाच इ.स. १६४२ मध्ये शहाजीराजांनी शामराजपंतांना 'पेशवा' करून पाठवलं होतं. चिटणीस म्हणतात की त्यांच्याकडून हवं तसं काम होत नसल्याने महाराजांनी मोरोपंतांना पेशवाई दिली. पण जेधे शकावलीनुसार मोरोपंतांच्या आधी काही काळ म्हणजे २१ ऑगस्ट १६६१ रोजी नरहरी आनंदराव पेशवा झाले.
पुढे लगेच ३ एप्रिल १६६२ रोजी मोरोपंतांना पेशवाई देण्यात आली. आता याच काळात, किंबहुना दोनेक वर्ष आधीपासूनच महाराजांनी जुनी म्हातारी झालेली सारी माणसं बदलून त्या जागी नव्या नावांची नेमणूक केली होती. त्यामुळेच, वयोवृद्ध झालेल्या शामराज निळकंठांना बदलून नवे, ताज्या दमाचे मोरोपंत नेमले, पण मधल्या काळात निर्णय सुरु असल्याने काळजीवाहू म्हणून नरहरी आनंदरावाला पेशवाई देण्यात आली. मोरोपंत खास विश्वासू होते. सभासद म्हणतो,
"राजियांनी याप्रकारे जावळीचे राज्य व शृंगारपूरचे राज्य ऐशी दोन्ही राज्ये काबीज केली, तेव्हा मोरो त्रिंबक पिंगळे ब्राह्मण यांनी बहुत मेहनत केली. त्याजवरून शामराव निळकंठ यांची पेशवाई दूर करू मोरोपंतास पेशवाई दिली."
१२ ऑक्टोबर १६८० रोजी मोरोपंत वारले. त्यानंतर त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला, निळोपंतांना पेशवाई देण्यात आली. जोवर राजाराम महाराज, आणि नंतर ताराबाईं आणि धाकटे शिवाजीराजे कारभार करत होते तोवर निळोपंत पेशवेपदी होते. एका कागदनुसार मधल्या काळात परशुरामपंत प्रतिनिधींना पेशवेपद सहा महिन्यांसाठी दिल्याचा उल्लेख आहे, पण हेही काळजीवाहू असावं. कारण एकच माणूस प्रतिनिधी आणि पेशवेपदी बसणार नाही. शिवाय यांच्या शिक्क्याचं एकही पत्र आजवर सापडलेलं नाही. असंच बाळकृष्णपंत हणमंते यांचंही नाव आढळतं, पण त्यातही कोणतंही पत्र उपलब्ध नाही. पुढे राज्याचे दोन भाग झाल्यावर निळोपंत ताराबाईंकडेच राहिले. धाकटा बहिरो मोरेश्वर मात्र शाहू महाराजांच्या बाजूला आला.
शाहू महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी, दि. १२ जानेवारी १७०८ रोजी बहिरो मोरेश्वरांना आपला मुख्य प्रधान अर्थात पेशवा म्हणून नेमलं. पण पुढे ताराबाईंच्या वतीने कान्होजी आंग्रे यांनी लोहगड-राजमाची वगैरेवर हल्ला केला तेव्हा बहिरोपंत पेशवे कैद झाले. शाहू महाराजांवर हि मोठीच नामुष्की ओढवली. तेव्हा कान्होजींची राजकारणं आणि एकंदरीतच नवीन माणूस पेशवेपदी नेमण्यासाठी नव्या पेशव्याची म्हणजे बाळाजी विश्वनाथांची १७ नोव्हेंबर १७१३ रोजी नेमणूक झाली. या आधी काही महिने बहिरो मोरेश्वर कैद झाल्याने अर्थातच त्यांचं पेशवेपदही गेलं.
एकंदरीतच, अशी आहे पहिल्या चार प्रमुख पेशव्यांची, आणि दोन-तीन काळजीवाहू पेशव्यांची कहाणी.
- कौस्तुभ कस्तुरे