इतिहास संशोधन- काल आणि आज

 

पगार देऊन सांगकाम्ये कारकून मिळतात. युक्तीने, बुद्धीने व मनःस्फूर्तीने संशोधन करणारे इसम मिळत नाहीत

 - इतिहासाचार्य राजवाडे


वर्षली सकळ मंगळी, इतिहासनिष्ठांची मांदियाळी!

आपल्याकडे, महाराष्ट्रात इतिहास संशोधनाच्या चळवळीला प्रारंभ झाला तो एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात. रावबहाद्दूर काशिनाथ नारायण साने, नीलकंठ जनार्दन कीर्तने वगैरे मंडळींनी तत्कालीन उपलब्ध असलेल्या पोवाडे-बखरीच्या साहाय्याने इतिहासाची मांडणी करायला सुरुवात केली. यात शिवाजी महाराजांपासून ते पुढच्या राज्यकर्त्यांच्या ज्या ज्या बखरी उपलब्ध झाल्या त्या त्या प्रकाशित करून इतिहास लोकांना सांगण्याचा घाट घातला. काही काळातच आणखी एक जोडगोळी प्रामुख्याने पुढे आली ती म्हणजे रावबहाद्दूर दत्तात्रय बळवंत पारसनीस आणि गणेश चिमणाजी वाड यांची. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 'Introduction to Peshawa Diaries' नावाचा आपला ग्रंथ आधी प्रकाशित केला होता, पण ही केवळ तोंडओळख म्हणून मर्यादित न ठेवता वाडांनी पुण्याच्या एलिनेशन ऑफिसमधून शाहू महाराज आणि पेशव्यांच्या रोजकीर्दीतले असंख्य कागद धुंडाळून महत्वाची माहिती 'रोजनिशी' या नावाखाली खंडात्मक प्रसिद्ध केली. पारसनिसांनीही आपल्या 'इतिहाससंग्रह' या मासिकातून त्यांना सापडलेली निरनिराळी त्रुटित पत्रे, ऐतिहासिक बखरी, आख्यायिका, वगैरे सारी माहिती लेखाद्वारे द्यायला सुरुवात केली. पुरुषोत्तम विश्राम मावजी म्हणून साताऱ्याचे एक प्रसिद्ध संग्राहक होते, त्यांच्या मदतीने वाड आणि पारसनीसांनी वतनपत्रे, निवडपत्रे, इनामपत्रे, तहनामे वगैरे गोळा करून त्याचेही एकूण चार खंड प्रसिद्ध केले. 

या मंडळींच्या काळातच आणखी एक माणूस इतिहास संशोधनाच्या या महासागरात मुक्तपणे विहार करत होता, पण अर्थातच त्याचं इतिहास संशोधन पुढे येण्यासाठी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत वाट पाहावी लागली. हे होते विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांना 'इतिहासाचार्य' म्हणून नावाजलं गेलं. इ.स. १८९५ मध्ये राजवाड्यांनी 'भाषांतर' नावाचं एक मासिक सुरु केलं होतं, पण त्यात परकीय इतिहासकारांचे लेख अन मतमतांतरं इथल्या लोकांना चटकन समजावीत म्हणून भाषांतरित केली जात. पण एवढ्यावरच थांबायचं कसं? इ.स. १९१० मध्ये सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे आणि विश्वनाथ काशिनाथ राजवाडे या दोघांच्याही डोक्यात एक अद्भुत विचार आला, आपल्यासारख्याच स्वच्छंदी पण इतिहासाविषयी जाण असलेल्या अभ्यासक-संशोधक मंडळींसाठी एक हक्काचं स्थान असावं हा तो विचार होता. पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर राजवाड्यांनी जणू काही सुखोपभोगाची साधनं दूर लोटून आपलं सारं आयुष्य इतिहासाला वाहून घेतलं. सरदार मेहेंदळेंसारख्यांच्या पाठिंब्यावर राजवाड्यांची 'इतिहास संशोधकांसाठी काहीतरी हक्काचं छप्पर असावं' ही कल्पना सत्यात उतरली. दि. ७ जुलै १९१० या दिवशी मेहेंदळ्यांच्याच वाड्यात 'भारत इतिहास संशोधक मंडळ' सुरु झालं, केवळ या दोघांनी सुरु केलं. पहिल्याच निबंधवाचनाला तिथे वक्ताही एकच अन श्रोताही एकच अशी परिस्थिती होती, पण पुढे मात्र मंडळ हे एखादा कल्पवृक्ष मोहरतो तसं बहरत गेलं. राजवाड्यांच्या स्वतःच्या हयातीत त्यांनी मंडळाच्या स्थापनेनंतर काही काळ पुण्यातून तर उर्वरित काळ धुळ्यातून आपलं इतिहास संशोधन सुरु ठेवलं. त्यांची सगळ्यात मोठी देणगी म्हणजे गावोगाव फिरून, दुर्लक्षिलेली कागदपत्रे पदरमोड करून गोळा करत ही 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' त्यांनी २२ खंडात प्रसिद्ध केली. याही व्यतिरिक्त राधामाधवविलास चम्पू, भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास इत्यादी ग्रंथ अन शेकडो लेख त्यांनी निरनिराळ्या त्रैमासिकांतून प्रसिद्ध केले. राजवाड्यांची खासियत ही, की एखाद्या ग्रंथाच्या मूळ संहितेपेक्षा त्या ग्रंथाच्या प्रस्तावनाचं जास्त वाचनीय असत, कारण राजवाडे त्या साऱ्याचं मूळ आपल्यासमोर उलगडून दाखवत. राजवाड्यांची मराठ्यांच्या इतिहासावरील ही सारी विवेचने अत्यंत महत्वाची आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक मूळ अन महत्वाची कागदपत्रे सर्वप्रथम राजवाड्यांनी उजेडात आणली, अन आठव्या खंडात छापली हे त्यांचे आपल्यावरील उपकारच म्हणावे लागतात. 

राजवाड्यांच्या नंतरच्या काळात दत्तो वामन पोतदार, त्र्यंबक शंकर शेजवलकर, गणेश हरी खरे, वासुदेव सीताराम बेंद्रे, शांताराम विष्णू आवळस्कर, आदी संशोधकांनी राजवाड्यांची ही परंपरा अबाधित ठेवत 'भारत इतिहास संशोधक मंडळा'चं काम अव्याहतपणे पुढे तसंच सुरु ठेवलं. आता या काळात मंडळाच्या बाहेरही इतिहास संशोधक निर्माण व्हायला लागले होते. द. वि. आपटे, या. मा. काळे, अप्पासाहेब पवार, दि. वि. काळे, स. म. दिवेकर, य. न. केळकर, शं. ना. जोशी, चिं. वि. वैद्य, कृ. वा. पुरंदरे, रा. वि. ओतूरकर, त्र्यंबक शंकर शेजवलकर, गंगाधर नारायण मुजुमदार, बळवंत मोरेश्वर उपाख्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, ग. भा. मेहेंदळे आदी अनेक इतिहास संशोधकांची नावं घेता येतात. या साऱ्या इतिहास संशोधकांनी आपापल्या कार्यकाळात निरनिराळे लेख, ग्रंथ प्रसिद्ध करून, कागदपत्रे शोधून त्यांतून बराचसा अपरिचित इतिहास समोर आणला आहे. 

या वरच्या मांदियाळीत, राजवाड्यांच्या काहीसं समकालीन म्हणून अग्रणी अशी दोन नावं येतात ती म्हणजे बडोद्याचे गोविंद सखाराम सरदेसाई आणि मिरजेचे वासुदेवशास्त्री खरे यांची. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड तिसरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतानाच सरदेसाईंना पाठबळ मिळालं, अन त्यांची इतिहास संशोधन क्षेत्रातली रुची आणखी बहरली. गोविंदरावांनी सर्वप्रथम मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास लिहून काढला, अन या खंडात्मक इतिहासाला नाव दिलं- 'मराठी रियासत'. पूर्वविभाग, मध्यविभाग आणि उत्तरविभाग अशा निरनिराळ्या कालखंडात विभागलेला हा इतिहास सरदेसाईंना तत्कालीन उपलब्ध असलेल्या साधनांवर आधारित होता, अन त्यात काहीशा त्रुटीही होत्या. केवळ मराठेच नाही, तर इंग्रजी आणि मुसलमानी रियासतीचे आणखी चार खंड त्यांनी प्रसिद्ध केले. पुढे बडोद्याहून पुण्याजवळच्या कामशेतला परतल्यावर तत्कालीन मुंबई सरकारच्या आणि परममित्र असलेल्या प्रसिद्ध बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकारांच्या आग्रहाखातर सरदेसाईंनी एक महत्वाचा प्रकल्प हाती घेतला. यात पस्तीस हजारांहून अधिक कागदपत्रे धुंडाळून त्यापैकी ८६५० कागदपत्रे त्यांनी 'Selections from the Peshwa Daftar' या नावाने एकूण ४५ खंडात प्रसिद्ध केली. हे काम झाल्यावर लगेच सरकारांच्या साहाय्याने त्यांनी 'Poona Residency Correspondence' म्हणून आणखी सव्वाचार हजार पत्रे प्रसिद्ध केली, शिवाय जदुनाथांनी प्रसिद्ध केलेल्या महादजी शिंद्यांच्या पंचखंडात्मक पत्रव्यवहाराची मूळ मराठी कागदपत्रेही सरदेसाईंनी याच काळात प्रसिद्ध केली. सरदेसाईंनी किती कागदपत्रे प्रसिद्ध केली हे दाखवण्यासाठी मी हे आकडे देत नाहीये. खरा मुद्दा तर पुढेच आहे. आपण कष्टाने, काही वर्षे खर्ची घालून एखादं काम पूर्ण करतो, आणि अखेरीस दमून लेखणी खाली ठेवतो. त्यात काही बदल असले तरीही ते लगेच करायला आपण धजावत नाही. पण सरदेसाईंची इतिहासाप्रती असलेली श्रद्धा अशी की आपण लिहिलेल्या रियासतीत काही त्रुटी आहेत, आणि आता नव्या कागदपत्रांत नवा इतिहास सापडला आहे असं पाहून सरदेसाईंनी चक्क आपणच लिहिलेलं जुनं लिखाण बदलून रियासतीचे संबंधित भाग नव्याने लिहून काढले. आता मराठी रियासतीचे आठ खंड झाले होते. आजही, मराठ्यांच्या इतिहासाशी निगडित काम करू इच्छिणाऱ्या कोण्याही अभ्यासकाला मराठी रियासत वगळून काम करणं शक्य नाही यातच रियासतकारांचं यश आहे. वासुदेवशास्त्री खरे यांनीही मिरजेतून प्रचंड खटातो करून पेशवाईच्या उत्तरकाळातली, विशेषतः पानिपतच्या नंतरच्या घडामोडी सांगणारी सारी कागदपत्रे पटवर्धन दफ्तरातून वेगळी काढून ती प्रसिद्ध केली. या कागदपत्रांचे एकंदर पंधरा खंड भरले, अन ते 'ऐतिहासिक लेखसंग्रह' या नावाने प्रसिद्ध करण्यात आले. 

या साऱ्या इतिहास संशोधकांनी मागच्या शतकात प्रचंड काम करून ठेवलं आहे. इतकं, की आजही बहुतांशी इतिहासकार यांच्याच कामावर गुजराण करून त्यातूनही नवनवीन दुवे सादर करत असतात. या साऱ्या मंडळींचं काम इतकं अफाट आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनात यातलं दहा टक्के काम जरी आपण करायला गेलो तरी आपल्याला ते जमेल का नाही अशी शंका येते. स्वतः राजवाड्यांनी केवळ इतिहास मांडला नाही, तर त्या इतिहासाची मांडणी कशी करायची, संशोधन कसं करायचं इत्यादी बाबतीतही नव्या पिढीला मार्गदर्शन केलं आहे. 

एकविसाव्या शतकातील इतिहास संशोधन 

इतिहास संशोधनाची ही परंपरा सुरु झाल्यापासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरु आहे हे इथे विशेषत्वाने सांगावं वाटतं. काळ बदलला, तशी इतिहास संशोधनाची पद्धतीही बदलली, पण इतिहास संशोधनाचा मूळ गाभा मात्र अजूनही टिकून आहे. मी आज माझ्या पिढीकडे पाहतो तेव्हा माझ्या आसपास अनेक इतिहास संशोधक-संकलक मला आढळून येतात. बाबासाहेबांसोबतच मागच्या, किंवा त्याही एक पिढी आधीचे इतिहास संशोधक आम्हाला गुरु म्हणून लाभले हे खरंतर आमचं भाग्य आहे. यात निनादराव बेडेकर होते, डॉ. सदाशिव शिवदे होते. अजूनही गजाननराव मेहेंदळे आहेत, पांडुरंग बलकवडे आहेत आणि असे अनेक. या साऱ्यांचे ग्रंथ आपल्या परिचयाचे आहेतच. आत्ताच्या काळात सूत्रबद्ध अन मालिकाप्राय लेखन करणाऱ्या इतिहास संशोधकांचं नाव घ्यायचं झालं तर सगळ्यात अग्रणी असतील ते डॉ. उदय कुलकर्णी. निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या डॉ. कुलकर्णींनी गेल्या दहा वर्षात अठराव्या शतकातील इतिहासाची उजळणी करत सात ग्रंथ लिहिले आहेत. यातले सारे इंग्रजीत असले तरीही काहींची मराठी भाषांतरेही झाली आहेत. रियासतकारांच्या काळी जेवढी साधने उपलब्ध होती, अन जेवढी त्यांनी शोधून काढली त्यावर मराठी रियासत उभी राहिली. पण पुढच्या साठ-पासष्ट वर्षांच्या कालखंडात जितकी साधने उपलब्ध झाली आहेत त्याच्या आधारे जणू काही या नव्या काळातील रियासतीच डॉ. कुलकर्णी लिहीत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. डॉ. अविनाश सोवनी हे आणखी एक संशोधक, विशेषतः नगररचना, वास्तुरचना इत्यादी गोष्टींवर डॉ. सोवनींनी पुष्कळ लिखाण केलं आहे. जुन्या ऐतिहासिक बखरी एकत्र करून त्यांचे खंड पुनर्प्रकाशित करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या अजित पटवर्धन आणि डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी ऐतिहासिक कागदपत्रे मूळ मोडी तसेच देवनागरी अशा दोन्ही स्वरूपात प्रकाशित करण्याची नवी परंपरा घालून दिली आहे. मोडी लिपीसोबतच फारसी भाषेचं महत्व आणि त्याची उपयुक्तताही आजच्या संशोधकांना प्रकर्षाने जाणवू लागली आहे, आणि यात कागदपत्रे प्रसिद्ध करणाऱ्यांमध्ये दोन तरुण संशोधकांची नावं आवर्जून घ्यावी लागतात ती म्हणजे मनोज दाणी आणि रोहित सहस्रबुद्धे यांची. मनोज दाणी यांनी पानिपत विषयावर, विशेषतः फारसी साधनांवर काम केलं असून सहस्रबुद्धे यांनी मासिर-ए-आलमगिरी या मूळ फारसी ग्रंथ नव्या संदर्भांसह पुनर्प्रकाशित केला आहे. पुराभिलेखागाराच्या त्या कुबट वातावरणात काम करून मोडी कागद तपासणं किती जिकिरीचं काम आहे हे मला चांगलं माहीत आहे. या अशा परिस्थितीतही राज मेमाणे यांच्यासारख्या संशोधकांनी शेकडो कागदपत्रे आपल्या पुस्तकांतून प्रसिद्ध केली आहेत. केवळ लेखांचं नव्हे, तर अनेक उत्तम वक्तेही आपल्याकडे आहेत, असंच एक नाव माझ्या डोळ्यांपुढे पहिलं येतं ते गणेश धालपे यांचं. बाबासाहेबांच्या सान्निध्यात शिकून जणू त्यांचाच वारसा पुढे चालवणाऱ्या गणेशरावांनी कित्येक व्याख्याने आणि पुस्तकातून इतिहास गावोगावी पोहोचवला आहे. आत्ताच्या अगदी कमी वयाच्या तरुणांनाही इतिहास संशोधन भुरळ पाडतं आहे. अगदी नुकतंच सांगायचं तर प्रथमेश खामकर नावाच्या अत्यंत तरुण अभ्यासक मित्राने प्रतापगडच्या युद्धाविषयी काही नव्या पैलूंवर चर्चा करत आपलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. अनेक अनेक आहेत, किती नावं सांगू? इतिहास हा अजूनही खुणावतोच आहे. मलाही त्याने असंच वेडं केलं होतं. 

मी इतिहासाकडे वळलो ते अगदी अपघाताने. नौसेनेत जाण्याचं स्वप्नं काही कारणास्तव भंगलं, अन मन रमवण्यासाठी काहीतरी वाचायचं म्हणून मी इतिहास वाचत गेलो, त्यातून आवड निर्माण होत गेली. सुरुवातीला, म्हणजे अगदी शाळेच्या वयात मी स्वतःही रणजित देसाईंच्या 'श्रीमानयोगी', शिवाजी सावंतांच्या 'छावा' आणि इनामदारांच्या 'राऊ' ने पूर्णपणे इतिहासाच्या धुंदीत गेलो होतो. इतकं, की या कादंबरीकारांनी उभी केलेली काल्पनिक पात्रंही खरी वाटावीत. पण ज्याप्रमाणे एखाद्या मूर्तीसाठी मूर्तिकार, मातीच्या भांड्यासाठी कुंभार कसलेला असावा लागतो त्याप्रमाणे आपल्यालाही योग्य मार्गदर्शन मिळायला गुरुही तसाच असावा लागतो. शाळेच्या वयातच सुरुवातीला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं 'राजाशिवछत्रपती' हाती आलं, आणि आधी वाचलेल्या श्रीमानयोगीच्या आधारे ज्या कल्पना मनात केल्या होत्या त्या साऱ्या कल्पनांना सुरुंग लागला. सातवी-आठवीत असताना पहिल्यांदा बाबासाहेबांना पीसीओवरून फोन केला आणि पंधरा मिनिटं माझ्या बालसुलभ शंका दूर करून घेतल्या. वास्तविक, कोणी अनोळखी मुलगा दुपारच्या वेळेत आपल्याला फोन करून पोरकट शंका विचारतोय म्हणून एखाद्याने फोन तत्क्षणी बंद केला असता. पण बाबासाहेबांनी असं केलं नाही! आणि नेमकं इथेच सारं चित्र पालटलं. मी घरी आल्यावर माझ्या मनातल्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. बाबासाहेब फोनवर एकच म्हणाले, "बाळ, सगळं सांगता येणार नाही, असं करा, कधीतरी पुण्याला माझ्या घरी येऊन भेटा". अर्थात, बाबासाहेबांची प्रत्यक्ष भेट घडायला पुढची जवळपास पाचेक वर्ष, आणि त्यांच्या घरी जाऊन इतिहासावर चर्चा करायला जवळपास २०१२ साल उजाडलं. पण, नंतरच्या काळात त्यांच्याकडून इतिहासाविषयी जे जे ज्ञान मिळत गेलं ते खंडीभर पुस्तकं वाचूनही मिळालं नसतं. ज्या काळात मला मोडी शिकण्यासाठी बाहेर काही मार्ग नव्हता त्या वेळी मी तोडकंमोडकं मोडी लिहून बाबासाहेबांना पत्रं लिहीत असे, अन पुण्याला गेल्यावर त्यांच्याकडून काय चुका झाल्या ते समजत असत. एरवी आम्ही 'इतिहासाच्या पाऊलखुणा'ची मंडळी पुरंदरेवाड्यावर गेल्यावर अगदी जमिनीवर फतकल मारून बाबासाहेबांशी झालेल्या गप्पांमधून जे काही शिकलो त्याची जोड कोणत्याही मुद्दा हा, की इतिहासातल्या अनेक प्राथमिक गोष्टी, साधनांचा अभ्यास, नेमकं काय वाचलं पाहिजे वगैरे ज्ञान बाबासाहेबांकडून योग्य वयात मिळालं, आणि कदाचित माझ्या पिढीतील कादंबरीवाचकांसारखा मीही वाहवत जाण्यापासून वाचलो. 

इ.स. २०१५ मध्ये बाबासाहेबांच्या आणि निनादरावांच्या कामामुळे प्रभावित झालेल्या आम्ही काही तरुण मंडळींनी, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 'इतिहासाच्या पाऊलखुणा' हा समूह सुरु केला. 'अभ्यासोनि प्रकटावे, ना तरी झाकोनि असावे' हे समर्थ रामदासस्वामींचं ब्रीद आम्ही नजरेसमोर ठेऊन 'पुरावे नाहीत तर इतिहास नाही' ही आमच्या गुरूंची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न केला, जो आजही तसाच सुरु आहे. समोरचा कोणी 'इतिहास' म्हणून एखादी गोष्ट सांगत असेल तर आपलं पहिलं कर्तव्य हे त्या व्यक्तीला पुरावे विचारण्याचं आहे. जर ती व्यक्ती पुरावे देऊ शकत नसेल, तर ती व्यक्ती कितीही जवळची असो, त्या कथनाला इतिहास म्हणता येऊ शकत नाही. प्रसिद्ध बंगाल इतिहास संशोधक सुरेंद्रनाथ सेनांचं एक वाक्य आहे, "इतिहासकारांची किंमत केवढी? तर त्याने दिलेल्या पुराव्या एवढी!" याच हेतूने आम्ही प्रेरित होऊन पाऊलखुणा हा समूह सुरु केला. आज हा समूह शासन दरबारी नोंदणीकृत आहे. एखाद्या किल्ल्यावर कोजागिरीच्या रात्री त्या किल्ल्याविषयी आणि इतरच इतिहासाविषयी गप्पा मारणे, इतर कार्यक्रम घेणे, पुस्तके प्रकाशित करणे आदी अनेक उपक्रम आम्ही सुरु केले आहेत. आमच्यापैकी कोणीही इतिहासाचा पदवीधारक नाही. आमचे व्यवसाय आणि पोटापाण्याचे उद्योगधंदे वेगळे आहेत. पण शेवटी, या पलीकडे जाऊन इतिहासाविषयीची आस्था म्हणून आम्ही हा समूह सुरु केला, आणि समाजमाध्यमांवर आज आमच्या सोबत साठेक हजार लोक जोडले गेले आहेत. व्यक्तीकरित्या माझा अभ्यास हा मराठ्यांच्या इतिहासाविषयी, विशेषतः अठराव्या शतकाभवती रुंजी घालत असल्याने माझी दहाही पुस्तके याच विषयाशी निगडित आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणाशी जोडलेल्या जवळपास प्रत्येकाचं इतिहासाप्रती काही ना काही योगदान आहे. आमच्या रोहित पवार यांनी Foreign Biographies of Shivaji हा ग्रंथ मराठीत अनुवादित केला आहे. आमचे पाऊलखुणांचे संकेत कुलकर्णी हे लंडनमध्ये राहून मराठ्यांच्याच नव्हे, तर इतरही इतिहासाविषयी काम करत आहेत. आपला व्यवसाय सांभाळून ब्रिटिश लायब्ररीत नित्यनेमाने जाऊन तिथली कागदपत्र तपासणं आणि त्याचा जास्तीतजास्त वापर कसा करता येईल हे पाहणं हे काम मोठं आहे. इ.स. २०१७ मध्ये पुनर्प्रसिद्ध केलेल्या शिवरायांनी समर्थांना दिलेल्या चाफळ सनदेचा फोटोझिंको त्यांना सापडला नास्ता तर हा पुरावा पुढची कित्येक वर्षे कदाचित अंधारातच राहिला असता. पाऊलखुणाच्या सौरभ वैशंपायन, शुभंकर अत्रे, तुषार माने, डॉ. सागर पाध्ये यांचं लिखाणही 'इतिहासाच्या पाऊलखुणा' या पुस्तकांच्या मालिकेत प्रसिद्ध आहेच, शिवाय आम्ही साऱ्यांनी वेगवेगळी क्षेत्र आणि कालखंड घेऊन त्यावर काम करण्याचं ठरवलं आहे. थोडक्यात, अगदी रामायण-महाभारताच्या काळापासून ते अगदी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामपर्यंत कोणताही इतिहास असेल, तो आमच्यापैकी कोणा ना कोणालातरी अवगत असावा. एकंदरीतच, माझी आजची पिढी इतिहासाच्या बाबतीत सुद्न्य आहे, विचारी आहे याचा मला आनंद आहे. काही बाबतीत जेव्हा बाहेर विसंगती आढळते तेव्हा ही सारी सुद्न्य मंडळी हिरीरीने पुढे येऊन सत्याची बाजू घेत असतात.  

इतिहास संशोधनाची शास्त्रशुद्ध पद्धत अन नव्या पिढीचे संशोधक

इ.स. १९१६ मध्ये इतिहासाचार्य राजवाड्यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनाची सद्यस्थिती' नावाचा १७ पृष्ठांचा एक विस्तृत निबंध इतिहास आणि ऐतिहासिक या मासिकात क्रमशः प्रसिद्ध केला. या निबंधाच्या सुरुवातीलाच राजवाड्यांनी तत्कालीन उपलब्ध असलेल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांची एक सूची दिली असून पुढे राजकीय, लष्करी व आरमारी, आर्थिक, वाङ्मय, धार्मिक-देवधार्मिक, शास्त्रीय, आणि कलिक (कलेशी संबंधित) इतिहासाशी संबंधित झालेल्या संशोधनाची तत्कालीन स्थिती दर्शवली आहे. याच निबंधात पुढे राजवाडे लिहितात, "वीस वर्षांपूर्वी जे संशोधन झाले ते बखरी वगैरे प्राथमिक स्वरूपाचे झाले. वीस वर्षांच्या राबत्याने, सरावाने व अनुभवाने संशोधनाचा धोत नुसता पन्नास पट फुगला इतकेच नव्हे, तर संशोधनाचे अनेकशाखात्व प्रतितीस येऊ लागले व सरसनिरस भेदात्मक अभिरुची ही शुद्ध, परिपक्व व अभिजात बनत चालली. आत ओबडधोबड व भोंगळ भाकडकथांनी आता नवशिक्या संशोधकही हुरळून जात नाही. प्रामाण्याला जो दस्तऐवज परिक्षांती शंभर नंबरी उतरेल तो व तेवढा मान्य व विश्वात्स्य समजण्याची प्रवृत्ती फैलावत चालली आहे. ती इतकी की, मराठीत दस्तऐवजांची परीक्षा करण्याचे एक शास्त्रच निर्माण होण्याचा रंग दिसतो. तसेच, आप्तप्रामाण्यालाही आता कोणी भीक घालत नाही. अमुक रावबहादूर अमुक म्हणतो आणि तमुक युरोपिअन तमुक म्हणतो असल्या आचारांची मातब्बरी बिलकुल उरली नाही. सत्यांश काय की, धोत, अभिरुची, विस्तार व प्रामाण्य या चार बाबींत संशोधनाची इयत्ता सद्यकाळी बऱ्याच उच्च दर्जाची झाली आहे."

राजवाड्यांच्या सोबतीने काम करणाऱ्या अन परममित्र असलेल्या शंकर श्रीकृष्ण देव यांनी 'संशोधक कसा असावा?' या नावाचा एक निबंध इतिहास आणि ऐतिहासिक याच मासिकात प्रसिद्ध केला. या लेखात एका उत्तम संशोधकाच्या ठिकाणी काय गुण असावेत हे अकरा मुद्द्यांत देवांनी विशद केलं आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे राजवाड्यांनी 'दस्तावेजांची परीक्षा करण्याचे शास्त्र निर्माण करण्याविषयी' जो काही मनोदय व्यक्त केला आहे तो त्यांच्याच एका शिष्याने पुढे सिद्धीस नेला. हे शिष्य म्हणजे वासुदेव सीताराम बेंद्रे. बेंद्रेंनी 'साधनचिकित्सा' हा ग्रंथ प्रसिद्ध केला, आणि ग्रंथात ठिकठिकाणी 'गुरुवर्य राजवाडे' यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळालेली शिकवण उद्धृत केली आहे. राजवाड्यांनी स्वतः अनेक बाबतीत आपल्या प्रस्तावनांमध्ये आणि लेखांमध्ये शास्त्रशुद्ध संशोधन कसं करावं याचं कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे दर्शन घडवलं आहे. साधनं म्हणजे नेमकी काय असतात, त्यांचे प्रकार नेमके कोणते, ती कुठे-कशी सापडतात, त्यातली किती खरंच विश्वासार्ह असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या संशोधकाने कशा पद्धतीने त्या साधनांचा वापर करायला हवा अशा महत्वाच्या अनेक मुद्यांवर बेंद्रे यांनी विस्तृतपणे भाष्य केलं आहे. बेंद्रेंचा हा ग्रंथ म्हणजे आत्ताच्या काळात सांगायचं तर एखाद्या नवशिक्या इतिहास संशोधकासाठी Standard Operating Procedure आहे. पुरावे म्हणजे नेमकं काय, अन त्यांची विश्वासार्हता ठरवून मग इतिहासाची मांडणी कशी करायची हे मूलभूत तत्व कोण्याही इतिहास संशोधकाला अवगत असावं लागतं. या सगळ्या पायाभूत मुद्द्यांची माहिती आपल्याला साधनचिकित्सा या ग्रंथातून मिळते. बेंद्रे यांनी हा ग्रंथ लिहिला तो पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक म्हणून. त्यांच्या समकालीन आणि पूर्वीच्या पिढीतील साऱ्याच इतिहास संशोधकांनी हा मार्ग अवलंबला होता. 

नव्या पिढीच्या इतिहास संशोधनाच्या पद्धती या बहुतांशी मूळ पायावरच उभारलेल्या असल्या तरीही त्यात कालानुरूप बदल झालेला अगदी सहजगत्या दिसून येतो. पूर्वीचे इतिहास संशोधक हे कायम इतिहासालाच वाहून घेतले असल्याने, अन तत्कालीन गरजाही कमी असल्याने त्या त्या पद्धतीनुसार काम करत. आज मात्र तंत्रज्ञान पुढे गेलं आहे. ज्याला पुरावे म्हणता येतील अशी असंख्य कागदपत्रे आज इंटरनेटवर एका क्लिकच्या साहाय्याने आपल्यासमोर येऊ शकतात. अनेक वस्तुसंग्रहालयांची उभारणी झाली आहे जिथे आपल्याला जुने शिलालेख, वा इतर साधने पाहता येऊ शकतात. स्वातंत्र्यानंतर, किंबहुना इंग्रजी आमदानीतच शेवटच्या काळात आपल्याकडे पुराभिलेखागारे निर्माण करण्यात आली. या या प्रांतिक पुराभिलेखागारांमध्ये त्या त्या प्रांताच्या इतिहासाशी निगडित कागदपत्रे व्यवस्थित जपून ठेवलेली असतात. पूर्वीच्या संशोधकांना दारोदारी उंबरे झिजवून कागदपत्रे गोळा करावी लागत ती परिस्थिती आता नाही. या पुराभिलेखागारांमध्ये, सगळं नसलं तरी बऱ्यापैकी सूचिकरण झालं असल्याने एखाद्या संशोधकाला तिथे जाऊन नेमक्या कोणत्या रुमालात कोणता कागद मिळेल याचा अंदाज येतो आणि त्यामुळे त्याला अपेक्षित असलेलं संशोधन झटपट होतं. 

आज अशा काही वेबसाईट्स आहेत जिथे जुने संदर्भ आणि साधनग्रंथ सहजपणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही मोफत आहेत, काही ठिकाणी पैसे भरून वाचनालयाप्रमाणे वाचावे लागतात. यात सगळ्यात महत्वाची आणि संशोधकांसाठी Encyclopedia म्हणता येईल अशी, सगळ्यात मोठा डेटाबेस असलेली साईट म्हणजे archive.org. या साईटवर जगभरातील अत्यंत दुर्मिळ, महत्वाची अशी अनेक भाषांमधली पुस्तके, पुष्कळ ध्वनीचित्रफिती वगैरे उपलब्ध आहेत. मराठ्यांच्या इतिहासाशी निगडित अनेक दुर्मिळ पुस्तकं आज आपल्याला इथे पाहायला मिळतात. आपण ती पीडीएफ स्वरूपात इथून डाऊनलोडही करू शकता. याही पुढे जाऊन अत्यंत महत्वाचं म्हणजे यात टेक्स्ट ऑप्शन असल्याने Ctrl+F करून आपल्याला हवा तो किवर्ड वापरून हवा तो मजकूर शोधणं सोपं होतं. यासोबतच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने सुरु झालेली samagrarajwade आणि rajwade.com ही दोन्ही संकेतस्थळं अत्यंत महत्वाची आहेत. समग्र राजवाडे या साईटवर राजवाड्यांची सारी ग्रंथसंपदा टंकलिखित करण्यात आली असल्याने तिथे तर आपल्याला हवं ते पत्रं, हवा तो लेख वगैरे चुटकीसरशी मिळू शकतं. याशिवाय भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आदी इतरही संस्थांच्या डिजिटल लायब्ररीज आपल्यासाठी खुल्या आहेत. नवे, ताज्या दमाचे इतिहास संशोधक या साऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी प्रभावी पद्धतीने, अत्यंत कमी वेळात इतिहास संशोधन करू शकत आहेत ही खरंतर तंत्रज्ञानाची कमाल आहे.

माझ्या पिढीच्या अथवा ताज्या दमाच्या इतिहास संशोधकांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या साऱ्या इतिहास संशोधकांचं काम आम्हाला आज उपलब्ध झालं आहे, आणि त्यातल्या चुका, जर काही झाल्या असतील तर, अन त्यातलं जे जे काही चांगलं आहे त्याची सांगड आम्ही आज घालू शकतो. अगदी उदाहरणच सांगायचं तर, इतिहासाचार्य राजवाडे यांची अनेक मतं ही अत्यंत टोकाची होती. अर्थात, याचा दोष राजवाड्यांकडे जात नाही कारण त्यांना उपलब्ध असलेल्या साधनांवरून त्यांनी इतिहासाचं विवेचन मांडलं. पुढे सरदेसाईंनी हजारो नवी कागदपत्रे शोधली तेव्हा राजवाड्यांच्या अनेक विधानांचा त्यांनी पुराव्यानिशी समाचार घेतला. पुढे सरदेसाईंच्या नंतरही अनेक कागदपत्रे उजेडात आली आणि हे सारं आज आम्हाला उपलब्ध आहे. यामुळेच, नवे संशोधक या प्रत्येकाचं काम पाहून, त्याच योग्य पद्धतीने विश्लेषण करू शकतात, आणि एखाद्याने मांडलेला इतिहास जर नव्या पुराव्यांनिशी चुकीचा ठरत असेल तर ते खुलेपणाने मांडू शकतात. प्रत्येक इतिहास संशोधकाचं हे कर्तव्य आहे, की आधीच्या लिखाणात काही वावगं आहे असं आढळल्यास ते योग्य त्या पुराव्यानिशी दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो. साधारण २०१९ साल असेल, एका ज्येष्ठ अन नावाजलेल्या इतिहास संशोधकांनी 'बाजीरावाने आयुष्यात केवळ दोनच लढाया लढल्या' असं विधान केलं. आता त्यांनी ते विधान कदाचित खाजगीत केलं असेल, पण त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींनी ते वाऱ्यावर सोडून दिलं. मला ही गोष्ट खटकली. वास्तवात, बाजीरावांच्या इतक्या लढाया आणि तपशील उपलब्ध असताना केवळ दोनच लढाया कशा काय असू शकतात? यावर मी एक लेख लिहायला घेतला होता, पण लवकरच असं लक्षात आलं की हे लिखाण मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच आहे. अखेरीस चार-आठ-सोळा पानं करता करता चक्क साडेतीनशे पानं लिहून झाली. बाजीरावांशी निगडित प्रकाशित असलेलं पान अन पान वाचून मी बाजीरावांच्या युद्धपद्धतीवर हे पुस्तक लिहिलं. बाजीरावांनी आयुष्यात तेवीस लढाया लढल्या याची यादीच मी परिशिष्टात दिली, अन संपूर्ण पुस्तकात जवळपास चारशेहून अधिक पुरावे दिले. हे देताना त्या इतिहास संशोधकांवर वैयक्तिक राग वगैरे असण्याचं काहीच कारण नव्हतं, पण पुढे त्यांचं हे मत त्यांची लोकप्रियता पाहून सगळेच खरं मानतील, अन तसं होऊ नये म्हणून वेळीच जे सत्य आहे ते मांडणं गरजेचं होतं. म्हणूनच, वाचक म्हणूनही तुम्ही तितकंच सजग असणं गरजेचं असतं.

अनेकदा उपलब्ध असलेल्या साधनांचे अर्थ प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकते. ही मतमतांतरं पूर्वीही होती, आजही आहेत, आणि पुढेही सुरु राहतील. पण, ही मतमतांतरं होत असताना जास्तीतजास्त पुराव्यांची चारचा होणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ आणखी एक गंमत सांगतो. मदारी मेहतर हे पात्रं इतिहासात असल्याचा एकही ठोस पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही. एकच संदिग्ध कागद साताऱ्याच्या राजोपाध्यांच्या घराण्यात सापडला जो पुढे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या एका त्रैमासिकात प्रसिद्ध झाला. या कागदात मदारीविषयी ज्या काही कविकल्पना आहेत त्याला दुसऱ्या कोणत्याही ऐतिहासिक कागदात दुजोरा मिळालेल्या आढळत नाही, किंबहुना या कागदात असलेल्या अनेक ऐतिहासिक चुका या कागदविषयीच संशय निर्माण करतात. निःसंशय हा कागद उत्तरकालीन आहे. पण या एकाच कागदाला विश्वासार्ह मानून अनेक ज्येष्ठ अन नामांकित इतिहास संशोधकांनी मदारीची ही कथा खरी मानली. अगदी सभासदांसारखा माणूसही 'एक पोरगा' म्हणून ज्याचा उल्लेख करतो, ज्याचं नाव गाव इतर कोणीही दिलेलं नाही त्या एका व्यक्तीची माहिती उत्तरकालीन कागदात येणं हे विश्वासार्ह नाही. पण अनेकांनी ही गोष्ट खरी मानली अन निनाद बेडेकरांसारख्या काही संशोधकांनी मात्र याला कडाडून विरोध केला. अशा अनेक गोष्टी आहेत. जुन्या अभ्यासकांनी कदाचित त्यांची मतं एखाद्या कागदावर आधारित तयार केली असतील, पण नव्या संशोधकांनी डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. अन मला हे सांगायला अभिमान वाटतो, की आजही नवे संशोधक जुन्या संशोधकांच्या गोष्टी, ते संशोधक कितीही वंदनीय असले तरीही, पुरावे नसल्यास जशाच्या तशा स्वीकारायला तयार होत नाहीत.

माझ्याही बाबतीत असाच एक प्रसंग घडला होता, पण अर्थात त्या प्रसंगाकडे मी वेगळ्या दृष्टीने पाहतो. शिवशाहीर बाबासाहेबांना मी माझे गुरु मानतो. पण एका बाबतीत बाबासाहेबांची मतं मला पटली नाहीत. कृष्णाजी भास्कर हा अफजलखानाचा वकील शिवाजी महाराजांनी सोडून दिला, त्याला ठार मारलं नाही असं सारे पुरावे सांगतात. पण केवळ वाईच्या यादिनाम्यांच्या आधारावर काही ज्येष्ठ संशोधक मंडळींनी 'शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कराला मारलं' असं आपापल्या शिवचरित्रात म्हटलं आहे. मी जेव्हा शिवकालीन उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रे ताडून पाहिली तेव्हा एकाही मराठी कागदात कृष्णाजी भास्कराला मारलं असल्याचं मला आढळलं नाही, किंबहुना शिवभारतासारख्या अत्यंत महत्वाच्या पुराव्यात महाराजांनी कृष्णाजीला मारण्याची इच्छा दर्शवली नाही असं स्पष्ट दिलंय. इतरही बखरींमधून कृष्णाजीला जिवंत सोडलं असं दिलं आहे. ही बाब मी बाबासाहेबांच्या नजरेला आणून दिल्यावर बाबासाहेब जे म्हणाले ते मला अजूनही स्पष्ट आठवतंय- "बाळ, मला मी मांडलेला पुरावा महत्वाचा आणि योग्य वाटतो. पण म्हणून तुम्हालाही तो योग्य वाटावाच असा माझा आग्रह नाही. तुम्ही तुमचं लिखाण अवश्य मांडा, पुराव्यानिशी मांडा. वाचक दोन्ही गोष्टी पाहून त्यातून जे पटेल ते घेतील". कोणी म्हणेल हे वाचकांना अधांतरी ठेवण्यासारखं झालं. पण मला मात्र यात बाबासाहेब हिमालयाच्या उंचीचे का होते याची साक्ष पटते. वास्तविक मी एक सामान्य अभ्यासक, असं असतानाही बाबासाहेबांसारख्या अत्युच्च पातळीवर पोहोचलेल्या संशोधकाला मला सहज झिडकारता आलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. उलट मला आणखी चालना दिली आणि नवनवीन मांडणी लोकांसमोर कशी येईल याचा ते विचार करत राहिले. मी माझ्या ब्लॉगवर आणि इतरत्र प्रसिद्ध केलेला हा लेख मागे घेतो असं म्हटल्यावर त्यांनी "असं अजिबात करू नका" असं काहीशा प्रेमळ जरबेनं दटावलं. जुन्या संशोधकांनी आम्हाला, या नव्या पिढीला दिलेला हा वारसा आहे. इतिहास संशोधन हे निगर्वीपणे व्हायला हवं, तिथे अहंकार आड येता कामा नये ही ती शिकवण होय. 

आज नव्या इतिहास संशोधकांसमोर आव्हानं भरपूर आहेत. आज जातीय अस्मिता अत्यंत टोकदार झाल्या आहेत. ऐतिहासिक तथ्य मांडायचं म्हटलं की कोणा ना कोणा जातीच्या लोकांना तो त्यांच्या संबंध जातीवर केलेला अत्याचार वाटतो, अन मग इतिहास राहतो बाजूलाच, निव्वळ आणि निव्वळ राजकारण सुरु होतं. राजकीय व्यक्ती या सगळ्याचा फायदा घ्यायला तापलेल्या असतातच. पण असं असलं तरीही आज ज्या मोठ्या संख्येने तरुण वर्ग इतिहास संशोधनाकडे वळतो आहे ते पाहून मात्र अंधारावर मात करत असलेला प्रकाश जास्त शक्तिशाली असल्याचं जाणवतं. या व्यतिरिक्त, आत्ताच्या काळात माझ्या दृष्टीने आपलं काम पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सगळ्यात मोठ्या आहेत. प्रत्येक संशोधकाकडे आपलं संशोधन पुस्तकरूपात मांडण्याइतका पैसा नसतो, आणि सारेच प्रकाशन व्यावसायिकही पूर्वीसारखे ध्येयवेडे राहिले नसल्याने अनेकदा लेखकांची फसवणूक होण्याचीच शक्यता जास्त असते. अर्थात हे सरसकटीकरण नाही. माझ्या माहितीत असे अनेक प्रकाशक अत्यंत उत्तम असून नवनव्या लेखकांना कायम प्रोत्साहन देत असतात. पण लेखकाचं संशोधन आणि प्रकाशनाच्या किमती इत्यादी पाहता जितकं सुलभपणे ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं तितकं सुलभ पोहोचत नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. पण या अशा मोजक्या गोष्ट सोडल्यास, बाकी इतर परिस्थिती ही नव्या संशोधकांना अनुकूल अशीच आहे.     

श्रोते आणि वाचकांचं कर्तव्य

जिथे चांगल्या गोष्टी आहेत तिथे वाईट गोष्टीही ओघाने येतातच. पूर्वीच्या तुलनेत म्हणायचं झालं तर इतिहास हा विषय हल्ली राजकारण्यांच्या मदतीसाठी असलेलं एक साधन झाला आहे हे जितकं खरं, तितकंच, ज्यांना इतिहासाविषयी आस्था आहे त्यांनी दुर्लक्ष केल्याने इतिहासाची जास्त वाताहात होत आहे हेही तितकंच खरं. पूर्वी बखरकारांनी बऱ्याच बाबतीत मीठ-मसाला लावून काहीही भाकडकथा पेरून आपलं लिखाण तत्कालीन समाजात प्रसिद्ध करवलं. याच बखरकारांनी री पुढे काही कादंबरीकारांनी ओढली, आणि आपल्या कादंबरी-नायकाचं चांगलं चित्रं रंगवण्याचा नादात त्या व्यक्तीच्या काळ्या बाजूलाही घासूनपुसून स्वच्छ करत लोकांसमोर ठेवलं. आता कोणी म्हणेल की कादंबरी हा स्वतंत्र वाङ्मयप्रकार आहे, आणि कादंबरीकाराने काहीही लिहिलं तरी त्याचा दोष कादंबरीकाराकडे जात नाही. पण हे असं नाही. कादंबरीकार हा एका बाजूने पाहिल्यास ललित लेखक असला तरी त्याला इतिहासाशी छेडछाड करण्याचं स्वातंत्र्य कोणीही बहाल केलेलं नसतं. अर्थात, टाळी एका हाताने वाजत नाही. कादंबरीकाराच्या लिखाणाला 'इतिहास' म्हणून डोक्यावर मिरवणारेही या चुकीला तितकेच जबाबदार असतात. आपल्याकडे अनेक प्रसिद्ध कादंबरीकारांच्या इतिहासावरची कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत, पण त्या कादंबऱ्यांमधून 'लेखनस्वातंत्र्य अन स्वायत्तता' या नावाखाली अनेक कपोलकल्पित गोष्टी रचल्या गेल्या आणि पुढे मात्र त्याच गोष्टी लोकांनी 'इतिहास' म्हणून स्वीकारल्या. जुन्या काळातल्या कादंबरीकारांचं तरी एकवेळ मी समजू शकतो, कारण त्यांच्या काळी साधनं हवी तशी उपलब्ध नव्हती, पण नंतरच्या काळातल्या लेखकांना याचं भान बाळगणं अत्यंत आवश्यक होतं, अजूनही आहे.

राजवाड्यांचं आठव्या खंडात एक प्रसिद्ध वाक्य आहे, "अस्सल कागदाचा एक चिटोराही बखरीच्या बहुमताला हाणून पडण्यास पुरेसा असतो". त्या काली बखरी होत्या, नंतरच्या काळात नाटकं आणि कादंबऱ्या आल्या. या कादंबऱ्यांवर पोसलेली जमात अल्पावधीत 'इतिहास अभ्यासक' झाली आणि मग यातून-त्यातून काही वाक्य उचलून स्वतःचे लेख म्हणून प्रसिद्ध करू लागली. हे मी माझ्याच पिढीबद्दल बोलतो आहे, फार लांब कशाला जा? आज WhatsApp आणि फेसबुक ही दोन समाजमाध्यमं आपल्या हातात इतकं रुळली आहेत की इथे कोणीही काहीही लिहिलं तरी अडवायला कोणी नाही. मग इथे अनेक जण इतिहास संशोधक असल्याचा आव आणत भलेमोठे लेख पुराव्यांना अक्षरशः अडगळीत टाकून लोकांसमोर मांडतात, अन यादीतला एक नासका आंबा इतरांना नासवतो तद्वत ते अगाध ज्ञान इतरांच्या गळी उतरवतात. दुसरा अत्यंत विषारी किडा सध्याच्या पिढीला लावलाय तो म्हणजे जात्यंध होऊन दुसऱ्या जातीच्या महापुरुषांची नालस्ती करण्याचा. यात कोणती एक जात आघाडीवर आहे अन कोणी मागे आहे असं नाही. कमीअधिक प्रमाणात सारेच यात आहेत. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याचं चारित्र्यहनन करण्याचा सोपा मार्ग समाजमाध्यमांचा रूपाने अशा व्यक्तींना मिळाला आहे आणि त्याचा ते पुरेपूर वापर करत आहेत. मुद्दा हा, की लिहिणाऱ्याला आपण अडवू शकत नाही, पण वाचणाऱ्याच्या मनात एकदाही 'हे खरंच शक्य आहे का?' असा प्रश्नही उद्भवू नये हे दुर्दैव आहे.

इथे वाचकांना एकच सांगणं आहे ते म्हणजे, तुम्ही ज्याचं लिखाण वाचताय ताची विश्वासार्हता मुळात तपासून पहा. समाजमाध्यमांवर, मग त्यात फेसबुक-युट्युब वगैरे काही असो, आलेल्या मेसेजेसवर आणि व्हिडीओजवर चटकन विश्वास ठेऊ नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, लेखकाने आपल्या मांडणीसाठी काय पुरावे दिले आहेत ते आधी पहा. त्यातला एक जरी पुरावा मिळवून वाचता आला तरी पहा. प्रत्येक वेळेस साधनग्रंथ हाताशी असतीलच असं नाही, अशा वेळेस संदर्भग्रंथ तपासून पहा. साधनग्रंथ आणि संदर्भग्रंथ म्हणजे काय? हा प्रश्न पडला असल्यास तेही सांगतो. जी मूळ पत्रं अथवा ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट वगैरे असतात त्यांना इतिहासाची साधनं म्हणतात, ज्यातून प्रत्यक्षपणे तो इतिहास समजून येतो. अनेकदा ही साधनं वाचणं आपल्यापैकी प्रत्येकाला शक्य होत नाही. अशा वेळेस ही साधनं पुस्तकरूपाने देवनागरीत वा इंग्रजीत प्रसिद्ध झाली असतात ती वाचून पहा. आता या साधनांच्या आधारे विवेकी इतिहास संशोधक जी ग्रंथसंपदा निर्माण करतात त्यांना संदर्भग्रंथ म्हणतात. वाचकांनी या दोहोंपैकी काहीही वाचून मगच आपलं मत बनवावं. उगीच वाचायला छान वाटतं म्हणून कसल्याही मीठ-मसाला लावलेल्या घटनांवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नये.

असो, फार पसारा आता आवरता घेतो, कारण हा एवढा विस्तृत लिहिण्यामागचा उद्देश एवढाच की इतिहास संशोधनाची परंपरा जुन्या, ऋषितुल्य संशोधकांनी ज्या निस्पृहपणे आपल्याकडे सुपूर्द केली त्या परंपरेला जागणं आपलं कर्तव्य आहे. नव्या पिढीने केवळ प्रसिद्धी आणि भावनिकतेच्या दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहण्याऐवजी त्याकडे 'इतिहास' अर्थात 'जसं घडलं तसं' या नात्याने पाहणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. इतिहासाचा एक साधा नियम आहे, जिथे पुरावे नाहीत तिथे इतिहास नाही. म्हणूनच, कल्हणाच्या राजतरंगिणीतील श्लोकाप्रमाणे आम्ही 'राग-लोभ-मत्सर वगैरे बाजूला ठेऊन', इतिहासाचा अभ्यास आम्ही सारे करतो आहोत, आणि समर्थांच्या 'अभ्यासोनि प्रकटावे, ना तरी झाकोनि असावे' या शिकवणीप्रमाणे आचरण करत आहोत. यात आम्ही, आयुष्याच्या अखेरच्या वळणावर असताना एक टक्का जरी यशस्वी झालो असं दिसलं तर आमच्या गुरुजनांनी पाठीवर ठेवलेल्या वरदहस्ताचं हे फळ आहे असं समजू. अजून काय लिहू? लेखनसीमा. 

© कौस्तुभ कस्तुरे

(सदर लेख मौज प्रकाशनाच्या २०२३च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.)