सुभेदार तानाजी मालुसरे यांची संगमेश्वरची लढाई
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे मराठ्यांच्या इतिहासातातील नाव सिंहगडाच्या लढाईमुळे अजरामर झाले आहे. दि. ४ फेब्रुवारी १६७० (ज्युलियन दिनांक) या दिवशी मोंगल किल्लेदार उदयभान राठोडकडून किल्ला जिंकताना तानाजी वीरगतीला प्राप्त झाले, अर्थात सिंहासारखा बलदंड सिंहगड घेऊनच स्वराज्याचा हा सिंह स्वर्गीच्या वाटेने मार्गस्थ झाला. पण, तानाजी मालुसऱ्यांची सिंहगडच्या लढाईच्या आधीची एक मोहीम, काहीशी गमतीशीर अशी, इतिहासात नोंदली गेली आहे. सिंहगडच्या जवळपास दहा वर्षे आधीची ही मोहीम इतिहास-अभ्यासक सोडल्यास क्वचितच सांगितली जाते. कोणती आहे ही मोहीम?
ही मोहीम म्हणजे साधारणतः जानेवारी १६६१ मधील कोकणची मोहीम. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर शिवाजी महाराज तळकोकणच्या दिशेने आदिलशाही मुलुखावर चालून निघाले. या वेळी स्वराज्याचे सरनौबत अथवा सेनापती असलेल्या नेतोजी पालकरांना महाराजांनी उंबरखिंडीच्या आसपास घाटवाटा अडवून ठेवायला सांगितलं. मोंगल सरदार, विशेषतः शायिस्ताखानाचे कारतलबखानासारखे सरदार आपला झालेला अपमान धुवून काढण्यासाठी पुन्हा उलटून येणारच नाहीत असं नव्हतं. त्यामुळेच, सेनापतींसारख्या माणसाची घाटवाटा अडवून ठेवायला गरज होती. तिथून भल्या पहाटे महाराज आपल्या फौजेसह तळकोकणच्या रोखाने निघाले. (शिवभारत, अध्याय २९, श्लोक- ६१ ते ६५)
या वेळेस महाराजांचं सैन्य अंदाजे पंधरा हजारांच्या आसपास होतं. या सैन्यात दोन महत्वाची माणसं असल्याचा उल्लेख मात्र निश्चित सापडतो- सुभेदार तानाजी मालुसरे आणि पिलाजी निळकंठराव सरनाईक. पिलाजी निळकंठराव म्हणजे पुरंदर किल्ल्याचे जुने गडकरी. इ.स. १६४८ मध्ये शिवछत्रपती महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या सैन्याशी पुरंदरावर लढाई लढली, तेव्हा त्याचे गडकरी निळकंठराव सरनाईक हे शिवाजी महाराजांच्या बाजूने आले. अर्थातच पुरंदरचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. निळकंठराव सरनाईक आणि शहाजीराजे यांची जुनी ओळख आणि स्नेह होता (शिवचरित्र साहित्य खंड ३, लेखांक ३९९). यावेळी स्वतः निळकंठराव हे म्हातारे झाले असून त्यांची चार मुले कर्ती होती. या चार मुलांचं आपापसात पटत नसे, पण बहुतांशी सगळेच शिवाजी महाराजांशी सख्य राखून होते असं दिसतं. यातीलच एक म्हणजे पिलाजी. दुसरे, सरदार तानाजी मालुसरे हे तर महाराजांचे लहानपणापासूनचे सवंगडीच.
महाराज आता तळकोकण जिंकायला निघायला तेव्हा निजामपूर लुटून (जेधे शकावली) ते आधी दाभोळला आले. महाराज दाभोळला आले आणि त्यांनी मधला प्रदेश जिंकून घेतला हे पाहून पालीचे जसवंतराव दळवी हे गठाबरून शृंगारपूरचे सुर्व्यांच्या आश्रयाला जाऊन बसले. शृंगारपूरकर सुर्व्यांनी सुद्धा दळवींना शिवाजी महाराजांपासून वाचवण्यासाठी आपल्याकडे आश्रय दिला. हे सुर्वे आणि दळवी म्हणजे आदिलशाही सरदार असून वर्षभरापूर्वीच सिद्दी जौहरने जेव्हा महाराजांना पन्हाळगडावर अडकवून ठेवलं होतं तेव्हा सुर्वे-दळवींच्या संयुक्त फौजांनी विशाळगडाला मोर्चे लावले होते. महाराज पन्हाळ्याहून विशाळगडावर जाताना त्यांना सुर्वे-दळवींच्या सैन्याचा वेढा फोडून गड चढवा लागला होता. महाराजांनी आत्ता या वेळेस मात्र सुर्वे आणि दळवींकडे दुर्लक्ष केलं आणि ते सैन्यासह पुढे चिपळूणला आले, तिथे भगवान परशुरामाचं दर्शन घेऊन महाराज सैन्यासह संगमेश्वर जिंकून, देवरुखमार्गे राजापूरकडे निघून गेले. जाताना गम्मत अशी झाली, की संगमेश्वर जिंकल्यावर महाराजांनी सुर्वे-दळवींना एक संधी देऊन पाहवी, ते आपलेच आहेत अशा उद्देशाने एका दूताकरवी सूर्यराव सुर्व्यांकडे निरोप पाठवला- "मी दक्षिणेकडे जात आहे. पण जाताना या प्रांताच्या रक्षणासाठी मी माझी काही फौज ठेवत आहे. तुम्ही, म्हणजे सुर्व्यांनी माझ्या या फौजेकडे व्यवस्थित लक्ष द्यावं, त्यांची देखरेख ठेवावी, जे काही पूर्वीचं वैर आहे ते सोडून द्यावं आणि माझं ऐकावं". या दुतापाठोपाठ महाराजांनी आपली काही फौज संगमेश्वराच्या मुलुखात पाठवून दिली. या फौजेचे मुख्याधिकारी होते तानाजी मालुसरे आणि पिलाजी निळकंठराव सरनाईक. (शिवभारत, अध्याय २९, श्लोक- ६८ ते ८२).
शिवभारत नावाचं आपल्याकडे एक ऐतिहासिक काव्य आहे. हे काव्य असलं तरीही हा एक प्रथम दर्जाचा पुरावा मानला जातो, कारण यातील बहुतांशी नोंदींना प्रत्यंतर पुरावे मिळतात. शिवाय, शिवभारत रचणारे कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर हे खुद्द शिवछत्रपती महाराजांच्या जवळचे असून त्यांचा उल्लेख महाराजांच्या आग्रा मोहिमेतही सापडतो. हे शिवभारतकार परमानंद तानाजी मालुसऱ्यांचा उल्लेख "मल्लसुर" असा करतात. महाराजांनी आधीच सुर्व्यांना कळवलं होतं की माझी माणसं फौजेसह इथे असतील तेव्हा त्यांची काळजी घ्या, आणि महाराज जाईपर्यंत तरी सुर्व्यांनी काहीही हालचाल केली नव्हती. पुढे, महाराजांनी राजापूरपर्यंतचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला ही बातमी विजापूरला पोहोचली तेव्हा आदिलशहाचा तिळपापड झाला. आदिलशहाला हे देखील समजलं की सूर्यराव सुर्व्यांनी खुद्द शिवाजी महाराज फौजेसह शृंगारपूरजवळून जात असताही त्यांना विरोध केला नाही अथवा त्यांच्यावर हल्ला चढवला नाही. आदिलशहाने सुर्व्यांना एक पत्रं लिहून म्हटलं, "तो आमचा उघड शत्रू राजापुरावर चालून जात असता त्यास त्या दुर्गम अरण्यमार्गात तू अडवले नाहीस. बरे, ते राहो. आता तो आमचा उन्मत्त शत्रू जवळ आला आहे, तेव्हा त्यास तू कोंड". आदिलशहाचा दूत आल्यावर मात्र सूर्यराव सुर्व्यांना अवसान चढलं. महाराज आता पुन्हा तळकोकणातून उत्तरेच्या रोखानेनिघाले होते. कदाचित सुर्व्यांची प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या फौजेवर थेट चालून जाण्याची हिम्मत होत नव्हती. म्हणून महाराजांनी तानाजी आणि पिलाजींना संगमेश्वराच्या आसपास ठेवलं होतं त्यांच्यावर चालून जाण्याची योजना सुर्व्यांनी केली.
तानाजी आणि पिलाजी हे सैन्यासह यावेळी इथे काय करत होते? महाराजांनी या फौजेला एक विशेष काम दिलं होतं ते म्हणजे इथला दुर्गम मार्ग साफसूफ करून ठेवणे. होय, हे खरं आहे ! सैन्य म्हणजे कायम लढायचं असं नव्हे ना? शांततेच्या काळात सैन्याला इतरही कामं असतात. इथल्या लोकांना दुर्गम मार्ग व्यवस्थित झाल्यास फायदा होईलच, पण शिवाय, पुन्हा या प्रदेशातून आपलं सैन्य जाताना रस्ते व्यवस्थित असावेत हा सुद्धा आणखी एक उद्देश. आणि म्हणूनच, सुभेदार तानाजी मालुसरे आणि पिलाजी निळकंठराव हे आपल्या सैन्यासह इथला दुर्गम मार्ग साफ करत होते.
इकडे सूर्यराव सुर्व्यांनी आपलं सैन्य घेतलं आणि एके रात्री अचानक तानाजी-पिलाजींच्या फौजेवर हल्ला चढवला. तानाजी-पिलाजींचं पायदळ काही कमी नव्हतं, पण सूर्यरावांची फौज अचानक आरडाओरडा करत चालून आलेली पाहून या दोघांचीही फौज क्षणार्धात तयार झाली. पण या सगळ्या गदारोळात, सूर्यरावांच्या गर्जना करत येणाऱ्या सैन्यामुळे पिलाजी सरनाईकांचं अवसान गळालं. एका क्षणानंतर ते तिथून भिऊन पळून जाऊ लागले. तानाजी आणि बाकीची फौज हुशार झालेली होतीच. पिलाजी भेदरले आहेत आणि पळून जात आहेत हे तानाजींनी पाहिलं. पिलाजी पळत होते. हातातली तलवार त्यांनी केव्हाच टाकून दिली होती आणि अक्षरशः धापा टाकत ते पळत होते. तानाजींनी हे पाहिलं आणि त्यांनी वेगाने धावत जाऊन पिलाजींना गाठलं, त्यांचा हात धरला आणि अडवून त्यांचा उघडपणे धिक्कार केला. तानाजी म्हणाले त्याचा थोडक्यात मतलब असा, "या युद्धात मी तुझ्या साहाय्याला असूनही तू घाबराटसारखा पळून काय जातोस? मोठ्या खेदाची गोष्ट आहे ही. तू पूर्वी लढाईच्या ज्या काही बढाया मारत होतास, त्या तुझ्या बढाया काय झाल्या हे 'सेनापती'? अभीष्टदात्या छत्रपती शिवरायांनी अत्यंत मोठेपणा देऊन तुला माझ्यासोबत इथे पाठवलं, तुला या फौजेचा सेनापती नेमलं आणि तूच असा पळून चाललास, तुला काहीच वाटत नाही का?"
तानाजींनी पिलाजींना मागे खेचलं. आपल्या जवळ असलेल्या दोरखंडाने त्यांनी पिलाजींना अक्षरशः एका भल्या मोठ्या दगडाला बांधून ठेवलं, आणि तिथून तानाजी समोर सुरु असलेल्या लढाईत शिरले. पिलाजींना तिथे बांधून ठेवण्याचा उद्देश हाच की "बघ, युद्ध कसं करतात ते प्रत्यक्ष बघच". तानाजी अक्षरशः हाती तलवार घेऊन नाचू लागले. त्यांची तलवार जणू काही विजेच्या लोळासारखी फिरू लागली. शिवभारतकर लिहितात, "ठार केलेल्या शत्रूकडील वीरांच्या रक्ताचे पूर वाहावयास लावणारा व प्रचुरयुद्धशोभारूपी सुंदरीच्या कानातील अलंकार असा तो तानाजी मालुसरे युद्धामध्ये चमकू लागला व त्याच्या तेजाने रात्री सूर्य उत्पन्न झाला". तानाजींच्या पराक्रमाने जणू काही सूर्यतेजाचं दर्शन होतं होतं. त्यांच्या भवताली बाकीचं मराठी सैन्य देखील ढगांच्या गडगडाटालाही लाजवेल अशा प्रकारे युद्धघोष करत शत्रूशी लढत होतं. "सज्ज हो, हाण, दे, थांब, फेक, पोहोचव" इत्यादी शब्द अधूनमधून ऐकू येत होते. जमिनीवर शत्रुसैन्याच्या शरीराचा आणि अवयवांचा खच पडला होता. पाहात होऊ लागली तसतसं सूर्यराव सुर्व्यांना दिसून आलं की तानाजी मालुसरे काही मागे हटत नाहीत. शिवाय शिवाजी महाराज देखील सैन्यासह परतीच्या मार्गावर आहेत. दोघे एकत्र झाले तर आपली काही खैर नाही. आणि हे पाहून सूर्यराव सुर्व्यांनी काढता पाय घेतला. हे पाहून तानाजींना अजूनच अवसान चढलं. नगारा वाजत होता, आणि तानाजी मालुसरे देखील आनंदाने गर्जना करत होते. नंतर मात्र बांधलेल्या पिलाजींना तानाजींनी मुक्त केलं. झाली गम्मत पुष्कळ झाली.
महाराज संगमेश्वराच्या जवळ आले तेव्हा तानाजी मालुसरे सैन्यासह महाराजांना सामोरे गेले. स्वतः पिलाजींनी तानाजींच्याही पुढे जाऊन महाराजांना तानाजीचा पराक्रम इत्यंभूत कथन केला. महाराजांना सारी हकीकत समजली तेव्हा महाराजांनी तानाजींचा सन्मान केला. सूर्यरावांच्या या कृत्याने महाराज भडकले होते. पण तरीही महाराजांनी आणखी एक संधी देण्यासाठी आपला माणूस सुर्व्यांकडे पाठवला. मधल्या अवधीत महाराजांनी दळवींचं पाली जिंकून घेतलं. सूर्यराव काही आपल्याकडे येत नाही हे पाहून महाराजांनी मागे फिरून पंधरा हजार फौजेनिशी शृंगारपुरवर हल्ला चढवला. महाराज पलीकडे गेले हे पाहून सूर्यरावाने आपल्या फौजेला रजा दिली होती. महाराज परतून येतील असं त्याला वाटलं नव्हतं. आता ऐनवेळेस फौज जागेवर नाही हे पाहून सूर्यराव चक्क पळून गेला. महाराजांनी शृंगारपूर जिंकलं. यावेळेस सुद्धा अर्थातच तानाजी मालुसरे आणि इतरही सैन्य त्यांच्या सोबत असणार. पण, या संबंध मोहिमेत तानाजींची वर उल्लेखलेली लढाई विशेष गाजली. काहीशी मजेशीर असलेली, काहीशी अपरिचित असलेली.
- कौस्तुभ कस्तुरे