मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण


महाराष्ट्राला लाभलेली संतपरंपरा मोठी आहे. वारकरी संप्रदायासोबतच इतरही अनेक संप्रदाय महाराष्ट्रात गेल्या कित्येक शतकांपासून अव्याहत आणि आनंदाने चालत आलेले आहेत. पण, नीट पाहिलं तर परमार्थाशिवाय इतर कोणतीही गोष्ट महत्वाची नाही असं बहुतांशी संप्रदाय सांगतात. याला अपवाद म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला रामदासी अर्थात श्री संप्रदाय. सतराव्या शतकात संतश्रेष्ठ तुकोबारायांसारखे अनेक संत 'नाठाळाचे माथी, हाणू काठी' म्हणत होतेच, पण त्याही पुढे जाऊन समर्थांनी नाठाळांच्या माथी काठी हाणण्यासाठी नेमकं काय करावं ते सांगायला सुरुवात केली. रामदासस्वामींचं नाव 'जहाल' संत म्हणून का घेतलं जातं त्याच कारण इथे आहे.

समर्थांच्या घरात पहिल्यापासूनच सूर्योपासना आणि रामोपासना सुरु असल्याने अर्थातच, एकीकडे शरीरबल माहात्म्य आणि भक्तिमाहात्म्य त्यांच्यात मुरत होतंच. समर्थांचा जन्म झाला जांब गावात. अर्थात, या वेळेस स्वराज्याचा मागमूसही कुठे नसल्याने आसपासच्या प्रदेशात मुघल आणि निजाम-आदिल आदी इतर शाह्या कशा प्रकारे थैमान घालत होत्या हे समर्थांना दिसत होतंच. पण आपण शरीरबल वाढवतो आहोत, आणि दुसरीकडे भगवान रघुनंदन श्रीरामांचं देखील गुणगान गातो आहोत, मग या दोहोंचा उपयोग करून रामराज्य आणायला मदत का होऊ नये हा विचार समर्थांच्या मनात अवतरला नसेल तर नवल. समर्थांनी बालवयातच रामायण लिहून काढलं. पण इथे समर्थांचा राम हा अत्यंत जहाल होता असंही आपल्याला जाणवेल. श्रीराम म्हटलं की त्यांचा दास सोबत हवाच, तद्वत मारूतिरायांची उपासना ही न सांगता येतेच. समर्थांनी श्रीरामांना देव मानलं अन त्यांचे दास असलेल्या हनुमंताला आपलं गुरुबंधू! आता पुढचा प्रवास सुरु होणार होता तो या गुरुबंधुच्या सल्ल्याने आणि भगवंताच्या आशीर्वादाने.

पंचवटीच्या एका तपाच्या वास्तव्यानंतर समर्थानी पुढचं एक तप भारतभ्रमण केलं. या संपूर्ण भ्रमंतीचा उद्देश हाच, की आपल्याकडे आपण जे भोगतोय, तीच परिस्थिती इतरत्रही आहे का? कोणी उठाव करायला तयार आहे का? कोणी किमान या सगळ्याविषयी विचार तरी करतंय का? अन या सगळ्यांची उत्तर नैराश्यजनक होती. संबंध हिंदुस्थानात सुलतानांनी कलकल्लोळ माजवला होता. जनता पिचत होती, पण उठाव करायला कोणी तयार नव्हतं. पूर्वी अकबराच्या काळात बंड करून उठलेल्या महाराणा प्रतापचे हाल पाहून वीरोत्तम क्षत्रिय मानल्या गेलेल्या राजपुतांसारख्यांची अवस्था धरल्या शेळीगत झाली होती तिथे इतरांची काय अवस्था. समर्थ महाराष्ट्रातून भारमानाला निघाले तेव्हा इथे महाराष्ट्रात वेगळीच राजकारणं सुरु झाली होती. नाशिकच्याच जवळ, खाली कोकणात असलेल्या माहुलीच्या किल्ल्याभवताली आणि जुन्नर परिसरात या हालचाली घडत होत्या. निजामशाही बुडवायला मुघल आणि आदिलशहा तापले असून निजामशाही वाचवण्यासाठी पुढे आलेला एक पराक्रमी वीर समर्थांना दिसत होता- शहाजीराजे भोसले. शहाजीराजांना अन जिजाऊसाहेबांना जुन्नरजवळच्या शिवनेरीवर नुकतीच द्वितीय पुत्रप्राप्ती झाली होती. शहाजीराजांच्या हालचाली समर्थांच्या नजरेतून सुटल्या नसाव्यात, अर्थात याविषयी पुराव्यांअभावी थेट भाष्य करणं कठीण आहे. पण कोणी एक पराक्रमी मराठा सरदार, जर मनात आणलं तर नवं राज्य निर्माण करू शकतो इतकी ताकद धरून आहे ही गोष्ट समर्थांना नक्कीच सुखावून गेली असेल.

समर्थ भारतभ्रमणानंतर कोयनेच्या खोऱ्यात परत आले तेव्हा मात्र महाराष्ट्रातलं चित्र वेगळं होतं. शहाजीराजांना दूर कर्नाटकात पाठवण्यात आलं होतं, अन पुणे-सुपे वगैरे त्यांच्या जहागिरीवर लक्ष ठेवण्यासाठी जिजाऊसाहेब पदर सावरून हिमतीने उभ्या होत्या. पुढच्या पाच-सात वर्षातच शिवरायांनी मांडलेला नवा डाव, आदिलशाही सरदार फतेखानाचा पराभव वगैरे आनंददायक गोष्टी एखादा सुरुंग फुटावा तशा पसरल्या आणि समर्थांच्या आशा पल्लवित झाल्या. या वेळेस, समर्थांचा शिवरायांशी प्रत्यक्ष संबंध आला नसला तरीही, समर्थांनी गावागावात फिरून शरीरबल वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचा उपयोग नक्कीच झाला असावा असं दिसतं. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा वैष्णवपंथीच आहे, अन समर्थांचा संप्रदाय हाही वैष्णवपंथी. पण आजूबाजूला सुरु असलेल्या या प्रचंड सुलतानीच्या जोखडात भगवान श्रीविष्णूने कमरेवर हात ठेऊन उभं राहणं काहीसं विचित्र वाटलं. पंढरपूरच्या एका भेटीत समर्थांनी न राहवून विठूमाऊलीला प्रेमाने विचारलेलं देखील, "इथे का रे उभा श्रीरामा? मनमोहन मेघश्यामा!". विष्णू म्हणजे रामच. मग रामा, तुझे ते चापबाण काय केलेस? इथे कमरेवर हात ठेऊन भक्तांची चाललेली दुर्दशा अशी का पाहत उभा आहेस तू? 

समर्थांना एक गोष्ट समजून चुकली होती, जनमानसात देवांचं जे रूप ठसवायचं असेल ते जहाल ठसवणं गरजेचं आहे. दानवांना हरवून शांत बसलेले देव दाखवण्याची ही वेळ नाही, ही वेळ दानवांना चीत करणाऱ्या महाबाहू, पराक्रमी देवांचं रूप दाखवण्याची आहे. समर्थांनी रामनामाचा जप आणि "श्री राम जय राम जय जय राम" हा अकरा अक्षरी मंत्र साऱ्या जनतेला दिला, अन यासोबतच हनुमंताच्या उपासनेचा मार्ग दाखवला. हनुमंत कसा आहे? समर्थरचित 'भीमरूपी स्तोत्र' वाचल्यास समर्थांचा मारुती आपल्याला समजतो. आणखी एक गमतीची गोष्ट पहा. आज गावागावात कुस्तीच्या तालमी असतात तिथे मारुतीची मूर्ती अथवा फोटो पाहायला मिळतोच. समर्थांच्या आधी हनुमंताची उपासना महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही. अचानक, समर्थांच्या या नव्या पवित्र्यामुळे आणि शिकवणीमुळे गावागावात मारुतीची उपासना सुरु झाली, आणि त्याचा परिणाम म्हणून हे हनुमंत कायम प्रेरणा देत राहावेत यासाठी गडागडांवर त्यांच्या मुर्त्या उभारणं सुरु झालं. समर्थांचा मारुती कसा आहे? खांद्यावर गदा घेऊन तो कायम उड्डाणाच्या पावित्र्यात आहे, आणि समोर येणाऱ्या शत्रूला फटका देण्यासाठी हात उंचावून जात आहे हेच मारुतीचं रूप आपल्याला दिसून येईल. मारुती इथल्या तरुणांच्या समोर समोर ठेवताना समर्थ त्यांना म्हणत होते, 

शक्तीने पावती सुखे । शक्ती नसता विटंबना ।
शक्तीने नेटका प्राणी । वैभव भोगिता दिसें ।।
कोण पुसे अशक्ताला । रोगिसे बराडी दिसे ।
कळा नाही, कांती नाही । युक्ती बुद्धी दुरावली ।।
साजिरी शक्ती तो काया । काया मायाची वाढवी ।
शक्ती तो सर्वही सुखे । शक्ती आनंद भोगवी ।।
सार संसार शक्तीने । शक्तीने शक्ती भोगिजे ।
शक्त तो सर्वही भोगी । शक्तिविण दरिद्रता ।।
शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने यत्न होतसे ।
शक्ती युक्ती जये ठायी । तेथे श्रीमंत धावती ।।

समर्थांच्या बलसंवर्धनाच्या या चळवळीचा फायदा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे स्वराज्याच्या कामी नक्कीच झालेला दिसतो, त्याशिवाय गडागडांवर मारुतीच्या मूर्ती दिसल्या नसत्या. वरील काव्य हे वास्तविक समर्थांनी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लिहिलं आहे, अन या काव्यात समर्थ महाराजांना उदंड यश आणि औक्ष देण्याविषयी तुळजाभवानीला विनवतात. समर्थांचं जे हरिकथा निरूपण जे आहे ना, ते असं आहे! मुळमुळीत रामायण समर्थांना मान्य नव्हतं! त्यांना अपेक्षित असलेला बलदंड, महाबाहू जहाल राम आणि त्याचा महापराक्रमी दास हनुमंत समर्थांनी जगासमोर मांडला. 

हे बलसंवर्धन एका बाजूला झालंच, पण समर्थ हे राजकारणाची उत्तम जाण असलेले, आणि त्यात रुची असलेले होते हे त्यांच्या वारंवार येणाऱ्या उल्लेखांवरून लक्षात येतं. समर्थांचं आनंदवनभुवनी हे काव्यच उदाहरणार्थ घेऊ. आणि औरंगजेब दिल्लीच्या सिंहासनावर आल्यानंतर त्याने जे अत्याचार केले त्या साऱ्या अत्याचारांना शिवरायांनी यशस्वीरीत्या तोंड दिलं, आणि एवढंच नाही तर औरंगजेबाला नामोहरम केलं. या घटनेने आनंदित होऊन समर्थ गरजले, 

कल्‍पांत मांडला मोठा । म्‍लेंछदैत्‍य बुडावया ।
कैपक्ष घेतला देवीं । आनंदवनभुवनीं ।।
बुडाले सर्व ही पापी । हिंदुस्‍थान बळावलें ।
अभक्तांचा क्षयो जाला । आनंदवनभुवनीं ।।
पूर्वी जे मारिले होतें । ते ची आतां बळावलें ।
कोपला देव देवांचा । आनंदवनभुवनीं ।।
येथूनी वाढिला धर्म । रमाधर्म समागमें ।
संतोष मांडला मोठा । आनंदवनभुवनीं ।।
बुडाला औरंग्‍या पापी । म्‍लेंछसंव्‍हार जाहाला ।
मोडलीं मांडली छेत्रें । आनंदवनभुवनीं ।।

इथे समर्थ प्रत्यक्षपणे 'औरंग्या' असा उल्लेख करतात, त्यावरून औरंगजेबाची महाराजांनी केलेली अवस्था पाहून समर्थांना काय आनंद झाला असेल हे वेगळं सांगायला नको. समर्थांचं लक्ष सगळीकडे होतं, पण कमलपत्रावरच्या जलबिंदूप्रमाणे समर्थ सगळ्यापासून अलिप्तही होते. समर्थांनी महाराजांना 'राजधर्म' आणि 'क्षात्रधर्म' सांगितले. हे समर्थांनी महाराजांना सांगितले याला दोन भक्कम पुरावे आहेत, एक म्हणजे शिवरायांनी समर्थांना लिहिलेलं १६७८ सालचं विस्तृत पत्रं ज्यात ते स्वतः समर्थांची वाक्य उद्धृत करतात, "तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले तैसेच करावे", अन याशिवाय स्वतः समर्थांनी शंभुराजांना अंतःसमयी दिलेल्या यादीत या राजधर्म-क्षात्रधर्मांचा उल्लेख केला आहे. या दोन्ही धर्मांमध्ये एका राजाने आणि एका क्षत्रियाने नेमकं कसं वागावं, कशी कर्म करावीत यासंबंधी मार्गदर्शन केलं आहे. मग आता कोणी हा प्रश्न सहज विचारेल, की महाराजांना हे सांगण्याची गरज काय होती? समर्थांच्या भेटीपूर्वीपासूनच महाराजांनी स्वराज्यस्थापनेचा उद्योग यशस्वी करून दाखवला होता. आणि हे खरंही आहे. पण समर्थांनी वडीलकीच्या नात्याने 'सांगणं आपलं कर्तव्य आहे' म्हणून हे सांगितलं आहे. या दोन्हीही धर्मांतील एकूण एक वाक्य वाचलं म्हणजे समर्थांची युद्धनीतीविषयी, राजकारणाविषयीची असलेली जाण आपल्या लक्षात येते. राजधर्मात समर्थ म्हणतात,

धुरेने युद्धासी जाणे । ऐसी नव्हेती राजकारणे ।
धुरा चकसुन सोडणे । कित्येक लोक ।।
उदंड मुंडे असावी । सर्वही येक न करावी ।
वेगळाले कामे घ्यावी । सावधपणे ।।

यातून समर्थांचं नेटका राज्यकारभार कसा करावा यावरचं मत समजतं. धुरा म्हणजे नेतृत्व. राजाने स्वतः नेतृत्व करू नये असं समर्थ म्हणतात. आता इथे कोणाला असं वाटेल, की राजा भित्रा असल्याने त्याने मागे राहावं का? तर तसंही नाही. युद्धात कधी काय होईल हे सांगता येत नाही, कुठून कशी गोळी येईल आणि जीव धोक्यात येईल हे समजत नाही. आपल्याकडे दुर्दैवाने एक परंपरा आहेच, की नेतृत्व पडल्यावर सैन्याची पळापळ होते. पुढे पानिपतात आपण पाहिलं आहेच काय झालं ते. सिंहगडावर तानाजी मालुसरे पडल्यावर सैन्य पळत सुटलं होतं ही गोष्टही घडली होतीच, सुदैवाने सूर्याजी मालुसरे खमके असल्याने त्यांनी फुटली फळी पुन्हा सांधली आणि गड जिंकून घेतला. म्हणूनच, समर्थ म्हणतात की तुम्ही नेतृत्व आहात, स्वतःचा जीव धोक्यात घालू  नका,तुम्ही एकमेव आहात. त्यापेक्षा नेतृत्वावर तितकी सक्षम माणसं नेमा आणि कार्य साधून घ्या. 'वेगळाली कामे घ्यावी' बाबतीतही तेच. महाराजांनी निरनिराळ्या परिस्थितीसाठी निरनिराळ्या माणसांची योजना केलेली होती. ज्यांचं डोकं जबरदस्त त्यांना विचारांची आणि राजकारणी कामंल ज्यांच्या अंगी ताकद जास्त त्यांना सरदारी-शिपाईगिरीची कामं असं हे गणित होतं. बरं, कोणताही भेदभाव नाही, साऱ्यांना न्याय सारखाच! युद्धाच्या आधीच माणसं आणि शास्त्र पारखून घेतली, आणि योजना उत्तम असली म्हणजे शत्रूचं निर्दालन हमखास होणार असं सांगताना समर्थ म्हणतात, "तुरंग शस्त्र आणि स्वार । पहिलाच पाहावा विचार । निवडून जाता थोर थोर । शत्रू पळती ।।" या राजधर्मासोबतच क्षात्रधर्मही तितकाच उपयुक्त आहे, ज्याच्या सुरुवातीलाच समर्थ खडसावतात, 

जयासी वाटे मरणाचे भय । त्याने क्षात्रधर्म करू नये ।
काहीतरी करून उपाय । पोट भरावे ।।
दोनी दळे येकवटे । मिसळता चिखल दाटे ।
युद्ध करावे खणखणाटे । सीमा सांडूनि ।।
मराठा तितुका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म राखावा ।
येविसी न करिता तकवा । पूर्वज हांसती ।।
देवद्रोही तितुके कुत्ते । मारोनी घालावे परते ।
देवदास पावती फते । यदर्थी संदेह नाही ।।
देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा, बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठी ।।

इ.स. १६७२ मध्ये, शिवरायांना "परिधाविनाम संवत्सरी सिंगणवाडीचे मठी श्री हनुमंतासमोर परमार्थ जाहला", म्हणजेच समर्थांचा अनुग्रह झाला. यामुळे एका दृष्टीने समर्थांनी राजांना हे दोन धर्म सांगितले. पण यातही महत्वाची गोष्ट अशी, की समर्थांनी कधीही शिवरायांच्या राजकारणात ढवळाढवळ केली नाही. चिंचवडकर देवांचाही महाराजांना सुरुवातीच्या काळात अनुग्रह झाला होता. त्यामुळे देवांना असं वाटलं की महाराज आपले शिष्यच आहेत, आपण काही केलं तरीही ते आपलं ऐकतील. अशाच एका प्रसंगात, जेजुरीच्या गुरवपणाच्या तंट्यात चिंचवडकर देवांनी परस्पर निकाल दिला आणि जे निर्दोष होते त्यांना दोषी ठरवून परस्पर सिंहगडावर कैदेत टाकण्यासाठी सिंहगडच्या किल्लेदाराला आदेश दिला. महाराज जेव्हा मोहिमेवरून स्वराज्यात आले तेव्हा त्यांना सारा प्रकार समजला आणि ते संतापले. त्यांनी देवांना स्पष्ट कळवलं, "तुमची बिरदी आम्हांस द्या, अन आमची बिरदी तुम्ही घ्या". म्हणजे, माझी जी क्षत्रिय कुलावतंस वगैरे बिरुदावली आहे ती तुम्ही घ्या,तुम्ही राज्य चालवा, मी तुमची धर्माची बिरुदावली धारण करून चिंचवडला धुपारत्या करत बसतो. महाराजांना दुसऱ्यांनी आपल्या राजकारणात लक्ष घातलेलं खपत नसे, आणि समर्थांनीही कधी असा प्रयत्नही केला नाही. म्हणूनच, इस. १६७२ नंतर शिव-समर्थ संबंध इतक्या जिव्हाळ्याचे होत गेले की शिवरायांनी समर्थांना मुक्कामासाठी सज्जनगड-महिपतगड अशा दोन किल्ल्यांचे पर्याय समोर ठेवले, आणि इथल्या किल्लेदारांना आज्ञा केली, "समर्थ गडावर येतील, त्यांना येऊ द्या. जितके दिवस म्हणतील तितके दिवस राहू द्या, जेव्हा उतरू म्हणतील तेव्हा उतरू द्या. त्यांना मुक्कामासाठी उत्तम जागा द्या, आणि या सगळ्यात किंवा या सेवेत माझ्या कानी काही तक्रार आली तर मात्र तुमची काही खैर नाही". दि. ८ ऑगस्ट १६७६ची ही पत्रं अत्यंत वाचनिय अशीच आहेत. समर्थांनी सज्जनगड निवडला, आणि नंतरच्या काळात समर्थांनी आपला देहही याच गडावर ठेवला. एकंदरीतच, समर्थ शिवरायांची योग्यता जाणून होते, शिवराय समर्थांची योग्यता जाणून होते, म्हणूनच एक्मेकांसंबंधी इतका जिव्हाळा-इतका आदर होता.

शिवरायांच्या मृत्यूनंतर समर्थांनी संभाजीराजांना लिहिलेलं "अखंड सावधान असावे" हे पत्रं अत्यंत महत्वाचं, आणि समर्थांचं राज्याविषयीची कळकळ, राजकारणातले बारकावे जाणून असल्याबद्दल साक्ष देतं. सेवकांना कसं हाती धरावं, कोणाला कधी आणि केव्हा माफ करावं आदी साऱ्या गोष्टी समर्थांनी दिल्या आहेत. हे संबंध पत्रं मोठं असल्याने इथे देत नाही, पण त्यातील "शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे" वाचताना समर्थ संपूर्ण शिवकाळ काही ओळीत आपल्यासमोर जिवंत उभा करतात याची प्रचिती येते. आपल्या वडिलांनी जसं राज्य केलं, आपल्या वडिलांनी जसं राजकारण-समाजकारण केलं तेच तुम्ही करा, किंबहुना त्याही पलीकडे जाऊन अधिक करून दाखवा, तरंच काही पुरुषार्थ आहे असं समर्थांचं सांगणं आहे. वयाच्या बाराव्या वर्षी सुरु केलेला हा उद्योग वयाच्या बहात्तराव्या वर्षीही समर्थ तितक्याच जबाबदारीने सांगत होते. 

अजून काय लिहू? स्वतः समर्थ, अर्थात लिहिताना जरी प्रथम स्थानी 'हरिकथा निरूपण' म्हणत असले तरीही ती हरिकथा म्हणजे 'रामकथा' नेमकी काय आहे हे वर सांगितलं आहेच. सोबतच, त्यांचं राजकारण कोणत्या वळणाचं होतं हे सांगण्याचीही हा लहानसा प्रयत्न. श्रीरामार्पणमस्तु! जय जय रघुवीर समर्थ!

- कौस्तुभ कस्तुरे