इतिहास संशोधक श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे
इ. स. २००२ चे दिवस, साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरचा महिना होता. माझी शाळा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठी असल्याने शाळेच्या मैदानावर अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे. त्या वर्षी दिवाळीनंतर बदलापुरात जाहिरातीचे फलक दिसू लागले, शाळेत तयारी सुरु झाली. कोणीतरी रामायण-महाभारतातल्या ऋषींसारखे दिसणारे वयस्क गृहस्थ शिवाजी महाराजांवर तीन दिवसीय व्याख्यानमाला घेणार होते म्हणे. मी तेव्हा सातवीत होतो, त्यामुळे चौथीनंतर थेट त्याच वर्षी शिवाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात असल्याने तेच तेच काय ऐकायचं पुन्हा असं वाटून गेलेलं. त्या तीन दिवसात, पहिल्याच दिवशी संध्याकाळी शाळेच्या रस्त्यावरून जाणं तेव्हा आत जमलेली गर्दी पाहून आश्चर्य वाटलं. एका वेळी चार पाच हेलिकॉप्टर्स उतरू शकतील एवढं मोठं ग्राउंड तुडुंब भरलेलं, अगदी शांतता; फक्त एक धीरगंभीर आणि त्वेषपूर्ण आवाज मात्र ऐकू येत होता. दुसऱ्या अन तिसऱ्या दिवशीही तीच गत. घरी आल्यानंतर न राहवून बाबांना विचारलं तेव्हा कुठे त्या वयस्क व्यक्तीच्या नावाचा, त्यांच्या कार्याचा, कीर्तीचा आणि त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्राचा महिमा समजला. चार महिन्यात सातवीची परीक्षा संपली आणि चांगले मार्क मिळाल्याबद्दल आजीने खाऊसाठी दिलेल्या पैशातून हे शिवचरित्र प्रथम आणलं. चांगला जाडजूड हजार पानांचा ग्रंथ, त्यावरचं शीर्षक आणि लेखकाचं नाव मनावर कोरल ते तेव्हापासूनच. शीर्षक होतं "राजाशिवछत्रपती", आणि ग्रंथकार अर्थात, बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे!
सातवी-आठवी दरम्यान राजाशिवछत्रपती हाती पडलं. तेव्हा 'मोडी' म्हणजे काय हे ऐकूनही माहीत नव्हतं. फोनवरील केवळ पाच मिनिटांच्या पहिल्याच संभाषणात बाबासाहेबांनी मन जिंकून घेतलं. ते पुण्याला येऊन भेट म्हणाले खरं, पण ते काही पुढच्या काही वर्षात जमलं नाही. पुढे २००९ नंतर जेव्हा भेटीगाठी वाढू लागल्या तेव्हा मात्र मनातले अनेक प्रश्न मग बाहेर येऊ लागले. साधारणतः २०१०-११ पासूनच अंदाजे, मी बाबासाहेबांना मोडीतून पत्रं लिहायला सुरुवात केली होती. मोडी स्वतःची स्वतः शिकत होतो तेव्हा, त्यामुळे त्रुटींसकटच मी बाबासाहेबांना पोस्टकार्डस पाठवायला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काही पत्रांना काही उत्तर आलं नाही तेव्हा वाटलेलं हे थांबवावं, कदाचित त्यांना आवडत नसेल तर; किंवा त्यांच्यापर्यंत ती पत्रं पोहोचतच नसतील तर? पण माझा हा भ्रम लवकरच दूर झाला. बाबासाहेबांची भेट झाली तेव्हा अगदीच शेवटचा प्रयत्न म्हणून मी पोस्ट न करता एक पत्रं स्वतः त्यांना दिलं. ते उलगडून त्यांनी वाचलं, आणि म्हणाले, "तुमची पत्रं मिळतात मला, पण वयानुसार उत्तर द्यायला जमत नाही. पण रागावणार नसाल तर एक सांगू का? त्यात किंचित चुका आहेत, बसा". लहान बाळाला कसं अगदी चिमूटभर जेवायला देताना बोटं जशी जुळतात तसं करून समजुतीच्या सुरात ते म्हणाले. वास्तविक, "तुम्हाला मोडी येत नाही, नीट शिका" असं उत्तर देता आलं असतं. पण समर्थ जे म्हणतात, "राज्यामध्ये सकळ लोक, सलगी देऊन करावे एक", किंवा "शिवरायांची सलगी देणे कैसी असे?", हे बाबासाहेबांच्या रक्तात भिनलंय. कोणाशीही अत्यंत सलगीने वागण्याची त्यांची ही पद्धतच समोरच्याला विरघळून टाकते. शेजारी बसवून एकेका अक्षरावर बोट ठेऊन पत्रं वाचता वाचता बाबासाहेब चुका सांगत होते. "बहुत काय लिहिणे! मोडीत 'हू' असा नाही, असा काढतात. 'ली' मध्ये देवनागरीसारखी ल वर वेलांटी नाही देता येत मोडीत. बाकी वेलांट्या तुम्ही दिलेल्या बरोबर आहेत, पण त्या आणखी पद्धतीनेही देता येतात".
पंधरा वीस मिनिटांचा हा माझा पहिला वर्ग झाला मोडीचा. त्यानंतर मग मी पोस्टाने पत्रं पाठवणं बंद केलं आणि त्यांना भेटायला जातानाच दर वेळेस पत्रं घेऊन जाऊ लागलो. बाबासाहेब मग तिथल्या तिथे बारकावे सांगू लागले. या सगळ्याचा परिणाम असा झाला, की सोनारानेच हलकेच पण योग्य पद्धतीने कान टोचावेत तसं माझं मोडी पक्कं झालं. दोन वर्षातच मी मोडीचा आधी एक बेसिक आणि नंतर ऐतिहासिक पेशवाई थाटाचा फॉन्ट बनवला. त्यातलं पत्रं बाबासाहेबांना देताना मुद्दाम जुन्या पद्धतीच्या कागदावर प्रिंट करून दिलं. बोरूने लिहिलेल्या, अगदी घोटीव, calligraphic पद्धतीने न लिहिता कागदाने शाई शोषून घेतल्यावर ती जशी पसरते तसं अक्षर असलेल्या पत्राकडे बाबासाहेब पाहतच राहिले. हे मी हाताने लिहिलेलं नसून संगणकावर टाईप केलं आहे हे सांगितलं तेव्हा लहान बाळाच्या चेहऱ्यावर जसे उत्सुकतेचे भाव असतात तसे त्यांच्या चेहऱ्यावर होते. हे भाव नंतरही एकदा पाहिले. दि. ५ मे २०१६ रोजी बदलापुरात झालेल्या व्याख्यानानंतर बाबासाहेबांची पायधूळ आमच्या घरी लागण्याचं भाग्य चालून आलं. त्यानंतर मार्गावर, हायवेपर्यंत सोडायला गेलो तेव्हा मागची मंडळी, इतर गाड्या यायला वेळ असल्याने दोन मिनिटं ते थांबले होते. इतर फारसं कोणी नव्ह्तं सोबत, त्यामुळे आदल्याच दिवशी मला समजलेल्या एका मोडी पत्राबद्दल, ज्यावर महाराजांची मोर्तब पाहण्यात आली होती आली, त्याबद्दल सांगितलं तेव्हा एकदम उसळून, "क्काय? खरं सांगताय हे? घेऊन या दाखवायला लवकर" असं बालसुलभ उत्सुकतेने त्यांनी विचारलं होतं.
ऑक्टोबर २०१५ मध्ये कोल्हापूरला विद्यापीठात मोडीसंबंधी एक कार्यक्रम होता. एव्हाना पाच वर्षात माझं मोडी चांगलंच सुधारलं होतं. तिथून निघून रात्री उशिरा पुण्यात पोहोचलो तोवर बदलापूरला यायला एकही ट्रेन किंवा बस उपलब्ध नसणार हे माहित होतं. अखेरीस आमच्या गणेशभाऊंना फोन केला, आणि मध्यरात्री दीड वाजता पुरंदरेवाड्याचा दरवाजा ठोठावला. दुसऱ्या दिवशी भाऊ त्यांच्या कामाला निघून गेले होते, सकाळी बाबासाहेब पेपर वाचत बसलेले. रस्त्यावर हळूहळू रहदारी सुरु झाली होती, पण वाड्यात राबता नव्हता सुरु झाला. बॅगमधून आणलेलं पत्रं बाबासाहेबांना दिलं. त्यांनी ते वाचलं, आणि बाजूला ठेवत म्हणाले, "ती पेटी बाजूला करून मागची फाईल घ्या". मी फाईल त्यांच्या समोर धरली. ती उघडली तेव्हा माझेच डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. अगदी मलिक अंबरपासून ते सवाई माधवराव पेशव्यांपर्यंत साऱ्यांची बाबासाहेबांच्या पूर्वजांना मिळालेली इनामपत्रं होती ती. मला बाजूला बसण्याची खूण केली. पुढचा जवळपास तासभर ती एकेक पत्रं उलगडून, एकेका अक्षरावर बोट ठेऊन आम्ही दोघेही वाचत होतो. अनपेक्षितपणे हे भाग्य मला लाभलं होतं. सगळी अस्सल पत्रं! हे पत्रं मलिक अंबरने हातात घेऊन वाचलं असेल, हे शहाजीराजांनी स्वतः हातात घेतलं असेल, हे बाळाजी विश्वनाथांनी, हे बाजीरावांनी, हे माधवरावांनी.. काय आणि कसं वर्णन करू मलाच समजत नाही. नंतर वाड्यावर भेटायला येणाऱ्यांचा राबता सुरु झाला आणि मग फाईल पुन्हा पूर्ववत आत ठेवली.
मी हे पत्रं, मोडीबद्दल इतकं का लिहितोय असं मनात आलं असेल ना तुमच्या? खरंतर हेच मला सांगायचं आहे. आज अनेकदा बाबासाहेबांच्या 'शिवशाहीर' या पदवीवरून बिनबुडाचे आरोप केले जातात. ते 'शाहीर' होते, इतिहास संशोधक नव्हते वगैरे सांगितलं जातं. पण जे कोणी इतिहास-अभ्यासक बाबासाहेबांना ओळखतात ते छातीठोकपणे सांगू शकतील की बाबासाहेब हाडाचे 'इतिहास-संशोधक' होते. त्या काळी, म्हणजेच पन्नासच्या दशकात मुद्दलात इतिहास हा विषय इतका रुक्ष असताना त्यात फार कोणी पडत नाही, आणि भारत इतिहास संशोधक मंडळासारख्या महत्तम कार्य करणाऱ्या संस्थांचा आणि संशोधकांचा उपयोग सर्वसामान्य लोकांना होत नाही हाच सल उराशी असल्याने बाबासाहेबांनी अखेरीस आपला संशोधकीय थाट बाजूला ठेवला; आणि एखादा शाहीर कसं, कथारूपात सारं काही समजावून सांगतो तसं बाबासाहेब गोष्टीरूपात शिवचरित्र मांडू लागले. कोणी स्विकारो अथवा न स्विकारो, पण शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याचं श्रेय हे बाबासाहेबांनाच द्यावं लागेल.
पु. ल. देशपांडे त्यांच्या 'गणगोत' मध्ये बाबासाहेबांबद्दल लिहितात, "वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. 'मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही' हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही... इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद्गार काढावेत इतका अभ्यास केला, आणि मांडला मात्र गद्य-शाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा 'माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,' असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी- लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो."
पु. लं.चं म्हणणं शब्दशः खरं आहे. मी वर माझे अनुभव सांगितले ते अगदीच मोजके आहेत. आणखी एक गंमत थोडक्यात सांगतो. मला बाजीराव पेशव्यांवर एक लेख लिहायचा होता, आणि नेमकं लेखात एका ठिकाणी द्यायला हवा असलेला, एका घटनेचा संदर्भ माझ्याकडे नव्हता. शक्य तितकं सगळीकडे शोधूनही तो संदर्भ सापडला नाही तेव्हा शेवटचा उपाय उरला तो बाबासाहेबांना विचारायचं हा. लगेच पुण्याला काही काम निघाल्याने वाड्यावरही जाणं झालंच. बाबासाहेबांनी क्षणाचाही विलंब न नव्हता, 'बाजीरावसाहेबांनी हे उद्गार या या पत्रात काढले आहेत, हे पत्र तुम्हाला पेशवे दप्तराच्या अमुक एका खंडात मिळेल. एवढंच नाही, अशा आशयाची पुढेही एक-दोन पत्रं सापडतात नाना फडणवीसांची' असं म्हटलं. त्याच दिवशी, मुंबईला परतण्यापूर्वी भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊन तो खंड पाहिला. आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, ते पत्रं बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार तिथेच छापलं होतं.
मंडळाच्या ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ७ मध्ये बाबासाहेबांनी 'पूर्व पेशवाईतील २७ महत्वाची पत्रे' या नावाने एक शोधनिबंध प्रकाशित केला आहे. यावेळी बाबासाहेब तरुण तेंतें तिशीच्या उंबरठ्यावर होते. मंडळाचे तत्कालीन चिटणीस आणि प्रसिद्ध इतिहास संशोधक शंकर नारायण जोशी यांनी बाबासाहेबांचा उल्लेख "तरुण इतिहास संशोधक" असा केला आहे. असंच, ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६च्या प्रस्तावनेतही इतिहास संशोधक प्रा. गणेश हरी खरे यांनी आपल्या राजस्थानातील संशोधन मोहिमेत बाबासाहेब तिथली कागदपत्रे शोधण्यासाठी, आणि वाचण्यासाठी आपल्यासोबतच असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं आहे. हे दोन नावाजलेल्या, बाबासाहेबांहून ज्येष्ठ संशोधकांचे अभिप्राय अत्यंत बोलके आहेत.
बाबासाहेबांच्या ठायी अष्टपैलू नांदताहेत हे सर्वांनाच माहीत असेल. त्यांच्या वडिलांकडून मिळालेली कलात्मक दृष्टी, मातोश्रींकडून मिळालेली वक्तृत्वकला यासोबतच त्यांनी स्वतः जे जे काही पाहिलं, ऐकलं ते ते सारं ते स्वतःच्या मनावर ठसवत गेले. इंग्रजीत Listening is a fine art असं म्हटलं जातं. इथे केवळ ऐकणं नव्हे तर जे जे काही पाहू ते लक्षात ठेवणं हे सुद्धा त्या जोडीला आलंच. सासवडच्या आसमंतातील पुरंदरे घराण्याच्या वाड्यांमध्ये त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागत गेलं. बाबासाहेबांनी पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, पुरंदरच्या बुरुजावरून वगैरे पुस्तकांमधून ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टींमधली पात्रं जरी नावं बदलून दिलेली असली तरी बऱ्याच गोष्टी या घडलेल्या आहेत. त्या गोष्टींमध्ये ते स्वतः आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी लिहिलेलं 'राजाशिवछत्रपती' हे साधार शिवचरित्रं. अनेकांना 'राजाशिवछत्रपती' ही बखर वाटते, कादंबरी वाटते, कल्पनाविलास वाटतो. पण असं मुळीच नाही. राजाशिवछत्रपती हा ग्रंथ अस्सल बावनकशी सोन्यासारखा संशोधकीय ग्रंथ आहे. बाबासाहेबांनीच मागे आठवण सांगितलेली आठवत्ये. मुळात हे शिवचरित्र लिहिताना संशोधकीय थाटाचं, पुरावे वगैरेंची चर्चा करून लिहिलेलं होतं, आणि सुरुवातीला ते 'एकता' मासिकात क्रमशः प्रसिद्ध झालं होतं. पण हे संशोधकीय थाटाचं लिखाण कोणीही वाचत नाही असं लक्षात आल्यावर बाबासाहेबांनी आपली लिखाणाची शैली बदलली. मुळातच ऐतिहासिक घराणं, त्यामुळे घरात जुनी शस्त्रास्त्रं, शालू-पैठण्या-शेले वगैरे उदंड. निरनिराळी प्रवचनं आणि गोंधळ घातले जायचे. त्यात कलाशिक्षक असलेले वडील लहानग्या बाबासाहेबांना मंडईच्या समोर पोवाडे वगैरे ऐकायला घेऊन जायचे. ज्या ज्या गोष्टी सांगतील त्या त्या किल्ल्यावर न्यायचे. तासनतास ते कानावर पडल्याने बाबासाहेबांच्या मनातही त्या शैलीने घर केलं होतं. एरवी इतिहास संशोधक असलेले बाबासाहेब आता मंडी घालून जमिनीवर बसू लागले. जेवायला बस्तान घ्यायचा पाट मांडीवर घेऊन, त्यावर कागद ठेऊन, गळ्यात भवानीदेवीची कवड्यांची माळ घालून लिहू लागले. हे शिवचरित्र प्रकाशित झालं आणि आचार्य अत्र्यांनी त्यावर 'मराठा' मध्ये दोन अग्रलेख लिहिले. अत्र्यांनी म्हटलं होतं, "पुरंदरे यांनी हे शिवचरित्र महाराष्ट्ररसात लिहिलं आहे". बाबासाहेब मात्र अगदी शेवटपर्यंत, कसलाही अहंभाव न येऊ देता नेहमी कृतज्ञतेने सांगायचे, "अहो, महाराष्ट्ररसात म्हणजे काय? संतांचं आणि शाहिरांचं साहित्य मी वाचलं. त्याचा परिणाम माझ्या भाषेवर झाला. माझी भाषा ही माझी भाषा नाही, ती त्यांच्याकडून उसनी घेतलेली आहे. मला हे ऋण कधीच फेडता आलेलं नाही. त्या कर्जाच्या जीवावर मी उभा आहे."
बाबासाहेबांच्यातला 'विवेकी' संशोधक शेवटपर्यंत कसा जागा होता याबद्दल जाता जाता एक लहानशी गोष्ट सांगतो. जुलै २०१५ च्या बहुदा १-२ तारखेलाच रात्री उमेशरावांचा फोन आला, बाबासाहेबांना बोलायचं आहे. माझ्या एका लेखावरून कोणीतरी काही अर्धवट सांगितलं असावं म्हणा, किंवा बाबासाहेबांनी वाचल्यावर पटलं नसेल म्हणून म्हणा, पण बाबासाहेबांनी "केव्हा यायला जमेल?" विचारलं. म्हटलं, "रविवारी येऊ का?" "चालेल" म्हणाले. तेव्हा MBAचं दुसरं वर्ष नुकतंच सुरु झाल्याने ते बुडवून जाता येणार नव्हतं. रविवारी सकाळी इंद्रायणी पकडली आणि तडक पुणं गाठलं. गेल्यावर अर्थात शिरस्त्याप्रमाणे अगदी शाही पत्राप्रमाणे सजवलेला मोडी खलिता दिला. तो वाचून झाल्यावर मग ज्या लेखाबद्दल चर्चा करायला त्यांनी बोलवलेलं तो पाच-सहा पानी लेख त्यांच्या हाती ठेवला. वास्तविक त्या लेखाची मांडणी ही बाबासाहेबांच्या मताच्या विरुद्ध असल्याने लेखात काय आहे हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता होती. पूर्ण लेख बाबासाहेबांनी वाचला, आणि पहिला शब्द उमटला तो म्हणजे "छान!" माझं निम्मं दडपण तिथेच नाहीसं झालं. काही बारकावे सांगून, काही विचारून मग अखेरीस ते म्हणाले, "मला मात्र असं वाटतं की मी जे पुस्तकात दिलं आहे ते तसंच घडलं असावं". वास्तविक उभं आयुष्य वचलेली व्यक्ती जेव्हा असं म्हणते तेव्हा तुम्ही त्यांच्या मानाने खूप खुजे असता. काही क्षण गेले, मलाच वाईट वाटलं. मी बाबासाहेबांना म्हटलं, "बाबासाहेब, हा लेख मी जिथे कुठे (ब्लॉगवर वगैरे) प्रसिद्ध केला आहे तिथून तो लगेच मागे घेतो. हे ऐकताक्षणीच ताडकन बाबासाहेब उत्तरले, "नाही नाही, असं करू नका. मला पटलं नाही म्हणून ते लोकांपुढे मांडलं जाऊ नये असं मी कधीही म्हणणार नाही, मला तसं वाटणार नाही. मी सुरुवातीलाच स्पष्ट 'मला असं वाटतं' म्हणालो. ते माझं माझ्या अभ्यासावर केलेलं मत झालं. हे तुमचं मत आहे, तुमच्या स्वतंत्र अशा अभ्यासावर. तुम्ही दिलेले पुरावे देखील खोटे नाहीत. फक्त एखाद्या पुराव्याकडे तुम्ही वेगळ्या दृष्टीने पाहता आणि मी वेगळ्या दृष्टीने. तेव्हा प्रसिद्ध केलं असल्यास हे अजिबात हे अजिबात मागे घेऊ नका, आपण केवळ ऐतिहासिक शक्यता मांडत आहोत, वाचकांना ठरवू दे". बाबासाहेब हसले. मी मात्र यावर काही बोलू शकलो नाही. ही ऋषितुल्य व्यक्ती हिमालयाच्या उंचीची का आहे त्याचं कारण अशा लहानसहान गोष्टीतही आहे.
आज बाबासाहेब शरीररुपाने आपल्यात नाहीत. पण त्यांच्या साहित्यसंपदेच्या रूपात, त्यांनी लिहिलेल्या प्रचंड अशा 'जाणता राजा' या महानाट्याच्या रूपात, 'राजाशिवछत्रपती' या शिवचरित्राच्या, आणि इतर असंख्य व्याख्यानांच्या-मुलाखतींच्या रूपात बाबासाहेब कायम आपल्यातच राहणार आहेत. मी आणि मागच्या तीन पिढ्यांतील असंख्य जणांना बाबासाहेबांनी एखाद्या अढळ ताऱ्याप्रमाणे ज्ञानप्रकाश दिला. यापुढेही, येणाऱ्या पिढ्यांना ते कायमच मार्गदर्शक ठरतील याबद्दल कसलाही संशय नाही. वर्ष होऊन गेलंय खरंतर, पण अजूनही जेव्हा जेव्हा पुण्यात पाऊल पडतं, जेव्हा जेव्हा काही ऐतिहासिक लिहायला-वाचायला घेतो तेव्हा पहिली आठवण बाबासाहेबांची असते. याही वेळेस त्यांचे पाय शिवले की हळुवार पाठीवर हात फिरेल, मायेने साद कानी येईल, "बाळ.."
श्रीकृष्णार्पणमस्तु!
- कौस्तुभ कस्तुरे
(सदर लेख नोव्हेंबर २०२२च्या साप्ताहिक विवेकच्या अंकात श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रसिद्ध झाला आहे)