मऱ्हाटा राजा छत्रपती जाहला..


ज्येष्ठ शुद्ध १३, शके १५९६, आनंदनाम संवत्सरी किल्ले रायगडी श्रीमन्महाराज शिवाजी राजियांचा राज्याभिषेक झाला हे आपण सारेच जाणतो. गेली काही वर्षं महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, ही खरंतर आनंदाचीच बाब आहे. शिवराज्याभिषेक हा जणू काही आपल्या सर्वांसाठी एक सण ठरावा इतक्या आनंदाचा क्षण होता. होय, मी मुद्दाम सण म्हणतो आहे. आपण सण का साजरे करतो? आपल्या देवदेवतांनी असुरांवर, राक्षसांवर विजय मिळवून सर्वत्र सुबत्ता नंदवली त्या निमित्ताने अनेक सण आपण साजरे करतो, तसंच हे. शिवराय नामक या सवाई नरसिंहाने असंख्य शत्रूचं, सुल्तानरूपी राक्षसांचं निर्दालन करून ही भूमी पुनश्च एकदा नांदती केली, त्या साऱ्यांचं फलित म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक असं म्हणता येईल, आणि म्हणूनच त्याचा सोहळा हा साजरा करायलाच हवा. 

यादवांचं साम्राज्य हे महाराष्ट्रातलं शेवटचं हिंदू साम्राज्य. यादवांच्या ऱ्हासानंनतर जवळपास साडेतीनशे वर्षे महाराष्ट्राने घनघोर काळरात्र अनुभवली. ही काळरात्र इतकी भयाण होती, की तिचं वर्णन करताना भल्याभल्यांच्याही घशाला कोरड पडावी, हाताला कंप सुटावा. अस्मानी आणि सुलतानी हे शब्दप्रयोग आपण अनेकदा अतिशय सहजगत्या उच्चारून जातो. पण त्या शब्दांची तीव्रता किती भयानक होती हे जर तत्कालीन कागदपत्रं आपण अभ्यासली तरच लक्षात येतं. अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर मलिक काफूर इथे आला, आणि त्याने खिलजी राजसत्तेचं बस्तान इथे मांडलं. खिलजी गेले अन मग एकामागून एक सुलतानांची रांगच लागली. बहमनी शाह्यांच्या काळात तर महाराष्ट्र जणू काही सुलतानांनी वाटून खाल्ला. विदर्भ-वऱ्हाडात इमादशाही, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकणात आदिलशाही, उत्तर महाराष्ट्रात मोंगल, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात निजामशाही, आग्नेयेला कुत्बशाही, अन या साऱ्यात भरीला भर म्हणजे कोकण किनाऱ्यावर सिद्दी-इंग्रज-पोर्तुगीज असे अनेक परकीय येऊन आपला जम बसवू पाहत होते. हे सारे सुलतान आणि युरोपीय व्यापारी आपापला मतलब साध्य करत, इथल्या प्रजेकडून वाट्टेल तशी वसुली करत आणि आपापल्या तुंबड्या भरून सुखाने जगत. सुखाने जगणारे राज्यकर्ते होते, अन वास्तवात ज्यांनी सुखाने जगणं अपेक्षित होतं ती महाराष्ट्राची रयत मात्र अत्युच्च हालअपेष्टा सहन करत होती.केवळ महाराष्ट्रच नाही, तर साऱ्या हिंदुस्थानात हा प्रकार सुरु होता. अगदी दोन ओळीत सांगायचं तर कधीही सुलतानी अधिकाऱ्यांनी घरात शिरावं, घरातलं असेल नसेल ते लुटून घ्यावं, धडधाकट पुरुषांना गुलाम करावं, मुलांना आणि स्त्रियांना आपल्या कामवासनेची शिकार करावं, आणि उरलेल्यांनी कत्तल करून आग लावून सगळं नष्ट करावं हा जणू काही पायंडाच पडला होता. 

'सुलतानी' हा शब्दप्रयोग नेमका कशासाठी पाहायचंय? मोजकी उदाहरणं पहा- मुहम्मद तुघलक नावाचा एक सुलतान इ.स. १३२५ ते १३५१ दरम्यान दिल्लीच्या गादीवर राज्य करत होता. या तुघलकाच्या काळात इब्न बतुता हा बर्बर प्रवासी भारतात आला होता. याने तुघलकाच्या विक्षिप्तपणाचं वर्णन करताना लिहिलंय, "माणसांची शिकार करायचं तुघलकाचं एक खास तंत्र होतं. एखाद्या गावाला सैन्यानिशी वेढा देऊन हळूहळू तो वेढा आवळत जायचा, आणि आत जे कोणी सापडतील त्यांची जंगली श्वापदांची करतात तशी शिकार करायची". मुहम्मदाचा मुलगा फिरोझशाह हा बापाहून जास्त क्रूर निघाला. फ़ुटूहात ए फिरोजशाही मध्ये तो स्वतः म्हणतो, "हिंदूंच्या नेत्यांना आणि इस्लामची वागणूक नाकारणाऱ्यांना ठार करावं असा मी हुकूम सोडला आहे. सर्वसाधारण हिंदूंना अत्यंत कठोर शिक्षा देण्याचं मी सहसा टाळलं असलं तरीही त्यांच्या मूर्ती आणि देवळं नष्ट करून मी तिथे मशिदी उभारल्या, आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी उत्तेजन दिलं. जो इस्लाम स्वीकारेल त्याला जिझियातून सूट मिळेल असं सांगितल्याने अनेकांनी इस्लाम स्वीकारला". इथे जिझियातून सूट मिळण्यासाठी लोकांनी इस्लाम स्वीकारला इतकं सरळसोट वाटेल, पण जिझिया हा प्रकार अत्यंत भयानक होता. तो देणं कठीण असल्याने नाईलाजाने जगण्यासाठी लोकांना धर्मांतर करावं लागत होतं. तुघलकांनंतर तैमूरलंग भारतात आला, आणि त्याने दिल्लीत आल्या आल्या पंधरा वर्षानंतरच्या साऱ्या 'गुलामांची' कत्तल केली.       

'स्त्रिया' हा या सगळ्यातला नाजूक धागा होता. खुद्द शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात होऊन गेलेल्या निकोलाओ मनुची नामक एका इटालियन प्रवाशाने मुघलांच्या सुल्तानीबद्दल, विशेषतः स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल लिहिलंय, "सुलतान आणि त्यांचे सरदार हे अत्यंत स्त्रीलोलुप आहेत, आणि आपल्या वासनेच्या पूर्तीसाठी आपल्या स्त्रीनावर त्यांचं  समाधान होत नाही, त्यासाठी ते अन्य मार्गही शोधत असतात. फकीर वगैरे लोकांनाही अनेक बायका आणि दासी असत. त्यांचा उपयोग बाहेरून भक्तिणी आणि आतून आपल्या कामवासनेची शिकार म्हणून केला जाई. अनेक जणी या नंतर फकिराच्या नादाला लागून त्यांची मदत करत. नवसाला येणाऱ्या सुंदर हिंदू स्त्रियांची माहिती त्या फकिरांना पुरवत आणि त्यावरून हे फकीर त्या स्त्रियांना फसवून व्यभिचार करत". 

समर्थ रामदासस्वामीं दासबोधातच तिसऱ्या दशकात, पाचव्या समासात लिहितात,

तंव तो गलबला जाला । परचक्र आले ।
अकस्मात धाडी आली । कांता बंदी धरून नेली ।
वस्तभावही गेली । प्राणियाची ।।
तेणे दुःख झाले भारी । दीर्घ स्वरे रुदन करी ।
मनीं आठवे सुंदरी । गुणवंत ।
ताव तिची वार्ता आली । तुमची कांता भ्रष्ट जालीं ।।

महम्मद घोरी ते बाबारापर्यंत दिल्लीच्या गादीवर ३५ सुलतान होऊन गेले, आणि शिवरायांच्या पूर्वी महाराष्ट्रावर पाच निरनिराळ्या शाह्यांतील ७२ सुलतानांनी राज्य केलं. साडेतीनशे वर्षं जेव्हा महाराष्ट्र या ७२ सुलतानांच्या सुलतानची भरडला गेला असेल, आणि वर जी अगदीच मोजकी वर्णनं केली तशी वेळ जेव्हा महाराष्ट्रावर आली असेल तेव्हा काय हाहाकार माजत असेल याची कल्पनाही करवत नाही. 

या सुल्तानीसोबत 'अस्मानी' नावाचं नैसर्गिक संकटही असे. निसर्ग शेवटी निर्विकार होता. त्याला दयामाया काही नव्हती. दुष्काळ पडला तर एकीकडे सुलतानी आणि ही अस्मानी इथल्या गोरगरीब रयतेला झेलावी लागे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, सतत तीन वर्षे दुष्काळ. सुलतान एकीकडून जीव घेत होतेच. समर्थ रामदासस्वामी भारतभ्रमण करताना सुलतानी आणि अस्मानी या दोहोंनी पिचून गेलेल्या रयतेचं दुःख पाहत होते. समर्थांनी आपल्या 'परचक्रनिरूपणा'त या सगळ्याचं वर्णन करताना म्हटलंय-

पदार्थमात्र तितुका गेला। नुसता देशचि उरला।
येणेकरिता बहुतांला। संकट जालें।।
लोके, स्थाने भ्रष्ट जालीं। कितेक येथेचि मेली।
उरली तें मराया आली। गांवावरी।।
काही रेडे पाडे उरलें। तें लोक गांवावरी आलें।
रगा करिता मरोनि गेलें। रेडे पाडे।।
माणसां खावया अन्न नाहीं। अंथरुण पांघरूण तेही नाहीं।
घर कराया सामग्री नाहीं। काये करिती।।
पुढें आला पर्जन्यकाळ। धान्य महर्ग दुःकाळ।
शाकार नाही भळभळ। रिचवे पाणी।।
कितेक अनाचारी पडिली। कितेक यातिभ्रष्ट जालीं।
कितेक तें आक्रंदली। मुलें बाळें।।
कितेक विषे घेतली। कितेक जळीं बुडाली।
जाळिली ना पुरिली। किती येक।।
ऐसें जालें वर्तमान। पुढेचि अवघ्या अनमान।
सदा दुश्चित अवघें जन। उद्वेगरुपी।।
अदयापी दुश्चिन्हें दिसती। दुष्ट ग्रह आडळती।
पुढेही वाईट सांगती। किती येक।।
काहींच पाहतां धड नाहीं। विचार सुचेना काहीं।
अखंड चिंतेचा प्रवाही। पडिलें लोक।।
येक म्हणती कोठें जावें। येक म्हणती कायें करावें।
विदेशा जाऊनि कायें खावें। वेच नाहीं।।
तथापि मार्गचि चालेना। भिक्षां मागता मिळेना।
अवघें भिकारीच जना। कायें म्हणावें।।
प्राणीमात्र जालें दुःखी। पाहाता कोणी नाहीं सुखीं।
कठीणकाळी वोळखीं। धरींनात कोण्ही।।
लोक बहुत प्रस्तावले। कितीयेक जाजावले।
कितीयेक तें कावले। उद्वेगरुपी।।

ही अवस्था झाली होती महाराष्ट्राची. उत्तर भारताप्रमाणेच इथेही देव सुरक्षित नव्हता. पुण्यात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन प्राचीन शिवालये होती. आपल्याकडे, पुरंदरे दप्तरात असलेल्या उल्लेखानुसार, "शके ११६८ (म्हणजे इ.स. १२४६) पीर पैगंबर फकीर अवलिया पुण्याजवळ आले. पुण्येश्वर केदार व नारायण दोन देव हिंदूंचे होते ते करामतीने उठऊन किल्ले पुरंदर नेले. तेथे (मंदिरांच्या ठिकाणी) दर्गे करून आपण राहिले."  

दासबोधाच्या तिसऱ्या दशकात, सातव्या समासात महाराष्ट्रातल्या लोकांची 'सुल्तानीत' भरड कशी होत होती याबद्दल लिहिलंय, 

प्राणी (माणसं) राजदंड पावत । जेरबंद चाबूक वेत ।
दरेमार तळवे मार होत । या नाव आदिभूतिक ।।
मोघरी मार, बुधले मार । चौखरून डंगारणे मार ।
बुक्क्या गचांड्या गुडघे मार । या नाव आदिभूतिक ।।
तिर मार, सुळी देती । नेत्र वृषण काढिती ।
नखोनखी सुया मारिती । या नाव आदिभूतिक ।।
कानी खुंट्या आदळिती । अपानी मेखा मारिती ।
खाल काढून टाकिती । या नाव आदिभूतिक ।।
सिरा ओढुनी घेती । टेम्भे लावूनी भाजती ।
ऐशा नाना विपत्ती । या नाव आदिभूतिक ।।

एकंदरच ही होती महाराष्ट्राची तत्कालीन स्थिती. शिवरायांच्या जन्मानंतर, बाराव्या वर्षी जेव्हा ते बंगळूरला गेले तेव्हा खुद्द आदिलशहाच्या दरबारात, त्याच्या राजधानीत काय प्रकार चालले आहेत ते त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. शहाजीराजांचं बंड कसं चिरडलं गेलं, खुद्द आपली काकू- खेळोजीराजांची पत्नी महाबतखानाने गोदावरीतीरावरून कशी पळवून नेली, रायारावाने आणि मुरार जगदेवाने पुण्यात काय हाहाकार मांडला होता आदी साऱ्या गोष्टी शिवाजी महाराजांना समजल्या नसल्या तरच नवल. महाराजांच्या मनात हा ज्वालामुखी भडका घेत होता. जिजाऊसाहेबांनी महाराजांना लहानपणापासून 'रामायण, महाभारताच्या' गोष्टी सांगून वाईटावर कशा पद्धतीने चांगली लोकं मात करू शकतात हे शिकवलं होतं. महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षांपासून जो स्वराज्यस्थापनेचा उद्योग केला त्यामागे ही सारी अस्मानी आणि सुलतानी मोडून, आपल्या रयतेला पुन्हा एकदा सुंदर सुखाचे दिवस दाखवण्याचं स्वप्न जिजाऊसाहेबांनी, शहाजीराजांनी आणि शिवरायांनी पाहिलं. 

तोरणा घेऊन सुरु झालेला हा प्रवास पुढे थांबलाच नाही. आदिलशाह, मुघल, सिद्दी, इंग्रज अशा परकीय सत्तांना तोंड देत, प्रत्येक संकटात मृत्यू कवटाळायला आला असूनही त्याला मात देत शिवरायांनी आपलं हे स्वप्न फुलवलं, सजवलं, वाढवलं. माणसामाणसांना सलगी देऊन महाराजांनी एक केलं आणि जणू काही शत्रूच्या लोंढ्यासमोर दगडाच्या सह्याद्रीसमवेत हाडामासाचा दुसरा कणखर सह्याद्री उभा केला. इ.स. १६७४ पर्यंत महाराजांनी अविरत कष्ट घेऊन राज्य स्थापलं, राखलं, अन वाढवलं. पण तरीही, महाराजांना 'राजा' म्हणून मान्यता न देणारे महाभागही या महाराष्ट्रात होतेच. स्वराज्याच्या स्थापनेच्या दहा वर्षानंतर सुद्धा जवळीकर मोऱ्यांनी महाराजांना उत्तर देताना, "तुम्ही कोण? राजे आम्ही! आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले" म्हटलं होतं. जावळीकर हे एक प्रातिनिधिक उदाहरण होतं. सूर्यराव सुर्वे, जसवंतराव दळवी वगैरे उदाहरणेही नंतर सापडतातच. या मानसिकतेला देखील मोडून काढणं गरजेचं होतं. साडेतीनशे वर्षे महाराष्ट्राने जी झळ सोसली होती, तिच्यावर फुंकर घालण्यासाठी या नव्या राज्याला अधिकृत 'राजा' म्हणून मिळवून देण्यासाठी कदाचित अनेकांच्या मनात असेलही, पण या बाबतीत सगळ्यात पुढे आले ते गागाभट्ट. साऱ्या हिंदुस्थानात सुलतानी अंमल प्रस्थापित झाला असताना एक हिंदू राजा या साऱ्या सुलतानांना तोंड देत एक नवं राज्य निर्माण करतो, अन एवढंच नाही तर औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्यालाही मात देतो ही गोष्ट सामान्य नक्कीच नव्हती. महाराष्ट्रातल्या या घडामोडींमुळे सारा उत्तर हिंदुस्थान महाराजांकडे आशेने बघू लागला होता. बुंदेलखंडातून छत्रसाल त्यासाठीच महाराजांच्या दर्शनाला आले. त्रिविक्रमपूरहून कवी भूषण रायगडावर आला तोच मुळी महाराजांची ख्याती ऐकून. अशीच ख्याती आणखी एका माणसाच्या कानावर सतत जात होती, अन ते म्हणजे गागाभट्ट. सभासद म्हणतो की गागाभट्टांनी विचार केला, "मुसलमान पातशाह तक्ती बैसवून, छत्र धरून,पातशाही करितात आणि शिवाजीराजे यांनीही चार पातशाही दाबविल्या आणि पाऊणलाख घोडा लष्कर गडकोट असे मिळविले असता त्यास तक्त नाही. याकरिता राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणिले."

आपल्याकडे एक प्रवाद कायम असतो, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, आणि म्हणून काशीहून गागाभट्टांना 'बोलवावं' लागलं. पण असं मुळीच नाही. एकतर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला याला कसलाही पुरावा उपलब्ध नाही, आणि इतिहास आपल्या मनाच्या गोष्टींवरून नाही तर पुराव्यांवरून ठरतो. दुसरं म्हणजे, गागाभट्ट हे स्वतः महाराष्ट्रीय ब्राह्मण होते. ते अचानक १६७४ला राज्याभिषेकासाठी इथे आले नव्हते. गागाभट्टांचं मूळ घराणं पैठणचं, पण ते पंधराव्या शतकात काशीत स्थायिक झाले. सुलतानची उध्वस्त झालेल्या काशीविश्वेश्वराचा जीर्णोद्धार हा गागाभट्टांच्या पणजोबांनी केला होता. आता पुन्हा औरंगजेबाच्या कारकिर्दीत काशीचा विश्वेश्वर पुन्हा भंगला आणि तिथे मशीद उभारली गेली. कदाचित यामुळेही असेल, पण औरंगजेबाविरुद्ध भडकून, आणि याच औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणाऱ्या महाराजांची ख्याती ऐकून गागाभट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विचार केला असावा असं दिसतं. गागाभट्टांना काशीच्या विश्वेश्वराच्या अग्रपूजेचा मान होता. यामुळेच, शिवरायांचा राज्याभिषेक एवढा मोठा धर्मपंडित करणार, यापुढे इतर स्थानिक ब्राह्मण गणतीतही नसावेत. 

मी या लेखात राज्याभिषेकाची आणि त्याच्या विधींची चारचा मुद्दाम केली नाही, करणारही नाही. कारण त्याबद्दल अनेक ठिकाणी माहिती सापडेलच, पण राज्याभिषेक करणं का गरजेचं होतं,महाराजांनी 'स्वराज्य' निर्माण केलं म्हणजे काय आणि त्यालाच अनुसरून नवीन राज्याला अधिकृत राजा मिळण्यामागचा विचार काय होता हे मला सांगणं जास्त संयुक्त वाटलं. शिवाजी महाराजांच्या लष्करी, न्याय, प्रश्न आणि इतर बाबींतही आपल्याकडे विपुल लिखाण झालेलं आहे. 'रयतेच्या भाजीच्या देठासही रास व दुरुस न वर्तणे' असं म्हणताना महाराजांचं रयतेविषयीचं मन दिसतं. स्त्रियांच्या बाबतीत आपल्याकडे कल्याणच्या सुभेदाराची कथा सांगितली जाते, त्या कथेला काहीही अर्थ नाही. इतिहासात तसलं काही घडल्याचे ठोस पुरावे नाहीत. पण दोन अस्सल पुरावे आपल्याकडे आहेत. एक म्हणजे रांझ्याच्या बाबाजी भिकाजी गुजर पाटलाचा. त्याचे हातपाय महाराजांनी तोडले हे सर्वश्रुत आहेच, पण आणखी एक उदाहरण म्हणजे रंगो वाकडे कुल्कर्ण्याचं. या रंगो वाकडे नावाच्या एका कुल्कर्ण्याने हंसाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेवर बलात्कार केला आणि मग त्याला अचानक आपलं भविष्य. रांझ्याच्या पाटलांसारखे आपले हाल वगैरे दिसू लागले. हा वाकडे घाबरून चंद्रराव मोऱ्यांच्या आश्रयाला गेला, आणि तिथेच मृत्यू पावला. महाराजांच्या एका पत्रात हा रंगो वाकडे 'देवकरणीने मयत झाला' म्हटलं आहे. आता तो हाय खाऊन मेला, का महाराजांच्या लोकांनीच त्याला तिथे जाऊन मारलं हे ठोस सांगता येत नाही. पण महाराजांचा स्त्रियांविषयीच्या सख्त शिक्षेची ही दहशत होती गुन्हेगारांमध्ये. अशाच अनेक बाबी आहेत, ज्यात सुलतानी आणि स्वराज्य यातला फरक स्पष्ट दिसून येतो. आणि म्हणूनच, इथल्या रयतेने आणि गागाभटांसारख्या महापंडितांनी महाराजांना 'छत्रपती' व्हावंच असा आग्रह धरला. 

ज्युलियन तारखेनुसार दि. ६ जून १६७४ रोजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. गागाभट्टांनी महाराजांना "क्षत्रियकुलावतंस छत्रपती" म्हणून घोषित केलं आणि रायगडासह सारं स्वराज्य शहारलं. हेन्री ऑक्झेण्डन नावाचा एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा वकील राज्याभिषेकाला रायगडावर हजर होता, त्याने काही नोंदी त्याच्या रोजनिशीत करून ठेवल्या आहेत, त्या आपल्याला इतरत्र वाचता येतात. त्याच्या म्हणण्यानुसार रायगडची राजसभा फुलून गेली होती. सिंहासनाच्या चौथऱ्यावर स्वतः महाराज सिंहासनाधिष्ठित झाले होते. गागाभट्ट त्यांच्या मस्तकी छत्र धरून उभे होते. युवराज संभाजीराजे आणि मोरोपंत हे सिंहासनाच्या खाली बसले होते आणि इतर सात प्रधान सिंहासनाच्या भवताली उभे होते. या सार्यानंतर रायगडी जगदिश्वरापर्यंत मिरवणूक वगैरे झाली आणि रायगडावरून तोफांचे बार काढण्यात आले. रायगडावरच्या तोफा ऐकून इतरही किल्ल्यांवरचा तोफखाना दणाणू लागला. काय दृश्य असेल नाही हे? भर पावसाळी आल्हाददायक वातावरणात स्वराज्याच्या गडकोटांवर आपले राजे महाराज झाले या आनंदाप्रीत्यर्थ तोफांचा गडगडाट होतो आहे.. खरंच, कधीकधी वाटतं, आपणही तिथे असायला हवं होतं, असूही कदाचित! सभासद लिहितो तसं, "या सर्व पृथ्वीवर म्लेंछ पातशाहा. मऱ्हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही." कवी भूषण देखील यावेळी रायगडावर उपस्थित होता. भूषणाचा 'शिवराजभूषण' हा ग्रंथ अमूल्य आहे. महाराजांनी सुलतानांच्या विरुद्ध केलेल्या अनेक घडामोडी आपल्याला त्यात वाचायला मिळतात. मग भूषण विश्वासार्ह आहे का? तर नक्कीच आहे, कारण या वेळी तो स्वतः इथे होता आणि राज्याभिषेकाच्या पंधरा दिवसानंतर त्याने आपला हा ग्रंथ पूर्ण केला असं तो स्वतःच लिहितो. अजून काय मोठा पुरावा हवाय?

एकंदरीतच, महाराजांचा राज्याभिषेक ही एक विलक्षण घटना महाराष्ट्राने अनुभवली. हा आनंदसोहळा आपण आज साजरा करताना या साऱ्या गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. केवळ 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' म्हणत झेंडे नाचवत, मोटारसायकल रॅलीज काढायच्या आणि डीजेवर नाचायचं या पलीकडे, महाराजांनी ही जी कार्य केली आहेत त्यामागचा उद्देश लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराजांनी समर्थांना दिलेल्या सनदेत ते म्हणतात, "जो जो उद्योग केला, व दुष्ट व तुरुख लोकांचा (सुलतानांचा) नाश करावा, विपुल द्रव्य करून राज्यपरंपरा आक्षई चालेल ऐशी स्थळे (किल्ले) दुर्घट करावीत ऐसे जे जे मनीं धरिले ते स्वामींनी आशीर्वादप्रतापें पूर्ण केले". महाराजांचं कर्तव्य महाराजांनी केलं. त्यांनी आपल्याला एक शिकवण दिली आहे, आणि ती शिकवण आचरणात आणणं हे आपलं कर्तव्य आहे. हा सण आहे असं मी सुरुवातीला म्हणालो ते यासाठीच. त्याच पावित्र्याने महाराजांचं, या राज्याभिषेकाचं स्मरण आपण सारेच ठेऊया. फार लांबवत नाही, राजते लेखनावधी!

- कौस्तुभ कस्तुरे