सय्यद बंधू, मराठे आणि तोतया बादशाह
इतिहासात गमतीशीर गोष्टी अनेक सापडतात. आपल्याकडे भाऊसाहेब, जनकोजी, छत्रपती रामराजा वगैरेंचे तोतये असल्याचं आपण अनेकदा वाचलं असेलच. पण अशीच एक गंमत १७१८ मध्ये झालेली, अन ती होती मुघल बादशहाच्या बाबतीत, हे आपल्याला माहित आहे का?
हसनअली (उपाख्य अब्दुल्ला) आणि हुसेनअली हे दोघे भाऊ म्हणजे १७१०-२०च्या दरम्यान दिल्लीदरबारचे किंगमेकर बनले होते. हे दशक उत्तरेत जवळपास या बंधूंनीच गाजवलं. एखादा बादशाह कसा बदलायचा, कोणाला कधी आणायचं हे जणू काही सूत्रबद्ध पद्धतीने हे दोघे भाऊ बेमालूमपणे करत असत. तर झालं असं, की या वेळेस, म्हणजे इ.स. १७१८ मध्ये दिल्लीच्या गादीवर होता फर्रुखसियर नावाचा एक बादशाह. या बादशाहालाही तसं या सय्यद बंधूंनीच तख्तावर बसवलं होतं. पण तख्तनशीन झाल्यावर बादशाहसाहेबांना या दोघं बंधूंचा मत्सर वाटू लागला अन मग तीच ती नेहमीची राजकारणं सुरु झाली. एका भावाला दुसऱ्या भावापासून फोडायचं, ते जमलं नाही तर दोघांना एकमेकांपासून दूर करून एकाला पकडायचं किंवा त्याचा खून पाडायचा वगरे मनसुबे हा बादशाह रचत होता. पण हे दोघे भाऊ काही असल्या मुर्दाड बादशहाला बधणारे नव्हते. या वेळेस सय्यद अब्दुल्ला अथवा हसनअली सय्यद हा दिल्लीत होता, आणि त्याचा भाऊ हुसेनअली हा दक्षिणेत होता. बादशहाचे उद्योह हुसेनअलीला भावाकडून अर्थातच समजले आणि मग या दोघांनी या बादशहाला धडा शिकवण्याचा घाट घातला.
या वेळेस दक्षिणेत शाहू महाराजांचं आसन हळूहळू स्थिरस्थावर होत होतं. 'अतुल पराक्रमी सेवक' म्हणून नावाजलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे हे अष्टप्रधान मंडळातील इतरही मंत्र्यांच्या साथीने बंडखोरांचा बंदोबस्त करत होते, राज्यविस्तार करत होते. नेमकं या वेळेस या सय्यद बंधूंना आता मराठ्यांची मदत घेणं आवश्यक वाटू लागलं. त्यांनी शाहू महाराजांना सरळ सरळ सांगितलं, तुम्ही एका हाताने आम्हाला मदत करा, तीच गोष्ट आम्ही तुमच्या बाबतीतही करू. दिल्लीदरबारातून तुमची जी कामं असतील ती आम्ही पूर्ण करून देऊ. या वेळेस दिल्लीच्या दरबारातून आपल्याला हवी असलेली अनेक कामं करून घ्यायची असल्याने, आणि खुद्द दिल्लीच्या बादशाहीचे किंगमेकर्स आपली मदत मागत असल्याने शाहू महाराजांनी या कल्पनेला तात्काळ होकार दिला. महाराजांनी दोन प्रमुख मागण्या हुसेनअली सय्यदासमोर ठेवल्या आणि हुसेनअलीने त्या तात्काळ मान्य केल्या. या दोन मागण्या काय होत्या? पहिली मुख्य मागणी म्हणजे पूर्वी झुल्फीकारखानाने पकडलेला सारा राजपरिवार अजूनही मुघलांच्या ताब्यात होता. खुद्द शंभूछत्रपतींच्या पत्नी, शाहू महाराजांच्या मातोश्री येसूबाई या गेली एकोणतीस-तीस वर्ष मुघल कैदेत होत्या. मदनसिंग नावाचा शाहू महाराजांचा एक सावत्र भाऊ हा १७०७ पासून मुघलांच्या कैदेत होता. माधोसिंह हा बहुदा त्याआधीच कैदेत गेलेला असावा. दुर्गाबाई नावाची संभाजी महाराजांची आणखी एक स्त्री कैदेत होती. या सगळ्यांना कैदेतून मुक्त करून मायदेशी सोडायचं ही पहिली मागणी. दुसरी मागणी म्हणजे थोरल्या कैलासवासी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य गिळंकृत केलं ते जसंच्या तासन आम्हाला परत मिळावं. त्यासोबतच आता आमच्या फौजा बादशाही मुलखात जिथे कुठे जातील तिथून चौथाई घेण्याचा हक्क मराठ्यांना असावा,आणि त्या उत्पन्नाच्या दहा टक्के हिस्सा हा छत्रपतींची खाजगी मिळकत म्हणून नेमण्यात यावी, या अशा एकूण तीन सनदा बादशहाकडून सय्यद बंधूंनी मिळवून द्याव्यात ही दुसरी मागणी. हुसेनअली सय्यदाने या दोन्ही मागण्या मान्य केल्या, अन या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी मराठा सैन्याची कुमक मागितली. शाहू महाराजांनी पेशवा बाळाजी विश्वनाथ यांना मोहिमेची मुखत्यारी देऊन सोबत खंडेराव दाभाडे सेनापती, भोसले वगैरे सरदार एकूण अकरा-बारा हजार फौजेसह हुसेनअलीच्या मदतीसाठी दिले. ही सारी फौज हुसेनअलीला औरंगाबादला येऊन मिळाली. हा ऑक्टोबर १७१८चा सुमार होता.
आता इथून खरी गंमत सुरु होते. हुसेनअली मराठ्यांना घेऊन दिल्लीत येतो आहे ही बातमी अर्थात फर्रुखसियरला समजणार होती, आणि तशी ती समजलीही. अन म्हणूनच, काहीतरी भक्कम कारण असावं म्हणून हुसेनअलीने एक गंमत केली. त्याने बादशहाला सांगितलं, "औरंगजेब बादशहाचा बंडखोर मुलगा अकबर इराणला पळून गेला. यानंतर कसं ते समजत नाही, पण हिंदुस्थानात राहिलेला अकबराचा मुलगा मुईउद्दीन हा आता राजा शाहूच्या कैदेत आहे. शाहूराजाने मला निरोप पाठवून कळवलं आहे की या माणसाला तुमच्याकडे सोपवायचं असेल आमचा राजपरिवार मुक्त झाला पाहिजे". एखादा बादशाह गादीवर असताना नवा राजपुत्र समोर येणं हे अत्यंत धोक्याचं होतं. त्यातही, आत्ता गादीवर असलेला फर्रुखसियर म्हणजे औरंगजेबाचा पणतू, बहादुरशाह (मुअज्जम)चा नातू. आता हा नवा मुईउद्दीन जो कोणी आहे, तो अकबराचा मुलगा म्हणजे आपला काकाच झाला की! आता हा दिल्लीत येऊन तख्ताची मागणी करू लागला तर? फर्रुखसियरच्या डोक्याला नवाच ताप झाला. हुसेनअलीला हे सगळं असंच होणार हे चांगलच माहीत असल्याने त्याने हा नवा मोहरा उभा केला होता. फर्रुखसियरने हुसेनअलीला पत्रं पाठवून या नव्या मुईद्दीनाला दिल्लीत बंदोबस्ताने पाठवून द्यायची आज्ञा केली. या आज्ञेचा आडोसा घेऊन हुसेनअलीने मराठ्यांनीहि फौज अन आपली अशी एकंदर पंचवीस हजार फौज घेऊन दिल्लीकडे केलं. अर्थातच, हे नवे शाहजादेसाहेब सोबत होतेच.
हुसेनअलीने शाहजादा मुईउद्दीनची अत्यंत बडदास्त ठेवली. शाही परिवारातल्या माणसाला साजेसं सगळं, मग ते मखमली पडद्यांपासून ते अगदी सिंहासन आणि शाहजाद्यांचा खास किमॉंशही तयार ठेवण्यात आला. वास्तविक हा मुईउद्दीन अकबराचा मुलगा वगैरे कोणी नव्हता. दक्षिणेतल्या एका काझीचा राजघराण्याला अत्यंत साजेसा असा दिसणारा, एक हुशार मुलगा या हुसेनअलीने पकडला अन त्यालाच मुईउद्दीन बनवलं. मुअज्जमखान नावाच्या एका जमादाराने साताऱ्याहून आलेल्या या नव्या शाहजाद्याचं मोठ्या धडाक्यात स्वागत केलं. तवारीखनवीस आणि अखबारनवीसांना "नेमकं काय लिहायचं आहे" याच्या आज्ञा आधीच देऊन ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशीच औरंगाबाद शहराच्या बाहेर शामियाने उभे राहिलेले दिसू लागले. या शामियानाच्या सुरक्षेसाठी नवी फौज तैनात झाली, ज्यांना एक महिन्याचा पगार आगाऊ देण्यात आला होता. मराठा सैन्यालाही नर्मदा ओलांडून वर गेल्यावर आणि दक्षिणेत परत येईपर्यंत बादशाही खर्चातून प्रत्येक माणशी एक रुपया प्रतिदिनी देण्याची आज्ञा हुसेनअलीने दिली. पुढच्या तीन-चार दिवसांनी या मुईउद्दीनाला एका अत्यंत सालंकृत हत्तीवर अंबारीत बसवण्यात आलं. ही अंबारी म्हणजे नवगजि होती, ज्याला सर्व बाजूंनी पांढऱ्या वस्त्रांनी आच्छादल गेलं होतं. लाल आणि पांढरे शुभ्र तंबू साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होते. शिवाय, या सगळ्याच्या बाहेर एक खंदकही खणण्यात आला होता. एखाद्या बादशहाला साजेसं असं सगळं काही या मुईउद्दीनसाठी तैनात करण्यात आलं होतं. हुसेनअली रोज या मुईउद्दीनकडे जाऊन मुजरा करत असे आणि त्याच्याशी बातचीत करत असे, जणू काही तो खरंच एखादा शाहजादा आहे असं वाटावं. हळूहळू हा सारा लवाजमा बऱ्हाणपूरला पोहोचला. इथे सय्यद अब्दुल्ला दिल्लीहून आला होता तोही भेटला. हे दोघे सय्यद बंधू आणि एकंदर बावीस मुघल सरदार आता उत्तरेकडे निघाले. यांच्या सोबत शाहू महाराजांचा एक मुत्सद्दी शंकराजी मल्हार, सोबतच बाळाजी विश्वनाथ पेशवे, खंडेराव दाभाडे सेनापती आणि मराठ्यांची फौज, ज्यात भिल्ल आणि तेलंगी तुकड्याही होत्या. सय्यद बंधूनी मराठा धुरिणांना हत्ती आणि घोडे नजर केले, आणि एकंदर २५ हजारांची ही फौज दिल्लीची वाट चालू लागली. हुसेनअलीने बादशहाला शाहू महाराजांच्या मागण्या कलावंतांना हेही म्हटलं की "या शाहजाद्याच्या जीवाला काही धोका उत्पन्न होता कामा नये असं शाहूराजानी कळवलं आहे, अन ही मागणीही मी मान्य केली आहे."
या साऱ्या दरम्यान कुतुब-उल-मुल्क उर्फ सय्यद अब्दुल्ला पुढे दिल्लीत जाऊन फर्रुखसियरला भेटला. हुसेनअलीचे हे कारनामे थांबावेत, अन सय्यद अब्दुल्लाने ते थांबवावेत म्हणून फर्रुखसियर बादशहाने त्याला थोडं झाडावर चढवण्याचा प्रयत्न केला खरा, पण अब्दुल्ला कसला मूर्ख बनतोय! त्याने बादशहाकडून जे जे पदरात पडता येईल ते पाडून घेतलं. आपल्याला अन आपल्या माणसांना उत्तमोत्तम नेमणुका आणि सगळ्यांच्या बढत्या करून घेतल्या. मुख्य मुख्य प्रदेशांवर आपल्या विश्वासातल्या माणसांच्या बदल्या केल्या. इकडे सवाई जयसिंह मात्र बादशहाच्या बाजूला गेल्याने बादशहाने त्याला राजिंदर राजाधिराज अशी पदवी बहाल केली.
इकडे हुसेनअलीने आणि मराठा फौजांनी १४ डिसेंबर १७१८ला बऱ्हाणपूर अन पुढे २६ डिसेंबरला उज्जैन सोडलं. बादशहाने हुसेनअलीला या नव्या शाहजाद्याला आपल्या हाती सोपवून पुन्हा दक्षिणेत जाण्याचा हुकूम केला होता, पण हुसेनअलीने हे काही ऐकलं नाही. या सगळ्यात मुईउद्दीन अत्यंत कडेकोट बंदोबस्तात होता. कोणी त्याला चटकन ओळखू नये म्हणून त्याच्या अंबरीभवताली कायम पडदे सोडलेले असत, भवताली कडक पहारा असे. त्याच्या अंबारीच्या मागे,नवगजित दोन माणसं कायम मोर्चेल ढाळत असत. उदयपूरच्या मुलुखातून जाताना या मुलखाला काही तोशीस लागली नाही, पण पुढे सवाई जयसिंहाच्या मुलुखातून जाताना मात्र हुसेनअलीच्या फौजांनी जयसिंह हा बादशहाचा पक्षपाती म्हणून प्रचंड नासधूस केली. इकडे हुसेनअली ऐकत नाही म्हणून फर्रुखसियर बादशहाने निजाम-उल-मुल्क वगैरे सय्यद बंधूंच्या विरोधात असलेल्या सगळ्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न सुरु केला, पण फारसा उपयोग झाला नाही. हुसेनअली अगदीच जवळ आल्याने बादशहाने नाईलाजाने जाफरखान आणि इतिकादखान या आपल्या विश्वासू सरदारांना हुसेनअलीला सामोरं जाण्यास फर्मावलं. दि. १४ फेब्रुवारी १७१९ रोजी अलिवर्दीच्या सराईत या दोघांनी हुसेनअलीचं आणि मराठा धुरिणांचं स्वागत केलं. यानंतर लगेच अमीनुद्दीनखानाच्या हवेलीत बोलाचाली करण्यासाठी भेट घडली असता बादशाही हुकुमाने आपल्याला दगाफटका होऊ शकतो असा संशय हुसेनअलीला आला आणि त्याने ही चर्चा करण्याचं टाळलं. अखेरीस इलाज चालेना म्हणून बादशहाने दोघंही सय्यद बंधूंची भेट घेण्याचा दिवस निश्चित केला. हा दिवस होता दि. २३ फेब्रुवारी १७१९.
या दिवशी, म्हणजेच दि. १९ फेब्रुवारीला, सूर्योदया नंतर तीन तासांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यात सर्वप्रथम प्रवेश करते झाले ते मराठे. आपापल्या हुद्द्यावर मराठा धुरीण किल्ल्यात प्रवेशते झाले. पाठोपाठ सय्यद हुसेनअली आपल्या तुकडीसह आत आला. या साऱ्यांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने आत मुलाखतीच्या दिवाणखान्यात, बहुदा दिवाण-ए-खास असावा, तिथे जायलाच जवळपास दुपारचे तीन वाजले. हुसेनअलीखान रिवाज म्हणून बादशहाच्या पायाचं चुंबन घ्यायला वाकला,पण बादशहाने त्याला तसं करू न देता त्याला आलिंगन दिलं. सुरुवातीचे सवाल-जवाब झाल्यावर बादशहाने हुसेनअलीला विचारलं, "तुमचा कैदी, तो अकबराचा पुत्र कुठे आहे?" हुसेनअली म्हणाला, "इथेच आहे, पण मराठे त्याला तोवर सादर करणार नाहीत जोवर शाहूराजांच्या आईची आणि इतर परिवाराची सुटका होत नाही." यावेळेस शाहूराजांच्या भावाला, बहुदा मदनसिंग असावा, त्याला सन्मानाने दरबारात आणण्यात आलं. स्त्रियांना दरबारात येता येत नसल्याने येसूबाईंची आणि इतर परिवाराचीही सुटका केल्याचं बादशहाने दर्शवलं. हुसेनअलीने लगेच बादशहाला वाचन दिलं की सगळ्यांदेखत अकबराच्या मुलाला म्हणजेच मुईउद्दीनला दुसऱ्या दिवशी बादशहाच्या स्वाधीन करण्यात येईल, जेणेकरून कोणाच्याही मनात संशय राहणार नाही. बादशहाने संतोषाने स्वतःचा किमॉंश काढून हुसेनअलीच्या डोक्यावर ठेवला, अन आपल्या अंगावर जेवढे सय्यदच्या अंगावर चढवले. हे सगळं केवळ दिखावा म्हणून बरं! दोघांनाही एकमेकांबद्दल काही कळवळा नव्हता. बाकीच्या दरबाऱ्यांना मात्र वाटलं, "चला, सुटलो बुवा एकदाचे यातून.. बादशाहसाहेब किती उदार, लगेच माफ केलं हुसेनअलीला. अन हुसेनअलीदेखील किती एकनिष्ठ, त्यानेही आपली निष्ठा दर्शवली.."
दुसऱ्या दिवशी काही कारणाने मुईउद्दीनला बादशहाकडे सोपवण्यात आलं नाही. २४ आणि २५ फेब्रुवारीला बादशहाने नेहमीसारखं कामकाज केलं. पण २६ फेब्रुवारीला मात्र दरबारी कामकाज सोडून बादशाहने शहरात जाऊन फिरण्याचा उगीच घाट घातला. मुईउद्दीनला सय्यद सोपवत नाहीत यातली गोम त्याला कळली. चाणाक्ष सय्यद बंधूनाही यातला धोका ओळखायला वेळ लागला नाही. बादशाह किल्ल्याबाहेर जाणार आणि आत आपला दग्यानें खून पडणार हे ओळखायला वेगळ्या शहाणपणाची गरज नव्हती. तातडीने सय्यद अब्दुल्लाने काही कारण काढून आणि मुईउद्दीनला सोपवण्याचा बहाणा करत बादशहाला किल्ल्यातच रोखलं, अन दोघे बंधू किल्ल्याबाहेर गेले. दुसऱ्या दिशी भल्या पहाटे सय्यद अब्दुल्लाच्या वतीने राजा मुहकमसिंहाने दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या मुख्य असलेल्या लाहोर दरवाजावर आपले पहारे बसवले. सय्यद अब्दुल्ला आल्यावर त्याने किल्ल्यातील प्रमुख ठिकाणांवर आपले पहारेकरी बसवले. किल्ल्यावर आता सय्यदांचा अधिकार झाला. याच दिवशी माध्यान्ही हुसेनअलीखान राजपुत्र मुहिउद्दीनला पुर्वीसारखंच बंदोबस्तात घेऊन किल्ल्यात प्रवेशता झाला. या वेळेस त्याच्याकडे जवळपास ४० हजार घोडेस्वार आणि तोफखाना होता. हा मुईउद्दीन लाल किल्ल्यात प्रवेश करत असताना मोठ्या आवाजात त्याच्या स्वागतासाठी ललकाऱ्या देण्यात आल्या. लाहोर दरवाजाच्या जवळच किल्ल्यात असलेल्या शायिस्ताखानाच्या हवेलीत मुईउद्दीनचा मुक्काम झाला आणि त्या हवेलीभवताली मराठा फौजा संरक्षणासाठी थांबल्या. या दिवशी सय्यद अब्दुल्ला आणि बादशाह फर्रुखसियर यांच्यात बोलाचाली होता होता शब्दाला शब्द वाढत गेला. अखेरीस "अजूनही अकबराच्या मुलाला माझ्या ताब्यात का देत नाही?" असं बादशहाने रागाने विचारलं आणि सय्यद अब्दुल्लाचाही संयम सुटला. दोन्ही बाजूंनी अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली गेली. सय्यद अब्दुल्ला रागारागात दिवाण-ए-खास मधून बाहेर पडला. मागे उरलेल्या इतिकादखानावर बादशहाची गैरमर्जी झाली. पण डोकं थंड झाल्यावर बादशहाला आपली चूक कळून चुकली. साऱ्या किल्ल्यावर सय्यदांचे पहारे असल्याने त्यांना दुखावून आपण यातून निसटू शकणार नाही हे त्याला समजलं. त्याने जाफरखानाला म्हटलं, "सय्यद अब्दुल्लाला माझ्या भेटीसाठी घेऊन ये. त्याला सांग की त्याच्या ज्या काही मागण्या असतील त्या मी पूर्ण करिन निश्चितच." यावर जाफरखान म्हणाला, "आता ती वेळ निघून गेली आहे. आता एकच उपाय आहे, बादशहांनी स्वतः जाऊन त्याची भेट घेणं." बादशहाने हे नाकारलं. तो तडक दिवाण-ए-खास मधून बाहेर पडला आणि जनानखान्यात जाऊन लपला. दरवाजावर तुर्की आणि हबशी स्त्रियांचे पहारे ठेवण्यात आले. बादशहाने अजितसिंहाला कळवलं, "पूर्वेकडच्या बाजूने तुझे पहारे आहेत, तू मला इथून गुपचूप जाऊ दे", पण अजितसिंह म्हणाला, "ती वेळ निघून गेलीय, आता तिथेही सय्यदांचे पहारे आहेत."
दि. २८ फेब्रुवारी १७१९ला सूर्यदयाच्या तासाभरानंतरच शहरात दंगल भडकली. दुर्दैवाने या दंगलीत मराठ्यांचेही काही धुरीण मारले गेले. संताजी भोसले, बाळाजी महादेव भानू (नाना फडणवीसांचे आजोबा) वगैरे दोन-तीन असामी पडल्या. ग्रांट डफ, खाफीखान वगैरेंनी दिलेला आकडा आहे दीड हजार मराठ्यांचा. हा आकडा किती खरा किती खोटा सांगता येत नाही, पण मोठं नुकसान झालं. या धुमश्चक्रीत सय्यद दिलावरअलीखान, सय्यद बंधूंचा विश्वासू याने दिल्ली दरवाजावर आपले पहारे बसवले. आता लाल किल्ला पूर्णपणे सय्यद बंधूंच्या हाती आला. सय्यद अब्दुल्लाने फर्रुखसियरला अजूनही बाहेर येऊन तख्त धारण करण्यासाठी सांगितलं पण बादशहाने घाबरून याला, आणि जनानखान्याच्या बाहेर पाऊल टाकायला नकार दिला. सय्यद अब्दुल्लाने अखेरीस बादशहाला अटक करण्यासाठी आपल्या माणसांना जनानखान्याकडे पाठवलं. पहारेकरी स्त्रियांनी जेवढा शक्य तेवढा प्रतिकार केला, पण अखेरीस फर्रुखसियर कैद झाला. त्याला किमॉंशविरहित आणि पायी काही घातलं नसलेल्या अवस्थेत दिवाण-ए-आम मध्ये सय्यद अब्दुल्लासमोर फरपटत नेण्यात आलं. क्षणाचाही विलंब न करता सय्यद अब्दुल्लाने आपल्या माणसांना फर्मावलं, "याला दूर घेऊन जा, आणि याचे डोळे काढून टाका." फर्रुखसियरला एका अंधाऱ्या खोलीत कैदेत टाकण्यात आलं. दुपारी बातमी बाहेर आली की फर्रुखसियर बादशहाला कैद करण्यात आलं असून नवा शाहजादा तख्तावर बसला आहे. हा नवा बादशाह म्हणजे औरंगजेबाचा पणतू होता, मुअज्जमचा नातू होता, अन मुख्य म्हणजे फर्रुखसियरचाच चुलत भाऊ होता. याचं नाव होतं रफीउद्दरजत. या सगळ्यात त्या मुईउद्दीनचं काय झालं? काही ठाऊक नाही! सय्यद बंधूंना जे हवं होतं ते झालं होतं, आता त्या तोतया बादशहाची गरज नव्हती. तो बहुदा पुन्हा दख्खनेत गेला असावा.
फर्रुखसियरचा पुढे दोन महिन्यांनी खून पाडण्यात आला. मुघल इतिहासकार खाफीखानाने यावर भाष्य करताना दिलंय, "हा मार्ग त्यांना विशेषत्वाने आमंत्रण देण्यामुळे प्राप्त झाला होता. तसे झाले नसते तर, त्यांनी पुढच्या युगात, आपण शाही राजधानी दिल्लीत जाऊन हिंदुस्थानच्या सम्राटाला पदच्युत करून तुरुंगात टाकल्याचा अभिमान बाळगला नसता का?" विल्यम आयर्विनने मात्र खाफीखानाचा हा वृथा मुघली अहंकार दूर करत आपला शेरा मारला आहे, "बिचारा खाफीखान, जरा जास्त काळ जगला असता, तर त्याने अशा घटना पाहिल्या असत्या जिथे अशा बढाईचे रूपांतर सत्यात बदललेले त्याला दिसले असते!" (If Khafikhan, poor man, had lived a little longer, he would have seen events that turned such a boast into no more than the sober truth!- Later Mughals Page 384)
ही मोहीम मराठ्यांसाठी मात्र काहीसं नुकसान झालं तरी इतर गोष्टीत फायद्याची ठरली. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेत राजमाता येसूबाईंसह इतर राजपरिवाराची जवळपास तीस वर्षांनी सुटका झाली. यासोबतच चौथाई-सरदेशमुखी-स्वराज्य अशा तीनही सनदा घेऊन मराठे दि. ३० मार्च १७१९ रोजी दिल्लीबाहेर पडले आणि दक्षिणेच्या मार्गाला लागले. या सगळ्यात बाळाजी विश्वनाथांचा मोठा हात असावा असं दिसतं, कारण पुढे जेव्हा रघुनाथरावांनी १७५४ मध्ये दिल्लीचा बादशाह बदलून नवा बादशाह बसवला तेव्हा एका पत्रात या १७१९ सालच्या दिल्लीतील क्रांतीचा आणि बादशाह बदलण्याचा उल्लेख आला आहे. पेशवे दप्तर खंड २१, लेखांक ६५ मधील या पत्रात म्हटलंय, "पूर्वी तीर्थरूप कैलासवासी नाना (बाळाजी विश्वनाथ) याणी महम्मदशाह पातशाह तख्ती बसविला, त्याप्रमाणे हे (रघुनाथराव)ही शाहजाद्यास आपले हाते राजी बसऊन आपला स्थापित असा करून येतील." या पत्रात बाळाजी विश्वनाथांनी महम्मदशाह बादशाह बसवला असं म्हटलंय त्याच कारण म्हणजे, सय्यद बंधूंनी बसवलेला रफीउद्दरजत केवळ तीन महिने,आणि त्यानंतर आलेला रफिउद्दौला केवळ साडेतीन महिने टिकले. त्यानंतर लगेच गादीवर आला तो महम्मदशाह. यामुळेच पात्रात महम्मदशाहाचा उल्लेख केला आहे. एकंदरीतच, या सगळ्या बनावाची सुरुवात झाली ती एक तोतया उभा करून, अन शेवट झाला तो दिल्लीचा बादशाह बदलून, मराठ्यांसाठी फायद्याचं असं सगळं पदरात पाडून.
© कौस्तुभ कस्तुरे