पहिला बाजीराव: हिंदुत्वाचा वाढता परीघ
ज्येष्ठ शुद्ध १३, शके १५९६ या दिवशी रायगडावर मराठ्यांचं स्वतंत्र सुवर्णसिंहासन निर्माण झालं. देवगिरी भंगल्यानंतर, जवळपास साडेतीनशे वर्षानंतर दख्खनेत सुलतानी सत्तेविरुद्ध बंड होतं आणि ते यशस्वी करून एक 'मऱ्हाटा पातशाह छत्रपती झाला', ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. समर्थांनी शिवरायांच्या कार्याचं मूल्यमापन करताना 'देव-धर्म-गोब्राह्मण। करावया संरक्षण। हृदयस्थ झाला नारायण। प्रेरणा केली' असं म्हणतानाच 'या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही। महाराष्ट्रधर्म राहिला काही। तुम्हांकारणे' असंही म्हटलं. समर्थांचा हा महाराष्ट्रधर्म म्हणजे 'मराठा तितुका मेळवावा', अन मग 'अवघा हलकल्लोळ करावा, धर्मस्थापनेसाठी' असा होता. मराठा म्हणजे भगव्या झेंड्याखाली जो जो लढेल तो तो मराठा. मग तो जन्माने कोणत्याही जाती-धर्माचा असो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाची जी व्याख्या केली आहे, त्यात "जो या भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू" असं म्हटलं आहे. समर्थांनी हेच, थोड्या वेगळ्या शब्दांत सांगितलं. शिवरायांनी हेच कृतीने प्रत्यक्षात उतरवून दाखवलं, अन शिवरायांच्या पुढल्या पिढ्यांनी याच विचारावर समृद्ध साम्राज्याचा वटवृक्ष उभा केला. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातच या वटवृक्षाची मुळे इतकी खोलवर रुजली की दिल्लीच्या मोंगल सत्तेचा पाया खिळखिळा झाला. मराठे केवळ नर्मदेपार गेले नाहीत, तर अंतर्वेद म्हणजे गंगा-यमुनेच्या मधल्या प्रदेशात आणि खुद्द दिल्लीच्या अंगणात जाऊन बसले. ही करामत केली होती ती एका महापराक्रमी मराठा पेशव्याने, पेशवा बाजीराव बल्लाळने.
बाजीरावांच्या राजकारणाची इमारत उभी होती तीच मुख्यत्वे शिवछत्रपती महाराजांनी घालून दिलेल्या महाराष्ट्रधर्माच्या भक्कम पायावर. या लेखात बाजीरावांच्या धर्मसंस्थापना आणि धर्मरक्षणाविषयी काही महत्वाच्या प्रसंगांची मी चर्चा करणार आहे. काही प्रसंग वाचकांना नवीन असतील तर काही यापूर्वीही ऐकलेले असतील याची मला खात्री आहे.
बाजीराव पहिल्यांदा इ.स. १७१९च्या स्वारीत वडील बाळाजी विश्वनाथांच्या सोबत दिल्लीत गेले. ज्याप्रमाणे शिवरायांनी वयाच्या बाराव्या वर्षी विजापुरात जाऊन आदिलशहाचा दरबार प्रत्यक्ष पाहिला आणि आपल्या भविष्यातील शत्रूचा अंदाज घेतला तद्वत बाजीरावांनीही वयाच्या अठराव्या वर्षी दिल्लीची पातशाही पाहिली, तिचं पाणी जोखलं. औरंगजेब गेल्यानंतर खिळखिळी झालेली पातशाही मराठ्यांच्या वादळवाऱ्यासमोर तग धरू शकणार नाही याचा अंदाज कदाचित बाजीरावांना तेव्हाच आला असेल. पुढे सात-आठ वर्षे दक्षिणेतच गुंतून पडल्याने बाजीरावांना हिंदुस्थानात बघायला फारसा अवधी मिळाला नाही. पण पालखेड जिंकल्यानंतर संबंध दख्खन आणि हिंदुस्थानात या तरुण मराठा पेशव्याचा डंका वाजू लागल्यावर हीच संधी योग्य आहे असं म्हणून बाजीरावांनी आपल्या धाकट्या बंधूंसह नर्मदा ओलांडली, आणि दोन्ही भावांनी सध्याच्या मध्य भारतातील, म्हणजे तत्कालीन माळवा आणि बुंदेलखंड हा संबंध प्रांत हळूहळू जिंकून घेऊन मराठा साम्राज्याला जोडला. यावेळेस शाहूछत्रपती महाराजांनी 'जो जिंकेल त्याचा प्रदेश' अशी संघराज्य व्यवस्था स्वीकारल्याने नर्मदेच्या वरील प्रदेश पेशव्यांच्या अखत्यारीत आला. बाजीरावांनी पूर्वीच माळव्यात बस्तान बसवलं तेव्हा धरला ठाणं देऊन पवार बंधूंना तिथे ठेवलं होतं. आता नव्याने जिंकलेल्या माळवा प्रांतात बाजीरावांनी आपले दोन खंदे सरदार, जे पेशव्यांचे डावे-उजवे हात होते, त्या मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंद्यांना माळव्याचा सुभा वाटून देऊन कायमस्वरूपी छावणी करण्यास सांगितलं. माळवा बाजीरावांनी जिंकल्यावर लागूनच असलेल्या राजपुतांनाही पेशव्याचा धाक बसला. उदयपूरची गादी कायमच स्वातंत्र्य बाण्याची होती, पण सवाई जयसिंह वगैरे राजपुतांना जरबेत आणणं गरजेचं होतं. बाजीरावांनी तेही यथायोग्य केलं.
गम्मत म्हणून सांगतो, पण जंजिरेकर सिद्दी आणि इंग्रज हे आधीपासूनच हातात हात घालून मराठ्यांच्या विरीधात संगनमत करत असत. अगदी शिवछत्रपती महाराजांनी खांदेरी जिंकल्यावर सिद्दीने इंग्रजांच्या मदतीने उंदेरी जिंकून घेतला. पुढेही इंग्रजांच्या आश्रयाने सिद्दी मुंबईच्या आसपासच्या खेड्यांतून प्रजेला लुटून नेत असे, गुलाम म्हणून पुरुषांना पकडून नेत असे, गायी-गुरांचे आणि स्त्रियांचे हाल तर वर्णायलाच नको. बाजीरावांनी आधी मुख्य शत्रूंना बाजूला करून हळूहळू यांच्याकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली होती. इंग्रज चिवट असल्याने आधी सिद्दीला नमवावं म्हणून १७३३च्या अखेरीस सहा महिने स्वतः बाजीराव जंजिऱ्यासमोर दंडा-राजपुरीला तळ देऊन बसले होते. या प्रकरणात सिद्दीला इंग्रजांची मदत मिळते आहे हे पाहून बाजीरावांनी जरबेने विचारलं तेव्हा इंग्रजांनी कांगावा केला, की दिल्लीच्या बादशहाकडून आम्हाला फर्मान आलं आहे. वास्तविक हे फर्मान वगैरे काही आलं नव्हतं आणि इंग्रजांनी स्वतःहून ही आगळीक याही वेळेस केली होती. बाजीरावांनी इंग्रजांना एवढंच म्हटलं, "महाराष्ट्राची मदत करून काय मिळणार? असं तुम्हाला वाटत असेल. पण पातशाहाचा परवाना आलाच कुठून? पातशाहाचे शेजारी आम्ही आहोत, आम्हाला सगळ्या बातम्या असतात. तुम्हाला मदत करायची तर खुशाल करा, पण एक लक्षात ठेवा, आम्ही तुमच्यावर हल्ला केला नाही अजून ही ईश्वराचीच कृपा आहे. मुंबई ही मुंबई म्हणून आजवर राहिली आहे ते कोणामुळे राहिलीय हे सर्वांना ठाऊक आहे". हे वाचल्यावर इंग्रजांची भीतीने गाळण उडाली नसेल तरच नवल.
इंग्रजांच्या जोडीलाच वसईकर पोर्तुगीजांचा अंमल भयंकर त्रासदायक झाला होता. इन्क्विझिशनचे भयंकर प्रकार इथे सुरु होते. एखाद्याने धर्मांतराला नकार दिला तर सरळ तेलात बुडवलेले डगले अंगात घालून, माणसाचे हातपाय बांधून त्याला जिवंत जाळण्यात येई, मेखसूखाली जीव घेण्यात येई. जवळपास इ.स. १७२५ पासूनच गंगाजी नाईक अणजूरकर वगैरेंनी बाजीरावांच्या मागे वसई प्रांत मोकळा करण्याचा लकडा लावला होता, पण त्याला मुहूर्त जवळपास बारा वर्षांनी मिळाला. चिमाजीअप्पांनी सलग तीन वर्षे ही प्रदीर्घ मोहीम काढून वसई प्रांतातून पोर्तुगीजांचं उच्चाटन केलं. चिमाजीअप्पांनी वसईवर हल्ला केला त्याच सुमारास बाजीरावांनी गोव्यावर आपले मेव्हणे व्यंकटराव घोरपडे आणि कोल्हापूरकर सरदार दादाजी भावे यांना पाठवलं होतं. गोवा पूर्ण जिंकता आलं नाही पण उत्तर कोकण मुक्त झालं. यावेळेस अप्पांच्या आणि बाजीरावांच्या कौतुकपर पत्रांत अनेक ठिकाणी "देवब्राह्मणांची संस्थापना करून हिंदूराज्याच्या संस्थापनेचा हेतू पूर्णत्वास जाईल" अशी इच्छा व्यक्त केली आहे. खुद्द नाना फडणीस पुढे सवाई माधवरावांना सांगतात, "आपासाहेबी वसईचे मसलतीस भगीरथ प्रेत्न करून, फिरंगान प्रांत हस्तगत करून, धर्मराज्य हिंदुराज्याची स्थापना केली". व्यंकटराव घोरपड्यांनी गोव्याच्या पोर्तुगीजांना सरळसरळ सांगितलं, "तह करतोय, पण इथे, म्हणजे गोव्यात हिंदुधर्म चालवावा". अर्थात, हिंदूंना इथे काही उपद्रव होता कामा नये.
दि. २३ मार्च १७३९ रोजी बाजीरावांनी उदेपूरच्या महाराण्याचा, महाराणा जगतसिंह दुसरे यांच्या दूधभावाला लिहिलेलं एक संस्कृत पत्रं ऐतिहासिक संकीर्ण निबंधाच्या पाचव्या खंडात प्रकाशित झालं आहे. या दूधभावाचं नाव नगराज. जगतसिंहाच्या सोबतीनेच हा नगराज देखील उदयपूरच्या राजकारणात एक महत्वाची व्यक्ती होता. बाजीरावांनी हे पत्रं लिहिलंय याच्या नुकतंच काही काळ आधी इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीत येऊन प्रचंड धुमाकूळ घातला होता. त्यातील अंगावर शहारे आणणाऱ्या बातम्या सातारा-पुण्याकडे आणि संबंध मराठी रियासतीत पसरल्या होत्या. या पत्रात बाजीराव काय म्हणतात ते पाहिल्यास या हिंदुनृपतीच्या पेशव्याची व्यापक दृष्टी आणि संबंध हिंदुस्थानच्या राजकारणाची जण लक्षात येते. बाजीराव लिहितात,
"आपल्या प्राधान्याचा समय आला आहे, त्यास, येथून पाठवलेल्या पत्रांच्या धोरणाने दिवाणजी स्वधर्मसंरक्षणानुकूल होतील असे करावे. नाहीतर, शत्रूचा प्रभाव पाहून स्वस्थ बसल्यास ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही प्रकारच्या कल्याणाचा विघातच होईल. दिवाणजींनी आपणास प्राधान्य दिले हे ऐकून परमानंद झाला. शिवाय, तुम्ही सवाई जयसिंहप्रभुतींचे ऐक्य संपादन करून सर्व हिंदूंचा सेनासमुदाय एकत्र करावा, म्हणजे आपली सेना सव्वा लक्षांची होईल. आमचाही सर्व सेनासमुदाय एकत्र आल्यावर दोन लक्ष सेना होईल. मग शत्रूपराजयाचा यत्न करावा. नाहीतर हिंदूंचे शौर्य व स्वधर्म बुडाला ऐसे होईल". उदयपूर आणि जयपूर या राजपुतांच्या दोन प्रमुख संस्थानांमधला विस्तव वर्षानुवर्षे जात नव्हता. उदयपूरची राजगादी ही सुरुवातीपासूनच मुघलांच्या विरोधात राहिली तर मूळच्या आमेर आणि नानगटारच्या जयपूर संस्थानाने कायमच मुघलांचं मांडलिकत्व पत्करलं. सहज ओळख करून द्यायची तर अकबराविरुद्ध दंड थोपटणारे महाराणा प्रताप हे उदयपूरच्या गादीचे तर शिवरायांविरुद्ध चालून येणारे मिर्झाराजा जयसिंह हे आमेरच्या गादीचे. पण पुढे जसा बाजीरावांचा वावर हिंदुस्थानात वारंवार होऊ लागला, विशेषतः १७२८च्या पालखेड आणि १७२९-३०च्या माळवा-बुंदेलखंड मोहिमांनंतर बाजीराव हा पुढेमागे हिंदू साम्राज्याचा पराक्रमी झेंडा दिल्लीवर रोवल्याशिवाय राहणार नाही हे दिसू लागलं तेव्हा उदेपूरच काय, पण जयपूरची राजगादीही पेशव्यांना घाबरून राहू लागली. बाजीरावांनी कधी धाकदपटशाने, तर कधी प्रेमाने जयपूरच्या सवाई जयसिंहांचं मतपरिवर्तन केलं. आणि या वेळेस, म्हणजे नादीरशहाच्या स्वारीच्या वेळेस ज्या दोन गाद्यांमधील विस्तव जात नव्हता त्यांना एकत्र करून, शिवाय आपली मराठ्यांनीहि फौज एकत्र करून दोन लाखांची प्रचंड हिंदुसेना नादीरशहाच्या विरोधात उतरवायचं बाजीरावांचं हे राजकारण विलक्षण होतं. अर्थात, नेमकं नादिरशाह या सगळ्याचा सुगावा लागून मायदेशी चालत झाला आणि मराठी फौजा वसईतून लवकर मुक्त होऊ शकल्या नाहीत त्यामुळे बाजीरावांच्या या बेताची पूर्तता होऊ शकली नाही.
बाजीराव गेल्यानंतर दिल्लीतील पेशव्यांचे वकील महादेवभट हिंगणे यांना लिहिलेल्या पत्रात चिमाजीअप्पांनी बाजीरावांच्या एकंदर व्यक्तित्वाचं विवेचन केलं आहे ते असं- "रायांचीही बुध (बुद्धी) रयत प्रतिपाळणास पूर्ण. देवाब्राह्मणांची स्थापना करुन काश्यादिक महास्थळी विश्वेश्वराच्या जीर्णोद्धार करावयास निरंत होऊन त्याच मार्गेकरून रयत नांदविली. रेवादक्षणतीरी देवाब्राह्मणांची स्थापना करून महास्थळाचा जीर्णोद्धार केला. पुढे, उत्तरप्रांती कीर्तिलता प्रफुल्लित केली. विश्वेश्वराचे स्थापना करावी हे आर्त होतीच" यापुढची अप्पांची वाक्य अतिशय महत्वाची आहेत. "सर्वा हिंदूंस महादाश्रये रावच (बाजीरावच) होते. रायासारिखा सामानपूर, सर्व गोष्टीने संपूर्ण दक्षिणेस, या हिंदुस्थानात दुसरा कोणी नव्हता".
बाजीरावांची अशी अनेक पत्रे, अनेक घटना सांगता येतील, विस्तारभयास्तव इथे केवळ तीन-चार सांगितल्या आहेत. अठराव्या शतकात, यमुनेच्या पात्रात मराठी घोडी फिरवून, साक्षात दिल्लीपतीच्या लाल किल्ल्याच्या आसमंतात धुमाकूळ घालून "मराठे आणि महाराष्ट्रधर्म" तुमच्या जुलुमाखाली मृत्यूपंथाला लागला नाही, तर अजूनच महत्त्वाकांक्षेने उंच झेपावला आहे असं बाजीरावांनी आपल्या कृतीतून ठणकावून सांगितलं. सदाशिव नाईक जोशांनी बाजीरावांच्याच काशीत निरनिराळे घाट बांधायला प्रारंभ केला, आणि पुढे अनेक मराठा सरदारांनी आणि राज्यकर्त्यांनी आपल्या नावे काशीत घाट वसवायला प्रारंभ केला. बाजीरावांच्या नंतर पुढे त्यांचे पुत्र नानासाहेब हे वडिलांहून एक पाऊल पुढे होते. बाजीरावांच्या योजना आणि बुद्धीचा योग्य वापर करून बाजीरावांच्या मनातील मनसुबे त्यांनी पूर्णत्वास नेले. नानासाहेबांनि पुढे केलेली राजकारणं हे मनसुबे बाजीरावांचेच होते याला हिंगणे दप्तरांतील चिमाजीअप्पांचं पात्र साक्ष आहे. असा हा पेशवा हिंदुत्वाचा परीघ केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर महाराष्ट्राबाहेर फैलावून अखेरीस दि. २८ एप्रिल १७४० रोजी महायात्रेस प्रयाण करता झाला; पण आपली स्वप्नं पुढल्या पिढ्यांना दाखवून, त्यांच्यात ही हिंदुत्वाची-महाराष्ट्रधर्माची उर्मी रूजवूनच.
© कौस्तुभ कस्तुरे
(सदर लेख जून २०२२ सालच्या एकटा मासिकाच्या 'हिंदुत्वाची विजयपताका' या विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे.)