शिवछत्रपती महाराजांची रामभक्ती
छत्रपती शिवराय हे शिवशंकराचे भक्त होते हे गोष्ट सर्वश्रुत आहे. शिखर शिंगणापूरचा शंभूमहादेव हे वेरूळच्या भोसले घराण्याचं कुलदैवत, त्यामुळे शिवभक्ती ही अर्थातच असणार. पण, यासोबतच, शिवराय प्रभू श्रीरामांचेही तितकेच भक्त होते ही गोष्ट आपल्याला माहीत आहे का? रामायणाचा पगडा जनमानसावर गेली हजारो वर्षे आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांवर तो नसता तरच नवल.
शिवाजी महाराज हे जणू काही भगवान विष्णूचंच रूप आहेत असं परमानंदादी समकालीन कवींचं मत होतं. राजा हा विष्णूचा अवतार असतो ही धारणा या मागची होती. पण शिवरायांच्या लहानपणी त्यांनी जी जी निरनिराळी शस्त्र-शास्त्र शिकली त्यात श्रुती-स्मृती-पुराणांसोबतच रामायण आणि महाभारतही शिकलं असल्याचं कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर आपल्या अणुपुराण या ग्रंथात नमूद करतात (शिवभारत १०।३४). या रामायणाचा पगडा म्हणूनच काय, पण महाराजांनी जातीने लक्ष घालून वसवलेल्या राजगडाच्या एका माचीला सुवेळा हे नाव दिलं. श्रीरामांनी लंकेवर हल्ला चढवण्यापूर्वी टी नेमकी आहे कशी हे दुरून पाहण्यासाठी लक्ष्मण, बिभीषण, आणि सुग्रीवासह सुवेळा पर्वतावर आरोहण केलं आणि तिथून, दुरून ही रावणाची राजधानी पाहिली असं वर्णन रामायणात आढळतं. इथे, राजगडच्या पूर्वेकडील माचीवर एक मोठा पर्वत आहे, ज्याला हाच रामायणाचा संदर्भ लक्षात ठेऊन महाराजांनी सुवेळा असं नाव दिलं. संजीवनी हे नाव जरी औषधी वृक्षाचं असलं तरीही त्या माचीचं नावही रामायणातील हनुमंताने आणलेल्या संजीवनीवरून तजवळ असण्याची शक्यता जास्त आहे.
दि. १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी महाराजांनी प्रतापगडाखाली अफजलखान मारून पुरा केला. यानंतर महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले आणि जवळपास सात महिन्यांनी राजगडावर येऊन पोहोचले. या वेळेस महाराजांनी एक विशेष दरबार भरवून प्रतापगड आणि पन्हाळा या दोन्ही समरांगणात पराक्रम गाजवलेल्या वीरांचं कौतुक केलं. या वेळेस महाराजांनी अज्ञानदास नावाच्या शाहिराला बोलावून त्याला पोवाडा रचायला सांगितला. शाहिराने पोवाडा रचला. या पोवाड्यात दोन ठिकाणी शिवराय आणि श्रीरामांचा संबंध शाहीर दर्शवतो. पहिला प्रसंग म्हणजे, खान जेव्हा महाराजांना कपटाने समजवायला पाहतो तेव्हा महाराज त्याला जशास तसं उत्तर देताना म्हणतात, "खाना, ज्याची करणी त्याला! काही एक भावे रघुनाथाला! तुम्ही जातीचे कोण? आम्ही जाणतो तुम्हाला!" पोवाड्याच्या शेवटीही प्रतापगड आणि पावनखिंड या दोन्ही युद्धात प्रचंड शौर्य गाजवलेल्या जेधे-बांदल घराण्याचं कौतुक करताना अज्ञानदासाने दोन ओळी मोठ्या झोकात उठवल्या, "जैसे अंगद हनुमंत रघुनाथाला, तैसे जेधे बांदल शिवाजीला!!" इथे अज्ञानदासाने उघडउघड महाराजांना प्रभू श्रीरामाची उपमा दिली आहे आणि जेधे-बांदलांना अंगद-हनुमानाची.(अज्ञानदासाचा पोवाडा).
शिवरायांनी संभाजीराजांच्या शिक्षणासाठी केशव पंडित पुरोहित नेमून दिला होता. या केशव पंडितांच्या मृत्यूनंतर पुढे त्यांच्या पुत्राला, रामचंद्रभट पुरोहिताला संभाजी महाराजांनी काही इनाम दिलं. हे इनामपत्रं प्रसिद्ध झालं आहे. यात संभाजी महाराज लिहितात, "कै. स्वामींनी (रामचंद्राच्या) तीर्थरूपाचे मुखे रामायण, पुराण श्रवण केले" (सनदापत्रे, ले.४४). या पत्रात कै. स्वामी म्हणजे शिवाजी महाराज. यावरून केवळ लहानपणीच नाही, तर पुढेही महाराज वेळ मिळेल तसं रामायण आणि पुराणे श्रवण करत होते हे उघड आहे.
शिवरायांनी आपल्या पुत्राचं नाव 'राम' ठेवलं हा सगळ्यात मोठा पुरावा आहे शिवरायांच्या रामभक्तीचा. यापूर्वी भोसले घराण्यात विष्णूशी निगडित नावं सहसा दिसत नाहीत, राम हे तर नाहीच नाही. पण महाराजांनी आपल्या धाकट्या पुत्राचं नाव 'राजाराम' ठेवलं यावरून त्यांच्या मनात असलेला श्रीरामाप्रतीचा पूज्यभाव प्रकट होतो. रामायण हे अर्थातच पूर्वीपासून श्रवण केलं जात असेल, पण महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिमी पट्ट्यात श्रीराम आणि हनुमंत या देवता दृढ करण्याचं सर्वात मोठं काम कोणी केलं असेल तर ते म्हणजे समर्थ रामदासस्वामींनी. गावोगावी जाऊन श्रीरामाचं चरित्र सांगणं, त्यासोबतच हनुमंत आपला आदर्श मानून त्याप्रमाणे कर्तव्य करणं हा रामदासस्वामी आणि त्यांच्या पंथाचा नित्यनेम होता. इ.स. १६७२-७३ मध्ये प्रमादी संवत्सरी शिवरायांनी चाफळच्या रामनवमीच्या उत्सवाचा ऐकार केला असं स्वतः समर्थ समाधी घेण्यापूर्वी संभाजीराजांना सांगतात. म्हणजेच, चाफळच्या रामनवमीच्या संपूर्ण उत्सवाची जबाबदारी शिवरायांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. हा उत्सव आता सरकारातून केला जाणार होता. या रामनवमीच्या उत्सवासाठी सरकारातून अनेक गावं शिवरायांनी नेमून दिली, आणि रोजच्या पूजा-अर्चा, दिवाबत्तीची सोय करून दिली. यासंबंधी असंख्य पत्रं श्रीसंप्रदायाची कागदपत्रे खंड १ मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. या पलीकडे दि. १५ सप्टेंबर १६७८ म्हणजेच विजयादशमीचं एक मोठं सनदपत्र अत्यंत महत्वाचं आहे.
पुढे, दि. २ सप्टेंबर १६७५ सालचं एक पत्रं आहे, ज्यात जवळीतील पारमाची भागात नलवडा नावाचं एक खेड होतं. इथे रामदासस्वामी आले, त्यांना ते स्थान आवडलं आणि पुढे त्यांनी महाराजांना म्हटलं की इथे एक नवी पेठ वसवावी आणि तिचा सरकारात घेण्यात येणारा वसूल बारा वर्षापर्यंत माफ करावा. महाराजांनी समर्थांची ही 'आज्ञा' म्हणून स्वीकारली. हे मी म्हणत नाहीये, हे स्वतः महाराजांनी पत्र लिहून या पेठेच्या मोकडं, उदमी आणि बाजे लोकांना पत्र लिहून कळवलं आहे, की "कोडमजकूरी श्री (समर्थ) येऊन राहिलिया उपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणि बारा वर्षेपावेतो दिवाणात हासील माफ म्हणून कौल देवीला." (संप्रदायाची कागदपत्रे खंड १, ले.१३)
एकंदरीतच, महाराजांच्या आयुष्यात श्रीरामांची भक्ती आपल्याला ठायीठायी दिसून येते. रामदासी संप्रदायाबद्दल जे शिवरायांनी सुरु केलं ते पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज आदी साऱ्याच छत्रपतींनी कायम पुढे सुरु ठेवलं. अशी होती शिवरायांची रामभक्ती!
© कौस्तुभ कस्तुरे
.png)
