ऐतिहासिक पत्रवाचनातील नजरचुका आणि गमतीजमती

 

ऐतिहासिक पत्रं वाचणं हे मोठं जिकिरीचं काम आहे. म्हणजे मोडी-फारसी येणं या दृष्टीने नाही; अगदी जरी कोणी लिप्यंतर/भाषांतर करून दिलं तरीही पत्राचा अर्थ लावणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. अशी अनेक उदाहरणं आजवर नजरेत आली आहेत. त्यातच भरीस भर म्हणून नुकत्याच घडून गेलेल्या टिपू सुलतान प्रकरणात अनेक जणांनी एक पत्र 'महादजी शिंदे यांनी लिहिलेलं' म्हणून दाखवलं; कसलीही शहानिशा न करता दाखवलं. पण ते पत्रं महादजींनी लिहिलेलं नाही. का आणि कसं? सांगतो. 

सगळ्यात आधी, पूर्वीची पत्रलेखनाची पद्धत कशी होती ते स्पष्ट करतो. हल्लीसारखं whatsapp किंवा कोणत्याही चॅनेलवर कोणत्याही एका मेसेजला 'रिप्लाय' देण्याची पद्धत असते तसलं पूर्वी काही नव्हतं हे उघड आहे. एका दिवसात अशी अनेक पत्रे येत असत; तेव्हा एखाद्या पत्राचं उत्तर द्यायचं झाल्यास नेमकं कोणत्या पत्राचं उत्तर समोरच्याने पाठवलं आहे हे सांगण्यासाठी मूळ पत्राचा काही भाग उद्धृत करण्यात येत असे. त्यानंतर मग त्या मूळ मजकुरावर काय पावलं उचलली ते सांगण्यात येत असे. या टिपूच्या पत्राच्या बाबतीत आणखीन घोळ वेगळाच आहे. इथे तीन माणसं आहेत. पहिला माणूस म्हणजे जो स्वतः पत्र लिहितोय तो, दुसरा माणूस म्हणजे महादजी शिंदे, आणि तिसरा माणूस म्हणजे नाना फडणवीस. आता पत्र डिकोड करून सांगतो.

खाली चित्रात पूर्ण पत्र दिलेलं पत्र आहे. यात सुरुवातीला लाल चौकटीत लिहिलेला मजकूर नीट पहा. त्यात लेखक म्हणतो "टिपूकडे आशय स्नेहाचा आलाच आहे. हेही सूत्र बळकट झाल्यास चांगले आहे. इंग्रजांनी काबू केली आहे. आपणही सावधतेस चुकू नये. टिपूचे साधन झाल्यास करणे सलाह आहे" असं तुम्हाला राजश्री पाटीलबावांनी लिहायला सांगितलं ते तुम्ही लिहून पुढे मला पाठवून दिलं; ते सगळं मला समजलं. म्हणजे ही अवतरणचिन्हातली गोष्ट महादजींनी नाना फडणवीसांना कळवली, ती नानांनी पुढे दक्षिणेत टिपूच्या मोहिमेत असलेल्या वकिलाला (त्याचं नाव नेमकं आत्ता माहित नाही) कळवली, पत्रलेखकालाही ती गोष्ट कळली. आता या वरच्या मजकुराच्या पुढे असलेला सारा मजकूर हा पत्रलेखक स्वतःच्या बाजूने सांगतो आहे. म्हणजेच, पुढच्या केशरी रंगाच्या चौकटीतील मजकूर हा ना नाना फडणवीसांचा आहे ना महादजी शिंद्यांचा आहे. दक्षिणेतला वकील टिपूच्या साऱ्या हालचाली पाहून बातम्या कळवतो आहे. 

यात झालं असं, की मुळात सालबाईच्या तहानुसार हैदराने वागणं अपेक्षित असता हैदर १७८२ मध्ये मृत्यू पावला आणि दिपू गादीवर आल्यावर त्याने अदूरदृष्टी आणि आत्यंतिक माजामुळे साऱ्यांशीच वितुष्ट पत्करलं. अशात मुंबईकर इंग्रजांची संमती नसताना मद्रासकर इंग्रजांनी तपीशी परस्पर तह केला. वॉरन हेस्टिंग्ज हा तत्कालीन गव्हर्नर जनरल महादजी शिंद्यांशी मैत्रीच्या करारात होता. त्यानेही मद्रासकर इंग्रजांना टिपूशी केलेल्या या मैत्रीबद्दल फटकारलं. इकडे नाना फडणीस आणि महादजी यांच्यातही टिपूच्या या अशा वागण्याने आणि इंग्रजांनी परस्पर टिपूशी तह केल्याने काहीसं वितुष्ट आलं; आणि त्यामुळे महादजी शिंदे हेस्टिंग्जवर उखडले. अखेरीस या साऱ्याचा परिणाम असा झाला की इंग्रज आतून एकमेकांना मिळाले नसतील कशावरून, आणि हेस्टिंग्ज आपल्याशी वरकरणी मैत्री दाखवूनही आतून मद्रासकरांच्या मताचा नसेल कशावरून असं महादजींनी वाटलं असल्याची शक्यता आहे. म्हणूनच, महादजींनी या खाली नमूद केलेल्या पत्रातील लाल चौकटीतल्या मजकुरात "इंग्रजांनी टिपूवर आपला हुकूम चालवायला सुरुवात केली आहे, आपण आता सावधतेस चुकू नये. इंग्रज बाहेरचे आहेत, आता टिपूची मदत करता येत असल्यास आपण ती करावी (टिपूचे साधन जाल्यास करणे सलाह आहे)" असं म्हटलं. याला दुजोरा म्हणजे या पत्राच्या सोबतच आणखी एक पत्र याच लेखकाने पुण्याला नाना फडणवीसांना लिहिलं आहे, त्यातही इंग्रज-टिपू आणि महादजींबद्दल दिलं आहे. त्यात शेवटी लेखक स्पष्टच म्हणतो, "इंग्रजांची चाल आपले ध्यानात आहे. सहवासामुळे येथेही (दक्षिणेतही) समजली". हीच गोष्ट महादजींनाही समजली. म्हणूनच त्यांनी इंग्रजांना शाह देण्यासाठी टिपूची मदत करावी असं पुण्याला नाना फडणवीसांना लिहून कळवलं, जी पुढे दिलेल्या पत्राची सुरुवात आहे.

आता मुख्य मुद्दा, केशरी चौकटीत लिहिलेला मजकूर हा दक्षिणेतील पेशव्यांचा वकील पुण्याला नाना फडणवीसांना लिहून कळवतो आहे. नानांनी त्याला महादजींचं मत सांगितलं की, "इंग्रजांची चाल ठीक नाही तर आपण टिपूची मदत करायला हवी", आणि पुणे दरबारातून टिपूला पत्रही गेलं होतं, ज्याचं उत्तर म्हणून टिपूने "खातरजमेचे पात्र पाठवावे म्हणजे पेशकशीचा ऐवज पाठवतो" असं कळवलं. त्यावर हा दक्षिणेतला वकील नानांना म्हणतो, "पूर्वी पत्र पाठवलं ते आणि आत्ताचं अशा दोन्ही पत्रांना टिपूने व्यवस्थित उत्तर देऊन ऐवज खरंच पाठवला तर तर ठीकच आहे, पण तसं होईल याची चिन्ह दिसत नाहीत. टिपूची चाल ठीक नाही. गर्व आणि उद्दामपणा ठासून भरलेला आहे, वर्तणूकही मनस्वी आहे. नूरमहंमदखानाला टिपूने कळवलं की एके दिवशी मी (टिपूने) पन्नास हजार हिंदू बायकामुलांसह बाटवून मुसलमान केले. पूर्वी मोठमोठे बादशाह आणि वजीर होऊन गळे पण त्यांनाही जे जमलं नाही ते (धर्मांतराचं काम) खुदाच्या कृपेने मी करून दाखवलं. त्याने नवे शिक्के आणि सिंहासन बनवायला घेतलं आहे. आता आपण टिपूशी सख्य करू म्हटलं (जसं पाटीलबावा म्हणतात) तर ते कायम राहून त्याप्रमाणे तो चालेल असं वाटत नाही. पुढेही तो गावंच्या गावं बाटवत चालला आहे. आता हरिपंततात्या इथे आले आहेत.." बाकी, वर टिपूच्या उद्दामपणाचा आणि हिंदूंना बाटवण्याच्या प्रकारचा पुनरुच्चार लेखकाने पुन्हा पत्र संपताना केला आहे. 

गंमत अशी, की, 'महादजी शिंदे ह्यांची कागदपत्रे' मध्ये हे पत्र लेखांक ३३१ म्हणून प्रसिद्ध करताना रियासतकार सरदेसाईंनी सुद्धा 'Mahadji learns from Nana of the revolting atrocities committed by Tipu' असं म्हटलं आहे. केवळ हेच पत्रं नाही, यापूर्वीच्या पत्र क्र. ३३० बाबतही रियासतकारांनी हाच घोळ घातला आहे, आणि मराठी रियासतीच्या सातव्या खंडात पृष्ठ २५७ वर "१७८४च्या पावसाळ्यात नानाने महादजीस लिहिले" असं म्हटलं आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे हे ही दोन्ही पत्रं बारकाईने वाचल्यास लक्षात येतं. पत्राच्या मायन्यातच "राजश्री बाळाजीपंतनाना गोसावी यांस" असं म्हटल्याने हे पत्रं 'नाना फडणवीसांना लिहिलं आहे' हे उघड आहे. पत्रात 'राजश्री पाटीलबावांनी ल्याहायवास सांगितले', 'पाटीलबावांस इतल्ला होईल' वगैरे वाक्यांवरून या पत्रात महादजी थेट कुठेही सहभागी नाहीत, ते ग्वाल्हेरच्या आसपास आहेत हेही उघड होतं. पेशव्यांचा पाटीलबावांकडे असलेला माणूस सदाशिव दिनकर याचाही या पत्रात स्वतंत्र उल्लेख होत असल्याने पत्रलेखक सदाशिव दिनकर नाही हे दिसून येतं. पुढे 'राजश्री हरिपंत सुरपूर तालुक्यापावेतो (सध्याचं कर्नाटकातील शोरापूर) फौजेसुद्धा पुढे आले' या वाक्यावरून लेखक दक्षिण कर्नाटकात कुठेतरी आहे, टिपूच्या हालचाली अत्यंत बारकाईने पाहून पुण्याला कळवतो आहे हे उघड आहे.

सारांश, नमूद केलेल्या पत्रात असलेला मजकूर "टिपूची चाल ठीक नाही.. एके दिवशी पन्नास हजार हिंदू बायकामुलेसुद्धा बाटवून मुसलमान केले, पुढेही गावचे गाव बाटवीत चालला आहे." वगैरे मजकूर हा मूळ पत्रातला असला, खरा असला तरीही दक्षिणेतल्या वकिलाचा आहे. केवळ आणि केवळ पत्र वाचताना नजरचुकीमुळे सरदेसाईंनी तो महादजीच्या तोंडी घातला, आणि पुढे साऱ्यांनी तीच री ओढली. कोणत्याही अभ्यासकाने मूळ पत्र वाचणं का गरजेचं असतं हे यावरून समजून येतं. आणखी एक गम्मत सांगू? या आधीच्या, म्हणजे पत्र क्रमांक ३३० च्या पत्रात दोन तीन ठिकाणी 'पापन' असं एका इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आलं आहे. ती मोडीची चूक असली पाहिजे. ते 'वारन' असं हवं. मोडीत देवनागरी वा काढताना तो 'पा' वाचला गेला, आणि 'र' चं वक्र टोक जास्त वर गेल्याने तोही 'प' वाचला गेल्याने 'वारन'चं 'पापन' झालं. हा 'वारन' म्हणजेच तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज. या दोन्ही चुका निव्वळ नजरचुकीने झालेल्या आहेत. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाईंचं प्रचंड काम पाहता या चुका ०.०१ही म्हणता येतील का नाही अशी शंका आहे, पण अशा लहानशा नजरचुकीने पुढे कसे घोळ होतात ही गंमत सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच.  

जाता जाता आणखी एक गंमत सांगू? इथे मात्र मी संशोधकांचं नाव घेणार नाही, कारण ते हयात आहेत, परिचयाचे आहेत, आणि मुख्य म्हणजे स्नेही आहेत. पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या एका पूर्वप्रकाशित पत्राचा अर्थ पुस्तकात देताना काही वाक्यांचा चुकीचा अर्थ लावला. दि. २ सप्टेंबर १६७५ रोजीचं महाराजांचं कोड नलवडा, मौजे पारमाची (शिवथर खोऱ्यातील गाव) इथल्या पाटील-उदमी लोकांना पत्रं आहे, ज्यात महाराज म्हणतात की, "कोडमजकुरी श्री     येऊनु राहिलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणि बारा वर्षेपावेतो दिवाणास हासील माफ म्हणून कौल देवीला, त्यावरून तुम्हांस कौल दिधला असे". इथे श्री नंतर मोकळी जागा सोडली आहे तिथे रामदासस्वामींचं नाव येतं, म्हणजेच १६७५ मध्ये रामदास हे शिवथर प्रांतात राहायला आले, आणि तिथल्या कोड नलवाडा या गावात ते आल्यावर तिथे त्यांनी पेठ वसवायला महाराजांना सांगितलं, शिवाय पुढची बारा वर्षे या पेठेतून दिवाणात म्हणजे सरकारात 'हासील' (वसूल रक्कम अथवा कर) घेऊ नये असाही कौल देववला. त्यावरून महाराजांनी तिथल्या पाटील-उदमी (वाणी) मंडळींना हा कौल सादर केला. हे पत्रं म्हणजे तोच कौलनामा आहे. मात्र आमच्या संशोधक मित्रांनी यातलं रामदासांचा उल्लेख गाळून ती आज्ञा थेट शिवछत्रपती महाराजांनी केली असं पुस्तकात लिहिलं. ही देखील कदाचित नजरचूकच असावी; ते मुद्दाम केलेलं नसावं अर्थातच याची मला खात्री आहे.

पण एकंदरीतच अशा गोष्टी आहेत. इथे कोणत्याही ऐतिहासिक व्यक्ती अथवा संशोधकांचा अवमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, ही सारी माणसं आपल्याकरिता सदैव वंदनीयच आहेत. पण ऐतिहासिक पत्रं वाचताना काय काळजी घ्यावी लागते, ती किती बारकाईने वाचावी लागतात हे मात्र समजून घेणं आवश्यक आहे. नाहीतर कोणी केला असो वा नसो, पण 'ध' चा 'मा' अशा चुकांमुळे नक्कीच होतो, आणि पुढे मग अल्पांशी का होईना पण पत्राचा आणि संबंधित इतिहासाचा अर्थच बदलतो. अभ्यासकांनी संपादित मजकुरावर अवलंबून न राहता मूळ पत्र नेट लक्ष देऊन का वाचावीत हा एकच धडा यातून घेणं गरजेचं आहे. बहुत काय लिहिणे? लेखनालंकार. 

- © कौस्तुभ कस्तुरे