'पुरंदरे' ग्रंथाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पुरस्कार
अखंडितलक्ष्मीअलंकृत सकळगुणालंकरण विजयीभव राजेश्री कौस्तुभराव कस्तुरे यांजप्रती अनेक शुभाशिर्वाद.
विशेष तरी, आपण लिहिलेले आमच्या पुरंदरे घराण्याचे कवतिक मजला पावले. बहुत आनंद जाहला. परंतु आपल्या कवतिकाच्या शब्दांनी माझे हात अधिकच जड जाहले. कारण, मजवरील दायित्व वाढले.
आपण हे इतिहासाचे अध्याय तीर्थस्वरूप कैलासवासी कृष्णाजी वासुदेव उर्फ बापूकाका पुरंदरे यांच्या चरणी आणि माझ्या करणी सादर केले आहे. परंतु हे कवतिक अवघ्या पुरंदरे घराण्याचे आहे. आम्ही सर्व पुरंदरे कुलोत्पन्न मंडळी श्री तुळजाभवानीच्या आणि श्री मल्हारीमार्तंडाच्या चरणी लीन आहोत. ती आमची कुलदैवते आहेत. आमचे आणखी एक कुलदैवत आमच्या श्वासनिःश्वासात जागृत आहे ते आपणही ओळखता. ते म्हणजे क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज! त्यांचे चरणी आम्ही लीन आहोत. श्री जेजुरी आणि किल्ले पुरंदरगड ही आमची घरे आहेत. कऱ्हेपठार हे आमचे अंगण आहे. श्री सोपानदेवांची समाधी हे आमचे तुळशी वृंदावन आहे, आणि श्री कऱ्हा नदी आमची गंगा आहे. यांच्या आशिर्वादानेच आम्ही सर्व पुरंदरे श्वास घेत आहोत. म्हणूनच आपण अर्पण केलेली बेलफुले आणि बेलभंडार हा आम्हां सर्वच पुरंदरे मंडळींच्याकरिता आहे. त्या सर्वांच्या वतीने मी नम्रतापूर्वक व कृतज्ञतापूर्वक त्याचा स्वीकार करतो. जय भवानी. जय मल्हार.
बहुत काय लिहिणे ? ऐसेच अगत्य जन्मोजन्मी ठेवावे हि विज्ञापना! राजते लेखनावधि!
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
.png)